रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

March 31, 2012

पिसाट मन

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !


- ना. घ. देशपांडे

समतेचें हें तुफान उठलें

ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचें हें तुफान उठलें; उठले सागरकडे ll धृ ll

हीच मराठी जिच्या मुखानें वदली ज्ञानेश्वरी;
शिवबानें तलवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठीं झडले तोफांचे चौघडे ll १ ll

टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी–
स्वातंत्र्याच्या पांच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे ll २ ll

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही; आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढें चला रे, चला सुराज्याकडे ll ३ ll

दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना;
कंकणनादा भिऊनि तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरतीं त्याही घुसल्या पुढें ll ४ ll

ऊठ खेडुता, पुन्हां एकदा, झाडुनियां घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हां मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे ll ५ ll


— विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

March 30, 2012

आवाहन

ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले,
त्यांनी दोन गाणी द्यावीत ll १ ll

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते,
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगांचा अंधार जेथे,
पहाटेचा गाव न्यावा ll २ll

ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी,
रिते करुन भरुन घ्यावे ll ३ll

मन थोडे ओले करुन
आतून हिरवे हिरवे व्हावे
मन थोडे रसाळ करुन
आतून मधुर मधुर व्हावे ll ४ ll

आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे ll ५ ll


— गणेश (दत्ता) तात्याराव हलसगीकर

घर कौलारू

आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू ll धृ ll

पूर्व दिशेला नदी वाहते
त्यात बालपण वाहत येते
उंबरठ्याशी येऊन मिळते
यौवन लागे उगा बावरू ll १ ll

माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतुन पिकते प्रीती
कणसावरची माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती-पाखरू ll २ ll

आयुष्याच्या पाउलवाटा
किती तुडविल्या येता-जाता
परि आईची अठवण येता
मनी वादळे होती सुरू ll ३ ll— अनिल भारती

दान


पांबरलं शेतं । ढग बरसले
बीज अंकुरले। मिरगात ।।१।।

पावसात भिजे । काळी काळी माती
दाणे बिलगती। कणसाला ।।२।।

धांड्यावर झुले । दिमाखात गोंडा
पानातून झेंडा । फडकला ।।३।।

शिवारामधून । पीक उधाणले
पक्षी झपाटले । दाण्यावर ।।४।।

जात्यातून दाणं । पिठाचं दे दान
जगा वरदान । कुणब्याचे ।।५।।


— वा. ना. आंधळे

पांबरलं = नांगरले,             मिरग = मृग नक्षत्र

March 20, 2012

माझ्या जन्मभूमीचें नांव

[मंदारमाला]

सृष्टी तुला वाहुनी धन्य ! माते, अशी रुपसंपन्न तूं निस्तुला !
तूं कामधेनू ! खरी कल्पवल्ली ! सदा लोभला लोक सारा तुला;
या वैभवाला तुझ्या पाहुनीयां, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी ! तसें पाहिलें मी न कोठें तरी !

माते ! महात्मे तुझे, तत्ववेत्ते, तुझे शूर योद्धे, तुझे सत्कवी
श्रेणी ययांची सदा माझिया गे ! मना पूजनीं आपुल्या वांकवी !
यांची यशें ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती, ध्येय ते गे जरी
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी ! तसें पाहिलें मी न कोठें तरी !

तूझ्या महोदार सारस्वताच्या महासागरींचा जरी मीन मी
झालों, तरी गे ! तृषा मन्मनाची कधींही कधींही न होणें कमी !
आई ! गुरूस्थान अंती जगाचें तुझें, यांत शंका न कांही जरी !
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी ! तसें पाहिलें मी न कोठें तरी !

वारा तुझ्या स्पर्शनें शुद्ध झाला, मला लाधला ! भाग्य हें केवढें !
माते ! स्वयें देशि जें अन्नपाणी, सुधा बापुडी कायशी त्यापुढें
तूं बाळगीशी मला स्कंधिं अंकीं, सुखाची खरी हीच सीमा पुरी
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी ! तसें पाहिलें मी न कोठें तरी !

सामर्थ्य नामीं तुझ्या हें मला जें दिसे प्रेमयोगें अगे हिंदभू
तें पूर्णतेला झणीं प्राप्त व्हावें, म्हणोनी करी योजना ही प्रभू
रोंवी तुला आंग्लभूपालकाच्या किरीटामधें कीं तुझी उन्नती
व्हावी खरी; तूं जगत्कारणाची पुरी ओळखीं प्रेमयुक्ता मती.


— नारायण वामन टिळक

'टिळकांची कविता' या संग्रहात शेवटचे कडवे वगळलेले आहे.

March 7, 2012

तर मग गट्टी कोणाशी ?

"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा"
"ताई, आणखि कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !
आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !
आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू !"
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू"

"कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी  कोणाशी ?"


—  भा. रा. तांबे

नदीमाय


नदीबाई माय माझी
डोंगरात घर,
लेकरांच्या मायेपोटी
येते भूमीवर II १ II

नदीबाई आई माझी
निळे निळे पाणी,
मंद लहरीत गाते
ममतेची गाणी II २ II

नदीमाय जल साऱ्या
तान्हेल्यांना देई,
कोणी असो, कसा असो
भेदभाव नाही II ३ II

शेतमळे मायेमुळे
येती बहरास,
थाळीमध्ये माझ्या भाजी-

भाकरीचा घास II ४ II

श्रावणात, आषाढात
येतो तिला पूर,
पुढच्यांच्या भल्यासाठी
जाई दूरदूर II ५ II

माय सांगे, थांबू नका
पुढे पुढे चला,
थांबत्याला पराजय
जय चालत्याला II ६ II— कुसुमाग्रज

March 3, 2012

पाकोळी (पावसात खंडाळा)

हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वाऱ्याची पावरी.

