A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label वसंत बापट (१९२२ – २००२). Show all posts
Showing posts with label वसंत बापट (१९२२ – २००२). Show all posts

24 November 2021

प्यारा हिंदुस्तान

प्यारा हिंदुस्तान माझा प्यारा हिंदुस्तान
नव्या जगाच्या नव्या घडीचे एकच आशास्थान

इथे हिमालय, किर्ति हिमासम
इथे नद्यांसह प्रीतिरसागम
भव्य सागर नि जन पुरुषोत्तम
दिव्य प्रेममय त्यागी जनता येथिल सृष्टिसमान

रक्तपिपासू न ही संस्कृती
वृकव्याघ्रांसम नसे प्रकृती
मानव्याची मूर्त आकृती
सकल जगाला मानवतेचे देई पाठ महान
येथे अकबर, येथ शिवाजी
कबीर, तुलसी, एकनाथजी
बुद्ध, प्रबुद्ध नि शुद्ध गांधिजी
एकी, शांती, त्याग नि प्रीती यांची माणिकखाण

आज भारतीं जे जे लढती
जे जे पिचती, झिजती, रडती
पिळले जाती, छळले जाती
बलशाली परि करिल भारता हे त्यांचे बलिदान

परकीयांच्या पाशामधुनी
विमुक्त झाली अपुली जननी
मुक्त करिल ही अवघी अवनी
दलित नि शोषित सारे गातिल स्वातंत्र्याचे गान



— वसंत बापट

15 April 2021

पाहुणा गोजिरा

आज ये अंगणा,
पाहुणा गोजिरा
ये घरा आमुच्या, सोयरा साजिरा ॥

वाजवा नौबती,
ये सखा सोबती,
खेळवा संगती, हा जरा लाजरा ॥

कोवळे देहुडे,
सावळे रूपडे
पोपटी अंगडे, शोभते सुंदरा ॥

हा वसंतासवें,
सृष्टीला हासवे,
पालवे, बोलवे, सानुल्या पाखरां ॥

श्रावणीं न्हातसे,
आश्विनीं गातसे,
साउली देतसे, भूमिच्या लेकरां ॥

बासरी ऐकतो,
चांदणे झोकतो,
नाचतो, डोलतो, झोंबतो अंबरा ॥

अंगारेखांतुनी,
पर्णशाखांतुनी,
वाहतो जीवनीं, अमृताचा झरा ॥

गीत गाता मुखी,
नाचवा पालखी,
विश्व व्हाया सुखी, या नव्या जागरा ॥

सूर्य देवो, द्धुती
चंद्र देवो द्रुती,
छत्रछायाकृती, मित्र आला घरा ॥



— वसंत बापट






10 October 2017

देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


— वसंत बापट

4 November 2015

छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,
होतील सुंदर बागा
शेतांना, मळ्यांना, फुलांना फळांना,
नवीन बहार देऊ ll १ ll

मोकळ्या आभाळीं जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ अन घेऊ ll २ ll

प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे,
अनेक एकत्र होऊ ll ३ ll


— वसंत बापट

13 April 2013

नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडिलांची वाडी तुमची, तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको अम्हाला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातिल गंधफुलांतच झाकुन ठेवा ती पोथी
अशी बुद्धीला भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले ! मेरूवरती सूर्य फिरे !
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो ! चंद्र राहूच्या मुखी शिरे !
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतुन अवकाशातुन विमान अमुचे भिरभिरते
अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पूजावी जुनी मढी ॥४॥


— वसंत बापट

7 November 2011

केवळ माझा सह्यकडा

भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकाठीं भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेंमाझे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयात; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि हृदयामाजीं
बच जायें तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गाठीं; मरहट्याचा हट्ट खरा

तुमचें माझें ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासाशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल दृत वेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत


— वसंत बापट (सेतू, १९५७)

(Compiled by - Mr. Unmesh, Mumbai and Corrected by - Mr. Shriniwas Kelkar, Pune)

30 June 2011

फुंकर

बसा म्हणालीस - मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस्स—इतकेच...
बाकी मन नव्हते थाऱ्यावर

दारावरचा पडदा दडपीत
तू लगबग निघून गेलीस
माजघरात
माझ्यासोबत ठेवून
तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या...

या जाळीच्या पडद्यात
कशाला कोरले आहेस
हे हृदय - उलटे- उत्तान ? ...
काचेच्या कपाटात
कशाला ठेवल्या आहेस
भुश्श्याच्या राघूमैना? ...
उडताहेत लाकडी फळांवर
कचकड्यांची फुलपाखरे
भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने.

