A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

18 August 2018

शबर्याख्यान

निघे दंडका राम कोदंडपाणी;
सवें चालिली जानकी कीरवाणी; ।
कराया वनीं स्वामिसेवा, स्वभावें
सवें चालिला लक्ष्मण स्वानुभावें ॥१॥
त्वरित चरणचाली चालिला घोर रानीं,
दृढतर मनिं भावें पूर्ण ज्याची शिराणी; ।
प्रतिदिवस दिनांसीं पावती ते श्रमांसी;
ऋषिवर मग त्यांसी आणिती आश्रमासी ॥२॥

तीघें यापरि चंडदंडकवनीं स्वच्छंदशीं हिंडती,
तों तेथें शबरी अखंड विचरे, पापें तिचीं खंडती, ।
वाचे राघवनाम संतत जपे, तें ध्यानही अंतरीं;
वांछी दर्शनलाभ होइल कधीं ? शोधी अरण्यांतरीं ॥३॥
आला राम वना म्हणोनि ललना ऐकोनि आनंदली,
“ मी वंदीन पदारविंद ” म्हणुनी जातां पथीं मंदली,
“ माझा राम असेल तो क्षुधितसा चंडाशुच्या आतपें,
त्यातें मी दृढ चित्तिं ठेविन बरा, ज्याकारणें हीं तपें ” ॥४॥

ज्या वनीं करिति झिंकृत झिल्ली,
दाट तें हुडकि कानन भिल्ली; ।
जेथ वृक्ष बहु पक्व फळांचे,
प्रांत तेथ फिरती अबलांचे ॥५॥
मोठ्या श्रमें वळघुनी सफळा तरूतें,
तोडी फळें, वदनिं गात जगद्गुरूतें,
ओटीं भरी, चतुर ते उतरोनि भूमीं,
भेटी निघे, “ नयनिं पाहिन तो विभू मी ” ॥६॥

दाही दिशां देउनियां निरीक्षा,
मार्गीं फळांची करि ते परीक्षा; ।
चाखी मुखें, गोड कडू कळाया,
टोंचूनि दांतें रसही कळाया ॥७॥
कट्वम्ल त्याचि रसहीन फळास टाकी,
लागे मधू सरस तें वसनांत झांकी; ।
आली वना निकट उत्तम भिल्लिणी ते,
जेथें जगज्जनक लक्ष्मण जानकी ते ॥८॥

ज्याच्या मस्तकिं दीर्घ नूतन जटा, फ़ेटा दिसे टोप तो,
माजीं वेष्टित वल्कलें झळकती, दूजा म्हणे कोण तो ? ।
आश्चर्या अति पावली, बघुनियां तूणीर पाठीवरी,
राजीवाक्ष असा विलोकुनी, वधू धांवे जशी बावरी ॥९॥
देखोनि डोळां हृदयाभिरामा
रामापुढें धांवतसे सुकामा ।
पुष्टांग झाली स्वसुखें भजाया,
साष्टांग वंदी रघुराजपायां ॥ १०॥

रामांघ्रि वंदुन नमी, न उठेच कांहीं,
रामें करांबुजयुगें उचलोनि बाहीं, ।
आलिंगिली स्वहृदयीं शबरी बरी ते;
आनंदले अमर भाविति बावरी ते ॥११॥
" बहू दीससी राघवा तूं भुकेला;
तुवां पाहिजे बा ! फलाहार केला; ।
तुझ्या कारणें म्यां फळें गोड रामा !
अगा ! आणिलीं सेविं सीताभिरामा ! " ॥१२॥

सारीं क्षतांकित फळें निरखून डोळां,
“ कां हो ! अशीं ? ” तिस पुसे रघुराज भोळा ।
“ चंचूपुटेंच बहु चोखिलिं पांखरांनीं,
नेणों दिला प्रतिफळास नखांक रानीं " ॥१३॥
" चंचुक्षतें हीं नव्हती कृपाळा !
मी कां तशीं आणिन ? हा कपाळा !
म्यां आपुल्या चावुनि शुद्ध दांतें,
चाखूनि घें मीच करें तुम्हांतें ॥१४॥

