रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

December 31, 2009

भंगु दे काठिन्य

भंगु दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनींचे;
येऊ दे वाणींत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.

ज्ञात हेतूंतील माझ्या
दे गळू मालिन्य; आणि
माझिया अज्ञात टाकीं
स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणीं.

राहुं दे स्वातंत्र्य माझें
फक्त उच्चारांतलें गा;
अक्षरां आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.

लोभ जीभेचा जळूं दे
दे थिजुं विद्वेष सारा;
द्रौपदीचें सत्व माझ्या
लाभुं दे भाषा-शरीरा.

जाउं दे 'कार्पण्य' 'मी' चें,
दे धरुं सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र-का​ट्याची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून मातें
शब्द तूझ्या स्पंदनांचे

त्वत्स्मृतीचे ओळखूं दे
माझिया हातां सुकाणू;
थोर-यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.

आण तूझ्या लालसेची,
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.

धैर्य दे अन्‌ नम्रता दे
पाहण्या जें जें पहाणें
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणें;

घेउं दे आघात तीतें
इंद्रिय-द्वारां जगाचे;
पोळुं दे आंतून तीतें
गा अतींद्रियार्थांचें

आशयाचा तूंच स्वामी !
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही,
आणि देणारा मुरारी.

काय मागावें परी म्यां
तूंहि कैसे काय द्यावें;
तूंच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावें !!– बा. सी. मर्ढेकर

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेनें बंदर
मुंबापुरीचें उजळित येई
माघामधली प्रभात सुंदर.
सचेतनांचा हुरूप शीतल;
अचेतनांचा वास कोवळा;
हवेत जाती मिसळुनि दोन्ही.
पितात सारे गोड हिवाळा !

डोकीं अलगद घरें उचलती
काळोखाच्या उशीवरूनी;
पिवळे हंडे भरून गवळी
कावड नेती मान मोडुनी;
नितळ न्याहारिस हिरवी झाडें
काळा वायू हळुच घेती;
संथ बिलंदर लाटांमधुनी
सागर-पक्षी सूर्य वेचती;
गंजदार, पांढर्‍या नि काळ्या
मिरवित रंगा अन नारिंगी,
धक्क्यावरच्या अजून बोटी
साखरझोपेमधीं फिरंगी;
कुठें धुराचा जळका परिमल,
गरम चहाचा पत्ती गंध;
कुठें डांबरी रस्त्यावरच्या
भुर्‍या शांततेचा निशिगंध;
ह्या सृष्टीच्या निवांत पोटी
परंतु लपली सैरावैरा,
अजस्त्र धांदल, क्षणांत देइल
जिवंततेचें अर्ध्य भास्करा.

थांब! जरासा वेळ तोंवरी––
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल;
उरे घोटभर गोड हिवाळा !


– बा. सी. मर्ढेकर

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पितांना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशींच कीं
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवई.
गिऱ्हाइकाची कदर राखणें;
जिरें, धणे अन धान्यें गळीत,
खोबरेल अन तेल तिळीचें
विकून बसणें हिशेब कोळित;
स्वप्नांवरतीं धूर सांडणें
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणें
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोतें;
आडोशाला वास तुपाचा;
असें झोपणें माहित होतें.
काडें गणपत वाण्यानें ज्या
हाडांची हीं ऐशी केलीं,
दुकानातल्या जमीनीस तीं
सदैव रुतलीं आणिक रुतलीं.
काड्या गणपत वाण्यानें ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागतां डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला !

— बा. सी. मर्ढेकर

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे !


- ना. धों. महानोर

जरा अस्मान झुकले

जरा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंगरेखा
संथ पाण्यात न्हालेले

रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दांडात हासले

जरा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उसमळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

-- अश्शी लखाखली बोर
अंगभर चंद्रकोर
उसमळयाच्या गर्दीत
थोडे सांडले केशर !


