A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label शौर्यगीत. Show all posts
Showing posts with label शौर्यगीत. Show all posts

29 August 2021

नौबत

नौबत आता झडू दे ,
उंच उंच स्वर चढू दे ,
जय जय भारत विजयघोष हा या गगनाला भिडू दे.


जातपात ना आम्ही मानित,
धर्मभेद ना आम्ही जाणत,
तेज आमुच्या हृदयामधले काळोखावर पडू दे.


इथली गरिबी आम्ही हटवू,
समता सगळ्या जगास पटवू,
अन्यायाच्या विरुध्द अमुची शूर मनगटे लढू दे.


लाज न आम्हां मुळी श्रमाची,
हाक ऐकतो पराक्रमाची,
नव्या जगाची नवीन मूर्ती या हातांनी घडू दे.


विज्ञानावर अमुची भक्ती,
माणुसकी हि अमुची शक्ती,
भिऊन दडली सर्व पांखरे निर्भर होऊन उडू दे.



— मंगेश पाडगावकर

31 August 2015

लढा वीर हो लढा

लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा

शेजार्‍यांचे शूर शिपाई
सीमारेषा पुसुनी पायी
लुटु पाहती तुमची आई
त्या ढोंग्यांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा

काल बिलगले भाऊ म्हणुनी
आज शांतीला दुर्बल गणुनी
काढु पाहती मूळच खणुनी
तोडा त्यांचे हात अडाणी, कबंध तुडवीत चढा चढा

रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा


— ग. दि. माडगूळकर

9 August 2014

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळु द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
<        > कधीही तारांचा संभार ll १ ll

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही ! आम्हाला कसले कारागार?
<        > अहो हे कसले कारागार? ll २ ll

पदोपदी पसरूनि निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
<        > होता पायतळी अंगार ll ३ ll

श्वासांनो, जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार
<        > तयांना वेड परी अनिवार ll ४ ll

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
<        > आई, वेड्यांना आधार ll ५ ll

कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
<        > आई, खळखळा तुटणार ll ६ ll

आता कर ओंकारा, तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
<        > मरणा, सुखेनैव संहार ll ७ ll


— कुसुमाग्रज

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

31 March 2012

समतेचें हें तुफान उठलें

ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचें हें तुफान उठलें; उठले सागरकडे ll धृ ll

हीच मराठी जिच्या मुखानें वदली ज्ञानेश्वरी;
शिवबानें तलवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठीं झडले तोफांचे चौघडे ll १ ll

टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी–
स्वातंत्र्याच्या पांच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे ll २ ll

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही; आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढें चला रे, चला सुराज्याकडे ll ३ ll

दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना;
कंकणनादा भिऊनि तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरतीं त्याही घुसल्या पुढें ll ४ ll

ऊठ खेडुता, पुन्हां एकदा, झाडुनियां घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हां मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे ll ५ ll


— विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

13 February 2012

नवा शिपाई

(जाति-हरिभगिनी)
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेच पतित कीं जे आखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मला न सुख;
कूपातिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !


जिकडे जावें तिकडे माझी भावंडे आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा–पायांखालीं तृणावृता भू दिसते,
कोठेंही जा–डोईवरतें दिसतें नीलांबर तें;
सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसती गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;
ती माझीं, मी त्यांचा, एकच ओघ अम्हांतुनी वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !


पूजितसें मीं कवणाला – तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला:
‘मी’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनी तो, निजशिरी ओढिती अनर्थ भलते देख !
लहान-मोठें मज न कळे,
साधु-अधम हें द्वयहि गळे,
दूर-जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठें-सांधु जवळ, त्या सकलीं मी भरुंनी राहें !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें!


हलवा करितां तिळावरी जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केंद्राभवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सद्दश सगुण तो पाक,
परी अन्यां बोंचाया धरीती कांटे कीं प्रत्येक !
अशी स्थिती ही असे जनीं!
कलह कसा जाइल मिटुनी?
चिंता वाटे हीच मनीं.
शांतीचे साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा, नव्या दमाचा शूर शिपाई आहें !



—   केशवसुत


टीप : पाठ्यपुस्तकात शेवटची दोन कडवी समाविष्ट नाहीत.

(Compiled by Ms. Bhakti Parab, Mumbai)

12 October 2011

जय जवान, जय किसान!

चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल
एक गाऊ विजयगान जय जवान, जय किसान!
जय जवान, जय किसान, जय जय!

अखिल देश पाठिशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमि सस्य शामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान!

शत्रू-मित्र जाणुनी, सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू, प्रसन्न देवी अन्नदा
उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान!

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान
जय जवान, जय किसान!


— ग. दि. माडगुळकर

(
सौजन्य: आठवणीतली गाणी डॉट कॉम)

1 July 2010

अमर हुतात्मे

ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !


— वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

30 January 2010

जाग जाग भारता

जाग जाग भारता, काळ कठीण ये अतां
शत्रुसैन्य पातलें, खडग उचल स्वागता

समरीं ज्वाळ पेटली, कैक घेतले बळी
थोर आपुल्यांतली, दाखवी मृगेंद्रता

कोटि देह एक प्राण, एक लक्ष्य एक आण
हिंदभूस वाचवूं, ना विचार अन्यथा

थांब लाल राक्षसा, निश्चय बघ रे कसा
लक्ष बिंदु सांडवूं, एक बिंदु सांडता

बेईमान जो तया, दाखवूं नको दया
देशनिष्ठ राहिला, तोच बंधू आपुला

वागवीं अता तरी, बोध एक अंतरी
ध्येय शांतिचे तरी, रक्ष रक्ष वीरता


— यशवंत देव

21 January 2010

शिवराय आणि बालवीर


सावळ्या:
खबरदार, जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या —
उडविन राइ राइ एवढ्या !

कुण्या गांवचे पाटिल आपण कुठे चाललां असे
शीव ही ओलांडुनि तीरसे ?
लगाम खेचा हा घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेउ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे,
हे हाडहि माझे लेचेपेचें नसे
या नसानसांतुन हिंमतबाजी वसे
खबरदार, जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या !


स्वार: 
मळ्यांत जाउन मोटेचे ते पाणी धरावे तुवां
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठींत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरें
वीर तूं समजलास काय रे ?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकतें
अणकुचीदार अति भाल्याचे टोक तें
यापुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार, जर पाऊल पुढे टाकशील, चिंधड्या —
उडविन राइ राइ एवढ्या !


सावळ्या: 
आपण मोठे दाढीवाले अहां वीर बायकी
किती ते आम्हांला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाजीची तुम्हां माहिती न का?
दावितां फुशारकी कां फुका ?
तुम्हांसारखे किती असतील लोळविले नरमणी
आमुच्या शिवबाने भर रणी. 
मी असे इमानी चेला त्यांचेकडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचेपुढे
देई न जाऊ शूर वीर फांकडे
पुन्हा सांगतो खबरदार जर जाल पुढे, चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या !

लालभडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
(स्वार परि मनी हळू कां हंसे ?)
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू, एक दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर
"आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हां एकदां,
'खबरदार, जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडविन राइ राइ एवढ्या !' "



— वा. भा. पाठक

4 January 2010

सैनिकाप्रत

सदैव सैनिका,पुढेच जायचे
न मागुती तुवा,कधी फिरायचे ॥ धृ ॥
सदा तुझ्यापुढे,उभी असे निशा
सदैव काजळी,दिसायच्या दिशा
मधून मेघ हे,नभास ग्रासती
मधेच या विजा,भयाण हासती
दहा दिशांतुनी,तुफान व्हायचे ॥ १ ॥
प्रलोभने तुला,न लोभ दाविती
न मोह-बंधने,पदांस बांधिती
विरोध क्रोध वा,तुला न थांबवी
न मोह भासतो,गजांतवैभवी
न दैन्यही तुझे,कधी सरायचे ॥ २ ॥
वसंत वा शरद,तुला न ती क्षिती
नभात सूर्य वा,असो निशापती !
विदीर्ण वस्त्र हो,मलीन पावले
तरी न पाय हे,कधी विसावले !
न लोचना तुवां,सुखें मिटायचे ॥ ३ ॥
नभात सैनिका,प्रभात येउ दे
खागांसवे जगा,सुखांत गाउ दे
फुलाफुलांवरी,सुवर्ण शोभु दे
जगास शांतता,सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी,तुझे ठरायचे ॥ ४ ॥


— वसंत बापट

Anonymous... यांच्या मदतीने दुरुस्त केलेली आवृत्ती (May 9, 2011)

25 December 2009

झांशिवाली

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रु. ll

तांबेकुल वीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करीत ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथें आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा, कथाया कथा सकळ काळी ! ll ४ ll


— भा. रा. तांबे