रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

December 20, 2012

पाखरबोली

चिमणीला बोलले कावळोबा काळे
चिऊताई, आपली हुशारयत बाळे

खूप खूप त्यांना कळतंय जग
आपणच अडाणी राहिलोत बघ

नुसती कावकाव, चिवचिव करून
डोळ्यातलं पाणी ठेवलंय धरून

शेणाचं, मेणाचं घरपण जपत
सगळं आयुष्य काढलं खपत

माणसासारखा तुझ्याही मुलाने
कालच मोबाईल घेतलाय म्हणे

माझंही काळं उजळू लागलंय
संगणकावरती जाऊन आलंय

पंखात वारं भरलंय गडे
पिढीच्या पिढी गेलीय पुढे

कशाला आपण ओढायचे पाय?
घेतील भरारी खातील साय

तरण्याताठ्या चोचीला चिऊ
चांगले दिवस लागलेत येऊ

तरीही उगाच वाटतंय बाई
राहतील ना शब्द 'बाबा अन आई'


— कल्याण इनामदार

December 19, 2012

माझें घड्याळ

ड्याळ माझें नवें असे;
सुंदर दिसतें पहा कसें !
दादाचें तर जुनें मुळीं;
झुरळांची वाटे खोली !
ड्याळ माझें लखलखतें;
सांगा कोणाचें आवडतें ?

'उगाच वटवट बोलुं नये;
कटकट कोणा करू नये'
– तूंच नाहिं कां म्हणत असें ?
किटकिट त्याची सदा असे.
दिवसां किटकिट,
रात्रीं किटकिट,
ड्याळ माझें गुणी मुळीं
कटकट कधिं ना करी खुळी !

गडबड करितां मार मिळे,
हेंहि न त्याला कसें कळे ?
रात्रीं निजण्याच्या वेळीं
दादा त्याचा कान पिळी;
कुरकुरतें, परि ना खळते,
रागानें चिडूनी जातें;
झोंप लागते दादाला,
तें नच खपतें पण त्याला;
पहाट होतां गुरगुरतें,
दादाला जागें करतें.
दादा उठतो;
चिमटा घेतो;
तेव्हां मग तें गप्पा बसें;
ड्याळ माझें कधि न असें !

रात्रीं नशिबीं कोनाडें;
दिवसा करितें पुढेंपुढें.
उगाच बसतें ऎटित
हालवीत अपुले हात;
लहानमोठे हात तसे
पाहुन येई मला हसें.
लाज तयाला ना त्याची;
खोड कोठची जायाची ?
हात असे फिरवुन आधीं
मोडुन घेतें कधींकधीं !
वैद्य आणुनी,
हात जोडुनी,
दादा देतो पुन्हां जरी,
फिरवित बसतें हात तरी !
ड्याळ माझें परी पहा;
चाळा त्याला मुळी न हा.

ड्याळ दादाचें, आई,
सर्वांना करितें घाई.
खेळ रंगला असे जरी
मधेंच दादा पुरा करी.
गोष्ट न राजाची सरली;
बाबा म्हणती, 'छे, झाली.'
ड्याळ असलें
कुणास सुचलें ?
ड्याळ माझें गुणी परी,
किती वाजले पहा तरी !
सकाळचे अवघे सात;
म्हणती खेळा बागेंत.


— विंदा करंदीकर

December 14, 2012

शेवटचा लाडू

सुटी संपली नी चाललों गांवाहुन दूर;
आणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.
ताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं
मी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;
आणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,
नकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll

तेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,
आज उरे मागें तयांतिल आवडता सरता.
वाटतसे घाई कशाला मी इतकी केली ?
नाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.
खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,
आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.
तूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;
तूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll

छे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.
छे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.
उजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;
उजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.
उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं
मिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ll३ll


– विंदा करंदीकर

December 13, 2012

पाऊस

थबथबली, ^^^^^^^^^ ओथंबुनी खाली आली,
जलदाली ^^^^^^^^^^ मज दिसली सायंकाळी.
रंगहि ते ^^^^^^^^^^^ नच येती वर्णायातें !
सुंदरता ^^^^^^^^^^^ मम त्यांची भुलवी चित्ता ll १ ll