- ना. धों. महानोर

सर्वात्मका शिवसुंदरा (समूहगान)

सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ॥ ३ ॥

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ४ ॥


- कुसुमाग्रज

सागर

आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे- कुसुमाग्रज

December 25, 2009

सतारीचे बोल

(वृत्त : पादाकुलक)

काळोखाची रजनी होती,
हृदयी भरल्या होत्या खंती;
अंधारांतचि गढलें सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे;
विमनस्कपणे स्वपदें उचलित
रस्त्यातुनि मी होतो हिंडत;
एका खिडकींतुनि सूर तदा
पडले - दिड दा, दिड दा, दिड दा ! ll १ ll
जड हृदयीं जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा;
जड ते खोटें हें मात्र कसे
ते नकळे; मज जडलेंच पिसें;
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावें !
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि हे - दिड दा, दिड दा, दिड दा? ll २ ll
सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हां मज मानवतें;
भुतें भोंवती जरी आरडती
तरि ती खचितची मज आव़डती;
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती;
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते - दिड दा, दिड दा, दिड दा ? ll ३ ll
ऐकूनि ते मज तो त्वेष चढे,
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनी मी हात हिसकला;
पुटपुटलोही अपशब्दांला;
म्हटलें – “आटप, आटप मूर्खा !
सतार फोडुनि टाकिसी न कां !
पिरपिर कसली खुशालचंदा,
करिसी - दिड दा, दिड दा, दिड दा !” ll ४ ll
सरलों पुढता चार पावलें
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरी माघारी;
ध्वनिजालीं त्या जणूं गुंतलो
असा स्ववशता विसरुनि बसलों -
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत - दिड दा, दिड दा, दिड दा !ll ५ ll
तेथ कोपरें अंकीं, टेंकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलों; इतुक्यामाजी करुणा -
रसपूर्ण गती माझ्या श्रवणां
आकृष्ट करी; हृदय निवालें,
तन्मय झालें, द्रवलें; आलें -
लोचनांतुनी तोय कितीकदां
ऐकत असतां - दिड दा, दिड दा ! ll ६ ll
स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे - “खेद का इतुका करिसी ?
जिवास का बा असा त्राससी?
धीर धरी रे ! धीरापोटी
असती मोठीं फळें गोमटीं !
ऐक, मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे – दिड दा, दिड दा, दिड दा !” ll ७ ll
आशाप्रेरक निघू लागले
सूर, तधी मी डोळे पुशिले;
वरती मग मी नजर फिरविली,
नक्षत्रें तों अगणित दिसलीं;
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती!
“तम अल्प - द्युति बहु" या शब्दां -
वदती रव ते - दिड दा, दिड दा ! ll ८ ll
वाद्यांतुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर;
तों मज गमलें विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी;
दिक्कालांसहि अतीत झालों;
उगमीं विलयीं अनंत उरलों;
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकत असतां - दिड दा, दिड दा ! ll ९ ll
प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायातें,
भुललों देखुनि सकलहि सुंदर;
सुरांगना तो नाचति भूवर;
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला - मजला गमला !
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते – दिड दा, दिड दा, दिड दा ! ll १० ll
शांत वाजली गती शेवटी;
शांत धरित्री, शांत निशा ती,
शांतच वारें, शांतच तारे,
शांतच हृदयीं झालें सारे !
असा सुखे मी सदना आलो,
शांतीत अहा ! झोपी गेलो,
बोल बोललो परि कितिकदा
स्वप्नीं - दिड दा, दिड दा, दिड दा ! ll ११ ll


- कृष्णाजी केशव दामले


सौजन्य : keshavsut.com

तुतारी

 (जाति पादाकुलक)

