नदीबाई माय माझी
डोंगरात घर,
लेकरांच्या मायेपोटी
येते भूमीवर II १ II
नदीबाई आई माझी
निळे निळे पाणी,
मंद लहरीत गाते
ममतेची गाणी II २ II
नदीमाय जल साऱ्या
तान्हेल्यांना देई,
कोणी असो, कसा असो
भेदभाव नाही II ३ II
शेतमळे मायेमुळे
येती बहरास,
थाळीमध्ये माझ्या भाजी-
भाकरीचा घास II ४ II
श्रावणात, आषाढात
येतो तिला पूर,
पुढच्यांच्या भल्यासाठी
जाई दूरदूर II ५ II
माय सांगे, थांबू नका
पुढे पुढे चला,
थांबत्याला पराजय
जय चालत्याला II ६ II
— कुसुमाग्रज
4 comments:
खुप छान कविता. मुलांना शिकवताना मन आनंदित होते. अतिशय सोपी आणि सुंदर चाल लावता येते. अशा कविता असायला हव्या. बोधप्रत.
Very nice poem
खुप सुंदर काव्य रचना केली आहे
Jitesh
Post a Comment