शर आला तो, धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !
मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.
मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.
परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.
— ग. ह. पाटील

स्वर : श्री. श्रीधर फडके