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज लागुनी
अवकाशाच्या ओसाडीतिले
पडसाद मुके जे आजवरी,
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारिता जीला जबरी,
कोण तुतारी ती मज देईल ?
सारंगी ती, सतार सुंदर,
वीणा, बीनहि, मृदंग, बाजा
सूरहि, सनई, अलगुज, माझ्या
कसची हीं हो पडतिल काजा ?
एक तुतारी द्या तर सत्वर.
रुढी, जुलूम यांची भेसुर
संतानें राक्षसी तुम्हाला
फाडुनि खाती, ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला;
तुतारीनें ह्या सावध व्हा तर!
अवडंबरलीं ढगें कितीतरि,
रविकिरणांचा चूर होतसे,
मोहर सगळा गळुनि जातसे,
कीड पिकांवरि सर्वत्र दिसे !
गाफीलगिरी तरिही जगावरि
चमत्कार! ते पुराण तेथुनि
सुंदर, सोज्वळ गोडें मोठें,
अलिकडलें तें सगळें खोटें
म्हणती, धरुनी ढेरीं पोटें,
धिक्कार अशा मूर्खांलागुनि !
जुन्या नभीं या ताजे तारक,
जुन्या भूमिवर नवी टवटवी,
जुना समुद्रहि नवरत्ने प्रसवी;
जुन्यांतून जी निष्पत्ति नवी
काय नव्हे ती श्रेयस्कारक ?
जुने जाऊं द्या मरणालागुनि
जाळुनि किंवा पुरुनि टाका,
सडत न एक्या ठायीं ठाका,
सावध! ऐका पुढल्या हाका !
खांद्यास चला खांदा भिडवूनि !
प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुंदर लेणीं तयांत खोदा,
निजनामें; त्यांवर नोंदा;
बसुनी कां वाढवितां मेदा ?
विक्रम कांहीं करा, चला तर !
अटक कशाची बसलां घालुनि ?
पूर्वज वदले त्यां गमलें तें
ऐका खुशाल सादर चित्तें,
परंतु सरका विशंक पुढते
निरोप त्यांचा ध्यानीं घेउनि !
निसर्ग निर्घृण, त्याला मुर्वत
नाहीं अगदीं पहा कशाची !
कालासह जी क्रीडा त्याची,
ती सकलांला समान जाची
चुरुनी टाकी प्रचंड पर्वत !
त्यांशीं भिडुनी, झटुनी, झगडत
उठवा अपुले इंच मनोरे !
पुराण पडक्या सदनीं कारे
भ्याड बसुनियां रडता पोरें ?
पुरुषार्थ नव्हे पडणें रखडत !
संघशक्तीच्या भुईंत खंदक
रुंद पडुनि शें तुकडे झाले,
स्वार्थानपेक्ष जीवीं अपुलें
पाहिजेत ते सत्वर भरलें;
घ्या त्यांत उड्या तर बेलाशक !
धार धरिलिया प्यार जीवावर,
रडतिल, रडोत, रांडा-पोरें;
गतशतकांचीं पापें घोरें
क्षालायाला तुमचीं रुधिरें
पाहिजेत रे ! स्त्रैण न व्हा तर !
जाऊं बघतें नांव लयाप्रत
तशांत बनलां मऊ मेंढरें,
अहह ! घेरिलें आहे तिमिरें !
परंतु होऊं नका बावरे
धीराला दे प्रसंग हिंमत !
धर्माचें माजवुवूनि अवडंबर
नीतीला आणिती अडथळे;
विसरुनियां हें जातात खुळे :-
नीतीचें पद जेथें न ढळे
धर्म होतसे तेथेंच स्थ्रिर
हल्ला करण्या तर दंभावरतर बंडावर,
शूरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंच धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे
तुतारिच्या या सुराबरोबर !
नियमन मनुजासाठीं, मानव,
नसे नियमनासाठीं, जाणा;
प्रगतिस जर तें हाणी टोणा,
झुगारुनि तें देऊनि, बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !
घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नत्तिचा ध्वज उंच धरा रे !
वीरांनो ! तर पुढे सरा रे
आवेशानें गर्जत "हर-हर" !
पूर्वीपासुनि अजुनि सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती;
संप्रति दानव फार माजती,
देवांवर झेंडा मिरवीती !देवांच्या मदतीस चला तर !
— केशवसुत

पारवा

भिंत खचली, कलथून खांब गेला,
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा;
तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो. ll १ ll
सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे,
घार मंडळ त्याभंवतिं घालिताहे.
पक्षि पानांच्या शांत सांवल्यांत
सुखें साखरझोपेंत पेंगतात. ll २ ll
तुला नाहीं परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची.
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडीत ll ३ ll
चित्त किंवा तव कोवळ्या विकारें
दुखतखुपतें का सांग, सांग बा रे !
तुला कांहीं जगतांत नको मान !
गोड गावें मग भान हें कुठून ? ll ४ ll
झोंप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची ?
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीतें घुमवीत जगी आज. ll ५ ll

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझें जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतांत उष्ण वारें,
तुला त्याचें भानही नसे बा रे ! ll ६ ll
अपूर्ण                                       

— बालकवी

फुलराणी

हिरवे हिरवे गार गालिचे                  हरित तृणाच्या मखमालींचे;
त्या सुंदर मखमालीवरतीं                फ़ुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणांत                अव्याज मनें होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला                 अवगत नव्ह्त्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी                  झोंके घ्यावें, गावीं गाणीं;
याहुनि ठावें काय तियेला                 साध्या भोळ्या फुलराणीला ? ll १ ll

