रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

November 29, 2010

धमाल सुट्टी आली

फांदीवरची फूलपाखरे
आभाळात उडाली
स्वैर होऊया त्यांच्यासंगे
धमाल सुट्टी आली

नको आता हो धाक छडीचा
नकोत ती गणिते
इतिहासातील नको लढाई
नको अक्षरवृत्ते
मैदानावर खेळायाची आता घाई झाली

गृहपाठ हो नवा आता हा
आईसक्रीम खाण्याचा
मित्रासंगे हुंदडण्याचा
डिस्को गाण्याचा
एकाऐवजी दोन-दोन चोंकलेट ठेवूया गाली

मित्रमैत्रिणी मिळूनी सारे
हिंडू चौपाटी
बाबांच्याही लागू पाठी
भेलपुरीसाठी
बेत किती हो रचले आम्ही मनाच्या महाली


- प्रवीण दवणे

November 23, 2010

बाभळी

लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागररिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे- कवयित्री इंदिरा नारायण संत

(Compiled by - Ms. Gouri Bargi, Pune)

September 29, 2010

हिरीताचं देनं घेनं

नको लागू जीवा, सदा मतलबापाठी
हिरीताचं देनं घेनं नही पोटासाठी

उभे शेतामधी पिकं
ऊन वारा खात खात
तरसती 'कव्हा जाऊ
देवा, भुकेल्या पोटात'

पेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवाटी,
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे,
यवहार खोटे नाटे
तव्हा बोरी बाभयीच्या
आले अंगावर काटे

राखोयीच्यासाठी झाल्या शेताले कुपाटी,
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

किती भरला कनगा
भरल्यानं होतो रिता
हिरिताच देनं घेनं
नही डाडोराकरता

गेली देही निंघीसनी नाव रे शेवटी
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी- बहिणाबाई चौधरीं

August 30, 2010

आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मुं. शिंदे

August 23, 2010

एखाद्याचें नशीब

(शार्दुलविक्रिडीत)

कांहीं गोड फुलें सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरीं,
कांहीं ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं
कांहीं जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादें फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें !

कोणी पर्वत आपुल्या शिरीं धरी हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एखाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनि पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुले विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी तया जाळते पोळते !

चाले खेळ असा जगात; बहधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दु:खार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठिं तो तापला !


— गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

August 18, 2010

भय इथले संपत नाही..

भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो... तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळांपाशी, मी उरलासुरला थेंब

संध्येतील कमळासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


 कवी ग्रेस

माझी कन्या

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
कां गं गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकांत
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनांतिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
कां गं आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! आली ही पहा, भिकारीण !'

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे ?

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिता विधुवल्लरी समान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारि-रत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलांतून.

भेट गंगायमुनांस होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपैसें.

नेत्रगोलांतुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रां तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासतां तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौर कृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्धृताचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा 'स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडीं मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगें मळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरवितां न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदतां, अनुभवी जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा !
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाऊनीयां
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीयां !

"गावी जातो" ऐकतां त्याच कालीं
पार बदलूनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी" पोर अज्ञ वाचा !— नारायण मुरलीधर गुप्ते (कवी बी)


गाणे (ध्वनिमुद्रण) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या

August 14, 2010

नीतिशतकांतील वेंचे : १

भर्तृहरीच्या "शृंगार", "नीति", आणि "वैराग्य" या तीन्ही मूळ संस्कृत शतकांचे वामन पंडितांनी मराठी अनुवाद केलेत; पण पाठ्यपुस्तकांमध्ये नीतिशतकातलेच श्लोक निवडून दिले जातात. त्यापैकी काही निवडक श्लोक इथे चार भागांत विभागून दिले जातील.


[वसंततिलका]
कीं तोडिला तरु फुटे अणखीं भरानें
तो क्षीणही विधु महोन्नति घे क्रमानें
जाणोनि हें सुजन ज्या दुबळीक आली
त्याशीं कधीं न करिती सहसा टवाळी ll १ ll


[शार्दूलविक्रीडित]
शाणोल्लेख जया असा मणि, रणि जो वीर घायाळला
सांभोगें शिणली अशी नववधू, हस्ती न मस्तावला
ज्यांची स्वच्छ शरदृतूंत पुलिने त्या निम्नगा, चंद्रही
विजेची, प्रभु पात्रदत्तधन जो— हे शोभती सर्वही ll २ ll


[उपजाति]
तृणें मृगाला सोलिलें झषाला
संतोष हे वृत्ति महाजनाला
तयांस निष्कारण सिद्ध वैरी
किरात-कैवर्तक-दुष्ट भारी ll ३ ll


[शिखरिणी]
महिपृष्ठी केव्हां अवचट पलंगी पहुडलो
क्षुधेतें शाकान्ने अवचट सदन्ने निवटितो
कधीं कंथाधारी अवचट सुवस्त्री मिरवितो
मनस्वी कार्यार्थी किमपि सुखदु:खे न गणितो ll ४ ll


[शार्दूलविक्रीडित]
लज्जेने जड, दांभिक व्रतिपणे, कापट्य शौचें गणी
शौर्ये निर्दय, आर्जवें लुडबुड्या, कीं दीन सद्भाषणीं
मानेच्छा तरि मूर्ख, कीं बडबड्या वक्ता, निकामी भला
ऐसा तो गुण कोणता खल-जनी नाहीच जो निंदिला ? ll ५ ll


[वसंततिलका]
मी जीस चिंतित असें न रुचें तिला मी
माने तिला अपर तो नर अन्यगामी
संतुष्ट मध्दिषयिं आन वधूच पाहीं
धिक तीस, त्यास, मदनास, इला, मलाही ll ६ ll


[द्रुतविलंबित]
दुबळिकेंत पसा यव इच्छितो
प्रभुपणीं धरणी तृण मानितो
म्हणुनियां कृपणत्व उदारता
घडतसे समयोचित तत्वतां ll ७ ll


[शार्दूलविक्रीडित]
तोयाचें परी नांवही न उरतें संतप्त लोहावरी,
तें भासे नलिनीदलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी,
तें स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकीं मोतीं घडे नेटकें,
जाणा उत्तममध्यमाधम दशा संसर्गयोगें टिके. ll ८ ll- वामन पंडित(वामन नरहरी शेष)

बिकट वाट वहिवाट

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐसा आपला, उगाच भटकत फिरुं नको
चल सालसपण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलुं नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणि तूं शिरुनी जनाचा, बोल आपणा घेऊ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारामंधी फसूं नको
कधीं रिकामा बसूं नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करुं नको ॥१॥


वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा, करुनी हेवा, झटूं नको
मी मोठा शहाणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनी चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबांला तूं गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपेश माथा घेउ नको
उणी तराजू तोलू नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहुं नको ॥२॥


उगीच निंदा स्तुती कुणाची, स्वहितासाठी करुं नको
बरी खुशामत शाहण्याची, परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजी-भाकरी, तूपसाखरे चोरुं नको
दिली स्थिती देवाने तींतच मानी सुख, कधिं विटूं नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटूं नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकू नको
सुविचारा कातरुं नको
सत्संगत अंतरुं नको
द्वैताला अनुसरुं नको
हरिभजना विस्मरुं नको
सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको ॥३॥कवी - अनंतफंदी (अनंत भवानीबावा घोलप)

असाच

वेगळीच जात तुझी; वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी; एकटाच चाल.

एकटाच चालत जा; दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा; एकटाच सूर

एकटाच चालत जा; उंच आणि खोल
बोल आणि ऐक पुन्हा; तूं तुझाच बोल

तूं असाच झिंगत जा; विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा; अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा; भास तूं तुझेच
शांततेत ऐकत जा; श्वास तूं तुझेच

खोल या दरीत अशा; गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या; मंद चाहुलीत.


- ना. घ. देशपांडे

August 7, 2010

ज्योत

आधीं होते मी दिवटी
शेतकर्‍यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतुन मिणमिणती !

समई केले मला कुणी
देवापुढतीं नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत काळासा धूर !

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदिल त्याला जन म्हणती
मीच तयांतील परि ज्योती.

बत्तिचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बरवें
वरात मजवांचून अडे
झगझगाट तो कसा पडे !

आतां झाले मी बिजली
घरे मंदीरें लखलखली
देवा ठाउक काय पुढें
नवा बदल माझ्यांत घडे.

एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जळो अन् जग उजळो !


- वी. म. कुलकर्णी

डरांव डरांव (बालगीत)

आभाळ वाजलं धडामधूम,
वारा सुटला सूं सूं सूं
विज चमकली चक चक चक,
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो,
पाणी वाहिले सो सो सो
पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभर जाऊन बुडली, बुडली.
बोटीवर बसले बेडूकराव
बेडूक म्हणाला डरांव डरांव.


— सरिता पदकी

इंजिनदादा

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या


- (अज्ञात)

लाला टांगेवाला

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला


- नारायण गोविंद शुक्ल

August 2, 2010

जे उरात उरते

जो गंध फुलांतून झरतो,
वार्‍याच्या उरी उतरतो;
होउन लेखणी वारा,
मग भवतालावर लिहितो.

जी वाफ जलाची होते,
ती मनी नभाच्या शिरते,
बेधुंद सरींनी गाणे
धरतीवर उपडे होते !

नभ, वार्‍याचेच असे हे
औदार्य असावे थोर
नि:संग किती घेताना,
देताना नसतो घोर !

मी भरून घेतो सारे
हृदयाच्या काठोकाठ,
शब्दांतून देताना का
पाझरता होतो माठ ?

मोकळी वाटती झाडे
शिशिरात ढाळूनी पाने
पाळुन मुळांशी बसली
आहेत उद्याची स्वप्ने.

शब्दांतून देऊन थोडे
जी उरात उरते काही;
ती प्रेरक शक्ती मजला
जगण्याची देते ग्वाही !


