A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label मंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५). Show all posts
Showing posts with label मंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५). Show all posts

17 November 2025

सांग ना आई

दिवसभर पावसात असून सांग ना आई,
झाडाला खोकला कसा होत नाही?

दिवसभर पावसात खेळून सांग ना आई,
वारा कसा जराही दमत नाही?

रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई,
बेडकाचा आवाज कसा बसत नाही?

रात्रभर जागून सुद्धा सांग ना आई,
चांदोबा झोपी कसा जात नाही?

दिवसभर काम करून सांग ना आई,
तुला मुळी थकवा कसा येत नाही?



– मंगेश पाडगांवकर

27 October 2025

झुले बाई झुला

झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला.

हिरव्या हिरव्या फांदीला ग,
झुला माझा बांधिला ग,
आता होता भुईवर, भेटे आभाळाला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

उंच उंच जाते मी ग,
झुल्यासंगे गाते मी ग,
गाता गाता वाऱ्याने या झोका मला दिला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

जिथे जिथे झुला झुले
तिथे तिथे सारी फुले.
झुल्यासंगे झुला, बाई, फुलासंगे फुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

झुला झाला अनावर,
जीव माझा खालीवर.
माया याची माझ्यावर, सांभाळतो मला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

झुला माझा पाखरू ग,
वाऱ्याचे हे लेकरू ग.
एक झोका मला आणि एक झोका तुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.


— मंगेश पाडगांवकर

29 August 2021

नौबत

नौबत आता झडू दे ,
उंच उंच स्वर चढू दे ,
जय जय भारत विजयघोष हा या गगनाला भिडू दे.


जातपात ना आम्ही मानित,
धर्मभेद ना आम्ही जाणत,
तेज आमुच्या हृदयामधले काळोखावर पडू दे.


इथली गरिबी आम्ही हटवू,
समता सगळ्या जगास पटवू,
अन्यायाच्या विरुध्द अमुची शूर मनगटे लढू दे.


लाज न आम्हां मुळी श्रमाची,
हाक ऐकतो पराक्रमाची,
नव्या जगाची नवीन मूर्ती या हातांनी घडू दे.


विज्ञानावर अमुची भक्ती,
माणुसकी हि अमुची शक्ती,
भिऊन दडली सर्व पांखरे निर्भर होऊन उडू दे.



— मंगेश पाडगावकर

16 September 2017

कधीं पाहातों

कधीं पाहातों
मी माझ्यातच विचित्र मानव
शुद्र अविकसित विद्रुप दानव
अंधारांतुन अन चिखलांतुन
वृक्षमुळांपरि भूविवरांतुन
चेटकिणीच्या हातांपरि निज शरीर अपुलें
शूद्र घृणास्पद; फिरे परंतु
मिरवित मिरवित जीवनजंतु
अंधपणांतच सरपटणारा
कुढ्या तमांतच अन जगणारा
विचित्र मानव !

कधीं पाहतों
मी माझ्यातच विराट मानव
पावलांतुनी उमले ज्याच्या उषाच अभिनव !
हिमालयापरि देह जयाचा
मुकुट शिरावर रविकिरणांचा
पवित्र गंगा स्फुरते ज्याच्या वक्षामधुनी !
अन मृत्युंजय मंत्र जयाच्या अधरांमधुनी !
आकाशाला भिडे जयाचा प्रचंड माथा
हसत उलटतो नक्षत्रांचा प्रकाशगाथा
अमर्त्यतेच्या वाटेवरला जीवनयात्री
रवि भाळावर, अमृत गात्रीं
चिरसंजीवन मंगल नेत्रीं !

विद्रुप मीही, विराट मीही
साक्षी केवळ आणिक तरिही
या दोघांचा :
भूविवरांतिल अंधाराचा; आकाशाचा !


— मंगेश पाडगावकर

15 March 2016

वेडं कोकरु

वेडं कोकरु खूप थकलं
येतांना घरी वाट चुकलं !

अंधार बघून भलतंच भ्यालं
दमून दमून झोपेला आलं !

शेवटी एकदा घर दिसलं
वेडं कोकरु गोड हसलं !

डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत!


— मंगेश पाडगांवकर

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

3 April 2015

दे

ढगा, ढगा,
पाऊस पाड, पाणी दे !
पक्ष्या, पक्ष्या,
सुंदर सुंदर गाणी दे !

वार्‍या, वार्‍या,
तुझ्यासारखं झुलू दे !
फुला, फुला,
तुझ्यासारखं फुलू दे !

मोरा, मोरा,
तुझ्यासारखं नाचू दे !
राना, राना,
हिरवं पुस्तक वाचू दे !