कभिन्न काळ्या खडकांमधुनी
फुटति दुधाचे झरे,
संथपणाने गिरक्या घेती
शुभ्र शुभ्र पाखरे !

सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा,
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.

हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ,
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.

डूल घालुनी जळथेंबांचे
तृणपाते डोलते,
शीळ घालुनी रानपाखरु
माझ्याशी बोलते !

गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू ?
पाकोळी का पिवळी होऊन
फुलांफुलांतुन उडू ?


— शांता शेळके

हिंमत द्या थोडी !

नका नका मला
देऊ नका खाऊ,
वैरी पावसानं
नेला माझा भाऊ.

महापुरामध्ये
घरदार गेलं,
जुल्मी पावसानं
दप्तरही नेलं.

भांडी कुंडी माझी
खेळणी वाहिली,
लाडकी बाहुली
जाताना पाहिली.

हिंमत द्या थोडी
उसळू द्या रक्त,
पैसाबिसा नको
दप्तर द्या फक्त.


— अशोक कौतिक कोळी

March 2, 2012

पांखरांची शाळा

पांखरांची शाळा भरे पिंपळावरती
चिमण्यांची पोरें भारी गोंगाट करती ! ll १ ll

उतरते उन, जाते टळुनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ll २ ll

बाराखड्या काय आई, घोकती अंगणी ?
उजळणी म्हणती काय जमूनी रंगणी ! ll ३ ll

तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
भुर्रकन इथे तिथें उडती मौजेत ! ll ४ ll

खेळकर किती, नको कराया अभ्यास
परीक्षेत कां न आई व्हायची नापास ? ll ५ ll

लक्ष यांचे पांगलेलें पेरूच्या बागेत
मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ll ६ ll

पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी गं शाळा यांची, भिजती सगळे ll ७ ll

रविवारी, सणावारी आमुच्यासारखी
यांना नाही सुट्टी, भली मोडली खोड की ! ll ८ ll

यांच्याहून आम्ही आई शहाणे, नव्हे का ?
गप्प शाळेमधीं, कधीं धरितो न हेका ll ९ ll

होतों पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
मौज काय सांगू ? मिळे सुट्टीही शाळेस ! ll १० ll


— ग. ह. पाटील

टीप : पा ​ठ्यपुस्तकामध्ये सहाव्या कडव्यातील ''लक्ष यांचे पांगलेलें..................आमुचे रागीट' या संपूर्ण ओळी गाळल्या आहेत. आठव्या कडव्यातील 'सुट्टी' हा शब्द 'सुटी' असा असून तोच शब्द दहाव्या कडव्यात मात्र 'सुट्टी असाच आहे.

माझी मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू

देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली

"अरे संन्याश्याची पोरं"
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरान्च
कधी तोन्ड पाहू नही

"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटी लावी ग्यानदेव
घरामदी रे दडले !

उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग

घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं
असा भाग्यवंत भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन


- बहिणाबाई चौधरी

March 1, 2012

चांदोबाची गंमत

ये ये ताई पहा पहा,
गंमत नामी किती अहा !

चांदोबा खालीं आला
हौदामध्यें बघ बुडला
कसा उतरला ?
किंवा पडला ?
पाय घसरला ?
कशास ऊलटें चालावें ?
पाय नभाला लावावे ?

किती उंच हें आभाळ,
तेथुनि हौद किती खोल -
तरि हा ताई !
आई आई !
बोलत नाहीं,
चांदोबा तूं रडूं नको !
ताई तूं मज हंसूं नको.

किती किती हें रडलास,
हौद रड्यानें भरलास -
तोंड मळविलें 1
अंग ठेचलें !
तेज पळालें
उलटा चालू नको कधीं,
असाच पडशिल जलामधीं !- हरी सखाराम गोखले

हा हिंददेश माझा

आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।।

सत्यास ठाव देई,
वृत्तीस ठेवि न्यायी
सत्यासि मानि राजा । हा हिंददेश माझा ।।

जगदीश जन्म घेई,
पदवीस थोर नेई,
चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ।।

जनकादि राजयोगी,
शुक वामदेव त्यागी,
घुमवीती कीर्तिवाजा । हा हिंददेश माझा ।।

दमयंति, जानकी ती,
शीलास भूषवीती
नटली नटेश-गिरिजा । हा हिंददेश माझा ।।

विश्वास मोह घाली;
ऐशी मुकुंद-मुरली
रमवी जिथे निकुंजा । हा हिंददेश माझा ।।

गंगा हिमाचलाची,
वसती जिथें सदाची,
होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ।।

पृथुराज सिंह शिवजी,
स्वातंत्र्यवीर गाजी,
करिती रणांत मौजा । हा हिंददेश माझा ।।

तिलकादि जीव देहीं,
प्रसवूनि धन्य होई,
मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ।।

जगि त्याविना कुणीही
स्मरणीय अन्य नाहीं
थोरांत थोर समजा । हा हिंददेश माझा ।।

पूजोनि त्यास जीवें
वंदोनि प्रेमभावें
जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा ।।


- आनंदराव कृष्णाजी टेकाडे