श्रोत्रयुग्म परिपूत कराया[श्र्लोक : स्वागता]
सावधान जनमेजय राया
जो परेशरत धन्य अहो तो
गोष्पदोपम तया भय होतो II १ II
"प्रतिज्ञा जे केली यदुकुळवरें 'युद्ध न करीं[ शिखरिणी ]
धरीं ना शस्त्रातें कदनसमयीं मी निजकरीं'
घडेना हें मिथ्थ्या जरि तरी न मी भागवत रे"
प्रतिज्ञेतें भीष्मे मनिं अवथिलें या दृढतरें II २ II
[ भुजंगप्रयात ]
पिता शंतनू माय ज्याची नदी जे
स्वयें शुद्ध ऐशास सन्मान दीजे
तसा गर्व तोही हरावा मनाचा
मनाचा असा भाव त्या वामनाचा II ३ II
नृपा ऐकिजे युद्ध देवव्रताचे
गमे हेचि साफल्य तूझ्या व्रताचे
रथी देखिले कृष्ण कौंतेय दोघे
म्हणे भीष्म माझ्या शराते यदो घे II ४ II
भीष्माकडे रव भयानक दूंदुभीचा[ वसंततिलका ]
होतां वदे तनय आनकदूंदुभीचा
'दुश्चिन्ह आजि गमते मज सव्यसाची
जाती शिवा आशिव हे अपसव्य साची' II ५ II
गर्वोक्ति फाल्गुन वदे 'जगदेकराया
आहे असा कवण तो झगडा कराया ?
म्यां काळखंज वधिले अतुलप्रतापी
पौलोमही असुर गोसुरविप्रतापी' II ६ II
[ पृथ्वी ]
पितामह वदे तया 'प्रबळ तूं पृथानंदना !
रमेश रथिं सारथी चतुर वागवी स्यंदना
स्वयें गतवयस्क मी, सरस वीर तूं रे नवा
भिडें रणधुरंधरा ! जया घडो सुखें वा न वा' II ७ II
पारीक्षिता ! मग शरासन पांडवानें[ वसंततिलका ]
ओढूनियां हुतवहार्पित खांडवानें
तों भीष्मदेह रचिला शरतांडवानें
ज्याच्या क्रिये सकळ पद्मभवांड वाने II ८ II
[ इंद्रवजा ]
गांगेय कोपा चढला कसा रें ?
ज्या मानिती हाचि कृतान्त सारे
गर्जोनियां सिंहरवें जयातें
पाहें जणों मारिल आज यातें II ९ II
'त्वां काय कर्म करिजे लघुलेंकरानें ?[ वसंततिलका ]
बोलोनियां मग धनू धरिलें करांनें
तें व्यापिलें सकल सैन्य महाशरांनीं
भीष्मे, जसा पतित होय हुताश रानीं II १० II
[ इंद्रवजा ]
तो स्तोम येतां बहु सायकांचा
झालाचि पार्थव्यवसाय काचा
काचावला वीर पुढें धजेना
झाली नृपा ! सर्व भयांध सेना II ११ II
पुष्पवर्ण नटला पळसाचा[ स्वागता ]
पार्थ सावध नसे पळ साचा
पहिलें जंव निदान तयाचें
तों दिसे वदन आनत याचें II १२ II
प्रतोद मग ठेविला उतरला रथाध:स्थळीं[ पृथ्वी ]
म्हणे, 'प्रबळ भीष्म हा जय घडे न या दुर्बळीं
करीं कमळनेत्र तो प्रथित चक्र तें स्वीकरी
प्रमोद यमनंदना बहु तया यशस्वी करी II १३ II
असा येतां देखे रथ निकट तो श्यामल हरी[ शिखरिणी ]
नृपा ! गांगेयाच्या हृदयिं भरल्या प्रेमलहरी
शरातें चापातें त्यजुनि वदला गद्गद रवें
'जगन्नाथें केलें मज सकळ लोकांत बरवें II १४ II
[ स्वागता ]
ये रथावरि झणीं यदुराया
खड्ग देईन विकोश कराया
तोडिं मस्तक पडो चरणीं या
धन्य होईन तदाच रणीं या II १५ II
मारावें मजला असेंचि असलें चित्ती तुझ्या केशवा[ शार्दूलविक्रीडित ]
तैं माते मग कोण रक्षिल पहा विश्वेश नाकेश वा !
हा मुख्यार्थ जनार्दना ! मज गमे भक्तप्रतिज्ञा खरी
कीजे, सर्व जनांत होईल मृषा हे आपुली वैखरी' II १६ II
[ वसंततिलका ]
हे भीष्मवाक्य परिसोनि जगन्निवासें
केलें विलोकन मृदुस्मित पीतवासें
वेगें फिरोनि चढला मग तो रथातें
पार्थाचिया पुरविणार मनोरथातें II १७ II
— वामन पंडित