— खलील मोमीन

विद्याप्रशंसा

[आर्या]

विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्टत्व ह्या जगामाजीं;
न दिसे एकहि वस्तू विद्येनेंही असाध्य आहे जी ll १ ll

व्यासादिक आद्य मुनी कवि अर्वाचीन सर्व थोर तसे
म्हणती एकमतें कीं, धन विद्यासम नरास अन्य नसे ll २ ll

देउनि किंवा भोगुनि उणें न होतां सदैव वाढतसे
ऐसे एकच विद्या-धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे ll ३ ll

न बलात्कारें राजा, न चोर कपटें, जया हरायास
होई समर्थ, ज्याच्या अल्पहि संरक्षणीं न आयास ll ४ ll

नानाविध रत्नांचीं कनकाचीं असति भूषणें फार;
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार ll ५ ll

या सार्‍या भुवनीं हित-कर विद्येसारखा सखा नाहीं;
अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांहीं ll ६ ll

गुरुपरि उपदेश करी, संकट्-समयीं उपायही सुचवी,
चिंतित फल देउनियां कल्पतरूपरि मनोरथां पुरवी ll ७ ll

विद्याबलसम अढळे न दुजें बल कोणतेंहि या लोकीं;
तीनें निजप्रभावें वश केलें सकल विश्व, अवलोकीं ! ll ८ ll

क्षुद्रा पशुपक्ष्यांची काय कथा? पांचही महाभूतें
ज्ञानबळें आकळुनी केलें मनुजें स्वदाससम त्यांतें ll ९ ll

विसरुनि परस्परांचा विरोध जल वन्हि सेविती त्यातें;
दासांपरि वश होउनि करिती त्याच्या समस्त कृत्यांतें ll १० ll

त्याचीं वस्त्रें विणिती, रथ ओढिती, लोटितीहि नौकांतें;
बहु सांगणें कशाला? करिती तो सांगतो तयां तें तें ! ll ११ ll

मोठे मोठे तरुवर मोडी, फोडीहि जी शिलारशी,
विद्युल्लता नरें ती केली संदेशहारिका दासी ! ll १२ ll

विद्येच्या सामर्थें केला रवि चित्रकार मनुजानें;
होउनि अंकित वायुहि तुष्ट करी त्यास सुस्वरें गानें ! ll १३ ll

यापरि सकल सुखें जी देई, दु:खें समस्त जी वारी,
त्या विद्यादेवींते अनन्यभावें सदा भजा भारी ll १४ ll

नाहीं परोपकारापरि दुसरें थोर पुण्य हें वचन
सत्य असे तरि विद्यादानाशीं तुल्य पुण्य आणिक न ll १५ ll

ऐश्वर्यबलधनादिक सौख्यें प्रसवे समस्त जी कांहीं,
ती विद्या जो देई, तेणें वद काय तें दिलें नाहीं? ll १६ ll- कृष्णशास्त्री चिपळूणकर


टीप: मूळ २३ आर्यांपैकी निवडक १६ आर्यांचा वेचा इथे देण्यात आला आहे.

ऋण

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥
चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥


— श्री. दि. इनामदार

ऋणाईत

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...


कवी - केशव तानाजी मेश्राम

July 31, 2010

झाल्या तिन्हिसांजा

[जाति : अवनी]
अजुनि कसे येती ना, परधान्या राजा ?
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ध्रु.ll

उशिर होइ काढाया, गाईंच्या धारा
शालु हिरा कालवडी, देती हुंकारा
टवकारिती कान जरी, वाजे दरवाजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll १ ll

वाट तरी सरळ कुठें, पांदीतिल सारी ?
त्यांतुनि तर आज रात्र, अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll २ ll

'जेवणार मी पुढ्यांत' घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरि न निजे मंजी
आणि किती करति आंत-बाहेरी ये-जा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ३ ll

निवल्यावर हुर​ड्याच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होइ जीव माझा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ४ ll

गुरगुरला तो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळिज कीं नाही !
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हिसांजा ll ५ ll


— यशवंत

स्वर्ग

असतिल तेथें जिकडे तिकडे विखरुन पडलीं फुलें
असतिल पक्षी झाडांवरती गोड गात बैसले

असेल तेथें वहात सुंदर दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवीं पिवळीं कमळें पाण्यामधीं

घरें तेथलीं सुरेख असतील चमकत सोन्यापरी
आंत लाविल्या असतिल रंगीबेरंगी तसबिरी

झगमग करीत असतील तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतील ते वार्‍यानें जणुं दुसरे काजवे

रोजच जत्रा भरत असावी तिथें नदीच्या तटीं
असतिल खाउ देत घेउनी पैसे दाटूमुटी

पंख लावुनी हिंडत वरतीं असतील तिथलीं मुलें
असतिल चालत ढगावरुनही टाकीत हळुं पावलें

असतिल भारी रंगीत कपडे बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या गुंफुंनिया पाकळ्या

खूप दागिने असतिल त्यांनीं अंगावर घातले
पुन्हां काढुनी नसतील कधिंही पेटिमधीं ठेविले

मुळींच नसतिल त्यांच्या नशिबीं अभ्यासाचीं बुकें
मनास माने तितुके भटकत असतील ते सारखे

नसतिल त्यांना ठोक द्यावया तिथें खाष्ट मास्तर
स्वर्ग असा मज बघावयाला मिळेल का लवकर?


- ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ)

महाराष्ट्र गीत

बहु असोत सुंदर संपन्न कीं महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ll ध्रु. ll

गगनभेदि गिरिविण अणु नच तिथे उणे
आकांक्षांपुढति जिथें गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगिं जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दांविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा llll

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा llll

नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा llll

विक्रम वैराग्य एक जागिं नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा llll

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरी ठसो
वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा llll— श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

July 30, 2010

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या
दारास नाही दोर्‍या या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ति तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥— संत तुकडोजी महाराज

July 24, 2010

आई

'आई' ! म्हणोनि कोणी आईस हांक मारी
ती हांक येई कानी मज होय शोककारी l
नोहेच हांक, माते मारी कुणी कुठारी,
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारीं! l
ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी ll १ ll
चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोट्यांत वासरांना ह्या चाटतात गाई  l
वात्सल्य हें पशूंचें मी रोज रोज पाहीं
पाहून अंतरात्मा व्याकूळ हाय होई  l
वात्सल्य माउलीचें आम्हां जगांत नाहीं
दुर्भाग्य याविना का? आम्हांस नाहिं आई ll २ ll
शाळेतुनी घराला येतां धरील पोटीं
काढून ठेविलेला घालील घास ओठीं  l
ष्टया तशा मुखाच्या धांवेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे का ह्या करील गोष्टी?  l
तूझ्याविना न कोणी लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया आम्हां 'शुभं करोति' ll ३ ll
ताईस या कशाची जाणीव काहिं नाहीं
त्या सान बालिकेला समजे न यांत कांहीं  l
पाणी तरारतांना नेत्रांत, बावरे ही
ऐकूनी घे परंतू "आम्हांस नाहिं आई"  l
सांगे तसे मुलींना "आम्हांस नाहिं आई"
ते बोल येति कानीं "आम्हांस नाहिं आई" ll ४ ll
आई! तुझ्याच ठायीं सामर्थ्य नंदिनीचें
माहेर मंगलाचें अद्वैत तापसांचें l
गांभीर्य सागराचें औदार्य या धरेचें
नेत्रांत तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचें l
वात्सल्य गाढ पोटी त्या मेघमंडळाचें
वात्सल्य या गुणांचें आई, तुझ्यांत साचें ll ५ ll
गुंफुनी पूर्वजांच्या मी गाईलें गुणांला
सार्या सभाजनांनीं या वानिले कृतीला l
आई! करावया तूं नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही मज त्याज्य पुष्पमाला l
पंचारती जनांची ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा तव कौतुका भुकेला ll ६ ll
येशील तूं घराला परतून केधवां गे ?
दवडूं नको घडीलाये ये निघून वेगें l
हे गुंतले जिवीचे पायी तुझ्याच धागे l
कर्तव्य माउलीचें करण्यास येइं वेगें
रुसणार मी न आतां जरि बोलशील रागें
ये रागवावयाही परि येइ येइ वेगें ll ७ ll


— यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर)

गाउं त्यांना आरती

[वृत्त : पांडव दिडकी]
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारतीं
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउं त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिलें
संभ्रमी त्या जाहले, कृष्णापरी जे सारथी, गाउं त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीवितीं, तो परार्थी पाहती
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउं त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचें दास्य ज्यांचा धर्म हो दास्य-मुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउं त्यांना आरती

देह जावो, देह राहो; नाहि ज्यांना तत्क्षितीं, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउं त्यांना आरती

जाहल्या दिड.मूढ लोकां अर्पिती जे लोचनें, क्षाळुनी त्यांची मनें
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउं त्यांना आरती

नेटकें कांही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितों कीं "एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती."


— यशवंत

July 1, 2010

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,
रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,
'जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,
पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,
आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

'जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,
दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !


- वि. म. कुलकर्णी

अमर हुतात्मे

ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !


- वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

June 21, 2010

बघ आई आकाशात !

बघ आई आकाशात सूर्य हा आला |
पांघरून अंगावरी भरजरी शेला ||
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी |
मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी ||
केशराचे घातलेले सडे भूवरी |
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी ||
डोंगराच्या आडून हा डोकावे हळू |
आणि फुले गुलाबाची लागे ऊधळू ||
नभातून सोनियाच्या ओती तो राशी |
गुदगुल्या करी कश्या कळ्या फुलांसी ||
पाखरांच्या संगे याची सोबत छान |
गाती बघ कशी याला गोड गायन ||
मंद वारा जागवीतो सार्‍या जगाला |
म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला ||


 शांता शेळके

May 29, 2010

आव्हान

छळून घ्या संकटानो,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा
जळून पुन्हा जळणार नाही.

साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनार्‍याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही ll १ ll

निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही ll २ ll

आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी
संकटानो सावधान गाफील मी असणार नाही ll ३ ll


कवी - अशोक थोरात

May 5, 2010

पतंग उडवूं चला

पतंग उडवूं चला
गडयांनो, पतंग उडवूं चला.

रंग ढगांवर मावळतीचा
लाल पिवळसर किती मजेचा,
झुळझुळ वारा नदीकांठचा
बाजुस डोंगरमळा.

करु चला सुरवात बरोबर,
सोडा सोडा रीळ भराभर,
पंतग चढवा हे वाऱ्यावर,
ढगांस भेटायला.

मउमउ वाळुंत पाय रोवूनी,
देउं झटका दोरा ओढुनी,
पतंग जातील वर वर चढुनी,
पंख नको त्यांजला.

जशीं पाखंरें आभाळांत,
पंख पसरुनी तरंगतात,
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला !

सूर्य डोंगराआड लपेल,
काळा बुरखा जग घेईल,
खेळ तोंवरी हा चालेल
मजेदार आपुला.


— अ. ज्ञा. पुराणिक

गे मायभू

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !

मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग... काशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !


- सुरेश भट

मायबोली

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगांत माय मानतो मराठी
आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरांत वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी
येथल्या फुलाफुलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगांत गर्जते मराठी
येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
येथल्या वनावनांत गुंजते मराठी
येथल्या तरुलतांत साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरांत राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी— सुरेश भट

April 3, 2010

घननिळ

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया


- विद्याधर सीताराम करंदीकर

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखांत गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखांत गेले.


- नारायण सुर्वे (ऐसा गा मी ब्रह्म)

पोटापुरता पसा पाहिजे

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ ध्रु ॥

हवाच तितुका पाडी पाउस देवा, वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा, मायमाउली काळी
एका वितीच्या भूकेस पुरते, तळहाताची थाळी ॥ १ ॥

महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ॥ २ ॥

सोसे तितुके देई, याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देइ वा दु:ख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणाही नलगे, नलगे पस्तावाची पाळी ॥ ३ ॥


 ग. दि. माडगूळकर

चैत्र पाडवा

शुभारंभ करी शक गणनेचा
करुनी पराभव दुष्ट जनांचा
शालिवाहन नृपति आठवा
चैत्रमासिचा गुढीपाडवा

किरण कोवळे रविराजाचे
उल्हासित करते मन सर्वांचे
प्रेमभावना मनी साठवा
हेचे सांगतो गुढीपाडवा

घराघरांवर उभारुया गुढी
मनामनांतील सोडून अढी
संदेश असा हा देई मानवा
चैत्र प्रतिप्रदा-गुढीपाडवा

जुन्यास कोणी म्हणते सोने
कालबाह्य ते सोडून देणे
नव्या मनूचे पाईक व्हा
हेच सांगतो गुढीपाडवा

नववर्षाचा सण हा पहिला
वसंत ऋतूने सुरू जाहला
प्रण करुया मनी नवा
हेच सांगतो गुढीपाडवा


- मंगला गोखले

April 1, 2010

कशासाठी? पोटासाठी!

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळूं आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कूकुक्‌ शीट झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी. ll १ ll

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी ll २ ll

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगांत
मागें मागें धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलांत
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी ! ll ३ ll


- माधव जूलीयन

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावुं तूज आतां मी कोणत्या उपायीं ?

तूं माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आतां कसे करू मी ?
गेली दुरी यशोदा, टाकुनी येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीही वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;
नैष्ठुर्य त्या सतीचे, तूं दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीप्य साधण्यातें.

नाही जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा, लाभे अतां मला ही,
आईविणे परी मी, हा पोरकाच राही.
सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई, तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.
किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा, की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई
पाहुनीया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही
वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

March 22, 2010

अस्मान कडाडून गेला

ही अशी उडी बघताना,
कर्तव्य मृत्यु विस्मरला
बुरुजावर फ़डफ़डलेला,
झाशितील घोडा हसला
वासुदेव बळवंताच्या,
कंठात हर्ष गदगदला
दामोदर डोले वरला,
मदनलाल गाली फ़ुलला
कान्हेरे खुदकन हसला
क्रांतीच्या केतूवरला - "अस्मान कडाडून गेला" "अस्मान कडाडून गेला"

दुनियेत फ़क्त आहेत
विख्यात बहाद्दर दोन
जे गेले आईकरिता,
सागरास पालांडून
हनुमंतानंतर आहे - "ह्या विनायकाचा मान" "ह्या विनायकाचा मान"- मनमोहन नातू

February 6, 2010

'शहाणी बाहुली'

या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया ll १ ll

ऐकून येते,
हळूहळू अशी माझी छबी बोलते ll २ ll

डोळे फिरवीते,
टुलु टुलु कशी माझी सोनी बघते ll ३ ll

बघा बघा तें,
गुलुगुलु गालांतच कशी हंसते ll ४ ll

मला वाटते,
इला बाई सारें काहीं सारें कळते ll ५ ll

सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे भलते ll ६ ll

शहाणी कशी!
साडिचोळी नवि ठेवि जशिच्या तशी ll ७ ll


कवि : दत्तात्रय कोंडो घाटे

February 4, 2010

माय मराठी


माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत !

ज्ञानोबांची, तुकयांची
मुक्तेशांची, जनाईची
माझी मराठी चोखडी
रामदास, शिवाजींची !

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची !

डफ-तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी !
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर !

नव्या प्राणाची 'तुतारी'
कुणी ऐकवी उठून
मधुघट अपी कुणी
कुणी माला दे बांधुन !

लेक लाडका एखादा
गळां घाली वैजयंती
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची !

कृष्णा-गोदा-सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी !


— वि. म. कुलकर्णी

बालभारती पाठयपुस्तकात फक्त पांचच कडवी होती.

लेझिम
दिवस सुगीचे सुरु जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी मन प्रफुल्ल झाले...,
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले
सिंहासनीं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफवाले...,
ट्प ढुम, ढुम ढुम, डफ तो बोले, लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली
पटक्यांची वर टोंके डूलली
रांग खेळण्या सज्ज जाहली...,
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं
लेझिम चाले मंडल धरुनी
बाजुस-मागें, पुढे वाकुनी...
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले
वेळाचे त्या भान न ऊरले
नादभराने धुंध नाचले...,
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !

सिंहासन ते डुलू लागले
शाहिर वरती नाचू लागले
गरगर फिरले लेझिमवाले...
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !

दिनभर शेती श्रमूनी खपले
रात्रीसाठी लेझीम चाले
गवई नलगे, सतारवाले...,
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !

पहांट झाली - तारा थकल्या
मावळतीला चंद्र उतरला
परी न थकला लेझिम-मेळां...,
ढूम झन, खळ खळ, लेझिम खाली...
"चला जाऊया शेतांत" !!

- श्रीधर बाळकृष्ण रानडे

January 30, 2010

खरा धर्म

खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अति पतित,
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे II १ II
जयांना कोणी ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे,
जगाला प्रेम अर्पावे II २ II
समस्तां धीर तो द्यावा,
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे II ३ II
चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई
सदा जे आर्त अति विकल,
जयांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावे II ४ II
कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे,
जगाला प्रेम अर्पावे II ५ II
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे II ६ II
जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य,
प्रकाशा तेथ नव न्यावे II ७ II
असे जे आपणांपाशी,
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे,
जगाला प्रेम अर्पावे II ८ II
भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे,
जगाला प्रेम अर्पावे II ९ II
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावेII १० II
जयाला धर्म तो प्यारा,
जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे,
जगाला प्रेम अर्पावे II ११ II

— साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

टीप : सातवे आणि शेवटची तीन कडवी बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ठ नाहीत.

गाणे ऐकण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा
खरा तो एकचि धर्म

आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणाऱ्यांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण- साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रुसंगे,
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक,
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू,
जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा,
झाशिवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू,
जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर,
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू,
जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर,
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू,
जिंकू किंवा मरू


— ग. दि. माडगूळकर

कोलंबसचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमळुदे तारे !
विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे
ढळूदे दिशाकोन सारे !
ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !
की स्वर्गातुन कोसळलेला, सुड-समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान !
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि, तुटुदे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी
नाविका ना कुठली भीती !
सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरि असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम !
काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी
जपावे पराभूत प्राणा ?
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा !
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ! "— कुसुमाग्रज

जाग जाग भारता

जाग जाग भारता, काळ कठीण ये अतां
शत्रुसैन्य पातलें, खडग उचल स्वागता

समरीं ज्वाळ पेटली, कैक घेतले बळी
थोर आपुल्यांतली, दाखवी मृगेंद्रता

कोटि देह एक प्राण, एक लक्ष्य एक आण
हिंदभूस वाचवूं, ना विचार अन्यथा

थांब लाल राक्षसा, निश्चय बघ रे कसा
लक्ष बिंदु सांडवूं, एक बिंदु सांडता

बेईमान जो तया, दाखवूं नको दया
देशनिष्ठ राहिला, तोच बंधू आपुला

वागवीं अता तरी, बोध एक अंतरी
ध्येय शांतिचे तरी, रक्ष रक्ष वीरता


- यशवंत देव

शिंग फुंकिले रणी

शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे
सज्ज व्हा, उठा उठा, सैन्य चालले पुढे

दास्यकाल संपला, शांत काय झोपला?
अग्नि येथ कोपला, पेटुनी नभा भिडे

लोकमान्य केसरी, गर्जतात वैखरी
माजला असे अरी, चारू त्याजला खडे

वीस सालचा लढा, जाहला किती बडा
इंग्रजास बेरडा, आणिले कसे रडे

तीस सालची प्रभा, उज्ज्वला भरी नभा
गांधि अग्रणी उभा, ठाकला रणी पुढे

शीर घेउनी करीं, दंग होउ संगरीं
घालवू चला अरी, सागरापलीकडे


— वसंत बापट

जयोस्तुते (गौरवगीत)

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महंमधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
भरतभूमिला दृढालिंगना कधी देशील वरदे
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तिथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरांचा सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत्र तो कां गे त्वां त्याजिला
स्वतंत्रते, या सुवर्णभूमित कमती काय तुला ?
कोहिनुरचे पुष्प रोज घे ताजे वेणीला- स्वातंत्र्यवीर सावरकर

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ! ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूंता l मी नित्य पाहिला होता;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं l सृष्टिची विविधता पाहू.
तैं जननीहृद् विरहशंकितहि झालें l परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन l त्वरित या परत आणीन !'
गंभीर त्वदाकृति बघुनी, मी
विश्वसलों या तव वचनीं, मी
जगद्नुभवयोगे बनुनी, मी
तव अधिक शक्त उद्धरणी, मी
"येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ १ ॥


शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं l ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं l दशदिशा तमोमय होती,
गुण-सुमनें मी वेंचियली या भावें l कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा l हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बालगुलाबही आतां, रे
फुलबाग मला, हाय ! पारखा झाला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ २ ॥


नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा l मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद इथे रम्य; परी मज भारी l आईची झोंपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा l वनवास तिच्या जरि वनिचा.
भुलविणें व्यर्थ हें आतां, रे
बहु जिवलग गमते चित्ता, रे --
तुज सरित्पते, जी सरिता, रे
त्वदविरहाची शपथ घालितो तुजला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ ३ ॥


या फेन-मिषें हंससि, निर्दया, कैसा l कां वचन भंगिसी ऐसा?
त्वस्वामित्वा सांप्रत जी मिरवीते l धकुनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी ? l मज विवासना तें देशी?
तरि आंग्लभूमि-भयभीता, रे
अबला न माझिही माता, रे
कथिल हें अगस्तिस आतां, रे
जो आंचमनी एक पळीं तुज प्याला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ ४ ॥- स्वा. विनायक दामोदर सावरकर


२७ मे १९३८ रोजी 'मराठा' या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकरचरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरानी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या या काव्याला १० डिसेंबर २००९ रोजी  शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षानंतर आजही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात. ब्रायटनच्या किना-यावर चिंतन करत असताना, तात्यारावांच्या मनात आत मातृभूमीची ओढ लागली होती. त्या भावनावेगातच त्यांना हे उत्कट काव्य स्फुरले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र निरंजन पाल होते त्यांनी हे काव्य लिहून घेतले.