पुरा विनोदी संध्यावात                     डोलडोलवी हिरवें शेत;
तोच एकदां हांसत आला                  चुंबून म्हणे फ़ुलराणीला—
" छानी माझी सोनुकली ती                कुणाकडे गं पाहत होती ?
कोण बरें त्या संध्येतून                    हळुच पाहतें डोकावून ?
तो रविकर का ग गोजिरवाणा           आवडला अमुच्या राणींना ? "
लाजलाजली या वचनांनीं                 साधी भोळी ती फुलराणी ! ll २ ll

आंदोळी संध्येच्या बसुनी                 झोंकें झोंकें घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल                  नभीं चमकती ते ग्रहगोल !
जादूटॊणा त्यांनी केला                     चैन पडेना फुलराणीला;
निजलीं शेतें, निजलें रान                 निजलें प्राणी थोर-लहान.
अजून जागी फुलराणी ही                 आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशीं डोळा                     काय जाहलें फुलराणीला ? ll ३ ll

या कुंजांतुन, त्या कुंजांतुन               इवल्याशा यां दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवांत समयीं            खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर                   निर्झर गातो; त्या तालावर—
झुलुनि राहिलें सगळे रान                 स्वप्नसंगमी दंग होउन !
प्रणयचिंतनीं विलिनवृत्ति                  कुमारिका ही डोलत होती;
डुलतां डुलतां गुंग होउंनी                   स्वप्नें पाही मग फुलराणी ! ll ४ ll

" कुणी कुणाला आकाशांत                प्रणयगायनें हॊतें गात;
हळुच मागुनी आले कॊण                   कुणी कुणा दे चुंबनदान ! "
प्रणय-खेळ हे पाहुनि चित्तीं                विरहार्ता फुलराणी हॊती;
तॊं व्यॊमींच्या प्रेमदेवता                    वार्‍यावरतीं फिरतां फिरतां—
ळूंच आल्या उतरुन खालीं                फुलराणीसह करण्या खेळी,
परस्परांना खुणवुनि नयनीं               त्या वदल्या " ही अमुची राणी !  " ll ५ ll

स्वर्भूमीचा जुळवित हात                   नाचनाचतो प्रभातवात;
खेळूनि दमल्या त्या ग्रहमाला            हळुंहळुं लागति लपावयाला
आकाशीचीं गभीर शांती                     मंदमंद ये अवनीवरतीं;
विरूं लागलें संशय-जाल                    संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचें वस्त्र लेवुनी                   हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्न-संगमी रंगत होती                   तरीहि अजुनी फुलराणी ती ! ll ६ ll

तेजोमय नव मंडप केला,                  लख्ख पांढरा दहा दिशांला,
जिकडेतिकडे उधळित मोतीं              दिव्य वर्‍हाडी गगनीं येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी                   हांसत हांसत आले कोणी;
कुणीं बांधिला गुलाबी फेटा                 झकमकणारा सुंदर मोठा !
आकाशी चंडोल चालला                     हा वाङनिश्चय करावयाला;
हें थाटाचें लग्न कुणाचें !                    साध्या भोळ्या फुलराणीचें ! ll ७ ll

गाउं लागले मंगलपाठ,                      सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा                   कोकिळ घे तानांवर ताना !
नाचुं लागलें भारद्वाज,                        वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर                     नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागतें ! सावध सारे !                सावध पक्षी ! सावध वारें !
दंवमय हा अंत:पट फिटला                 भेटे रविकर फुलराणीला ! ll ८ ll

वधूवरांना दिव्य रवांनीं                     कुणीं गाइलीं मंगल गाणीं
त्यांत कुणीसें गुंफित होतें                  परस्परांचें प्रेम ! अहा तें !
आणिक तेथिल वनदेवीही                  दिव्य आपुल्या उच्छ्वासांहीं
लिहीत होत्या वातावरणीं                   फुलराणीची गोड कहाणी !
गुंगत-गुंगत कवी त्या ठायीं                स्फ़ुर्तीसह विहराया जाई;
त्यानें तर अभिषेकच केला                 नवगीतांनीं फुलराणीला ... ll ९ ll— बालकवी

टीप : पाठ्यपुस्तकात फक्त पांचच कडवी समाविष्ट आहेत.

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.


