A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

24 February 2021

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश ।। ध्रु .।।

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास ।। १ ।।

दंव पिऊन नवेली, झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे, जग उदास उदास ।। २।।

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा, सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही, नवा सुवास सुवास ।। ३ ।।



— सुधीर मोघे

18 February 2021

तारकांचे गाणे

कुणी नाही गं कुणी नाही
आम्हाला पाहत बाई
शांती दाटली चोहिकडे या गं आता पुढेपुढे लाजत लाजत
हळूच हासत खेळ गडे
कोणीही पाहत नाही!सुंदरतेला नटवून,

कोमलतेला खुणवून,
प्रेमाच्या वसतीकरिता
जगदंतर फुलवु आता.
दिव्य सुरांनी गीते गाउनि
विश्वाला निजवायाला वाऱ्याचा बनवू झोला
एखादी तरुणी रमणी
रमणाला आलिंगोनी
लज्जा मूढा भिरुच ती
शंकित जर झाली चित्ती
तिच्याच नयनी कुणी बिंबुनी
धीट तिला बनवा बाई भुलवा गं रमणालाही...

अनेक असले खेळ करूं
प्रेमाशा विश्वात भरूं
सोडुनिया अपुले श्वास
खेळवु नाचवु उल्हास प्रभातकाळी
नामनिराळी होऊनिया आपण राहू
लोकांच्या मौजा पाहू!

9 February 2021

पाणी पडते


पाणी वरून पडते जमिनी गेल्या धागा
पोवळे पेरू लागा

पाणी वरून पडते जमिन शिणारते
मोती-हिरे उणारते !

पाणी वरून पडते पडते उभ्या धारा
तिफणी आल्या घरा

पाणी वरून पडते टपकते थेंब थेंब
करे झाडं–झुडं चिंब

पाणी वरून पडते लहरा मारे मुंग
झोंबे पानोपानी शेंग !

पाणी वरून पडते बाजरा निसवला
दाणा चिकावर आला !

पाणी वरून पडते तूर बारावर आली
वाकल्या फांद्या खाली

पाणी वरून पडते डोले धांडा उसावणी
काढे जसा नाग फणी !

पाणी वरून पडते धरे मिरची फुलोरा
भरारला मोतीचुरा !

पाणी वरून पडते नार चालली वावरा
हाती तिच्या विळा दोरा !

पाणी वरून पडते कसा मोत्यांचा शिरवा
बाग हिरवा हिरवा !

पाणी वरून पडतेकाय पाहता वावरा
धरा धडाल डवरा !

पाणी वरून पडतेबसे दडून हरणी
झाली मुकी मैनाराणी

पाणी वरून पडतेपाहा म्हशी डोबोडोबी
गवळी उभा लोभी !

पाणी वरून पडते नदी दोथडी भरून
धार चालली फुटून

पाणी वरून पडतेमोत्यांचा झाराझुरा
जाते पाणी देवघरा !



धागा = भेगा; लहरा = डोलू लागणे; मुंग = मूग; धांडा = ज्वारीचे ताट; बार = बहर; डोबोडोबी = डबक्याडबक्यात; मोतीचुरा = ज्वारीचा एक प्रकार; धडाल = खुशाल; डवरा = शेतीचे अवजार

5 February 2021

भारतमाता

प्रियतम अमुची भारतमाता
आम्ही सारी तिची मुले
तरी येथली सर्व फुले !
प्रिय आम्हांला येथिल माती
प्रिय हे पाणी झुळझुळते
प्रियकर ही डुलणारी शेते
प्रिय हे वारे सळसळते
प्रियतम अमुचा धवल हिमाचल
बघे भिडाया जो गगना
प्रियतम अमुचे सह्य-विंध्य हे
प्रियतम या गंगा-यमुना
मानव सारे समान असती
शिकवण ही जगतास दिली !
या मातेची मुले सद्गुणी
सर्व जगाला प्रिय झाली !
प्रियतम अमुची भारतमाता
वंदन आम्ही तिला करू
या मातेची मुले लाडकी
सदा तिचा ध्वज उंच धरू !
— शांता शेळके

4 February 2021

कशाले काय म्हनू नही

बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरीनामाइना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हाललं त्याले पान म्हनू नही
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाटा येहेरीवाचून त्याले मया म्हनू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामधी नही पानी त्याले हाय म्हनू नही
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

येहेरीतून ये रिती तिले मोट म्हनू नही
केली सोताची भरती त्याले पोट म्हनू नही

नही वळखला कान्हा तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरी वाटच्या दोरीले साप म्हनू नही
इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही
जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही
ज्याच्यामधी नही चेव त्याले शक्ती म्हनू नही


— बहिणाबाई नथुजी चौधरी

गोगलगाय


बैसूनिया कशावरी
शंखोबाची निघे स्वारी ?
गोगलगाय गोगलगाय
दोन शिंगे बिनापाय !

