A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

4 November 2019

तृणबाळे होवू

तृणबाळे होऊ, क्षणभर, तृणबाळे होऊ;
गड्यांनो, तृणबाळे होवू.

पैजण घालुन नाचत मुरडत
निर्झर येइल ठुमकत ठुमकत,
हसुन करूया त्याचे स्वागत,
तुषारात न्हाऊ, क्षणभर, तुषारात न्हाऊ
गड्यांनी, तुणबाळे होवू,

चपल वारुवर आरुढ होउन
उटी फुलांची अंगी लावुन
अवखळ वारा येइल धावुन,
डुलत डुलत राहू, क्षणभर डुलत डुलत राहू;
गड्यांनो तृणबाळे होवू

निळे जांभळे लेउन मंदील
रानफुलांचे थवे शोभतिल
गोड गोड गुजगोष्टी करतील
त्या ऐकत राहू, क्षणभर, कान हळुच देवू ;
गड्यांनो तृणबाळे होवू

लांब सावल्या पडता, गगनी
रंग नाचतिल फेर धरोनी,
सोन्याची मग होईल धरणी,
टक लावुन पाहू, क्षणभर, टक लावुन पाहू;
गड्यांनो तृणबाळे होवू

आणि कधिमधि सायंकाळी
येतिल फिरण्या बालमंडळी
हळु पायाला करुनी गुदगुली
गमतीने हसवू, क्षणभर, गमतीने हसवू;
गड्यांनो तृणबाळे होवू


  कृष्ण बळवंत निकुंब

Compiled by : Abhay Bapat on Facebook

21 May 2019

चंदनाच्या विठोबाची

चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात


— बी. रघुनाथ

28 March 2019

यशश्री पायची दासी

[वृत्त : वियद्गंगा]

तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला ।
हिऱ्यांचे तेज ही जैसे मिळावे गारगोटीला ॥
दिसावी पावलांखाली खड्यांना तारकाकांती ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ धृo ॥


घणाचे घाव घालावे गळावा घाम अंगीचा ।
यशोदेवी तयांसाठी करी घे हार पुष्पांचा ॥
विषारी तीक्ष्ण काट्याची तुझ्या स्पर्शे फुले व्हावी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ १ ॥


स्वसामर्थ्ये, स्वचारित्र्ये, तुवा हे दाविता राया ।
तरी ये निंदकांच्याही मुखी वाणी अहो या या ॥
मनीषा ही जरी ठेवी मनी या खूणगाठीशी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ २ ॥


ग्रहांनी कुंडलीच्या त्या, फिरावे कोष्टकांमाजी ।
परी यत्नांसी जो राजी, ठरे तो सर्वदा गाजी ॥
स्मरोनी आत्मकर्तव्या, प्रयत्नांची करे राशी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा, यशश्री पायची दासी ॥ ३ ॥



— यशवंत


संकल्पना : श्री अजित गोखले

धबधबा

[वृत्त: वियद्गंगा]

किती उंचावरूने तूं । उडी ही टाकिसी खालीं
जणों व्योमांतुनी येसी । प्रपाता ! जासि पातालीं ll १ ll

कड्यांना लंघुनी मागें । चिपांना लोटिसी रागे;
शिरीं कोलांटुनी वेगे । शिळेचा फोडिसी मौली ! ll २ ll

नगाचा ऊर फोडोनी । पुढे येसी उफाळोनी;
उडे पाणी फवारोनी । दरीच्या सर्द भोंताली ll ३ ll

तुषारांचे हिरेमोत्यें । जणों तू फेंकिसी हाते;
खुशीचे दान कोणाते । मिळे ऐसे कधी काळी ? ll ४ ll

कुणी तांदूळ् वा कांडे । रुप्याचे भंगती हांडे
मण्यांचा की भुगा सांडे । कुणाच्या लूट ही भाली ? ll ५ ll

घळीमाझारिं घोटाले । वरी येऊनिं फेंसाळे,
कुठे खाचांत् रेंगाळे । करी पाणी अशी केली ll ६ ll

उभी ताठ्यांत् जी झाडे । तयांची मोडिसी हाडें;
कुशीं गेसी लव्हाळ्यांना । तयांचा तूं जणो वाली ! ll ७ ll

विजेचा जन्मदाता तूं । प्रकाशाचा निशीं हेतू;
तुला हा मानवी जंतू । म्हणोनी फार सांभाळी ! ll ८ ll


— भवानीशंकर श्रीधर पंडित

25 February 2019

गढी

गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी
भिंती ढासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी

कुत्रे हे पेंगतसे करीतसे दिंडीपुढे राखण
जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गढी आपण

होते राहात या गढीत इथले पाटील मातब्बर
पाठी वाकवूनी त्यास मुजरे देती किती येसकर

होते वाजत धडांग धीदिंधा दिंडी पुढे चौघडे
घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे

वैऱ्याला शह देत येथे भगवा झेंडा डूलावा पण
ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण –



— ग. ल. ठोकळ








2 February 2019

तान्हा भाऊ

द्रुतविलंबित

" चिमकुला बहु बालक हा असे !
बघुनियां सुख गे मज होतसे
चरण कोमल तांबुस हे किती !
वदन रम्य दिसे नयनांप्रती ll १ ll

मिटुनियां बहु घट्ट मुठी धरी,
चरण हालवितो वरच्यावरी
बघतसे टक लावुनियां किती
बघुनियां सुख होय मनाप्रती ll २ ll

किति शरीर तरी मृदु लागतें !
भय मला, जननी, बहु वाटतें
चिमकुला हसतो मज पाहुनी,
सवंगड्या, मज जाणसि कीं मनीं ? ll ३ ll

दिपतसे बघतांच उजेड हा,
मिटितसे नयनां, जननी पहा !
फिरविलें मुख कां ? जननी, अगे,
रडतसे, वरतींहि न हा बघे ! ll ४ ll

चिमकुल्या, छकुल्या, न रडें उगा,
धर करीं चिमणी अथवा फुगा
जवळ घेउनियां तुज बैसतें,
चिमकुल्या, कमती वद काय तें ll ५ ll

शिकविते तुज भूक रडावया ?
रडूं नको, तुज आणिन खावया
धर करीं बहु सुंदर बाहुली,
सजवुनी स्वकरें, बघ ! आणिली " ll ६ ll

" अजुनि हा, यमुने, बहु नेणता;
सुखद होय पुढें तुज वाढतां
अजुनि ह्या वदतां न मुळींच ये;
कळतसे न तुझें वदणें, सये ll ७ ll

अजुनि दांत न याप्रति खावया,
न समजे करिं वस्तुहि घ्यावया,
चिमकुला तुजला जरि वाटतो,
पुढतीं होय तुझ्यासम थोर तो " ll ८ ll


— मोरो गणेश लोंढे

5 January 2019

सुंदर भारत देश

स्वर्गाहुनही प्रिय अम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष

या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष

श्रीरामाचे, श्रीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश

हिमालयापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश


— शांता शेळके