— बालकवी

उदासीनता

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचतें तें समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथें नाही तेथें नाहीं,
काय पाहिजे मिळवायाला ?
कुणीकडे हा झुकतो वारा ?
हांका मारी जीव कुणाला ? ।।

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरें पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला ? ।।


— बालकवी

निर्झरास

गिरिशिखरें, वनमालाही  ll  दरीदरी घुमवित येई !
ड्यावरुनि घेऊन उड्या  ll  खेळ लतावलयीं फुगड्या.
घे लोळण खडकावरतीं  ll  फिर गरगर अंगाभंवतीं;
जा हळुहळु वळसे घेत  ll  लपत-छपत हिरवाळींत;
पाचूंची हिरवीं रानें  ll  झुलव गडे, झुळझुळ गानें !
वसंतमंडप-वनराई  ll  आंब्याची पुढतीं येई.
श्रमलासी खेळुनि खेळ  ll  नीज सुखें क्षणभर बाळ !
हिं पुढची पिवळीं शेतें  ll  सळसळती-गाती गीतें;
झोप कोठुनी तुला तरी  ll  हांस लाडक्या ! नाच करी.
बालझरा तूं बालगुणी  ll  बांल्याचि रे ! भरिसी भुवनी !

बालतरू हे चोहिंकडे  ll  ताल तुला देतात गडे !
प्रेमभरें त्यांवर तूंही  ll  मुक्तमणि उधळुनि देई
बुदबुद-लहरी फुलवेली  ll फुलव सारख्या भंवतालीं
सौंदर्ये हृदयांमधलीं  ll दे विश्वी उधळून खुलीं !
गर्द सावल्या सुखदायी  ll वेलींची फुगडी होई !
इवलालीं गवतावरतीं  ll  रानफुलें फुलती, हंसती.
झुलवित अपुले तुरे-तुरे  ll  निळीं लव्हाळीं दाट भरे.
जादूनेच तुझ्या बा रे !   ll  वन नंदन बनलें सारें ?
सौंदर्याचा दिव्य झरा  ll  बालवसंतचि तूं चतुरा;
या लहरीलहरींमधुनी  ll  स्फूर्ति दिव्य भरिसी विपिनीं.

आकाशामधुनी जाती  ll  मेघांच्या सुंदर पंक्ती;
इंद्रधनूची कमान ती  ll  ती संध्या खुलते वरतीं;
रम्य तारका लुकलुकती  ll  नीलारुण फलकावरतीं;
शुभ्र चंद्रिका नाच करी  ll  स्वर्गधरेवर एकपरी;
हिं दिव्यें येती तुजला  ll  रात्रंदिन भेटायाला !
वेधुनि त्यांच्या तेजानें  ll  विसरुनियां अवघी भानें,
धुंद हृदय तव परोपरी  ll  मग उसळी लहरीलहरी
त्या लहरीमधुनी झरती  ll  दिव्य तुझ्या संगीततति !
नवल न, त्या प्राशायाला  ll  स्वर्गहि जर भूवर आला !
गंधर्वा ! तव गायन रे  ll  वेड लाविना कुणा बरें !

पर्वत हा, ही दरीदरी   ll  तव गीतें भरलीं सारीं.
गाण्यानें भरलीं रानें  ll  वर-खाली गाणें ! गाणें !
गीतमय स्थिरचर झालें !  ll  गीतमय ब्रम्हांड डुलें !
व्यक्त तसें अव्यक्तहि तें  ll  तव गीतें डुलतें-झुलतें !
मुरलीच्या काढित ताना  ll  वृंदावनिं खेळे कान्हा;
धुंद करूनि तो नादगुणें  ll  जडताही हंसवी गानें;
दिव्य तयाच्या वेणुपरी   ll  तूंहि निर्झरा ! नवलपरी
गाउनि हें झुळझुळ गान  ll  विश्वाचे हरिसी भान !
गोपि तुझ्या हिरव्या वेली  ll  रास खेळती भंवतालीं !
तुझ्या वेणुचा सूर तरी  ll  चराचरावर राज्य करी !

काव्यदेविचा प्राण खरा  ll  तूंच निर्झरा ! कवीश्वरा !
या दिव्याच्या धुंदिगुणें  ll दिव्याला गासी गाणें.
मी कवितेचा दास, मला  ll  कवी बोलती जगांतला,
परि न झरे माझ्या गानीं  ll  दिव्यांची असली श्रेणी !
जडतेला खिळुनी राही  ll  हृदयबंध उकलत नाही !
दिव्यरसीं विरणें जीव  ll  जीवित हें याचे नांव;
तें जीवित न मिळे मातें  ll  मग कुठुनी असलीं गीतें ?
दिव्यांची सुंदरमाला  ll  ओंवाळी अक्षय तुजला !
तूंच खरा कविराज गुणी  ll  सरस्वतीचा कंठमणि
अक्षय तव गायन वाहे  ll  अक्षयांत नांदत राहे !