घेता

देणाऱ्याने देत जावें;
घेणाऱ्याने घेत जावें.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगांकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.

देणाऱ्याने देत जावें
घेणाऱ्याने घेत जावें;
घेतां घेतां एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे !


– विंदा करंदीकर

आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जगत ये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!


- केशवसुत

January 22, 2010

मी फूल तृणांतिल इवलें

जरि तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाही.

शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें

कुरवाळित येतिल मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करतिल सजल इषारा

रे तुझिया सामर्थ्यानें
मी कसें मला विसरावें ?
अन रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें ?

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा;
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होउनि ये तूं
कधि भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू !

तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावें

पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरि दाही
मी फूल तृणातिल इवलें
उमलणार तरिही नाहीं.


— मंगेश पाडगावकर

घाल घाल पिंगा वाऱ्या

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर" सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुलीया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !


—  कृ.ब. निकुंब
गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घाल घाल पिंगा वार्‍या

January 21, 2010

खबरदार जर टाच मारुनी


सावळ्या: खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या —
उडविन राइ राइ एवढ्या !

कुण्या गांवचे पाटिल आपण कुठे चाललां असे
शीव ही ओलांडुनि तीरसे ?
लगाम खेचा हा घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेउ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे,
हे हाडहि माझे लेचेपेचें नसे
या नसानसांतून हिंमतबाजी वसे
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या !


स्वार: मळ्यांत जाउन मोटेचे ते पाणी धरावे तुवां
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठींत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरें
वीर तूं समजलास काय रे ?
थोर मारसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकतें
अणकुचीदार अति भाल्याचे टोक तें
यापुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर पाऊल पुढे टाकशील, चिंधड्या —
उडविन राइ राइ एवढ्या !


सावळ्या: आपण मोठे दाढीवाले अहां वीर बायकी
किती ते आम्हांला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हां माहिती न का?
दावितां फुशारकी कां फुका ?
तुम्हांसारखे असतील किती लोळविले नरमणी
आमुच्या शिवबाने भररणी
मी असे इमानी चेला त्यांचेकडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचेपुढे
देईन न जाऊ शूर वीर फांकडे
पुन्हा सांगतो खबरदार जर जाल पुढे, चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या !

लालभडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
(स्वार परि मनी हळू कां हंसे ?)
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
"आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या पुन्हां बोल एकदां
'खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या !' "- वा. भा. पाठक

January 19, 2010

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर


— मंगेश पाडगांवकर

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!


— मंगेश पाडगांवकर

संथ निळें हें पाणी

संथ निळें हें पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरिंमधुनी
शीळ घालितो वारा
दूर कमान पुलाची
एकलीच अंधारीं
थरथरत्या पाण्याला
कसलें गुपित विचारी ?
भरुन काजव्यांनीं हा
चमके पिंपळ सारा
स्तिमित होउनी तेथें
अवचित थबके वारा !
किरकिर रातकिड्यांची
नीरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरती अंधारीं !
मधेंच क्षितिजावरुनी
वीज लकाकुनि जाई
अन ध्यानस्थ गिरीही
उघडुनि लोचन पाही !
हळुच चांदणे ओलें
ठिबके पानांमधुनीं
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणांमधुनी !
संथ निळें हें पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधानें
मौनाचा गाभारा !— मंगेश पाडगांवकर

टप‌ टप‌ पडती अंगावरती

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पहा भरारा, गवत खुशीने डुले !


दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !


— मंगेश पाडगांवकर

शतदा प्रेम करावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे


— मंगेश पाडगांवकर

दगडाची पार्थिव भिंत

मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमीही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।
पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।
की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।
दगडाची पार्थिव भिंत - ती पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।


- मनमोहन नातू

घड्याळ

गडबड घाई जगांत चाले,
आळस डुलक्या देतो पण;
गंभीरपणें घड्याळ बोले —
'आला क्षण गेला क्षण!'

ड्याळास या नाहीं घाई,
विसावाहि तो नाहीं पण;
त्याचें म्हणणें ध्यानीं घेई —
'आला क्षण गेला क्षण!'


कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
ड्याळ बोले अपुल्या वाचे —
'आला क्षण गेला क्षण!'


कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयीं हाणित घण,
काळ-ऐक ! — गातो अपुल्याशी
'आला क्षण गेला क्षण!'


लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती —
''आला क्षण गेला क्षण!'केशवसुत


तळटीप : मूळ कवितेत आठ कडवी असल्याचे आढळून येते पण पाठ्यपुस्तकात शेवटची तीन कडवी अंतर्भूत नसल्यामुळे वगळण्यांत आली आहेत.