व्योमपटीं ^^^^^^^^^ जलदांची झाली दाटी;
कृष्ण कुणी ^^^^^^^^ काजळिच्या शिखरावाणी.
नील कुणी ^^^^^^^^^ इंद्रमण्यांच्या कांतिहुनी,
गोकर्णी ^^^^^^^^^^^ मिश्र जांभळे तसे कुणी; ll २ ll

तेजांत ^^^^^^^^^^^^ धुमाचे उठती झोत,
चकमकती ^^^^^^^^^ पांडुरही त्यापरिस किती !
जणुं ठेवी ^^^^^^^^^^ माल भरुनि वर्षादेवी
आणुनिया ^^^^^^^^^ दिगंतराहुनि या ठाया ! ll ३ ll

कोठारी ^^^^^^^^^^^^ यावरला दिसतो न परी.
पाहुनि तें ^^^^^^^^^^^ मग मारुत शिरतो तेथें;
न्याहळुनी ^^^^^^^^^^ नाहिं बघत दुसरें कोणी
मग हातें ^^^^^^^^^^^ अस्ताव्यस्त करी त्यातें.
मधु मोतीं ^^^^^^^^^^ भूवरतीं भरभर ओती ! ll ४ ll


— बालकवी

पाऊस खुळा

पाऊस खुळा, किति पाऊस खुळा !
शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ll धृ.ll

नाचे किती वेड्यापरी,
बडबडे कांहींतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ll १ll

दीनवाणी वेलीबाई,
पांघराया नाहीं कांहीं
काय करू, उघडा हा राहे छकुला ! ll २ll

उचलून आणूं काय,
पुसूं डोकें, अंग, पाय ?
काकडून गेला किती माझा माकुला ! ll ३ll

निजवूं या गादिवर,
पांघरुण घालूं वर,
देऊं काय, सांग आई, आणुन तुला ? ll ४ll

काय– "नको तोडूं फूल,
वेल– पावसाचें मूल ?
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला ?" ll ५ll

आणि, येऊं मी घरांत ?
भिजूं नको अंगणांत ?"
नको आई– ! चमकेल मीही आपुला ! ll ६ll

मज वेडा म्हणतील ?
फूल शहाणें होईल ?
मग वेडी म्हणतील सगळे तुला ! ll ७ll


गिरीश

December 1, 2012

माझी शाळा

वृत्त: शिखरिणी

तुझें जेव्हां जेव्हां सहज मजला दर्शन घडे
स्मृतींचे पूर्वींच्या फलक पुढतीं राहति खडे
हृदयी भारावोनी गुणगुणत मी त्यांत रमतों,
तरंगूनी भावें विनत हृदयें तूज नमतों ll १ll

किती होता झा उगम अगदीं सान, नगरीं
जणू रानातील स्फटिकधवला निर्मळ झरी
अतां विस्तारें या मन कुतुकुनी येथ खिळतें
नदीच्या सौंदर्ये अतुल सुख नेत्रांस मिळतें ll२ll

तुझीं बाळें, तूझे गुरुवर, तुझे सेवक मला
सदा पूज्य; प्रेमें तूजवर असे जीव जडला
तुझ्या उत्कर्षातें श्रवुनि हृदया येई भरतें
तुझ्या त्यांच्या गावें सतत पुरुषार्थास गमतें ll ३ll

गुरुचें तूं माझ्या असशी मधुर स्वप्न, सुभगे !
मन:सौंदर्याचा सुखमधुर कीं ताजच बघे
कणांतूनी तूझ्या अतुल दिसते वृत्ती विमला
गमे ठायीं ठायीं गुरुहृदयिंचा भाव रमला ll ४ll

तुला होवो वा न स्मरण मम, माते परि मनीं
स्मृती माझ्यासंगें मधुर तव मी नेइन जनीं
तुझी थोर सर्वां पटवुन सदा देइन मुखें
तवशिर्वादानें मिळतिल मला आंतरसुखें ll ५llगिरीश (शंकर केशव कानेटकर)