शिकवी रे, शिकवी मातें  ll  दिव्य तुझी असलीं गीतें !
फुलवेली-लहरी असल्या  ll  मम हृदयी उसळोत खुल्या !
वृत्तिलता ठायींठायीं  ll  विकसूं दे सौंदर्याहीं !
प्रेमझरी-काव्यस्फूर्ति  ll  ती आत्मज्योती चित्तीं
प्रगटवुनी चौदा भुवनीं  ll  दिव्य तिचें पसरी पाणी !
अद्वैताचें रज्य गडे !  ll  अविच्छिन्न मग चोहिंकडे !
प्रेमशांतिसौंदर्याहीं  ll  वेडावुनि वसुधामाई
मम हृदयीं गाईल गाणीं  ll  रम्य तुझ्या झुळझुळ वाणी !
आणि जसें सगळें रान  ll  गातें तव मंजुळ गान,
तेंवि सृष्टिची सतार ही  ll  गाईल मम गाणीं कांहीं !


— बालकवी

झांशिवाली

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रु. ll

तांबेकुल वीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करीत ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथें आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll- भा. रा. तांबे

रिकामे मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या, परिं
मधुघटचि रिकामे पडति घरीं ! II ध्रु० II

आजवरी कमळांच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा हि पुर्वीची स्मरोनी,
करि रोष न सखया, दया करी II १ II

नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाची माझ्या गांठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी II २ II

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी रे बळ न करी II ३ II

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया ?
लागले नेत्र रे पैलतिरीं II ४ II


- भा. रा. तांबे (१९२३, ग्वाल्हेर)

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवुं द्या जगासी
सूर्य गगनातुनी ओतुं द्या निखारा
मूक सारें हे साहतो बिचारा !

तरूवरची हसतात त्यास पानें
हसे मुठभर तें गवतही मजेनें,
वाटसरू वा तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत !

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा, घेरूनी तयातें
नेई उडवुनि त्या दूर दूर कोठें

आणि जागा हो मोकळी तळाशीं
पुन: पडल्या वरतून पर्णराशी


— कुसुमाग्रज

संकलन : श्रीमती वनमाला पाटील, जालना

प्रेम कर भिल्लासारखं

पुरे झाले चंद्र सुर्य , पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं.
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळ काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


- कुसुमाग्रज

जालियनवाला बाग (क्रूस)

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनी क्रुसावरचे
विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष—
"प्रेम, शांति अन् क्षमा यांमध्ये वसतो परमेश !"
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातांत
निःशस्त्रांच्या रक्तामांसामध्ये नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलांबायकांत
जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभुवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजात!


— कुसुमाग्रज

अहि-नकुल (मंथर नाग)

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग !
कधी लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
चालला पुढे तो– काय ऐट! आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वर कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा तांडव करता सोम प्राशुनि काली–
रक्तात नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे, दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब– कुणाची जाळिमधे चाहूल,
अंगार– कणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख नकूल !
थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात !
रण काय भयानक– लोळे आग जळात!
आदळती, वळती, आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वाऱ्यापरि गेला नकुल वनातुनि दूर.
संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!


— कुसुमाग्रज

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतिची याचना

नव्हाळीतले ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी अता यौवनाच्या मशाली
उरी राहिले काजळी कोपरे

परि अंतरी प्रीतिची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा,
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पुजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवांनी वर
शहारून येते कधी अंग, तूझ्या–
स्मृतीने उले अन् सले अंतर
गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण— कुसुमाग्रज

December 9, 2009

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे ?

आली बघ गाई गाई काढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा.- इंदिरा संत

लतांनो सांगू का तुम्हां (शबरीगीत)

"लतांनो" ! सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार !
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार !

तुम्हां कोठूनीयां ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखछंदी झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल घोकाया, "जय श्रीराम श्रीराम"

बघोनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे? झर्‍यांनो ध्याल ना पाणी?
पहा! ही अर्पिली कैसी, फळे ह्या थोर वृक्षांनी

नव्हे - कोठून ही उष्ठी? जराशीं चावलेली हिं!
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई?
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पोनी, सुखे त्यापायीं लोळेन
"जय श्रीराम श्रीराम! जय श्रीराम श्रीराम"


_ वा. गो. मायदेव

रानांत एकटेंच पडलेले फूल

वन सर्व सुगंधित झालें,
मन माझे मोहुन गेलें— किति तरी !

