A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

30 May 2021

अरे ,अरे कळसा

—अरे,अरे कळसा,
हसून नको पाहू !
पायरीचा मी दगड
तुझाच कि भाऊ !

—मी तर बडा कळस !
माझा किरीट झळझळीत;
पायरीचा तू दगड
पडलास धूळ गिळीत

—अरे,अरे कळसा,
जरा बघ – जरा तरी,
पायरीचा मी दगड
तुझा भाऊ – गरीब जरी

—मी उंच कळस !
चढणार आकाशी !
पायरीचा तू दगड
पडणार तळाशी


—अरे,अरे कळसा,
नको गाल फुगवून बसू;
पायरीचा मी दगड
तरी भाऊ भाऊ असू

—डौलदार मी कळस !
माझा मुकुट कसा छान !
पायरीचा तू दगड,
तुझा पैजारांचा मान

—अरे,अरे कळसा,
नको झिडकारू मला;
भाऊ ना मी तुझा,
माझा दादा तू भला

—कुठे मी कळस !
मला ठेंगणे आभाळ !
पायरीचा तू दगड,
आपली पायरी सांभाळ !

कळसाचा दगड
गर्वाने चढला;
पायरीचा दगड
मान घालून बसला

इतक्यात आला सज्जन
देवदर्शन करीत
पायरीवर बसला
'राम राम' करीत

तितक्यात आला कावळा
पंख फडकावीत
जाऊन बसला कळसावर
'काव काव ' करीत !



— रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले

15 May 2021

जो बाळा जो

आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ घातला
सृष्टी माऊली लागे गायाला... जो बाळा जो जो रे जो ||

बाई गं माझं बाळ गुणाच
रांगत होतं तरी केव्हाच
लाल दिसती डोळे झोपेचे
निज रे बाळा निज सुखाने... जो बाळा जो जो रे जो ||

निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळ नीज भास्करा... जो बाळा जो जो रे जो ||

आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा... जो बाळा जो जो रे जो ||



– अज्ञात

हे अंगाईगीत श्रीमान जागृत यांच्या मदतीने पूर्ण झाले. संकलक श्री जागृत यांचा आभारी आहे.

14 May 2021

जय भारता


जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते
जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते
जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा
प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृक्ष हो, हे अंबरा
परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले
यज्ञात जे धन अर्पिले
शतकांत जे हृदयी फुले
उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडळ हो उभा
गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा
दलितांस हा नित्‌ तारता जय भारता, जय भारता

— कुसुमाग्रज

चालता चालता काय होते

समोर समोर चालता चालता
शेवटी संपून जाईल रस्ता,
आकाश राहील उभे पुढ्यात,
चांदोबाला लागेल हात.
असे काही मनात धरून
चालत सुटतो रस्त्यावरून.

गळ्यात गलोल, हातात छडी,
खिशात शेंगदाण्याची पुडी.
चालता चालता काय होते,
रेल्वे फाटक आडवे येते.
गाडीला मग 'टाटा' करतो
समोर समोर चालत राहतो.

चालता चालता काय होते,
एक छोटे तळे लागते.
पाय बुडवून, भाकऱ्या खेळून
दाणे खात चालतो फिरून.

पुढे एकदम आले समोर
चिंचेचे वन हिरवेगार !
गलोल मारून चिंचा पाडतो,
चोखत चोखत दुडका पळतो.

मग पुढे काय झाले,
ओसाड माळ, डोंगर आले.
सगळीकडे सामसूम
कडक ऊन घामाघूम.
बसून राहिलो दगडावर
एकटा एकटा... दूर घर...

'आई आई' ओरडू वाटले.
दाटून दाटून रडायला आले.
खाड्र खाड्र बूट वाजले
उंचच उंच कोण आले ?
आरपार घाबरून गेलो,
अंथरुणात मी उठून बसलो.


— इंदिरा संत

13 May 2021

पतंग

हा पतंग, की पाखरू,
म्हणे मज 'आभाळी चल फिरू'.
उंचावर किति वाकड्या
मारितो सारख्या उड्या
कुरणात जसे वासरू
शिवारी अवखळ की शिंगरू.

थरथरे दीपिकेपरी,
गिरगिरे नर्तिकेपरी,
की वारुवरुन वायुच्या
बघे हा स्वार शिलंगण करू .

कितितरी चलाखी दिसे
तैशीच चढाई असे,
जणु दाखवितो की 'पहा
किती मी पराक्रमी, वाघरू ! '

सरसरा चढे वरिवरि
एकेक काय पायरी.
सूर्यास पाहते धरू,
काय हे अंजनिचे लेकरू.


— यशवंत

12 May 2021

चंदन

माझ्या चंदनी खोडाचा
मंत्र: 'झिजणे झिजणे !'
ऊणें लिंपायाला माझें
घाली सुगंधाचे लेणें

झिज केशरी तयाची
तप्त जीवा लावी उटी
आंत उमले भावना
शांत, शीतल, गोरटी !

