A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

29 December 2021

भीष्मप्रतिज्ञा

[श्र्लोक : स्वागता]

श्रोत्रयुग्म परिपूत कराया
सावधान जनमेजय राया
जो परेशरत धन्य अहो तो
गोष्पदोपम तया भय होतो II १ II

[ शिखरिणी ]

"प्रतिज्ञा जे केली यदुकुळवरें 'युद्ध न करीं
धरीं ना शस्त्रातें कदनसमयीं मी निजकरीं'
घडेना हें मिथ्थ्या जरि तरी न मी भागवत रे"
प्रतिज्ञेतें भीष्मे मनिं अवथिलें या दृढतरें II २ II

[ भुजंगप्रयात ]

पिता शंतनू माय ज्याची नदी जे
स्वयें शुद्ध ऐशास सन्मान दीजे
तसा गर्व तोही हरावा मनाचा
मनाचा असा भाव त्या वामनाचा II ३ II

[ वसंततिलका ]

भीष्माकडे रव भयानक दूंदुभीचा
होतां वदे तनय आनकदूंदुभीचा
'दुश्चिन्ह आजि गमते मज सव्यसाची
जाती शिवा आशिव हे अपसव्य साची' II ४ II

गर्वोक्ति फाल्गुन वदे 'जगदेकराया
आहे असा कवण तो झगडा कराया ?
म्यां काळखंज वधिले अतुलप्रतापी
पौलोमही असुर गोसुरविप्रतापी' II ५ II

[ पृथ्वी ]

पितामह वदे तया 'प्रबळ तूं पृथानंदना !
रमेश रथिं सारथी चतुर वागवी स्यंदना
स्वयें गतवयस्क मी, सरस वीर तूं रे नवा
भिडें रणधुरंधरा ! जया घडो सुखें वा न वा' II ६ II

[ वसंततिलका ]

पारीक्षिता ! मग शरासन पांडवानें
ओढूनियां हुतवहार्पित खांडवानें
तों भीष्मदेह रचिला शरतांडवानें
ज्याच्या क्रिये सकळ पद्मभवांड वाने II ७ II

[ इंद्रवजा ]

गांगेय कोपा चढला कसा रें ?
ज्या मानिती हाचि कृतान्त सारे
गर्जोनियां सिंहरवें जयातें
पाहें जणों मारिल आज यातें II ८ II

[ वसंततिलका ]

'त्वां काय कर्म करिजे लघुलेंकरानें ?
बोलोनियां मग धनू धरिलें करांनें
तें व्यापिलें सकल सैन्य महाशरांनीं
भीष्मे, जसा पतित होय हुताश रानीं II ९ II

[ इंद्रवजा ]

तो स्तोम येतां बहु सायकांचा
झालाचि पार्थव्यवसाय काचा
काचावला वीर पुढें धजेना
झाली नृपा ! सर्व भयांध सेना II १० II

[ स्वागता ]

पुष्पवर्ण नटला पळसाचा
पार्थ सावध नसे पळ साचा
पहिलें जंव निदान तयाचें
तों दिसे वदन आनत याचें II ११ II

[ पृथ्वी ]

प्रतोद मग ठेविला उतरला रथाध:स्थळीं
म्हणे, 'प्रबळ भीष्म हा जय घडे न या दुर्बळीं
करीं कमळनेत्र तो प्रथित चक्र तें स्वीकरी
प्रमोद यमनंदना बहु तया यशस्वी करी II १२ II

[ शिखरिणी ]

असा येतां देखे रथ निकट तो श्यामल हरी
नृपा ! गांगेयाच्या हृदयिं भरल्या प्रेमलहरी
शरातें चापातें त्यजुनि वदला गद्गद रवें
'जगन्नाथें केलें मज सकळ लोकांत बरवें II १३ II

[ स्वागता ]

ये रथावरि झणीं यदुराया
खड्ग देईन विकोश कराया
तोडिं मस्तक पडो चरणीं या
धन्य होईन तदाच रणीं या II १४ II

नृपा ऐकिजे युद्ध देवव्रताचे
गमे हेचि साफल्य तूझ्या व्रताचे
रथी देखिले कृष्ण कौंतेय दोघे
म्हणे भीष्म माझ्या शराते यदो घे II १५ II

[ शार्दूलविक्रीडित ]

मारावें मजला असेंचि असलें चित्ती तुझ्या केशवा
तैं माते मग कोण रक्षिल पहा विश्वेश नाकेश वा !
हा मुख्यार्थ जनार्दना ! मज गमे भक्तप्रतिज्ञा खरी
कीजे, सर्व जनांत होईल मृषा हे आपुली वैखरी' II १६ II

[ वसंततिलका ]

हे भीष्मवाक्य परिसोनि जगन्निवासें
केलें विलोकन मृदुस्मित पीतवासें
वेगें फिरोनि चढला मग तो रथातें
पार्थाचिया पुरविणार मनोरथातें II १७ II