काळ्या मखमलीवर
पतीच्या नावाचा रेखीव कशिदा—
त्यातला एक टाका जरी चुकली असतीस
तरी मी धन्य झालो असतो.
तू विचारलेस, काय घेणार?
काय पण साधा प्रश्न—
काय घेणार ?
देणार आहेस का ते सारे—पूर्वीचे ?
मला हवे आहेत
चिंचेचे आकडे—ते
ते अघाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा !
दे झालं कसलंही साखरपाणी.

तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र
छान आहे.
तुझ्यावरची सारी साय
या फुगीर गालांवर ओसंडते आहे.
बळकट बाहू, रुंद खांदे,
डोळ्यांत कर्तेपणाची चमक
छान आहे.
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस
जसे काही कधी झालेच नाही !

मी तुला बोलणार होतो
छद्मीपणाने
निदान एक वाक्य, एक जहरी बाण
ते मला जमले नाही, आणि
तू तर नुसती हसत होतीस
आता एकच सांग,
उंबर्‍यावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले—
इतकी का तुला सुपारी लागली ?
पण नकोच सांगूस,
तेवढीच माझ्या मनावर
एक फुंकर.


— वसंत बापट

30 January 2010

शिंग फुंकिले रणी

शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे
सज्ज व्हा, उठा उठा, सैन्य चालले पुढे

दास्यकाल संपला, शांत काय झोपला?
अग्नि येथ कोपला, पेटुनी नभा भिडे

लोकमान्य केसरी, गर्जतात वैखरी
माजला असे अरी, चारू त्याजला खडे

वीस सालचा लढा, जाहला किती बडा
इंग्रजास बेरडा, आणिले कसे रडे

तीस सालची प्रभा, उज्ज्वला भरी नभा
गांधि अग्रणी उभा, ठाकला रणी पुढे

शीर घेउनी करीं, दंग होउ संगरीं
घालवू चला अरी, सागरापलीकडे


— वसंत बापट

15 January 2010

बाभुळझाड

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll
जगले आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांध्यावरती वरती सुताराचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll
टक... टक... टक... टक...
चिटर फटर... चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला
सोलत आहे, शोषत आहे ll५ll
आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे
आत फार जळते आहे ll६ll
अस्स्ल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll७ll


— वसंत बापट

उन्मेष यांच्या मदतीने साभार.

14 January 2010

आभाळाची अम्ही लेकरे

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ–रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही


— वसंत बापट

4 January 2010

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट

मेघ वितळले, गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि खुलले... भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये... आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव-अरुणाचे होऊ आम्ही... प्रतिभाशाली भाट


— वसंत बापट

सैनिकाप्रत

सदैव सैनिका,पुढेच जायचे
न मागुती तुवा,कधी फिरायचे ॥ धृ ॥
सदा तुझ्यापुढे,उभी असे निशा
सदैव काजळी,दिसायच्या दिशा
मधून मेघ हे,नभास ग्रासती
मधेच या विजा,भयाण हासती
दहा दिशांतुनी,तुफान व्हायचे ॥ १ ॥
प्रलोभने तुला,न लोभ दाविती
न मोह-बंधने,पदांस बांधिती
विरोध क्रोध वा,तुला न थांबवी
न मोह भासतो,गजांतवैभवी
न दैन्यही तुझे,कधी सरायचे ॥ २ ॥
वसंत वा शरद,तुला न ती क्षिती
नभात सूर्य वा,असो निशापती !
विदीर्ण वस्त्र हो,मलीन पावले
तरी न पाय हे,कधी विसावले !
न लोचना तुवां,सुखें मिटायचे ॥ ३ ॥
नभात सैनिका,प्रभात येउ दे
खागांसवे जगा,सुखांत गाउ दे
फुलाफुलांवरी,सुवर्ण शोभु दे
जगास शांतता,सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी,तुझे ठरायचे ॥ ४ ॥


— वसंत बापट

Anonymous... यांच्या मदतीने दुरुस्त केलेली आवृत्ती (May 9, 2011)

इंच इंच लढवूं

उतुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवूं
अभिमान धरुं, बलिदान करूं, ध्वज उंच उंच चढवूं ll धृ ० ll

परक्यांचा येता हल्ला,
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड,
होतील इथें ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवूं ll १ ll

बलवंत उभा हिमवंत,
करी हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड अडवूं ll २ ll

जरि हजार अमुच्या ज़ाती
संकटामधें विरघळती
परचक्र येतसे जेव्हां,
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवूं ll ३ ll

राष्ट्राचा दृढ निर्धार,
करु प्राणपणेंप्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त,
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू ll ४ ll

अन्याय घडो शेजारी,
की दुनियेच्या बाजारीं
धावून तिथेही जाऊ,
स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू ll ५ ll



— वसंत बापट