मी सारे वन हुडकीलें,
फुल कोठें नकळे फुललें— मज तरी !
स्वर्गात दिव्य वृक्षास
बहर ये खास,
असें कल्पीलें— असें कल्पीलें;
मन माझे मोहुन गेलें— किति तरी !

परि फिरतां फिरतां दिसलें
फुल दगडाआड लपालें— लहानसें
दिसण्यांत फार तें साधे,
परी आमोदें
जगामधिं पहिलें— जगामधिं पहिलें;
मन माझे मोहुन गेलें— किति तरी !

मी प्रेमें वदलों त्याशी,
'का येथें दडुनी बसशी— प्रिय फुला ?
तूं गडे फुलांची राणी,
तुला गे कोणी,
रानिं धाडीलें— रानिं लावीलें ?
मन माझे मोहुन गेले— किति तरी !

तें लाजत लाजत सुमन
मज म्हणे थोडके हंसुन ! तेधवा
'निवडिलें प्रभूने स्थान
रम्य उद्यान
तेंच मज झालें— तेंच मज झालें'
मन माझे मोहुन गेलें— किति तरी !


— ना. वा. टिळक

फुलपांखरूं


फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बारीक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं


 ग. ह. पाटील

उघड उघड पाकळी

उघड उघड पाकळी, फुला रे
उघड उघड पाकळी llध्रु.ll

आंतल्या आंत कोवळे
मधुजीवन कां कोंडले?
बाहेर हवा मोकळी, फुला रे ll१ll

तमसंकुल सरली निशा
नीलारुण हंसली उषा:
चौफेर विभा फांकली, फुला रे ll२ll

मलयानिल उदयांतला
बघ शोधत फिरतो तुला
कां मृदुल तनू झांकली, फुला रे ll३ll

कीं रहस्य हृदयांतले
आंतल्या आंत ठेवले?
ही तुझी कल्पना खुळी, फुला रे ll४ll- ना. घ. देशपांडे

फुलपांखरेधरूं नका ही बरे,
फुलांवर उडती फुलपांखरे ॥ धृ.॥

काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होतां सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडूं लागल्या
पंख फुटुन गोजिरे,
फुलांवर उडती फुलपांखरे ॥ १ ॥

मजेमजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यांवर नाचे
सकाळचे हांसरे,
फुलांवर उडती फुलपांखरे ॥ २ ॥

फुलाफुलाशीं हांसत खेळत
फिरती भवती पिंगा घालित
बघा दुरूनच त्यांची गंमत
दृश्य मनोहर खरे,
फुलांवर उडती फुलपांखरे ॥ ३ ॥

हात लावतां पंख फाटतिल
दोरा बांधुन पायहि तुटतिल
घरी कशी मग सांगा जातिल ?
दूर तयांची घरे,
फुलांवर उडती फुलपांखरे ॥ ४ ॥

उगाच धरितां त्यांस कशाला ?
अपाय करितां मुक्या जिवाला
आवडेल का हे देवाला ?
हिं देवाची मुलें,
फुलांवर उडती फुलपांखरे ॥ ५ ॥


— अ. ज्ञा. पुराणिक

उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही !

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही !

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या ?

बाळाचें नी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनियां दूर जाई
भूर भूर.- कुसुमाग्रज

December 7, 2009

गवतफुला

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्रांना;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे

पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.

वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.

गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.

तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.

मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे.— इंदिरा संत
Mr. Unmesh Inamdar, Ms. Amita Karanth and श्रीयुत किरण राजे (बोरीवली) यांच्या मदतीने दुरुस्त केलेली सुधारीत आवृत्ती.

कितीतरी दिवसांत

कितीतरी दिवसांत
नाहीं चांदण्यांत गेलों;
कितीतरी दिवसांत
नाहीं नदीत डुंबलों.
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.
केव्हातरी चांदण्यांत
पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत
होईन मी जलमय.
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी;
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी.
बरा म्हणून हा इथें
दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची
शिरीं धार, मुखीं ऋचा


— बा. सी. मर्ढेकर

सायंकाळची शोभा

पिवळे तांबूस उन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी !

हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे !

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे.

