रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

May 28, 2012

आहे मनोहर तरी गमतें उदास

(वसंततिलका)

सर्वांगसुंदर, सुभूषणवस्त्रयुक्त
चैतन्य, वाणि, मन, बुद्धिहि ज्या प्रशस्त
ऐसे शरीर, परि शील नसे तयास
आहे मनोहर तरी गमतें उदास II १ II

वैडुर्य-आदिकरुनी बहुदिव्यरत्नीं
शृंगारिले भवन की विविधप्रयत्नी
नाही तयांत गृहिणी जरि, तें मनास
आहे मनोहर तरी गमतें उदास II २ II

सौंदर्यखाणि, सुनया, विमला, सुशीला
विद्याविभूषित गुणी अशि मुग्ध बाला
दैवेचि हो गतधवा जरि ती जनास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ३ II

आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी
उद्यान एक भरले, लतिकाविशेषी
तेथें परंतु न वसंत करी विलास
आहे मनोहर तरी गमते उदास II ४ II

पुष्पे, फले, खग, मुले, सुविचारमाला
नक्षत्रपंक्ति, गगनी तशिही विशाला
ऐशा मनोहर चमत्कृति पूर्ण खास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ५ II

निद्रेत मी नृपति होउनी, सौख्य भोगी
कीं चित्पदी मिळुनि जाइं बनोनी जोगी
जेव्हां कळे सकल हा परि स्वप्नभास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ६ II

विद्या, कला, कुशलता, बहु जेथ होत्या
जैं सृष्टिसुंदरिविलासनिवास होत्या
उत्साहहीन बघता अजि भारतास
आहे मनोहर तरी गमतें उदास ! II ७ II

विद्वान सुशिक्षित समाजधुरीण लोक
मोठ्या उदार मतिने लिहितात लेख
तैशा कृती न करिती, स्थिती ही मनास
आहे मनोहर तरी करिते उदास II ८ II—  सरस्वतीकंठाभरण (दिनकर नानाजी शिंदे)


श्री. उपेंद्र चिंचोरे (पुणे) द्वारा संकलित

May 26, 2012

हिरवळ आणिक पाणी

हिरवळ आणिक पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी
निळीतुनी पांखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी

सुखांत चरती गुरेवासरे
लवेतुनी लहरते कापरे
हवेतुनी आरोग्य खेळते गार नि आरसपानी

उरी जिथे भूमीची माया
उन्हात घाली हिरवी छाया
सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानी


जिथे अशी समृद्ध धरित्री
घुमति घरे अन पुत्रकलत्री
रमे श्रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्यी

सख्यापरते जिथे न बंधन
स्मितांत शरदाचे आमंत्रण
सहजोद्वारी गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी

ऋतूऋतुंतून जिथे सोहळे
तसेच उघड्यावरी मोकळे
आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी

माणूस जेथे हवाहवासा
अभंग-ओवीमधे दिलासा
विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी

देव जिथे हृदयात सदाचा
भार मनाला नसे उद्यांचा
सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी— बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

शांत सागरी कशास?

शांत सागरी कशास उठविलीस वादळे ?
काय हे तुझ्यामुळे
देहभान हरपले

युगसमान भासतात आज नाचरी पळे
निमिषमात्र लोचनात
दिव्य तेज दाविलेस

भडकुनी तयेच वन्हि जीव आतला जळे
अमृतमधुर बोल एक
श्रवणी जो न पाडिलास

अधिरता भरे जिवात केव्हढी तयामुळे
पढविल्या वदे वचांस
बद्ध त्या विहंगमास

गायिलेस तू कशास गीत नंदनातले ?
स्वर्ग कल्पनेतला येईल कधी भूतला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे


— संजीवनी मराठे


(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

May 25, 2012

सुंदर मी होणार !

सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार !
सुंदर मी होणार । हो । मरणानें जगणार ।धृ.।

वर्षत्रय मम देह मरतसे, तो आतां मरणार.
वर्षत्रय मम प्राण जातसे, तो आतां जाणार ।१।

प्राशुनि माझ्या रुधिरा हंसतो, तो व्याधी रडणार;
व्याधीक्लेशें रडतो तो मम जीवात्मा हंसणार ।२।

हृद्रोगाच्या ज्वाला विझुनी सुख माझें निवणार;
माझा मृत्यू माझा सारा अश्रुपूर गिळणार ।३।

कंटक-पंजर तनु-पीडेचा पिचूनिया फुटणार;
बंदिवान मम आत्मा चातक सुखेनैव सुटणार ।४।

जुनी इंद्रियें, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार;
नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार ।५।

त्या पंखानीं कर्तृत्वाच्या व्योमीं मी घुसणार;
देशहिताच्या पवनसागरी पोहाया सजणार ।६।

प्रतिभाप्रसन्न नव बुद्धीची, चंचु मला येणार;
चंचुरूप मुरलीनें प्रभूचे काव्यगान होणार ।७।

मम हृदयांतरी ज्ञानफुलांचा फुलबगिचा फुलणार;
फुलांत झुलुनी आत्मदेव मम नवानंद लुटणार ।८।

नवें ओज मज, नवें तेज मज, सर्व नवें मिळणार;
जीर्ण जुन्यास्तव कोण अवास्तव सुज्ञ झुरत बसणार ? ।९।

गहानोगहनीं, भुवनोभुवनीं शोधित मी फिरणार,
भूमातेला हुडकून काढुन तद्दर्शन घेणार ।१०।

