A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 April 2023

भाऊराया

लोकगीते लिखित स्वरूपात नसतानाही ती पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली आहेत. या लोकगीतांत स्त्रीगीते अधिक प्रमाणात आढळतात. कुटुंबातील नातीगोती, सुखदु:खे, सण-समारंभ, चालीरीती यांचे चित्रण स्त्रियांनी रचलेल्या या ओव्यांत केलेले असते.


शेताला गेली कुरी । शेत काजळाची वडी ।
माझ्या ग बंधवाची । बारा बैलांची ग जोडी ॥

पाऊस पडतो । नको वाजूगाजू ढगा ।
माझ्या ग बंधवाला । राजसाला पेरू लागा ॥

शेताआड शेत । कोण्या शेताला मी जाऊ?
बंधवाचा माझ्या । हेलकावा देतो गहू ॥

वाटेवर हरभरा । हुळा देतो मूठ मूठ ।
राजस बंधू माझा । मन याचं किती मोठं ॥

गहू-हरभऱ्याच्या गाड्या । बाई वेशीत थटल्या ।
सावळ्या बंधुजीनं । दंडाभुजांनी रेटल्या ॥

माझ्या बंधुजी रायानी । हिर जोडील दावणीला ।
सांगते बाई तुला । नाचणीच्या मळणीला ॥

भावाघरी बैल । पवळ्या चिंतामणी ।
पाठीवर गोण्या । जोतं चढती नंदीवाणी ॥

बंधवाचं शेत । जसं काजळाची वडी ।
असे राबतेत बाई । बारा बैल चौघ गडी ॥

चार बैलाचा नांगर दोन बैलान चालविला ।
नटव्या बंधुजीन कुणबी गावात निवडीला ॥

बारा बैल खळ्यात बारा बैल मळ्यात ।
आता भाऊ माझा ज्वारी उसाच्या थळ्यात ॥

बारा बैल शेती बारा बैल दावणीला ।
दादा मये झोपी गेले मदनाच्या सावलीला ॥

बारा बैलाची दावण वाड्याच्या भुजाला ।
भाऊला माझ्या वैभव साजत राजाला ॥

दुरून वळखीते । तुझ्या गाडीची धुम्माळ ।
लाडक्या बंधुराजा । बैलं अवखळ संभाळ ॥

दुरून वळखीते । तुझ्या गाडीची चकरं ।
लाडक्या बंधुराजा । बेलं न्हवं ती पाखरं ॥

माडीवरती माडी । मी पाहते गुंजवाणी ।
नंदी आल शिंगासणी । बाई माझ्या बंधवाच ॥

तिन्ही सांजा झाल्या । दिवा लावावा लावणीला ।
नटव्या बंधुजीची । हायते बईल दावणीला ॥


1 April 2022

बीज अंकुरे अंकुरे

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? II धु० II

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्र-किरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ १ ॥

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ २ ॥

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुला-फळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल, वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात? ॥ ३ ॥— मधुकर पांडुरंग आरकडे

31 March 2022

हरि हा आनंदाचा कंद

हरि हा आनंदाचा कंद । आनंदाचा कंद ।
उभा पुढें भक्तसखा गोविंद ॥ हरि०॥ध्रु०॥

सजल नीरदश्यामतनु नवरत्नखचितसौवर्ण
मुकुट शिरपेंच तुरा वरि कलगि विराजित
कुटिलालक निटिलासि कस्तुरी विराजित
कुटिलालक निटिलासि कस्तुरी-तिलक
केशरीगंध ॥ हरि०॥१॥

श्रवणिं मनोहर मकरकुंडलें फुल्ल गल्ल
कर्णांत दीर्घ-सुप्रसन्नलोचन इंदुवदन तिल
पुष्पनासिका कुंदरदन हनु अधरबिंबगत
हास्य मंदमंद ॥ हरि० ॥२॥

कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभपटीरपंक नव-
द्रवरुषितपविरांस केयूरविभूषित कनक-
कटकसह-रत्नतोडर-प्रभानुभासित शंख
सुदर्शन-गदा-सरोरुह लसच्चतुर्भुज
ललितांगुलिधृत रत्नमुद्रिकावृंद ॥ हरि०॥३॥

विशाल गक्षस्थलीं रमाकुचकुंभकुंकुमालेप-
लिप्त श्रीवत्सलांछिता सुवर्णयज्ञोपवीत
मध्य वलित्रयबंधुर निम्ननाभि तनु
रोमराजि लुठदुत्तरीयपट परिजातनव-
कुसुम तुलसिकामिश्रहार-पादाप्रचुंबि
नभ भरुनि जयाचा मधुर सूटला गंध ॥ हरि०॥४॥

