(जाति : समुदितमदना)
आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साउली,मृदुल, कोंवळी, श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढतीं झरा खळाळत खडकांतुन चालला,
साध्या, भोळ्या गीतामध्यें अपुल्या नित रंगला !
कांठी त्याच्या निळीं लव्हाळीं, डुलती त्यांचे तुरे,
तृणांकुरांवर इवलालीं हीं उडतीं फुलपांखरें !
खडा पहारा करिती भंवतीं निळेभुरे डोंगर,
अगाध सुंदर भव्य शोभतें माथ्यावर अंबर !
दुर्मिळ ऐशी देइ शांतता सदा मला हें स्थल,
ऎकुं न येई इथें जगाचा कर्कश कोलाहल.
व्याप जगाचा विसराया मी येइ इथें सत्वर,
अर्धोन्मीलित नयनीं बघतें स्वप्नें अतिसुंदर.
शांतविलें मी तप्त जिवाला इथें कितीदां तरी;
कितीदां यावें तरी येथली अवीट ही माधुरी !
— शांता ज. शेळके