रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

September 29, 2014

अखंड - २

ईशें केलें नाहीं तुजसाठीं सर्व l
करूं नको गर्व l प्राण्यांमध्यें ll १ ll

देह देऊनीयां बुद्धिमान केला l
धनीपणा दिला l सर्वांमध्यें ll २ ll

जगाच्या कल्याणा देह कष्टवावा l
कारणीं लावावा l सत्यासाठीं ll ३ ll

अशा वर्तनानें जन्माचें सार्थक l
संतोषी निर्मीक l जोती म्हणे l l ४ ll


— जोतिराव गोविंद फुले

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

September 27, 2014

ऋणानुबंध

तसे हे गाव आणि  मी एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे
टिपायचे होते तेवढे टिपून घेतले झाले चोचीत दोनचार दाणे
मग गावासाठी मी उरले नाही आणि संपले माझ्यापुरते हे गाव,
पुन्हा शोधणे: नवे रस्ते, नवी माणसे, पुन्हा एखादे नवे गाव.
याहून दरवेशी बरा. निदान त्याला असते सोबत चड्डी घातलेले
एखादे माकड नाहीतर अस्वल. आणि असतो हाताशी जुना तरीही
प्रत्येक दारापुराता नवा खेळ. शिवाय प्रत्येक प्रेक्षक उत्सुक प्रसन्न डोळ्यांनी
स्वागत करतो, हातावर ठेवतो एखाद दुसरे नाणे; निदान चार घरांमागे तर
हक्काचे असतातच वरून नेमून दिलेले पायलीभर दाणे.
आणि दरवेशाला ओळखतात सारे रस्ते. झाडे, मुले, माणसे दरवर्षी नव्याने
तेवढे असतात त्याचे नि गावाचे ऋणानुबंध.

पण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी. सोबत घेऊन आपली सावली.
शोधावा नवा रस्ता. पायांना जर फुटल्याच आहेत दिशा आणि जर आहेतच
गावे प्रत्येक रस्त्यावर, तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले.
नाही तर हा आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा आणि ते रस्ते
दुस​र्‍या रस्त्यांना मिळत जाणारे.


— प्रभा रामचंद्र गणोरकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

शब्द

आज माझा प्रत्येक शब्द
आभाळ झालाय
मी सडून होतो— पडून होतो— कुढून होतो
इतक्यांदि अर्थच नव्हता माझ्या शब्दाला

माझा शब्द: एक गोणपाट
कोनाड्यात पडलेले
पडलेच उपयोगी
तर कधीमधी घर पुसायला
किंवा पोचारा

मला ठाऊकच नव्हते शब्दांचे आभाळपण
कारण तुम्ही शब्दांनाच बांधलं दावणीला
कसे सांगू तुम्हांला
शब्दावाचून दिन सुने जाताना
काळजाचे कसे कोळसे झाले ते

कळणार नाही माझ्या बाबांनो
हा तळहातावर जपलेला
पाळण्यात जोजावलेला
साता समिंद्राच्य पल्ल्याडला माझा शब्द—
शब्द नाहीयच तो
लहलहणारा जळजळीत लाव्हा
जर उच्चारलाच नाही तो
तर त्वचेलाही फुटतीत शब्दांचे घुमारे !

आज चौखूर उधळलेला माझा शब्द—
कसे सांगू तुम्हांला,
आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय !


— अरुण कृष्णाजी कांबळे


(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

September 26, 2014

स्पर्शातून

विसरसीमेहून आठवत आठवत येत आहे
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?

अस्ताभोवती माझं पालवताना मन तुमच्या
मास्तर, उभ्याच आहेत रेघा भागाकाराच्या वेशीच्या

तुम्ही एक अधिक एक शिकवलं
मास्तर, मला तुमच्यात मिळवलं
येता जाता ठेच लागायची,
मास्तर, होता तुम्ही वेशीबाहेर
आमचं नालंदा तुमचं घर

हाडांनी सांधलेली तुम्ही एक आकृती होता
माणूस होता, नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता
तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी
अजूनही नाही कळत मास्तर, तुम्ही अस्पृश्य कसे होता ?

होताहेत आता मुक्त संवाद आकाश-मातीचे
                 पण नालंदा कुठं आहे ?
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?


