भा. रा. तांबे (१८७४ – १९४१)
![]() |
भा. रा. तांबे (१८७४ - १९४१) |
'राजकवी' श्री. भास्कर रामचंद्र उर्फ भा.रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ साली मध्यप्रदेशातील झाशी जवळच्या मुगावली या गावी झाला. प्रारंभीचे शिक्षण त्यांनी झांशी येथील पुसाळकर यांच्या खासगी शाळेत आणि त्यानंतर वैदिकाचे शिक्षण घेतले. १८९७ मधे वारूबाई जावडेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
मध्यप्रदेशात वास्तव्य असल्यामुळे हिंदी आणि उर्दू या भाषेचे त्यातील काव्याचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यानी प्रथम देवासच्या हायस्कूलमध्ये व नंतर युवराजांचे शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांचे राजघराण्याबरोबर इंदूरला वास्तव्य होते. तेथे संस्थांचे दिवाण, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षण खात्यात रजिस्ट्रार इत्यादी पदे भूषविली. १९३७ मध्ये "ग्वाल्हेरचे राजकवी" हा बहुमान त्यांना मिळाला.
'राजकवी' भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. रेखीव गेय रचना, कल्पकता, गूढगुंजन, रूपकात्मक रचना ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. शिशुगीते, नाट्यगीते, प्रणयगीते, भावगीते अशा विविध स्वरुपांची काव्यरचना त्यांनी केली. साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी सुनीत या काव्य प्रकारात काही कविता लिहिल्या. बालगीत व नाट्यगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.
त्या काळातील सुप्रसिद्ध मध्य भारतीय कवी संमेलनाचे १९२६ मध्ये ते अध्यक्ष होते. १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.
अशा या सौंदर्यवादी, भावनाप्रधान कवीचे ७ डिसेंबर १९४१ साली निधन झाले. पण आपल्या काव्यामुळे ते आजही अजरामर आहेत.
-~~~~~***~~~~~~
संदर्भ :
प्राचीन काव्यशास्त्र - कंगले र.पं., मौज प्रकाशन, मुंबई, १९७४
अर्वाचीन मराठी काव्यदर्शन - काळे अक्षयकुमार, बनहट्टी प्रकाशन, नागपूर, १९९९.
आधुनिक मराठी कविता: काही रूपे, काही रंग - कुलकर्णी गो. म. , मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९१.
साठोत्तरी मराठी कविता व कवी - जाधव रा. ग., साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९०
अर्वाचीन मराठी काव्य - जोग रा. श्री., मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, १९४६
आधुनिक मराठी कविता - पंडित भ. श्री., सुविचार प्रकाशन, नागपूर, १९६८.