कटीतटीं जरिकांठि पीतकौशेयवासपट
वास सुवासित विचित्र शृंखल अगणित
मणी झणझणित मंजुलकणित किंकेणी
विपुलरोरुद्वंद्व विराजित जानुजंघ सुकुमार
सरलतर कनकवलयुक्त रत्नतोडरे मंजुमंजु
सिंजान हीर मंजीर परिष्कृत सहज रक्त
मृदु वज्र अंकुश ध्वजांबुजांकित वृत्तवृत्त
उत्तुंग-रक्तनखचक्रवाल सत्पुण्यचंद्रिका ध्वस्त
महध्दृदयांघतमस मंदाकिनी माहेर चरणयुग
धृतरणरणिक जयाच्या क्षणिक ध्यानें तुटती
झटिति सर्व भवबंध ॥ हरि० ॥५॥

कोटिकोटि कंदर्प रुपलावण्य-दर्पहर ध्यान
मनोहर अनंतजन्म मनोमल पटली निर्मूलनकर ।
भक्तिगम्य तापत्रयभंजन आसेजनक ध्यानिं पाहतां
वाटे जणुं नयनांत भरावें हुंगावें दृढ आलिंगावें
कीं चुंबावें विसरतसे संसार सर्वही संतत
याचा पंत विठ्ठला सहज लागला छंद ॥ हरि०॥६॥


— विठोबा अण्णा दफ्तरदार

27 March 2022

बकुळीची फुले

छाया गर्द सुरेख, गार हिरवी शोभे तुझी पालवी
सो सो गर्जत वाहुनी गदगदा वारा तुला हालवी ।

भोती कुंपण दाट, त्यावरुनही विस्तारल्या डाहळ्या
झाला भूमिवरी किती खच तरी; पाने, फुले, पाकळ्या ।

पुष्पांचे झुबके किती लहडले प्रत्येक फांदीवरी
त्यांचा गंध चहूकडे पसरला, वर्णू किती माधुरी ।

छोटे गोंडस, पांढरे सुम तुझे, हुंगू किती मी तया
छोट्या, सुंदर पाकळ्या कितितरी, येती न मोजावया ।

उद्यानात अनंत वृक्ष फुलले, त्यांची सुगंधी फुले
घेतो जो न करांत तोच सुकती, पस्तावतो त्यामुळे ।

पुष्पे वेचुनिया तुझी जर तया, मी ठेविली गुंफुनी
त्यांचा गंध अनंत काळ टिकतो, जाती न कोमेजुनी ।

पुष्पांच्या तव ओंजळीत तरुवरा, डोक्यावरी ठेवितो
यावज्जीव असो शिरावर तुझी छाया असे इच्छितो ।— गजानन लक्ष्मण ठोकळ

19 March 2022

देवमान्य

यज्ञ शंभरावा होताच पुरता
गमे भूपा झाली जन्मसफलता !
कुणा दे दक्षिणा कुणा देई भूमी
याचकां संतुष्ट करी अंतर्यामी !
घडविली तेणे यज्ञपुरुषाची
कलाकुसरीची प्रतिमा सोन्याची.
'मिरवून मूर्ति नगरामधून
वैभव आपुले सकलां दावून
शंभर यज्ञांचे स्मारक म्हणून
होत्यालागून ती करावी अर्पण;
—प्रथा अभिनव होईल ही खास,
नावलौकिकही येईल भरास !'
—यापरी योजिला भूपाने विचार
डामडौलाची त्या हौस अनिवार !
त्याच मूर्तींची ही पालखी निघाली
नगरात तीच घांदल सगळी !
पहा उभारिली पताका–तोरणे
मार्ग संमार्जिले जान्हवी–जलाने,
पादचारी भूप चवरे वारितो
मंजुळ मंजुळ चौघडा झडतो
दो बाजूंस पथी सैनिक चालती,
पालखीशी कोणा रिघो नच देती !
दर्शनार्थ जन लोटले अमित;
दुरूनच देवा भावे नमितात !
' घन्य नृपवर ! ' करिती ते ध्वनी
हरखून तेणे भूप म्हणे मनी —
' मजसम कोण भुवनी दुसरा ?
पुण्यश्लोकांत मी पुण्यश्लोक खरा !
अमर सुमने का न उधळिती ?
काय कल्पतरू सुकला संप्रतिं ?
नुधळोत सुखे नुधळती जरी,
ठसलो जनांच्या हृदयांभीतरी ! '
इतक्यात एक कुष्ठे पीडियेला
पालखीजवळी जावया सजला !
"पैस रे दा वाट ! आडवा न कुणी !
टेकवू द्या माथा प्रभूच्या चरणी !
स्पर्शे त्याच्या भोग हरतील सारे !
ऐसे वदून तो पुढे पुढे सरे !
–कोण हे साहस भूप खवळला !
"मारा पातक्याते ! "सैनिकां बोलला
तळपू लागल्या नग्न तरवारी,
श्रमण ये कुणी तोच तीरापरी,
गलितांगालागी झाकी निज देहे–
हासत हासत घांव साहताहे
क्षणी होती त्याची खांडोळी–खांडोळी
—सुरी नभातून सुमवृष्टि केली !
कोठला तो कुष्ठी ? — यज्ञनारायण !
स्वयं प्रकटला त्याच्या देहातून !
म्हणे, "राया ! भूल पडली तुजलाः
यज्ञात–मूर्तीत —असेन कोठला ?
रंजल्या–गांजल्या दीनांचे शरीर
आम्हां देवतांचे हेच रे मंदिर !
मीच झालो कुष्टी सत्व पाहण्याला
भिक्षूवीण न ये कुणीच कसाला !
पहा ! कैसा मान्यहो देवालागून —
— स्वर्गातून तया येतसे विमान ! "— वामन नारायण देशपांडे

