[दिंडी]
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणांत,
सेविकेचा आधार एक हात !
ताप त्यानें भरताच तडफडावे;
पांखरानें एकलें फडफडावें
ह़ळू गोंजारी सेविका दयाळू;
डाक्तराचें वच शांतवी कृपाळू.
कधी त्यानें घ्यावें न मुळी अन्न,
कुठें डोळे लावून बसे खिन्न;
आणि डाक्तर येतांच गोंजराया
हाय ! लागे तो घळघळां रडाया !
एक दिन तो व्याकूळ फार झाला
आणि त्यानें पुशिलेंच डाक्तराला —
"अतां दादा, मरणार काय मी हो ?"
तोंच लागे अश्रुची धार वाहों !
हृदय हेलुनी डोळ्यांत उभें पाणी,
तरी डाक्तरची वदे करुण वाणी;
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजारुन शांतवून जाई.
रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास अतां ताण
हळुच बोलावी बाळ डाक्तराला
तोहि धर्मात्मा धांवुनीच आला
अतां बाळाला टोंचणार, तोंच
वदे वासुन पांखरुं दीन चोंच —
"नको आतां ! उपकार फार झाले !
तुम्ही मजला किति...गोड...वागविलें !
भीत...दादा...मरणास...मुळी...नाहीं !
तु...म्ही...आई...!!" बोलला पुढें नाही !
झणी डोळे फिरविले बालकानें
आणि पुशिलीं लोचनें डाक्तरानें .
— शंकर केशव कानेटकर (कवी गिरिश)
संकल्पना : श्री किरण भावसार, वडांगळी, सिन्नर
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणांत,
सेविकेचा आधार एक हात !
ताप त्यानें भरताच तडफडावे;
पांखरानें एकलें फडफडावें
ह़ळू गोंजारी सेविका दयाळू;
डाक्तराचें वच शांतवी कृपाळू.
कधी त्यानें घ्यावें न मुळी अन्न,
कुठें डोळे लावून बसे खिन्न;
आणि डाक्तर येतांच गोंजराया
हाय ! लागे तो घळघळां रडाया !
एक दिन तो व्याकूळ फार झाला
आणि त्यानें पुशिलेंच डाक्तराला —
"अतां दादा, मरणार काय मी हो ?"
तोंच लागे अश्रुची धार वाहों !
हृदय हेलुनी डोळ्यांत उभें पाणी,
तरी डाक्तरची वदे करुण वाणी;
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजारुन शांतवून जाई.
रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास अतां ताण
हळुच बोलावी बाळ डाक्तराला
तोहि धर्मात्मा धांवुनीच आला
अतां बाळाला टोंचणार, तोंच
वदे वासुन पांखरुं दीन चोंच —
"नको आतां ! उपकार फार झाले !
तुम्ही मजला किति...गोड...वागविलें !
भीत...दादा...मरणास...मुळी...नाहीं !
तु...म्ही...आई...!!" बोलला पुढें नाही !
झणी डोळे फिरविले बालकानें
आणि पुशिलीं लोचनें डाक्तरानें .
— शंकर केशव कानेटकर (कवी गिरिश)
संकल्पना : श्री किरण भावसार, वडांगळी, सिन्नर