नाजुक वेलीवरी लगडल्या गुंजा दो बाजुंनी.
लवली जागोजाग सुमांगी मेंदी काठावरी
तशी बाभळी, शुभ्र ओढणी काटेरी सावरी.
उंच जांभळा डोंगर शोभे सुनील क्षितिजावर;
हिरवट काळें रान तळाशीं, दिसें जरा धूसर.
शिळा घालती रानपाखरें, वारा करि सळसळ;
भवतालीं तर शांती दाटे गभीर अन् कोमल.
तिथेच आहे तुझें चिमुकलें गवताचें झोपडें;
काळेंबाळें तिथे कोकरु दाराशीं बागडें.
दारांशीं तूं उभी : नेसुचें लुगडें गुंजेपरी
लालभडक अन् तंग नेसणी तशीच गुडघ्यावरी.
उभार उघडी; नुसती चोळी तारुण्या सावरी;
लाल मण्यांच्या गळ्यांत पोती; मधे रुप्याची सरी .
साध्याभोळ्या नयनीं नाचे निर्भयता हासरी;
हसें कोवळें अर्भकापरी : भान मनाचें हरी.
नागर नीती शिकवाया तुज आलें तुझियाकडे :
सौंदर्याच्या शांत जलाशयिं टाकावें का खडे ?
— इंदिरा संत
संकलन व संकल्पना: श्री देवराम भुजबळ