7 March 2022

धरणी ती माय कोपली का ?

जीव-जनावरा देत आली ठाय
धरणी ती माय कोपली का ?
स्वप्न पहाटेचे खरेच होणारे
घरातले सारे गोड स्वप्नी
पाहता पाहता दृष्टी गेली पार
सकाळी अंघार अनंताचा
दुष्ट कसा होतो अनंतही अंती
गेले त्यांना शांती कशी आता ?
मातीला जे होते दगड धरून
त्यांचेही भरून आले मन
परास्त होऊन आणि कोसळले
अश्रू ओघळले अखेरचे
मातीचे पाईक मातीखाली मेले
असे कसे गेले कष्टवंत ?
खेड्याचे या कसे भाग्य असे खोटे
सूर्यास्त पहाटे पाहण्याचे
कोणती अशी ही धरतीची माया
काळीकुट्ट छाया मरणाची
गेले त्यांना आता कुणी कसे गावे ?
पुन्हा उगवावे जोमदार ! १०— फ. मुं. शिंदे

6 March 2022

मानवता

अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही
घाव पडो कोठेही, तडफडू आम्ही

हाल पाहून हळूहळू, होवोत कोठेही
पिळवणूक पाडील पीळ आम्हा, असो कोणाचीही

वजन आमच्या छातीवर, पायांतल्या बेड्यांचे दासांच्या
चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या

अवघ्या अभाग्यांचे अश्रू, उभे आमच्या डोळ्यांत
दु:खितांच्या, वेदनांच्या कळा आमच्याही उरात

संवेदना सार्‍या जगाची
हृदयात आहे भरभरून
नाते नवीन असे काही
जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही


— अनिल

23 February 2022

माझ्या या ओटीवर

माझ्या या ओटीवर
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
टपटप दाणे टिपून जातो — टिपून जातो.
होला येतो नि पारवा येतो,
हू हू घू घू करून जातो — करून जातो
मैना येते नि पोपट येतो,
मंजूळ मंजूळ बोलून जातो — बोलून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थय थय थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.

माझ्या या हौदावर
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
बुडबुड गंगे न्हाऊन जातो — न्हाऊन जातो.
होला येतो नि पारवा येतो,
थेंबथेंब पाणी पिऊन जातो — पिऊन जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पाणी उडवून खेळून जातो — खेळून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थुई थुई थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.

माझ्या या बागेत
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
इकडे तिकडे उडून जातो — उडून जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पेरु, डाळिंब खाऊन जातो — खाऊन जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
आंब्याच्या डहाळीवर झुलून जाते — झुलून जाते.
कोकीळ येतो नि बुलबुल येतो,
गोड गोड गाणी गाऊन जातो — गाऊन जातो.— ताराबाई मोडक

21 February 2022

पाणी-पाणी

वर कोर्‍या आभाळाची
भट्टी तापली तापली,
खाली लेकरांची माय
वारा पदराने घाली.

वाऱ्याखाली कसेबसे
उभे रोप जवारीचे,
एक मलूल पोपटी
दोन सुकल्या पात्यांचे.

उभी कोणाच्या दारात
रांग भुकेल्या बाळांची,
थाळा वाडगा घेऊन
अशी तिष्ठत केव्हाची.

पोरक्या या अर्भकांना
एक पाणी का मिळेना,
उभा डोळ्यामधे थेंब
तो का सुकून जाईना.


— इंदिरा संत