— फ. मुं. शिंदे

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

तांबियाचे नाणे (अभंग क्र. ४१०१)

तांबियाचे नाणे न चाले खर्‍या मोले   l   जरि हिंडविले देशोदेशी  ll

करणीचे काही न मने सज्जना         l   यावे लागे मना वृद्धांचिया  ll

हिरियासारिखा दिसे शिरगोळ          l   पारखी ते डोळा न पाहती  ll

देउनिया भिंग कमाविले मोती          l   पारखिया हाती घेता नये  ll

तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ       l   आपुले हे चित्त आपणा ग्वाही ll


— संत तुकाराम

मृगाचिये अंगीं (अभंग क्र. ४०८२)

मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास    l    असे ज्यांचा त्यास नसे ठावा ll

भाग्यवंती घेती वेंचूनियां मोलें     l   भारवाही मेले वाहतां ओझें ll

चंद्रामृतें तृप्ति पारणें चकोरा         l    भ्रमरासी चारा सुगंधाचा ll

अधिकारी येथें घेती हातवटी        l    परीक्षवंता दृष्टी रत्न जैसें ll

तुका म्हणे काय अंधळिया हातीं  l    दिलें जैसें मोतीं वायां जाय ll


— संत तुकाराम

September 24, 2014

पाखरांनो तुम्ही

पाखरांनो, तुम्हांलाही आता याची सवय झाली असेल
स्वच्छ, निळ्या आकाशात रोज सकाळी
सायरनचे सूर पसरतात, त्या वेळी
तुम्ही कुठे असता ?
हवेत चढत जातात त्या सुरांची उंच, उंच कंपने
तुमच्यासारखीच…. तेव्हा तुम्ही कुठे जाता ?
समजतात तुम्हांला हे धोक्याचे इशारे
नि नंतरचे उतरत्या सुरांतले
'ऑल क्लिअर' चे दिलासे
—युद्ध्यमान जीवनसंघर्षाची आमची हि रोजची तालीम
पांखरांनो तुम्ही काय करता ?
आम्ही आमची घड्याळे लावतो,
आणि कामाला जायला
किती वेळ आहे याचा अंदाज घेतो !
पाखरांनो, तुम्ही ……


— रमेश अच्युत तेंडुलकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

September 23, 2014

अग्निपंख नभि फडफडु दे

तव अग्निपंख नभि फडफडु दे
निजलेल्या चटका लव बसु दे

तुफानवाता बेडी पडली
वीज ढगांतुनि स्वस्थ झोपली
गगन-धरेला जडता खिळली
त्या प्रलयघनांना कडकडु दे
तव अग्निपंख नभि फडफडु दे

आत शांत जरि दिसते जगती
युद्ध-वैर लाव्हारस कढती
धाराकंपनि आग फुटुनि ती
चल जुनाट जग हे तडतडू दे
तव अग्निपंख नभि फडफडु दे

क्रांतिदेवि, ये, विद्युच्चरणी
तव नयनींची ठिणगी उडवुनि
असंतोष पेटवी जनमनी
मग जुलूम कितिही वर गडगडु दे
तव अग्निपंख नभि फडफडु दे


— वामन रामराव कांत

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

पऱ्यांचे गाणे

चल, चल, धरतीवर उतरू
छुम छुम छननन नाच करू !
मी पहिली, ही दुसरी !
मी दुसरी, ही तिसरी !
सुंदर पंख हळू पसरू,
छुम छुम छननन नाच करू !

रात पडे, चांद चढे,
ओरडती रातकिडे,
हलती, डुलती तालतरू,
छुम छुम छननन नाच करू !

गवत किती मउ हिरवे !
चल, मिळवू हळु तळवे,
लगबग लगबग हात धरू,
छुम छुम छननन नाच करू !

गगन वरी नाच करी,
जग अवघे फेर धरी !
नाच आमुचा होय सुरु,
छुम छुम छननन नाच करू !

घ्या गिरकी, घ्या फिरकी,
पूर्व दिशा हो भुरकी !
दहिवर दिसता परत फिरू,
छुम छुम छननन नाच करू !


— अज्ञात

September 9, 2014

शांत बहरलेली रात्र

शांत बहरलेली रात्र आकाश कसे जवळ आले आहे
         तेज गोठावे तसे साठले आहेत
         पांढर्‍या ढगांचे पुंजके दक्षिणेला
चांदण्यादेखील मोजून घ्याव्यात इतक्याच….
       विखुरलेल्यास्निग्ध.

