रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

March 11, 2014

आई, मला दे ना !

आई, मला छोटीशी बंदूक दे ना !
बंदूक घेईन l शिपाई होईन l
ऐटीत चालीन l एक दोन तीन ll १ ll

आई, मला छोटीशी तलवार दे ना !
तलवार घेईन l सरदार होईन l
शत्रूला कापीन l सप सप सप ll २ ll

आई, मला छोटीशी मोटार दे ना !
मोटार घेईन l ड्रायव्हर होईन l
गावाला जाईन l पों पों पों ll ३ ll

आई, मला छोटेसे विमान दे ना !
विमान घेईन l पायलट होईन l
आकाशी जाईन l भर भर भर ll ४ ll

आई, मला छोटीशी बाहुली दे ना !
बाहुली घेईन l तिला मी सजवीन
ती संगे नाचेन l छुम छुम छुम ll ५ ll


– अज्ञात

March 8, 2014

खचतो माझा धीर

हे चिमण्या चंद्रा ! पाहुनि तुजला खचतो माझा धीर l

मुनिनिं कथिलें, सत्य झालें
परि कशा हें भाळिं आलें
हे मोद खेद मज उलविति बाळा खळत न नयनीं नीर l

जन्म दिधला, करिं न धरिला
अजुनि पान्हा जों न फुटला
ये तोंच स्मरणीं आज्ञा ऋषिंची 'व्रजि पोंचविं यदुवीर' l

देखिलें ना मुखहि पुरतें
तोंच दुरवी बालकातें
ती माता कसली ? घाता सजली ! म्हणतिल अदय अधीर l

त्यांत माजे तिमिर भारी
वीज मधुनी नभ विदारी
हे अकांडतांडव मांडिती नभिंचे घन गर्जुनि गंभीर l

मुसळधारा कोसळे ही
त्रस्त सार्‍या ह्या दिशाही
ही त्वेषें घोषें धांवे यमुना तुडवुनी दोन्ही तीर l

शृंखलांनीं बद्ध असणें
तरिहि कारापार होणें
हें बाळा ! कैसें घडतें असतां नष्ट कंस बाहीर l

दुर्बळांचा देव वाली
पाठिराखा सर्व काळीं
ही आशानौका माझी राखो तोच संकटीं थीरl


वा. गो. मायदेव

इरलेवाली

वेडिंवाकडीं घेउन वळणें
नागिण धावें जणु रोशानें
वाफा टाकित धापांपरी ही गाडी धडधडते

वरतीं भिडली घन घनमाला
धूम धांवते दिग्भागाला
रथचक्रांच्या घरघरीपरी गगनीं गडगडतें

ड्यांकड्यांवर गार चारिवर
झडून राहे सरीवरी सर
जिकडे तिकडे जलधारा ही सारखी खळखळते

बांधावरतीं ऐशा वेळीं
नाजुक बाला काळिसांवळी
हादरणारें शिरिंचें इरलें धरण्या धडपडते

वेष तिचा तो सुंदर साधा
लपवुन गोंडस ठुसका बांधा
दावी यौवनकांती किती ती अंगी मुसमुसते

"आज ना जरी धावुन येतील
लावणि कसची शेती होइल
सासुसासरा उपाशि देवा", ऎशी पुटपुटते

हाती रोप परि गाडी निरखुनि
बघते आपुलें आलें का कुणि
दिसतां, लज्जालहरि शरिरीं निमिषी थरथरते

प्रेमदृश्य हें बघण्या चोरुनि
गुपचिप वाहे नदि इंद्रायणी
स्वभालिं न असें भाग्य म्हणुनि का मनि हि हळहळते !


वा. गो. मायदेव