रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

November 25, 2014

बालिश बहु बायकांत बडबडला

उत्तर म्हणे, 'असें जरि मीं एकाकी लहान, परि सवतें
यश जोडितों चि असता सारथि तरि, कथन मज न परिसवतें ll १ ll

होता परम निपुण, परी त्या ख्यात रणांत सारथि गळाला,
झांको छिद्र भलतसा; अडले म्हणतात 'सार' थिगळाला ll २ ll

कर्णादिकांसि देता समरीं वैराटिकेसरी करिता,
जिष्णुपुढें असुरजनीं कोण्ही वैरा टिके सरी करिता ? ll ३ ll

मिळवा कोण्ही तरि, हो ! धैर्याचा मात्र उदधि सारथि जो,
कुरुभटसमूह पावुनि मज, जेंवि हिमासि सुदधिसार थिजो' ll ४ ll

ऎसे बहुत चि बोले तो बालिश बोल बायकांमाजी,
चित्रपटकटकसें शिशुभाषण येईल काय कामा ? जि ! ll ५ ll

तें परिसुनि एकांतीं पार्थ म्हणे, 'देवि ! कृष्णसखि ! जावें
उत्तरसारथि होवुनि म्यां, त्वां मजवरि कदापि न खिजावें' ll ६ ll

त्या उत्तरासि सांगे, 'सारथ्य बृहन्नडा करिल; यातें
सूत करुनि, विजयानें नेले बहु खांडवीं अरि लायातें' ll ७ ll

कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला ll ८ ll

बोले, 'बृहन्नडे ! हें कुरुबळ कल्पांतसिंधुसें गमतें,
ने रथ पुरात, माजें मन नयन हि पाहतां बहु भ्रमतें ll ९ ll

दुर्योधन, दु:शासन, कर्ण, कृप, द्रोण, भीष्म ज्या कटकीं
त्यांत मरेन चि शिरतां, काट्यांवरी घालितां चिरे पट कीं' ll १० ll— मोरोपंत

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

November 22, 2014

धाव धाव गा श्रीपती

लावूनियां नेत्रपातीं | हृदयीं चिंतिली कृष्णमूर्ती |
म्हणे, धांव धांव गा! श्रीपती! | ये आकांतीं स्वामिया ! || १२१ ||

कृष्णा! मी तंव तुझीच कुमरी | यथार्थ जन्मलें तुझेच उदरीं,
स्नेहें सुभद्रेचिये सरी | बहिण म्हणें मी पाठींची || १२३ ||

सहस्त्र व्याघ्रामाजी गाय | सांपडतां जेवीं बोभाय
तेवीं तूतें मोकलिली धाय | कृष्णा! धांवें म्हणउनी || १२८ ||

तूंचि ग! माझी कुळस्वामिणी | मानसतुळजापुरवासिनी
कौरवमहिषासुरमर्दिनी | धांवें धांवें धांवणिया || १३२ ||

कौरवसभापाणीथडी | नक्रदु:शासनें घातली आढी,
काया करोनि कडोविकडी | ओढीताडीं पीडियेलें || १३३ ||

तयालागीं तूं घालीं उडी | फेडी दीनाचीं सांकडीं
धांवें पावें गा! तांतडी | कृपाळू बा गोविंदा || १३४ ||

दु:शासन शंख वहिला | स्मरतां संतोषवेद हारविला
कौरवसागरीं बुडविला | तो कवणातें न काढवे ? || १३५ ||

मत्स्यरुपीया नारायणा! | धांवें पांवें मधुसूदना!
विभांडूनि याचिया वचना | समाधान मज द्यावें || १३६ ||

माझा स्वधर्ममंदरागिरी | कौरवसमुद्री पडिला फेरीं
तया बुडतया उद्धरीं | कांसव होई केशवा! || १३७ ||

कांसवदृष्टी विलोकावें | मातें पाठीसीं घालावें
पाय पोटीं न धरावें | धांवे पावें ये काळीं || १३८ ||

माझी लाज हे धरित्री! | रसातळा नेतो वैरी
यज्ञवराहरुपिया हरी! | दाढें धरीं प्रतापें || १३९ ||

माझा भाव तो प्रल्हाद | निष्ठुरीं गांजितां पावला खेद,
शत्रूअहंकारस्तंभभेद | करुनि प्रगटें नरहरी! || १४० ||

कौरव अहंता महीतळीं | वामनरुपिया वनमाळी!
दाटी त्रिपादपायांतळीं | बळिबंधना! पावावें || १४१ ||

माझा भाव आणि भक्ती | तेचि जमदाग्निरेणुकासती
कुशब्दशस्त्रीं कौरवदैत्यीं | संत्रासिली अवनिये! || १४२ ||