ऐटीमध्ये पाठीवरी
शंखोबाची बसे स्वारी !
चाल हिची मंद अशी
तीन वाव दार ताशी !

असा काही हिचा थाट
मागे चमचम करी वाट
अंग हिचे लोळागोळा
काय तरी अंगी कळा !

शंखोबाचे छत्र वर
तेचअस्त्र, तेच घर,
नाही पाय, नाही पंख
अकलेचा वरी शंख

नका म्हणू रे टोचूनी
गोगलगाय माझी गुणी,
भयभीत जेव्हा होते
शंखामाजी ही दडते

चतुर हि आसे भारी
जीवालागी जपणारी
पीळ देऊनी पोटाला
निघे आपुल्या कामाला

हळू मार्ग आक्रमीत
गेली गेली, झाली गुप्त !
शोधा बघू, जा जा थेट
चमचमणारी वाट !

सापडेल तुम्हांलागी
चाललीसे निजमार्गी.
गोगलगाय पोटात पाय
म्हण खोटी नव्हे काय ?



— सोपानदेव चौधरी

2 February 2021

कोकिळ

बहुत मधुर ऐशा काढिशी तू रवाला l
परिसुनि बहू लागे नाद माझ्या मनाला ll
टकमक बघतो मी कोठ काही दिसेना l
मधुर कुठून येई शब्द हेही कळेना ll

तरुवर दिससी ना पर्वतीही न पाही l
अवनितल रिकामा, कल्पना होत नाही ll
झुडुप हलत नाही थोर आश्चर्य आहे l
खग न मजसि वाटे शब्द हा धावताहे ll

जवळ रव निघावा तोच तो लांब जावा l
परिसुनि मग का हा जीव ना गोंधळावा ll
अवनितलि निघे हा, की दरीतून येई l
समजत मज नाही की नभी जन्म घेई ll

फिरून फिरून येई शब्द ऐकावयाला l
बहुत रिझवितो तो माझिया बा मनाला ll
जलद जलद चाले रूप पाहावयासी l
त्वरित पळुन तुही फार तो दूर जासी ll

बघुनि परि तुला मी पावलो फार तोष l
लवकर पळसी तू कोकिळा हा न दोष ll
बसुनि परि कुठेही गोड वाणीस काढी l
परिसुनि रव माझे चित्त घेईल गोडी ll

हरित बहुत ऐसे शोभती पंख ज्याला l
सुबक अमल चंचू लाजवी पोवळ्याला ll
मधुर वदुन शब्दां तोषवी मानवाला l
धरुनि जन अशाही कोंडिती की शुकाला ll

म्हणवुनि तुजलागी धाक वाटे जनांचा l
पळुन करिसि वाटे आसरा काननाचा ll
परि न समचि मानी कोकिळा सर्व लोक l
धरुनि तुजसि द्याया इच्छितो मी न षोकं ll

तरुवर सुफलांनी युक्त झाले कितीक l
कुसुमित दिसताती हे किती येथ देख ll
झुळ झुळ झुळ आहे मंद वाहात वात l
निज किलबिल शब्दे पाखरे बोलतात ll

सुरूचिर वनशोभा सोडुनी पिंजर्‍यात l
रुचि न तव मनाला राहणे दे निवांत ll
मम मन न कधी बा इच्छिते जे अनिष्ट l
तुज बहु गमते ते हो स्वचित्तास तुष्ट ll

परि न सकळ माझ्यासारखे लोक पाहे l
म्हणवुनि पिकराया दूर तू दूर राहे ll
बसुनि वरि तरुच्या गोड वाणी वदे तू l
पुरविन मनिचा मी येथ येवून हेतू ll



— मो. ग. लोंढे

शिशिर ऋतूचं गान



हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान
बाई, तरुचे पान न् पान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
हिवात राने पिवळी पडली
उषा धुक्यामधि ही काकडली
ओठच उलले संध्यालाली
नक्षत्रांची रात शहारे गारव्यात हैराण
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
थंडगार किति पवन झोंबतो
ऊन्हाच्याहि उरि काटा उठतो
पानफुलांचा बहर झडपतो
गळेल वाटे चांदण्यात हे निळे नभाचे पान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
फुले जळाली, पाने गळली
फळांत जरि रसधार गोठली
सर्व सृष्टि जरि हिमे करपली
पिवळ्या पानांच्या मनि फुलते वसंतस्वप्न महान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !


— वा. रा. कांत