झाडा, झाडा,
उन्हात तुझी छाया दे !
आई, आई,
कुशीत घेऊन माया दे !


— मंगेश पाडगांवकर

7 April 2014

शापित मी तगमगतो

या माझ्या पंखांनी
उडण्याचे वेड दिले
पण माझ्या हातांनी
घरटे हे निर्मियले

जगण्याची ओढ अशी
उडण्याचे वेड असे
घरट्याच्या लोभातहि
गगनाचे दिव्य पिसे

व्योमातुन उडतांना
ओढितसे मज घरटे
अन उबेत घरट्याच्या
क्षुद्र तेच मज गमते

हे विचित्र दुःख असे
घेउनि उरि मी जगतो
घरट्यातुन, गगनातुन
शापित मी तगमगतो.


— मंगेश पाडगावकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

5 February 2013

किमया

उभारून कर उभे माड हे
शिरीं वीरांपरी झेलीत वृष्टी
जरा पहावे क्षितिजावर तर
बुडून जाते धुक्यात दृष्टी

हिरवी झाडे—शामल डोंगर
धुसर निळसर तलम हवा ही
लाल गढूळ जलातूंन वाहे
उसळत खिदळत चंचल काही

भिजून गेलें पंख तरीही
बसला तारांवरती पक्षी
मधेच ठिबके थेंब कोवळा
फुलवित जळी वलयांची नक्षी

मिचकावीत केशरी पापणी
कुठे दूरच्या ज्योती हसती
कुठे घरांच्या कौलारांवर
गुच्छ धुरांचे झुलती… भिजती

छेडी सुरावट मल्हाराची
धारांच्या तारांवर वारा
लख्ख विजेच्या प्रतिबिंबाचा
जळात गोठून झाला पारा

ध्वज मिरवीत काजळी धूराचा
आगगाडी ये दूरून उत्सुक
खडखड धडधड आज तिची पण
भिजून झाली हळवी नाजूक.


— मंगेश पाडगांवकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)

17 October 2012

प्रार्थना

तुझा सूर्य उगवे आम्हीं प्रकाशात न्हातो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll धृ०ll

ऱ्यातुनी निर्मळ वाहे तुझा निळा छंद
फुलांतुनी लहरत राहे तुझा हा सुगंध
तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll१ll

मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया
तशी तुझी आम्हांवरती माऊलीची माया
जिथे जातो तेथें तुझा नाद ऐकू येतो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll२ll

मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्य वास
सत्य, प्रेम करुणा आहे तिथे तुझा श्वास
विकासात वाहून आम्हीं भेट तुझी घेतो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll३ll

तुझी मुले सगळी आम्हीं, नसे जात-पात
द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात
सुरांतुनी वाहुनि आम्हीं तुझे प्रेम नेतो
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ll४ll


— मंगेश पाडगांवकर


(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

29 February 2012

आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आतां ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरारेल
आतां उजाडेल !

फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !

निळें आकाश भरून
दाही दिशा उजळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फुरेल
आतां उजाडेल !

आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !


— मंगेश पाडगांवकर (१९५०)

22 January 2010

मी फूल तृणांतिल इवलें

जरि तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाही.

शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें
अन् स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें

कुरवाळित येतिल मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करतिल सजल इषारा

रे तुझिया सामर्थ्यानें
मी कसें मला विसरावें ?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें ?

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा;
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होउनि ये तूं
कधि भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू !

तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावें

पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरि दाही
मी फूल तृणातिल इवलें
उमलणार तरिही नाहीं.


— मंगेश पाडगावकर

19 January 2010

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर


— मंगेश पाडगांवकर

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!


— मंगेश पाडगांवकर

संथ निळें हें पाणी

संथ निळें हें पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरिंमधुनी
शीळ घालितो वारा
दूर कमान पुलाची
एकलीच अंधारीं
थरथरत्या पाण्याला
कसलें गुपित विचारी ?
भरुन काजव्यांनीं हा
चमके पिंपळ सारा
स्तिमित होउनी तेथें
अवचित थबके वारा !
किरकिर रातकिड्यांची
नीरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरती अंधारीं !
मधेंच क्षितिजावरुनी
वीज लकाकुनि जाई
अन ध्यानस्थ गिरीही
उघडुनि लोचन पाही !
हळुच चांदणे ओलें
ठिबके पानांमधुनीं
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणांमधुनी !
संथ निळें हें पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधानें
मौनाचा गाभारा !



— मंगेश पाडगांवकर

गाणे अमुचे जुळे

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !


दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले !


—  मंगेश पाडगांवकर

शतदा प्रेम करावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी, गाणे गात झुरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे


— मंगेश पाडगांवकर