अशी अचल फुलपांखरे फुले साळिस जणु फूलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झूलती.

झुळकन, सुळकन इकडून तीकडे किती दुसरी उडती !
हीरे, माणके, पांचू फुटुनी पंखची गरगराती !

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा ?— भा. रा. तांबे

गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पिवळे तांबूस उन कोवळे पसरे चौफेर

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरीन सुगरीन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !

तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?


- बहीणाबाई चौधरी

अरे संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !


- बहिणाबाई चौधरी

उगवले नारायण

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll

उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll- बहिणाबाई चौधरी

मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मनं एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात !
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत !

देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं !


- बहीणाबाई चौधरी

अनामवीरा

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

काळोखातूनी विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !- कुसुमाग्रज

कणा

'ओळखलंत का सर मला' – पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून :
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी – बायको मात्र वाचली–
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले –
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे' –
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला–
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. '


– कुसुमाग्रज

December 4, 2009

या बालांनो ...

या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे, मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे,
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनीया
सुंदर ती दुसरी दुनिया.
या बालांनो ! या रे या !
लवकर भरभर सारे या !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहूंबाजू भरे;
जिकडे तिकडे फुलें फळें,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर जयांचे,
सोन्याचे
ते रावे,
हेरावे.
तर मग कामें टाकुनी या
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

पंख पाचुचे मोरांना,
टिपती पांखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.
चपल गती,
हरिण किती !
देखावे
देखावे
तर मग लवकर धावुनी या
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या !


- भा. रा. तांबे

आनंदी - आनंद

आनंदी-आनंद गडे ! इकडे, तिकडे, चोहिंकडे;
वरतीं-खालीं मोद भरे, वायूसंगे मोद फिरे;
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे... आनंदी-आनंद गडे!

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हंसते आहे;
खुलली संध्या प्रेमानें, आनंदे गाते गाणें;
मेघ रंगले,
चित्त दंगलें,
गान स्फुरलें,
इकडे, तिकडे, चोहिंकडे.. आनंदी-आनंद गडे!

नीलनभीं नक्षत्र कसें, डोकावुनि हें पाहतसे;
कुणास बघतें ? मोदाला ! मोद भेटला का त्याला ?
तयामधें तो,
सदैव वसतो,
सुखें विहरतो,
इकडे, तिकडे, चोहिंकडे.. आनंदी-आनंद गडे !

वाहति निर्झर मंदगति, डोलति लतिका वृक्षतती;
पक्षि मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरें ?
कमल विकसलें,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले—
इकडे, तिकडे, चोहिंकडे.. आनंदी-आनंद गडे!

स्वार्थाच्या बाजारांत, किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो ? सोडुनि स्वार्था तो जातो—
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला,
इकडे, तिकडे, चोहिंकडे.. आनंदी-आनंद गडे!


— बालकवी

गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आनंदी-आनंद गडे !

December 2, 2009

श्रावणमास


'बालभारती - आठवणीतील कविता' म्हटले की, सर्वात पहीली कुठली कविता आठवत असेल तर ती 'श्रावणमासीं हर्ष मानसीं' या कवितेची नुसती आठवण जरी झाली तरी लगेच आपण त्यातल्या ओळी गुणगुणायला लागतो. "बालभारती - मराठी कविता" या माझ्या नवीन ब्लॉगची सुरुवात बालकवींच्या याच 'श्रावणमास' कवितेने करतो.- सुरेश शिरोडकर
(संकलक)
श्रावणमास

श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटें चोहिंकडे,
क्षणांत येतें सर सर शिरवें, क्षणांत फिरुनि ऊन पडे ll १ ll

वरतीं बघतां इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिलें नभोमंडपी कुणि भासे ! ll २ ll

झालासा सुर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तों उघडे,
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेंपिवळें ऊन पडे ll ३ ll

उठती वरतीं जलदांवरतीं अनंत संध्याराग पहा,
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रुप महा ll ४ ll

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांचि माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि कीं एकमतें ll ५ ll

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती,
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निजबाळांसह बागडती ll ६ ll

खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गा‌य तयाचा श्रावणमहिमा एकसुरें ll ७ ll

सुवर्णचंपक फुलला, विपिनीं रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघतां भामा रोष मनींचा मावळला ! ll ८ ll

सुंदर परडी घे‌उनि हातीं पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें पत्री खुडतीं ll ९ ll

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचे गीत. ll १० ll


— बालकवी