ते निवटूनि धराभारा | फेडीं भार्गवपरशुधरा!
द्रौपदी सती वसुंधरा | पांडवद्विजा अर्पी कां || १४३ ||

लाज हरिली दु:शासनें | तेचि सीता या रावणे
हरिली ते तुवां रघुनंदनें | प्रतापरुद्रें रक्षावी || १४४ ||

आतां कृष्णा! आठविया | तूंच आमुच्या विसावियां
कौरवअहंकारकाळिया | पायांतळीं रगडीं कां ? || १४५ ||

बौद्धरुपिया जगदीशा! | कौरवीं मांडिली माझी हिंसा
करुणाकरा! कृष्णा! परेशा! | प्राणरक्षक मज होई || १४६ ||


— मुक्तेश्वर (मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल)


(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

सलग क्रमाने ओव्या न घेता ज्या पाठ्यपुस्तकात होत्या त्याच इथे घेतल्या आहेत.

November 21, 2014

कंसारी संसारगजकेसरी | हासोनि बोले श्रीकृष्ण शौरी |
पांडुपुत्र हे निर्धारी | भीमार्जुन जाण पां ||

मागे अपराध केले क्षमा | ते कार्याकारणे पुरुषाधमा |
लोटली मर्यादेची सीमा | शेवटी फळ भोगी का ||

सरला सुकृताचा तंतू | आयुष्यतैला झाला अंतू |
माझिये हस्ती व्यजनवातू | भीमरूपे उदेला ||

तो झगटतां सत्वरगती | प्राणदीप पंच ज्योती |
मालवोनि पडेल क्षिती | गात्र पात्र पालथे ||

तिघांमाजी जो आवडे | त्यासीच भिडीजे इडेपाडे |
मागध म्हणे मूर्खा! तोंडे | जल्प करिसी वाचाटा ||

तू बहुरूपी खेळसी सोंगे | कोणते युद्ध जिंकिले आंगे |
वेडी बागडी भाविकें भणगे | तुझे शूरत्व त्यांमाजी ||

पार्थ पृथेचे सुकुमार बाळ | शस्त्राभ्यासी गेला काळ |
मजसि योग्य परि अळुमाळ | भीम काही दिसतसे ||

तोही मंद जड आळसी | बहुत आहार निद्रा त्यासी |
आयुष्य सरले म्हणोनि ऐसी |बुद्धि उदेली तुम्हांते ||

तिघांते हाणोनि चडकणा | क्षणामाजी मेळवीन मरणा |
बळे सर्पाचिया सदना | मंडूक वस्ती पावला ||

मंडूक किंवा तिघे गरुड | आत्ताचि होईल हा निवाड |
समय प्राप्त झालिया वाड | बोल टाकी माघारा ||

ऐसे बोलतां चक्रपाणी | उभे ठेले समरांगणी |
जरासंधे राज्यासनीं | अभिषेकिले सहदेवा ||


— मुक्तेश्वर (मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल)


(Compiled by : Mr. Nikhil Bellarykar)

November 3, 2014

ते मर्‍हाटी बोलैन

आतां सुमन देतु अवधान l धुमकुसें साहित्याचेन l
जग भोजें नाचवीन l आनंदाचा l

आधीचि जगा चंदन आवडे l वरि देवाचें अनुलेपन जोडे l
तरि कवणां वालभ न पडे l तया सुखाचें ? l

तैसें आएकतां श्रीकृष्णचरित्र l होय सकळ सुखाचें छेत्र l
वरि जोडे ब्रम्हसुख पवित्र l ते मर्‍हाटी बोलैन l

जिथे भाषेचिये रसवृत्ती l सा भाषांचे कुपे कीजेति निगुती l
ते मर्‍हाटी कवण जाणे निरुती l जे रसांचे जीवन l

ते मर्‍हाटी बोल रसिक l वरी दावीन देशियेचे बिक l
म्हणैन सव्याख्यान श्लोक l मिसें वोवियेचेनि l— नरेंद्रधुमकुसें = गर्दीने, वालभ = आवड, निगुती = नीट, निरुती = योग्य, बिक = महत्व

November 1, 2014

भेटेन नऊ महिन्यांनीं

मनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll

या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते
किति दुर्दैवी, प्राणी असतिल असले l जे अपराधाविण मेले
लाडका बाळ एकुलता
फांशीची शिक्षा होतां
कवटाळुनि त्याला माता
अति आक्रोशें, रडते केविलवाणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १ ll

"किती वेळ असा, शोक करिसि गे असला l दे निरोप मज जायाला
होईल पहा, विफल तुझा आकांत l बाहेर उभे यमदूत
ते चाकर सरकाराचे
नच उलटें काळिज त्यांचें
परि शरमिंदे अन्नाचे
तुजपासुनियां, नेतिल मज ओढोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll २ ll