— वामन पंडित

संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai

24 December 2021

महाराष्ट्र भूपाळी

प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा IIधुII

सह्याद्रिच्या सहस्र शिखरीं उन्नत झालेला
गोदा कृष्णा भीमा ह्यांनी पुनीत केलेला
पश्चिम सिंधु बंधु पाठिशी पूर्वोदधि जामात
विंध्याद्रीची ऊंची लक्षी सातपुडा प्रांत
अलंकार जयाचे पैठण पंढरपूर
आळंदी, चाफळ, देहू, तुळजापूर
किं पुणे, रायगड शिवनेरी सुंदर
रजःकणाला लावुनि भाळीं महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II १ II

वरी नाचणी भात पिकवितो कोंकणचा प्रांत
गहूं बाजरी कापुस शाळू देशावर होत
कांबळ खांदी वहाण पायीं डोईस मुंडासें
श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे
ते विळे कोयते शस्त्रें हीं हातिचीं
तीं बटी ठेंगणी भीमेच्या काठींचीं
मिळविती धुळीला कीर्ती बादशाहीची
वीरांना त्या वंदन अमुचें महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II २ II

वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा
धर्म रक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा
भगवा झेंडा धन्य करी हें आनंद-वन-भुवन
स्वातंत्र्याच्या जरिपटक्याला लक्षवेळ नमन
पुण्याई पुरली शिवभुपाची पुढें
पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे
साम्राज्य मराठी पसरे चोहोंकडे
स्मरणें स्फुरतें हृदय वाकतें महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ३ II

भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत
तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयात
ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची
श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची
एकनाथ, चोखा, गोरा, ज्ञानेश्वर
रामदास, तुकया, नामा, मुक्तेश्वर
नच जात पाहतो भक्तांची ईश्वर
संतमंडळा लववू माथा महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ४ II

मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा
सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा
गतवीरांचीं पुण्य चरित्रें गाऊनि अंगाई
बाळा करितें महाराष्ट्राची भगिनी वा आई
शोभवी अहिल्या होळकरांचे पुरी
ती सती रमा भट-वंशाला उद्धरी
स्वातंत्र्य-लक्ष्मी प्रचंड संगर करी
प्रणिपात असो ह्या देवींना महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ५ II



— दत्तो आप्पाजी ऊर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर

संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai

8 December 2021

भय्याजी

रजनीचें अवगुंठन पडलें साऱ्या विश्वावरी
दाटले मेघहि गगनोदरीं.   ध्रुo

सोडून गांव ही उंच इमारत जुनी
किति किर्र रान हें माजे चौ बाजुंनीं !
खळखळा वाहते मधेंच जलवाहिनी;
पिसाट वारा तरुपर्णांतुन फिरुनी भय दाखवी,
माजली भेसुर कोल्हेकुई !    १

या स्थळींच करती भय्याजी पाहरा.
पिळदार मिशांनीं उग्र दिसे चेहरा.
ध्वज शुभ्र फडकवी वदनावरतीं जरा.
आवाजामधिं मेघगर्जना, नयनीं विद्धुल्लता,
देह हा पोलादी तत्वतां.     २

अंगात कोपरी, कसलेलें धोतर,
मल्मली चिमुकली टोपी डोक्यावर,
पायांत वाजती चढाव ते करकर,
कंदिल घेउन दंडा फिरवित भय्याजी चालती,
हादरे भूमि तयांभोंवतीं !    ३

कधिं तुलसीजींची चौपाई गाउनी,
कधिं गोड बांसरी मौजेनें छेडुनी
ते दिवस कंठिती जीवाला रिझवुनी.
कोस शेकडों दूर राहिलीं दयिता अन् बालकें
त्यामुळें सुख झालें पारखें.    ४

अन् सुहृदांची त्या स्मृति होतां कधिंतरी
ते उदासवाणे बसती कोठेंतरी;
नि:श्वास सोडती टक लावुनि अंबरीं.
दोन आंसवें भय्याजींच्या पडती नेत्रांतुनी
येति मग भानावरतीं झणीं.     ५



— गोपीनाथ

संकल्पना: श्रीमती प्रिती म. म्हात्रे, नाशिक

5 December 2021

झप-झप चाललेत नाजुक पाय

मे महिन्याची दुपार ... रणरणते उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय ?
झप-झप चाललेत नाजुक पाय.

घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळे भरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.

माथ्यावर उन्ह ... पायाखाली उन्ह
परिस्थितीचे मनात उन्ह
निखार्‍यात तापलेल्या धरणीमाये
पोरीचे पाऊल कमळाचे आहे
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे, तिच्या डोळ्यातली भिती पाहा
ड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय !



— दत्ता हलसगीकर

संकल्पना : श्रीयुत दिनेश कासवेद, पुणे.