A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label अनिल (१९०१ – १९८२). Show all posts
Showing posts with label अनिल (१९०१ – १९८२). Show all posts

6 March 2022

मानवता

अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही
घाव पडो कोठेही, तडफडू आम्ही

हाल पाहून हळूहळू, होवोत कोठेही
पिळवणूक पाडील पीळ आम्हा, असो कोणाचीही

वजन आमच्या छातीवर, पायांतल्या बेड्यांचे दासांच्या
चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या

अवघ्या अभाग्यांचे अश्रू, उभे आमच्या डोळ्यांत
दु:खितांच्या, वेदनांच्या कळा आमच्याही उरात

संवेदना सार्‍या जगाची
हृदयात आहे भरभरून
नाते नवीन असे काही
जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही


— अनिल

26 November 2021

चाललो

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो
मिसळुन मेळ्यात कधी, एक हात धरुनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो
आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो
चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो
खांद्यावर बाळगिलेओझे सुखदुःखांचे
फेकुन देऊन आता परत चाललो !



— अनिल

22 August 2016

वासरू

ओढाळ वासरू रानी आले फिरू,
कळपाचा घेरू सोडुनिया
चित्रकार : राजेंद्र गिरधारी

कानांमध्ये वारे भरुनिया न्यारे,
फेर धरी फिरे रानोमाळ

मोकाट मोकाट, अफाट अफाट,
वाटेल ती वाट धावू लागे

विसरुनी भान भूक नि तहान,
पायांखाली रान घाली सारे

थकुनिया खूप सरता हुरूप,
आठवे कळप तयालागी

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,
आणखीच भागे भटकत

पडता अंधारू लागले हंबरू,
माय! तू लेकरू शोधू येई.



— अनिल

17 March 2016

शिशिर (हिवाळा)

चढली शिशिर ऋतूची कळा,
आली सृष्टीवरि अवकळा
सुटले सोसाट्याचे माघामधले वारे
गोठलें हिमाद्रिंत गंगाजल कीं सारें ll १ ll

भरली हरिणांना हुडहुडी
ससेंही देउनि बसले दडी
सृष्टीला भरलें हींव, थरथरे अंग
लोपले धुक्यांतच सर्व उषेचे रंग ll २ ll

मिटल्या वेलींवरल्या कळ्या
फुलांच्या झडल्या कीं पाकळ्या
उपवनिंचा गेला बहर सर्व ओसरुनी
कोषातच पडलीं फुलपांखरें मरुनी ll ३ ll

गारठल्या राघू-मैना
पसरें फुलाफुलांवर दैना
झाडांची गळली पात, लता भयभीत
कंठातच थिजलें कोकिळमनिचें गीत ll ४ ll



— अनिल (आ. रा. देशपांडे)

संकलन व संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

16 November 2011

वाट

मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची, नदीच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
अशी भुलवणिची हुलकावणीची
सागवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणिची चढउतरणीची
घाटमाथ्याची ती पलिकडची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधी कुणिकडची
क्षितिजाकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची

— अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)

8 November 2011

तळ्याकाठी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआंतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो कांही
गळून पडत असतां पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!



— अनिल (आ. रा. देशपांडे)

11 June 2011

खेळणी

खेळणी सुंदर लहानपणी माझ्यापाशी होती नाना तर्‍हेची
कांही पेरकुंडी स्वतः केलेली काही पितळी कांही लाकडाची
चिनीच्या भावल्या जरी नव्हत्या तरी होते दोन मातीचे बैल
कांही कळसूत्री करामती होत्या कमान ज्यांची पडते सैल
पुढे हाती आल्या काचेच्या गोट्या भोवरे चक्र्या एक एकामागे
पतंग लहान मोठे लढवाया घोटले मजेत मांज्यांचे धागे
फोडली मोडली किती खेळणी फुटून फाटून आपोआप गेली
थोडे रडू आले पण त्यांतूनच नव्यानव्याची हौस वाढली
खेळण्यांच्या जागी खेळ आले आणि जीवनाचाही खेळ झाला कांही
बाळखेळण्यांमधुन मन अजून निघतां निघत नाही !


— आत्माराम रावजी देशपांडे (अनिल)