तुज सोडुनि मी, जाइन कां गे इथुन l परि देह परस्वाधीन
बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे l मम दोरखंड दंडाचे
अन्न्पाणि सेवुनि जिथलें
हें शरीर म्यां पोशियलें
परदास्यिं देश तो लोळे
स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ३ ll

कां परक्याला, बोल उगिच लावावा l दैवानें धरिला दावा
लाभेल कधीं, सांग कुणाला जगतीं l या जळत्या घरिं विश्रांती
घेऊनि उशाला साप
येईल कुणाला झोंप
हा सर्व ईश्वरी कोप
हा परवशता, करते भयकर करणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ४ ll

मज फांशीची, शिक्षा दिधली जाण l न्यायाचा करुनी खून
या मरणाची, मौज कशी बघ असते l सांगेन तुला मी माते
मी राजपुत्र दिलदार
घेऊनि करीं समशेर
भोंवतीं शिपाई चार
करितील अतां, स्वागत जन मैदानीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ५ ll

मजसाठिं तिनें, सिंहासन निर्मियलें l त्या एका खांबावरलें
मी वीर गडी, चढेन गे त्यावरतीं l इतरांची नाहीं छाती
इच्छिली वस्तु ध्यायाला
अधिकारी तैनातीला
प्राणापरि जपती मजला
या दुनियेची, दौलत लोळे चरणीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ६ ll

या सर्वांचे मजवर भारी प्रेम l देतील खडी ताजीम
हें वैभव मी, विकत घेतलें साचें l देउनी मोल जिवाचें
या गळ्यांतला गळफांस
देईल घडीभर त्रास
लाभेल मुक्ति जीवास
वर जाइन मी, लाथ जगा हाणोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ७ ll

या देहाची, करुं कशाला चिंता l होईल तें होवो आतां
कुणि करुणेचे, सागर हळहळतील l कुणि हंसणारे हंसतील
अश्रूंनीं न्हाऊ घाला
प्रेमाचें वेष्टण त्याला
मातीचा मोहक पुतळा
जाईल पहा, क्षणांत मातिंत मिळुनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ८ ll

सांगतों तुला, शपथ घेउनी आई l मरणाला भ्यालों नाहीं
आठवीं मनीं, श्रीगीतेचें सार l कीं नश्वर तनु जाणार
हृदयाचे मोजुन ठोके
बघ शांत कसे आहें तें
वाईट वाटतें इतुकें—
तव सेवेला, अंतरलों मी जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ९ ll

माउली तुझा, नव्हें नव्हें मी कुमार l पूर्वीचा दावेदार
तव सौख्याच्या, वाटेवर निर्मियले l दु:खाचे डोंगर असले
नउ मास भार वाहून
बाळपणी बहुपरि जपुन
संसार दिला थाटून
परि बनलों मी, खचित अभागी प्राणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १० ll

'मम बाळ गुणी, वृद्धपणी बहुसाल l आम्हांला सांभाळील'
तव ममतेचे, बोल ऐकले असले l परि सारें उलटें झालें
माउली विनंती तुजला
सांभाळ तिला, बाळाला
नच बघवे तिकडे मजला
हा कठिण गमे, प्रसंग मरणाहहूनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ११ ll

लाभतें जया, वीर-मरण भाग्याचें l वैकुंठपदीं तो नाचे
दे जन्म मला, मातृभूमिचे पोटीं l पुन:पुन्हां मरण्यासाठीं
मागेन हेंच श्रीहरिला
मातृभूमि उद्धरण्याला
स्वातंत्र्यरणीं लढण्याला
तव शुभ उदरीं, जन्म पुन्हां घेवोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १२ ll

मग यमदुतें, ओढुनि त्याला नेलें l व्हायाचें होउनि गेलें
परि त्या ठायीं, शब्द उमटती अजुनी l 'भेटेन नऊ महिन्यांनी'
खांबाला फुटतील फांटे
मृदुसुमसम होतिल कांटे
हिमगिरिला सागर भेटे
परि परवशता, सुखकर झाली नाहीं l दे कुंजविहारी ग्वाही ll १३ ll
— कुंजविहारी (हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी)पाठ्यपुस्तकात फक्त पांचच कडवी होती. देशाकरिता आनंदाने फाशी जाणार्‍या एका वीरयुवकाचे हे उद्गगार कवीने अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने चित्रित केले आहेत. आपल्यासारख्या व्यक्तीच्या मरणातूनच राष्ट्राचा पुनर्जन्म होत असतो अशी त्याची श्रद्धा आहे. पुन्हा याच भूमीत आणि याच आईच्या पोटी जन्म मिळावा हीच त्याची शेवटची इच्छा.