माझी भरारी विमान उडतें भरकन तिज देणार,
परवशतेचें जाल तोडुनी उडवुनि तिज नेणार ।११।

उडतउडत मग, रडतरडत मग, प्रभुपाशीं जाणार,
'स्वतंत्र तिजला करा' म्हणूनी तच्चरणीं पडणार ।१२।

व्यंग देह हा याने कामुक काम कसे पुरणार ?
पुरले नच तें पुढतीं पुरवुन आणणार शतवार ।१३।

या जन्मीं नच मोद लाभला, खेद मात्र अनिवार,
प्रीती अतृप्ता, तृप्ति अशांता, जन्म मला देणार ।१४।

मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरतीं खुलणार;
सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्यें घडणार ! ।१५।

तळमळ हरुनी कळकळ देई मृत्यू असा दातार,
कळकळ भक्षुनि जळफळ वितरी रोग असा अनुदार ।१६।

प्रेम हांसतें, हास्य नाचतें, मृत्यूचा परिवार;
शोक क्रंदतो, भय स्फुंदतें, रोगाचा दरबार ।१७।

जगण्यांच्या नव अवताराचा मरणें हा व्यवहार;
जगतें जगणें प्रभुप्रमाणें, मरणें क्षण जगणार ।१८।

मरण्याविरहित जगणें मिळवूं असा करूं निर्धार;
शाश्वत जगण्यामधें, कोठचा दु:खाचा संचार ।१९।

आनंदी-आनंद जाहला, तनुक्रांति होणार !
मरणाचा परमेश्वर मजवर करुणाघन वळणार ! ।२०।

आनंदी-आनंद जाहला, मरतां मी हंसणार;
हांसत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार ! ।२१।


— गोविंद (गोविंद त्रिंबक दरेकर)

May 24, 2012

स्फूर्ति

(जाति-हरिभगिनी)

कांठोकांठ भरु द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या !
प्राशन करितां रंग जगाचे क्षणोक्षणीं ते बदलूं द्या !

अमुच्या भाळीं कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपी, पर्वा कसली मग याची !
जिव्हेचीं बंधनें तर ढिलीं करा तीव्र या पेयानें,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगानें !
होउनियां मग दंग मनी,
व्हावे तें आणा ध्यानीं,
गा मग सुचतिल तीं गाणीं;
परिसुनि त्यांचे शब्द, रुढिचे दास झणीं ते खवळूं द्या !
कांठोकांठ भरुं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! IIII

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उसळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हांला !
औचित्याच्या फोल विवेका ! जा निघ या दुरवस्थेनें
अम्हा घेरिले म्हणुनी घेतों झिंगुनिया या पानानें !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरि जाऊं,
उड्डरत्‍नें या गरिब धऱेला तेथुनि फेंकुनियां देऊं !
अडवतील जर देव, तरी
झगडूं त्यांच्याशी निकरीं,
हार न खाऊं रतीभरी !
देवदानवां नरें निर्मिलें, हें मत लोकां कवळूं द्या !
कांठोकाठ भरूं द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! IIII

पद्यपंक्तिची तरफ आमुच्या करीं विधीनें दिली असे,
टेंकुनि जी जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसें !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे –
उडवुनि देउनि जुलमाचे या करुं पहा तुकडे तुकडे !
‘महादेव ! हरहर !’ समराचा गर्जत तो वार्‍यावरती
येउनि घुमतो अमुच्या कणीं – “निजती ते ठारची मरती !”
उठा ! उठा ! बांधा कमरा !
मारा किंवा लढत मरा !
सत्त्वाचा ‘उदयोऽस्तु’ करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तिमित जगाला ढवळूं द्या !
कांठोकांठ भरूं या पेला, फेंस भराभर उसळूं द्या ! IIII


- केशवसुत (मुंबई, १८९६)

May 19, 2012

मराठी माती

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा;
हिच्या संगाने जागल्या,
ऱ्याखोऱ्यांतील शिळा II १ II

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात;
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात II २ II

नाही पसरला कर,
कधी मागायास दान;
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान II ३ II

हिच्या गगनांत घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही;
हिच्या पुत्रांच्या बाहूंत,
आहे समतेची ग्वाही II ४ II

माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर
मला हिचे महिमान II ५ II

रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे
सरस्वतीची पालखी II ६ II

रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली
झाले वसुधेचे घर II ७ II

माझ्या मराठी मातीचा
नका करू अवमान
हिच्या दारिद्ऱ्यात आहे
भविष्याचे वरदान II ८ II

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा;
हिच्या संगे जागतील,
मायदेशांतील शिळा II ९ II


— कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)

मी वाचवतोय

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
शाळांतून बाद होतेय बाराखडी आणि अंकलिपी
औटकीसहित सगळे पाढे जातायत विस्मरणात
समोर येत नाहीत आता आधीसारखे
खाटीक, कसाई आणि पालखीचे भोई

हरवत चाललाय किराणा आणि भुसारा
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट

कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
पखालीने मान टाकली कसायासमोर
उभे होण्याआधीच
कावड आणि श्रावणबाळ
इतिहासाच्या अडगळीत

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोर्‍या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकर्‍या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात
दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम थ्रिलर
आणि दंगा करतात वडीलधारी माणसं
गॅस सिलिंडर आणि त्रिशूलाच्या
नवशिक्षित तालावर

लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत
एक-एक इंद्रिय निकामी होत
गळून जाईल शेपटीसोबत
मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत


- सतीश काळसेकर

(Compiled by Ms. Bhakti Parab, Mumbai)