माझें सुख, माझी तृप्ति
हीच देवपूजा त्याची—
निष्काम ते; अपवाद :
इच्छा एक झिजायाची !

झिजतें तें—जीव माझा
होतो आंत आंत गोळा
अडखळे हात आणि
पाणी तरारतें डोळां—

वृद्ध चंदन तें माझें
नित्य जपलें—जपेन
त्याच्यासाठीं—आण त्याची—
जीव ठेवीन गहाण !



— कृष्ण बलवंत निकुंब

पाऊस

थेंबा थेंबा थांब थांब
दोरी तुझी लांब लांब
आकाशात पोहोचली
तिथे कशी खोचली ?
सर सर सर सर धावतोस
सरीवर सरी गुंफतोस
सरी तुझ्या मोत्यांच्या
रुप्याच्या की सोन्याच्या ?
सरी तुझ्या ओल्या
गंगेत जाऊन न्हाल्या


– ताराबाई मोडक

10 May 2021

अखंड

अखंड - ४

उद्योग जो करी दीनबंधूंसाठी l
ममता ती पोटी ll मानवाच्या ll १ ll

विद्या सर्वां देई सद्गुणांची हाव l
करी नित्य कीव ll अज्ञानाची ll २ ll

थकल्या भागल्या दीना साह्य करी l
उद्योगास सारी ll जपूनीया ll ३ ll

त्याच्या उद्योगास नित्य यश देई l
जगा सुख देई ll जोती म्हणे ll ४ ll


— महात्मा जोतिबा फुले

पाऊस

पाऊस पडतो । पडतो मुसळधार
गंगेला आला पूर । दोन्ही थडी ।। १ ।।

पाऊस पडतो । गरजे पाणी पडे
आकाश जणु रडे । रात्रंदिवस ।। २ ।।

पाऊस पडतो । पडतो सारखा
सूर्य जालासे पारखा । चार दिवस ।। ३ ।।

पाऊस पडतो । विजांचा चमचमाट
धरणीमाता हिरवा थाट । मांडीतसे ।। ४ ।।

मेघ गडगडे । कडाडते वीज
कुशीमध्ये नीज । तान्ह्या बाळा ।। ५ ।।

झाडे झडाडती । विजा कडाडती
धरणीमाये तुझा पती । येत आहे ।। ६ ।।

मेघ गरजतो । पाऊस वर्षतो
कुशीत निजतो । तान्ह्या बाळ ।। ७ ।।

पाऊस थांबेना । राऊळी कशी जाऊ
त्रिदळ कसे वाहू । शंकराला ।। ८ ।।

पाऊसं थांबेना । देउळी कशी जाऊं
बाळाला कशी नेऊ । कडेवरी ।। ९ ।।

पाऊस थांबेना । पाखरे गारठली
आईच्या पदराखाली । तान्ह्या बाळ ।। १० ।।

पाणी पाणी झाले । साऱ्या अंगणात
नको जाऊ तू पाण्यात । तान्ह्या बाळा ।। ११ ।।



— अज्ञात

वाङमयरुपाने आजही अस्तित्वात असलेल्या अनेक लोकगीतांपैकी हे एक प्राचीन ओवीबद्ध लोकगीत आहे. या काव्याचा रचयिता कोण, याचे नेमके उत्तर देता येणार नाही.

6 May 2021

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा चमकावी वीज
उतरावी खाली भिनावी रक्तात
पेटावे स्नायू करीत पुकार
पुन्हा एकवार पुन्हा एकदा
घालीत पिंगा पावसाच्या सरी
व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली
मातीत माती व्हावी एक...
पुसून टाकीत भेदाभेद...
पुन्हा एकवेळ... पुन्हा एकदा
घुमावा वारा युवक इथला
भारला जावा भुलावी तहान
विसरावी भूक नवनिर्माणाची
लागावी चाहूल उजळावी भूमी...
दिगंतात...पुन्हा एकदा...


– प्रतिमा इंगोले

5 May 2021

मी न माझा राहिलो

या नदीला घाट छोटा
बांधुनी मी चाललो !

जन्मली वेदांसवे जी
सिंधु ही सारस्वताची
दे स्मुती आता श्रुतींची
व्यास आणि वाल्मिकींची,
मी इच्या पाण्यात रसिका
थेंब म्हणुनी खेळलो !

मी नव्हे शिल्पज्ञ मोठा,
तंत्र नव्हते माहिती,
चार धोंडे जोडणारी
ही किनाऱ्याचीच माती,
फक्त तिचा चिखल व्हाया
अंतरी मी ओळलो !

या प्रवाहाच्या गतीला
पृथ्वी गातेआरती
जी त्रिकालज्ञास ठेवी
आपुल्या विस्तीर्ण पोटी
ताज बांधो बांधणारा,
मी वडारी जाहलो !

गर्व कुठला, गर्जनाही
या निवांतातून जाई,
ईश्वरी कंठातली का
जाइ कोमेजून जाई ?
लोटताना देह डोई
मी न माझा राहिलो ... !



— मनमोहन नातू