कादरखां

हा कोण इथे पडलेला! 'कादरखां काबुलवाला' ! धृ.
धिप्पाड देह हा आडवा, पसरला सहा अन् फूट !
पालथे पलीकडे पडले, विक्राळ खिळ्यांचे बूट !
चुणीदार चोळणा आतां, फाटून होय चिरगूट !
बैसला पठाणी बडगा, बाजूला दूर निमूट !
चिखलांत बुडाले कल्ले
त्यां ओढिती चिल्लें-पिल्लें
खिसमीस खिशांतील उरलें
कुणी मारी तयावर डल्ला, 'कादरखां काबुलवाला' !...१

अफगाण दर्‍यांतील आतां, डरकळ्या फोडिती शेर !
बुरख्यांतुनी कंदाहारी, उठलासे हाहा:कार !
तो शर्बत पीतां-पीतां, दचकेल मधेंच अमीर !
'क्या हुवा !'ओरडुनी ऐसें, बडवितात सगळे ऊर !
ते हेरतचे अक्रोड
ते बदाम-पिस्ते गोड
रडरडुनी होती रोड !
अल्बुखार अंबुनी गेला ! 'कादरखां काबुलवाला' !...२

तो हिंग काबुली आतां, विकणार यापुढें कोण ?
व्याजास्तव बसुनी दारीं, गरिबांचा घेइल प्राण ?
खाणार कोण यापुढतीं, तीं कलिंगडें कोरून ?
सजवीलvनूर नयनांचा, कीं सुरमा घालुनी कोण ?
रस्त्यावर मांडुनी खाटा
हुक्क्यासह मारिल बाता-
हिंडेल कोण वा आतां
घालून चमेलीमाळा ? 'कादरखां काबुलवाला' ! ...३

करुं नका गलबला अगदीं, झोंपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्याने,! पहुडला शांत गंभीर !
राहणें जितें जर, मागें, व्हा दोन पावलें दूर !
हा बसेल मानगुटीला, ना तरी होउनी पीर !
जा पळा-पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,
अडकवील कीं साक्षीला,
मग म्हणाल "पुरता भंवला ! कादरखां काबुलवाला" !...४


- प्र. के. अत्रे (केशवकुमार)

January 16, 2010

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनी हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते
"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी,
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी,
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"
चित्रकार : श्री. विजय शिंदे
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनीयां सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानी तो घणघणा घंटाध्वनी आदळे.
खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनीसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे,घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा
सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी !
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो ! तरी ना मिळे !

— केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे)

परवचा = तोंडाने म्हटलेली उजळणी;     झांजर = पहाट;    फडताळ = भिंतीतील कपाट

(बालभारती पाठ्यपुस्तकात पाचवे कडवे वगळलेले आहे)


गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक

January 15, 2010

आकाशवेडी

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी.
स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.
अशी झेप घ्यावी, असे सूर गावे,
घुसावे ढगामाजि बाणापरी,
ढ्गांचे अबोली भुरे केशरी रंग
माखून घ्यावेत पंखावरी.
गुजे आरुणी जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारिते काय वीणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर.
कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी
किती उंच जाईन, पोचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी!


- पद्मा गोळे

बाभुळझाड

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll
जगले आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांध्यावरती वरती सुताराचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll
टक... टक... टक... टक...
चिटर फटर... चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला
सोलत आहे, शोषत आहे ll५ll
आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे
आत फार जळते आहे ll६ll
अस्स्ल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll७ll


— वसंत बापट

उन्मेष यांच्या मदतीने साभार.

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले
दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले –  बा. भ. बोरकर

चढवू गगनी निशाण

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान

मुठ न सोडू जरी तुटला कर, गाऊ फासही जरी आवळला तर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरी शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगूनी पाषाण

विराटशक्ती आम्ही मानव, वाण अमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरीट उद्धट ठेवुनी पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण


–  बा. भ. बोरकर

तेथें कर माझे जुळती

तेथें कर माझे जुळती
दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥धृ.॥

हृन्मंदिरी संसृतिशरस्वागत
हंसतचि करिती कुटुंबहितरत
गृहस्थ जे हरि उरात रिझवित,
सदनीं फुलबागा रचिती ॥१॥

ज्या प्रबला निज भावबलानें
करिती सदनें हरिहरभुवनें,
देव-पतींना वाहुनि सु-मने
पाजुनि केशव वाढविती ॥२॥

गाळुनियां भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगविती,
जलदांपरि येउनियां जाती,
जग ज्यांची न करी गणती ॥३॥

शिरीं कुणाच्या कुवचनवॄष्टी,
वरिती कुणि अव्याहत लाठी,
धरिती कुणि घाणीची पाटी,
जे नरवर इतरांसाठीं ॥४॥

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिलें मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहिं चिरा, नाही पणती ॥५॥

स्मितें जयांची चैतन्यफुले,
शब्द जयांचे नव दीपकळे,
कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे,
प्रेमविवेकी जे खुलती ॥६॥

जिथें विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥७॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरीं तम चवर्‍या ढाळी;
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळीं;
एकांती डोळे भरती ॥८॥


–  बा. भ. बोरकर


अधिक टिप : आशाबाईंनी हि कविता पूर्ण गायलेली नाही.

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळांचे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात ||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी ||–  बा. भ. बोरकर