A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निसर्गकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे

bal kavi.jpg
बालकवी (इ.स. १८९० - १९१८)
बालकवी (इ.स. १८९० - १९१८)

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे इ.स. १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून त्यांचा यथार्थ गौरव केला जातो. जळगावमधे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) बालकवींनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा त्यांचं वय १७ वर्षं होतं. त्यानंतर ‘बालकवी’ हे नाव रूढ झालं.

त्यांचे वडील बापूराव देवराव ठोंबरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण, अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.

१९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं.

वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं).

अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि:शब्दकळेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात.

वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही अनेक अर्थांनी मर्यादितच राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट. निसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवींनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडून ठेवलं.

५ मे १९१८ रोजी खानदेशातील त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या ट्रेनखाली अडकून बालकवींचा मृत्यू झाला.
-~~~~~***~~~~~~

संदर्भ -
समग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे (पॉप्युलर प्रकाशन)
बालकवींची कविता : तीन संदर्भ – रमेश तेंडुलकर (मौज प्रकाशन)
फुलराणी – संपादक- कुसुमाग्रज (काँटिनेन्टल प्रकाशन)

No comments: