A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

23 February 2022

माझ्या या ओटीवर

माझ्या या ओटीवर
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
टपटप दाणे टिपून जातो — टिपून जातो.
होला येतो नि पारवा येतो,
हू हू घू घू करून जातो — करून जातो
मैना येते नि पोपट येतो,
मंजूळ मंजूळ बोलून जातो — बोलून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थय थय थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.

माझ्या या हौदावर
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
बुडबुड गंगे न्हाऊन जातो — न्हाऊन जातो.
होला येतो नि पारवा येतो,
थेंबथेंब पाणी पिऊन जातो — पिऊन जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पाणी उडवून खेळून जातो — खेळून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थुई थुई थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.

माझ्या या बागेत
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
इकडे तिकडे उडून जातो — उडून जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पेरु, डाळिंब खाऊन जातो — खाऊन जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
आंब्याच्या डहाळीवर झुलून जाते — झुलून जाते.
कोकीळ येतो नि बुलबुल येतो,
गोड गोड गाणी गाऊन जातो — गाऊन जातो.



— ताराबाई मोडक

21 February 2022

पाणी-पाणी

वर कोर्‍या आभाळाची
भट्टी तापली तापली,
खाली लेकरांची माय
वारा पदराने घाली.

वाऱ्याखाली कसेबसे
उभे रोप जवारीचे,
एक मलूल पोपटी
दोन सुकल्या पात्यांचे.

उभी कोणाच्या दारात
रांग भुकेल्या बाळांची,
थाळा वाडगा घेऊन
अशी तिष्ठत केव्हाची.

पोरक्या या अर्भकांना
एक पाणी का मिळेना,
उभा डोळ्यामधे थेंब
तो का सुकून जाईना.


— इंदिरा संत

15 February 2022

श्लोक

[वसंततिलक]


द्रव्यास हे गमन-मार्ग यथावकाश ।
की दान, भोग अथवा तिसरा विनाश ॥

जो घे न भोग-जरि, पात्र-करी न देही ।
त्याच्या धनास मग केवळ नाश पाही ॥


दे दान गुप्त, उपकार करी न बोले ।
मानी प्रमोद जरि मान्य घरास आले ॥
'दांवी न गर्व विभवे गुणं घे पराचे ।
खड्गाग्र-तुल्य विषम-व्रत हे भल्याचे ॥



— वामन पंडित

प्रकाशमान व्हा !

त्या अंधाऱ्या प्रदेशात
सूर्योदय घेऊन मी जात आहे.
केविलवाणे सूर्यास्त वळणावळणांवर
खाली मान घालून उभे आहेत
शरणागतांसारखे !

त्यांच्या निर्वासित आशा
हद्दपार झाल्या होत्या शतकांपूर्वीच
बहिष्कृत केलेले होते
त्यांच्या जीवनाचे आनंदोत्सव

दोस्तहो ....... !
तुमच्या डोळ्यांतील वाळवंट पुसून टाका
तिथे पेरायला आणल्यात मी
नवप्रेरणांच्या तेजस्वी बहरकळ्या,
धुऊन टाका चेहर्‍यावरला भयग्रस्त अंधार
प्रकाशाचे दिवे आणलेत मी तुमच्यासाठी
तुमच्या ऐतिहासिक शापांना

तुडवले मी वादळग्रस्त पावलांनी
आणि बंधमुक्त केलेत तुमचे कोंडलेले श्‍वास

राजहंसांनो ....... !
ओळखा तुमच्या तेजस्वी रूपाला
नि लुटा तुमच्या तडफदार युक्‍तीचा विजय

दोस्तांनो ....... !
तुमच्यासाठी मी सूर्योदय आणलेत
प्रकाशमान व्हा, प्रकाशमान व्हा !


— हिरा गुलाबराव बनसोडे

14 February 2022

प्रमाण

[भुजंगप्रयात]

अती कोपतां कार्य जातें लयाला
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम तें कोणतेंही नसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १ ॥

अती लोभ आणी जना नित्य लाज
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ २ ॥

अती मोह हा दु:ख-शोकासि मूळ
अती काळजी टाकणें हेंही खूळ ।
सदा चित्त हें सद्विचारें कसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ३ ॥

अती ज्ञान अभ्यासिल्या क्षीण काया
अती खेळणें हा भिकेचाचि पाया ।
न कष्टाविणें त्वां रिकामें बसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ४ ॥

अती दान तेंही प्रपंचात छिद्र
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरें कोणतें तें मनाला पुसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ५ ॥

अती भोजनें रोग येतो घराला
उपासें अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी कां रुसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ६ ॥

अती स्नेह तेथें अवज्ञा उदंड
अती द्वेष भूलोकिंचे पंककुंड ।
अती मत्सरें त्वां कशाला कुसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ७ ॥

अती आळशी वांचुनी प्रेतरुप
अती झोप घे तोहि त्याचाचि भूप ।
सदा सत्कृतीमाजि आत्मा विसांवें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ८ ॥

अती द्रव्यही जोडितें पापरास
अती घोर दारिद्रय तो पंकवास ।
धनें वैभवें त्वां न केंव्हा फसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ९ ॥

अती भाषणें वीटती बुद्धिवंत
अती मौन मूर्खत्व तें मूर्तिमंत ।
खरें तत्त्व तें अल्पशब्दें ठसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १० ॥

अती वाद घेता दुरावेल सत्य
अती `होस हो' बोलणें नीचकृत्य ।
विचारें तुवां ज्ञानमार्गी घुसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ ११ ॥

अती औषधें वाढवीतात रोग
उपेक्षा अती आणिते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १२ ॥

अती दाट वस्तींत नाना उपाधी
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लहुग्राम पाहोनि तेथें वसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १३ ॥

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी
अती मानितो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १४ ॥

अती भूषणे मार्ग तो संकटाचा
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणीं हसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १५ ॥

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगें शब्द-स्पर्शे डसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १६ ॥

अती भांडणें नाश तो यादवांचा
हठानें अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हें न कोणीं वसावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १७ ॥

अती गोड खाणें नसे रोज इष्ट
कदन्नें अती सेवणें हें कनिष्ठ ।
असोनी गहूं व्यर्थ खावे न सावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १८ ॥

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरें सार शोधोनियां नित्य घ्यावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ १९ ॥

सदा पद्य घोकोनियां शीण येतो
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी तें कधी हेंहि वाचीत जावें
प्रमाणामधें सर्व कांहीं असावें ॥ २० ॥



— कृष्णाजी नारायण आठल्ये

13 February 2022

धरण

बाई मी धरण, धरण बांधिते गं
माझं मरण, मरण कांडिते गं

झुंजूमुंजू गं झालं,
पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा गं
कोंडा मी रांधिते

दिस कासऱ्‍याला आला
जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरू
लेकरू पाटीखाली मी डालते

काय सांगू उन्हाच्या झळा
घाव घालीत फुटे शिळा
कड दाटे कड दाटे
पायी पाला मी बांधिते

पेरापेरात साखर
तुमचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी
सारं रान धुंडाळिते

वेल मांडवाला चढे
माझ्या घामाचे गं अळे
माझ्या अंगणी
अंगणी पाचोळा गं पडे



— दया पवार (दगडू मारुती पवार)

11 February 2022

संताजींची घोडदौड

तळहातीं शिर घेउनियाा दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगलसेना नचही नामोहरम जाहली.
पडली मिठी रायगडला सोडविता नाही सुटली.
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून.
परते सरसेनापतिची घोडदौड संताजीची ||१ ||


मिरजेवर पातशहाची शहाजणें वाजत होती
हाणील्या तायांवर टापा फाडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून घेतला पन्हाळा हातीं
तों कळलें त्या वीराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची घोडदौड संताजीची || २ ||


झुल्फिकारखां लढवय्या कातरली झुल्फे त्याची
धूळधाण केली तेथें किती अमीर-उमरावांची
उसळली तेथुनी मांड मग त्या कर्दनकाळाची
जिंजीचा धुरळा मिटला
जालना प्रांति तो उठला
चोळितो शत्रू नेत्राला
गेली हां हां म्हणतांची घोडदौड संताजीची || ३ ||


वाजल्या कुठें जरि टापा धुरळ्याची दिसली छाया
छावणीत गोंधळ व्हावा “संताजी आया ! आया !”
शस्त्रांची शुद्धी नाही धडपडती ढाला घ्याया
रक्तानें शरिरें लाल
झोंपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
ऐशी शत्रूला जाची घोडदौड संताजीची || ४ ||


गिरसप्पा वाहे ‘धो धो’ प्रतिसारिल त्याला कोण ?
शिशिराचा वारा ‘सो सो’ रोधील तयाला कोण ?
हिमशैल–खंड कोसळतांप्रतिरोधिल त्याला कोण ?
होता जो गंगथडीला
आला तो भीमथडीला
एकाच दिसात उडाला
करि दैना परसेनेची घोडदौड संताजीची || ५ ||


पुरताच बांधिला चंग घोड्यास चढविला तंग
सोडी न हयाचे अंग भाला बरचीचा संग
नौरंगाचा नवरंग उतरला जहाल दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्रा घेई
अंग ना धरेला लावी
भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची || ६ ||


न कळे संचरलें होते तुरगांसहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगेंरिकिबींत ठेवितां चरण
जणुं त्यांसहि ठावे होतेंयुद्धी “जय किंवा मरण”
शत्रूचे पडता वेढे
पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
ऐशी चाल चाले शर्थीची घोडदौड संताजीची || ७ ||


नेमाने रसद लुटावी ‘नेमाजी शिंदे’ यांनी
हयगज सापडती तितुके न्यावे ‘हैबतरावांनीं’
वाटोळे सर्व करावें‘आटोळे’ सरदारांनी
‘खाड खाड' उठती टापा
झेपांवर घालित झेपा
गोटावर पडला छापा
आली म्हणती काळाची घोडदौड संताजीची || ८ ||


चढत्या घोड्यानिशिं गेलाबेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलाणांत ओली न पुशी समशेर
बसवितो जरब यवनांना बेजरब रिसालेदार
वेगवान उडवित वाजी
तोंडावर लढतो गाजी
धावून आला संताजी
पळती मोघल बघताची घोडदौड संताजीची || ९ ||


नावाचा होता ‘संत’ जातीचा होता शूर !
शीलाचा होता 'साधू' संग्रामी होता धीर !
हृदयाचा ‘सज्जन’ होता रणकंदनि होता क्रूर !
दुर्गति ती संभाजीची
दैना राजारामाची
अंतरी सर्वदा जाची
उसळे रणशार्दूलाचीघोडदौड संताजीची || १० ||


मर्दांनी लढवय्यांनी केलेल्या मर्दुमकीची
मर्दांनी गीतें गातां मर्दानी चालीवरची
कडकडे डफावरि थाप मर्दानी शाहिरांची
देशाच्या आपत्कालीं
शर्थीची युद्धे झालीं
गा शाहीरा ! या कालीं
ऐकू दे विजयश्रीची घोडदौड संताजीची || ११ ||



— दु. आ. तिवारी (दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी)


संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

10 February 2022

ओले हिरवे दिवस

गिरिशिखरांवरूनी
सोगे सुटले ढगांचे
ओले हिरवे दिवस
येती, जाती श्रावणाचे

मिटे फुले डोंगरांत
फूल ऊन-सावल्यांचे
स्वप्न दिवसाच्या डोळां
तरळते चांदण्यांचे

ओल्याचिंब अवकाशी
आर्त नाद पावशाचा
पान, फूल होऊ पाहे
कण कण मृत्तिकेचा

विष्णुकांतीच्‍या फुलांच्या
पसरल्या निळ्या राशी
सहस्राक्ष आंथरितो
नेत्र धरेच्या पायांशी

गवताच्या पात्यापरी
भिजलेले माझे मन
इंद्रधनुष्याशी नाते
जोडी तन्मय होऊन



— वा. रा. कांत

9 February 2022

महानतेचा मानदंड तू

भयाण अंधाराने होते जीव कोंदुनि गेले,
जोखड वाहत मानेवरती जगणे नशिबी आले

तुकड्यांसाठी मान विकुनिया केली भिक्षांदेही,
निजधर्माची वा देशाची चाडच उरली नाही

पालखीतुनी मिरवत होते ते विकले गेलेले,
स्वाभिमान अन्‌ क्षात्रतेज तर धुळीत मिळुनी गेले.

या अंधारी दिशादिशांवर प्रकाश फेकित येसी
महानतेचा मानदंड तू, महाराष्ट्री अवतरसी.

स्पर्श तुझ्या पायांचा हो अन्‌ पेटुनि उठली माती,
पायतळीचे दगडहि उठले मिळवित प्राणज्योती.

नजर तुझी संजीवक पडता वठल्या झाडावरती,
समशेरींसह लाख मावळे वीर प्रगटले भवती.

झोपड्यांतुनी उभे ठाकले सशस्त्र गड अन्‌ किल्ले,
तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या, भाले.

पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे परजुनिया,
महाराष्ट्राला महानतेप्रत नेसी तू शिवराया !



— पद्मा विष्णू गोळे

आला आश्‍विन आश्‍विन

आला आश्‍विन आश्‍विन
मऊ धुकं पांघरून
साज दवाचे लेवून
उन्हं केशरी पिऊन

आला आश्‍विन आश्‍विन
तरारली रानं वनं
बहरली उपवनं
रंग-गंधांत न्हाऊन

आला आश्‍विन आश्‍विन
तृप्त झुळुझुळु गाणं
गंधगार रुणझुण
मुक्‍त किलबिल तान

आला आश्‍विन आश्‍विन
शेतामधी झुले सोनं
मन आले भरून
दारी झेंडूंची तोरणं

आला आश्‍विन आश्‍विन
स्निग्ध दुधाळ चांदिणं
अमृताचे ढाळी कण
नभ कोंदे नक्षत्रानं

आला आश्‍विन आश्‍विन
जाती सीमा उल्लंघून
लुटा समतेचं सोनं
गात मानव्याचं गाणं


— विजया व्यंकटेश संगवई

6 February 2022

थवे

बोला कुणाकुणा हवे फुलपाखरांचे थवे
जादूगार श्रावणाच्या कर्णकुंडलींचे दिवे

निळे, जांभळे, तांबडे जर्द पिवळे, हिरवे,
काळे, पांढरे, राखेरी, भुरे, पोपटी, पारवे
कोणी उन्हेरी, चंदेरी, कोणी अंजिरी, शेंदरी,
मोरपिसांपरी कोणी वर्ख ल्यालेले भर्जरी,
कुणी मख्मली, मल्मली, कुणी वर्गंदी, वायली,
किनखापी मुलायम, कुणी शीतल सायली,
कुणा अंगी वेलबुट्टी, चित्रचातुरी गोमटी,
इंद्रधनूचेही वर्ण होती पाहून हिंपुटी.

वर्णलाघवाचे थवे जाती घेत हेलकावे,
कधी थांबून पुसती फुलापानांची आसवे,
कधी पिकलेल्या साळी, कधी साळकांची तळी,
कधी लालगुंज रस्ता जाती लंघून मंडळी,
त्यांच्या लावण्याने दुणा येथे श्रावणाचा हर्ष,
अशा मोसमी गोव्यात खरेच या एक वर्ष,
पण धरायचा त्यांना फक्त करावा बहाणा,
सुखे बघत रहावा सप्तरंगांचा तराणा.



— बा. भ. बोरकर

लावणी गिरणीची

सात वाजता सकाळी । भोंगा वाजवी भूपाळी ।
सुरू होते पहिली पाळी । मोठ्या डौलात ।
चाक फिरे गरगरा । सूत निघे भरभरा ।
नटवाया वसुंधरा। आमच्या घामातुन ॥

लेवुन सूत नऊवारी । नखरा बाबीणीचा भारी ।
कांडी गोल फेरे मारी । मग साच्यातुन ।
झडपीनं घालुन वारा । कापसा न देई थारा ।
जोडुन तुटलेल्या तारा । तारा जुळवून ॥

ऐका घामाची कहाणी । फिरवी कळ जादूवानी ।
तंतूतंतूला जोडूनी । वस्त्र गुंफून ।
रंग घेउन आभाळाचा । हिरव्या सोनाळ शेताचा ।
सातरंगी इंद्रधनुत । वस्र भिजवून ॥

नाना ऋतूंच्या हो कळा । खुलवी माझा वस्त्रमळा ।
मरवा, मोतिया, पिवळा । तुरा खोवून ।
झोंबती चैत्राच्या झळा । भिजे श्रावणात शेला ।
ऊब चोरितो हिवाळा । हेरून ऋतूंचा हा चाळा ।
विणतो माझा कबीर भोळा । जगा नटवून ॥

मलमल आणिक दोरवा । झोक साडीचा हिरवा ।
शालू पैठणी भगवा । झळके पीतांबर ।
शोभे काळी चंद्रकळा । मोरपिसावानी डोळा ।
जणू गुलाबाचा कळा । टाकी भुलवून ॥



— नारायण सुर्वे

1 February 2022

अशी आमुची मुले

वडाच्या पारंब्या लोंबतात, लोंबतात
त्यांचे झोपाळे झुलतात, झुलतात
झुलत्या झोपाळ्यांवर बसतात, बसतात
अशी आमची मुले, रानची फुले
धीट बाई धिटुकली, धिटुकली
भीत नाहीत पिटुकली, पिटुकली

छोटे-मोठे डोंगर चढतात, चढतात
कोल्होबाच्या मागे धावतात, धावतात
लांडग्याची खोड मोडतात, मोडतात
अशी आमुची मुले, रानची फुले
धीट बाई धिटुकली, धिटुकली
भीत नाहीत पिटुकली, पिटुकली

भरभर झाडावर चढतात, चढतात
खणखण कुदळीने खणतात, खणतात
रोपांची लावणी करतात, करतात
अशी आमुची मुले, रानची फुले
धीट बाई धिटुकली. धिटुकली
भीत नाहीत पिटुकली, पिटुकली

उन्हातान्हात हिंडतात, हिंडतात
वार्‍यापावसांत भिजतात, भिजतात
थंडीचा कडाका सोसतात, सोसतात
अशी आमुची मुले, रानची फुले
धीट बाई धिटुकली, धिटुकली
भीत नाहीत पिटुकली, पिटुकली



—  अनुताई वाघ 

संकलन व संकल्पना: श्रीमती वनमाला पाटील, जालना