उंच इमारती झाल्या आहेत अबोल….
         दिवे केव्हाच विझून गेलेत
वारा फक्त झुळझुळत आहे पडद्यांना हेलकावे देत किंचित
लांबलचक पसरले आहेत रस्ते निर्जनपावले दूर गेलेली
सारेच स्वर बुडाले आहेत निद्रेच्या संथ प्रवाहात खोल
         जाणवतो आहे फक्त शांततेचा रंग
         गडदगंभीरकाळाभोर
पलीकडे सारेच आकार हरवले आहेतत्यात माझाही.


— श्रीमती शिरीष व्यंकटेश पै

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

September 8, 2014

तो श्रीकृष्णराओ जेथ

चंद्रु तेथ चंद्रिका  l  शंभु तेथ अंबिका l
संत तेथ विवेका   l  असणें कीं जी ll १ ll

रावो तेथ कटक   l  सौजन्य तेथ सोइरिक l
वन्हि तेथ दाहक   l   सामर्थ्यता ll २ ll

दया तेथ धर्मु   l   धर्मु तेथ सुखागमु l
सुखीं पुरु
षोत्तमु  l  असे जैसा ll ३ ll

वसंतु तेथ वनें  l  वनें तेथ सुमनें l
सुमनिं पालेगनें   l  सारंगांचि ll ४ ll

गुरु तेथ ज्ञान   l  ज्ञानिं आत्मदर्शन l
दर्शनीं समाधान  l  आथि जैसें ll ५ ll

भाग्य तेथ विलासु  l  सुख तेथ उल्हासु l
हें असो तेथ प्रकाशु   l  सूर्यो जेथें  ll ६ ll

तैसे सकळ पुरुषार्थ   l  जेणें कां सनाथ l
तो श्रीकृष्णराओ जेथ   l  तेथ लक्ष्मी  ll ७ ll


— संत ज्ञानेश्वर


पालेगनें = झुंडी, समुदाय    कटक = सैन्य

September 6, 2014

सरस्वतीची भूपाळी

नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा l
बंधुहो, जयजयकार करा l
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा ll ध्रु० ll

विमल हास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत l
निरंतर, असो तुझे स्वागत l
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत ll १ ll

आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती l
बुद्धिचे, वसंत जे विकसती l
त्याच वसंता तदिय विकासा, सरस्वती बोलती ll २ ll

विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी l
दीप्‍ती जी, चित्तमयूरावरी l
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी ll ३ ll

हे वाग्देवी, असे प्रार्थना ये या संकीर्तना l
उत्सवा, ये या संकीर्तना l
जगन्मंगले, सकल मंगलासह दे पददर्शना ll ४ ll

सगुण शांत त्वच्‍चित्रमूर्तिला गातो मी गायन l
शारदे गातो मी गायन l
धन्य धन्य सौंदर्य, धन्य त्वत्प्रसन्‍नपुण्यानन ll ५ ll

किरिट शोभला त्वन्मौलीला अमूल्य तत्वांचा l
शारदे अमूल्य तत्वांचा l
अरुणराग त्यातून उधळला सद्गुणरत्‍नांचा ll ६ ll

डोले कंठी सच्छास्‍त्रांचा चंद्रहार हासरा l
पाहुनी चंद्रहार हासरा l
भाली फुलला, गाली खुलला काव्यदिव्यबिजवरा ll ७ ll

सौंदर्याहुनि दिव्य दिव्यतर हिचे ज्ञान सुंदर l
खरोखर हिचे ज्ञान सुंदर l
त्या ज्ञानाहुनी जगात सुंदर एकच परमेश्वर ll ८ ll

हृदयमंदिरी प्राणशक्‍तीचे झोपाळे डोलवी l
देवि ही झोपाळे डोलवी l
सुखदु:खांचे देउनि झोके जिवांना खेळवी ll ९ ll

विचारकारंज्यावर तुषार शब्दांचे नाचवी l
देवि ही शब्दांचे नाचवी l
जिवात्मा त्यातून बोलवी परमात्मा डोलवी ll १० ll

चराचरांचा दावि चित्रपट अमुच्या स्मरणावर l
भराभर अमुच्या स्मरणावर l
विजेऐवजी त्यात जळे चित्‍चंद्राचे झुंबर ll ११ ll


गोविंद


(सौजन्य : आठवणीतली गाणी . कॉम)