मधुरतर फळांची पूर्ण घेऊनि गोडी,
मग मज रघुनाथा ! ठेवितां होय खोडी; "
निरखुनि रघुराजें भाव त्या भिल्लिणीचा,
परम मनिं सुखावे नाथ तो जानकीचा ॥१५॥
भिल्ली बोलुनि बोल सुंदर असे, रामाकरीं तीं फळें
घाली, नेणुनि शास्त्रषिद्ध पुरुषा उच्छिष्ट देतां बळें,
प्रेमें प्रेमभरें, प्रसन्नहृदयें, भक्ताजनांचा पिता,
आत्माराम रमापती निजमुखीं झाला फळें अर्पिता ॥१६॥

भिल्लिच्या वनफळें मन धालें,
लोकनायक म्हणे "सुख झालें. " ।
प्रेम रामहृदयीं बहु आलें,
तोयबाप्प नयनांत निघाले ॥१७॥
रामचंद्र विभु आचरणासी
लक्षुनी, विनटली चरणासी; ।
वंदिता बहु सुखेंच, वधू ते
बाष्पकेंकरुनि ते पद धूते ॥१८॥

आलिंगिली पुनरपी प्रमदा किराती,
जे अंतरीं सतत चिंतित दीसराती; ।
जोडूनि अंजलि नमी, स्तवितां तियेतें
" मागे " म्हणे वरद, " जें स्वमनास ये तें " ॥१९॥
" माझें मनोगत वियोग तुझा न व्हावा,
रूपीं तुझ्या दृढ असेन महानुभावा ! "
स्वामी म्हणे, " तुज वियोग कधीं न वाटे,
जा, शेवटीं मिळसि चिन्मयराजवाटे " ॥२०॥

देतां असे वर तिसी रघुनायकानें, ।
झाली कृतार्थ शबरी, परिसोनि कानें, ।
आलिंगुनी, अग तिचें निघती वनातें.
आनंदनंदन म्हणे "परिसा" जनांतें ॥२१॥


 — आनंदतनय (गोपाळपंत आनंदराव अरणीकर)

आगगाडी

झुकझुक गाडी
घरांची माळ,
चालती फिरती
अजब चाळ !
धावत जाते
गावोगाव,
हुंदडत फिरते
गावन्गाव.

पाऊस, वाऱ्याची
नसे भीती,
वाटेत वादळ
असो किती !
तिला न आडवी
नदी, पहाड,
टाटा म्हणते
झाडन्झाड.

छंद म्हणा कि
उद्योग खरा,
सर्वांना पोचवी
घरा घरा !


— शंकर विटणकर

17 August 2018

झाड

चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाली, लवकर वाढ.

तुला रोज घालीन पाणी,
तुझ्यासाठी गाईन गाणी.

गाणी ऐकून फुलं फुलतील,
फुलपाखरांचे थवे झुलतील.

फुलतील फुलं छान छान,
हसत राहील पानन्पान.


— ज्ञानदा आसोलकर

खुर्ची आणि स्टूल

खुर्ची म्हणाली,
"अरे स्टुला,
केव्हा येणार
चालायला तुला ?"

स्टूल म्हणाले,
"त्याच वेळी
जेव्हा हाताने
वाजवशील टाळी !"

– हे ऐकून
पंखा हसला,
पाय नसून
फिरत बसला.



— विंदा करंदीकर

8 August 2018

असे कसे ?

एवढासा ससा त्याचे
एवढे मोठे कान
एवढा मोठा हत्ती त्याचं
शेपूट मात्र लहान
मान वर करून जिराफ
बघतो तरी काय
पोटांत पाय घालून कशी
चालते गोगलगाय –?

कुत्र्याचं शेपूट आपलं
नेहमींच वाकडं
माणसांसारखी सही-सही
दिसतात कशी माकडं –?
दोन पाय छोटे
दोन पाय मोठे.
चित्रकार : श्री. चंद्रशेखर जोशी
कांगारूच्या पोटाला,
पिशवी कोण शिवतें –?

एक डोळा बंद करून
बगळा बसतो टपून
पाठीवरचं ओझं कसं
कासव ठेवतं जपून –?
पंख असून शहामृग
उडत नाही कसं –
कुणी दिली मोराला
हीं रंगीत पिसं –?

डोळे मिटून मनीमाऊ
दूध कां पिते
उभ्या उभ्या घोड्याला या
झोप कशी येते –?
उंच उंच आभाळांत
घार कशी उडते
पाणी नाही डोळयांत
न सुसर कशी रडते –?
जाऊं दे ते सारं आई
एक सांग मला
नाकावरती म्हशीने का
पाय माझ्या दिला –?


— नलिनी तळपदे

दोन पाय छोटे दोन पाय मोठे