रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

August 31, 2015

थेंबा, थेंबा येतोस कोठून ?

"थेंबा, थेंबा कोठून येतोस ?
कोठे जातोस ? कोठे राहतोस ? "

"बाळ, मी लांबून येतो, उंचावरून येतो
आणि जमिनीच्या पोटात शिरतो ."

"थेंबा, थेंबा खरं खरं सांग—
कोठून येतोस, कोठे जातोस ?"

"मी जमिनीवरून वर जातो,
आकाशातून खाली येतो .
खाली नि वर,
वर नि खाली,
येतो नि जातो,
जातो नि येतो ."

"अरे, आकाशातून येतोस,
हे तर खरं आहे;
पण खालून वर जातोस कसा?"

"उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना ?
मग आम्ही खूप खूप तापतो.
वाफ होऊन आम्ही वर जातो.
वर जाऊन खूप खेळतो .
इकडून तिकडे, तिकडून इकडे
धावतो, पळतो,
डोलतो, लोळतो.
मग खाली येतो.

आम्ही नसलो तर
नद्या, नाले आटतील.
तळी, विहिरी आटतील.
शेते सुकतील.
मग खाल काय ? प्याल काय ?"

"खरंच भाऊ, किती तुझा उपयोग ! "


— ताराबाई मोडक

लढा वीर हो लढा

लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा

शेजार्‍यांचे शूर शिपाई
सीमारेषा पुसुनी पायी
लुटु पाहती तुमची आई
त्या ढोंग्यांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा

काल बिलगले भाऊ म्हणुनी
आज शांतीला दुर्बल गणुनी
काढु पाहती मूळच खणुनी
तोडा त्यांचे हात अडाणी, कबंध तुडवीत चढा चढा

रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा


— ग. दि. माडगूळकर

August 29, 2015

आईसारखे दैवत

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई


— ग. दि. माडगूळकर

घड्याळबाबा

ड्याळबाबा भिंतीवर बसतात,
दिवसभर टिक टिक करतात.

ठण ठण ठोके देतात आणि म्हणतात,
"मुलांनो, सहा वाजले, आता उठा."
"मुलांनो, आठ वाजले, आंघोळ करा."
"मुलांनो, दहा वाजले, आता जेवण करा ."
"मुलांनो, अकरा वाजले, आता शाळेत जा ."

आम्ही रोज घड्याळबाबांचे ऎकतो,
पण रविवारी काहीच ऎकत नाहि.

ते म्हणतात, "सहा वाजले, उठा."
आम्ही सात वाजता उठतो.
ते म्हणतात, "आठ वाजले, आंघोळ करा."
आम्ही नऊ वाजता आंघोळ करतो.
ते म्हणतात, "दहा वाजले, जेवण करा."
आम्ही अकरा वाजता जेवण करतो.

आणि रविवारी तर शाळेला सुट्टीच असते.

मग घड्याळबाबा खूप रागावतात,
जोरजोरात ठण ठण ठोके देतात.

पण रविवारी आम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही,
बाघितले तरी फक्त हसतो आणि खेळत रहातो.— कुसुमाग्रज

ताजी भाजी

मी आणली भाजी
ताजी ताजी भाजी .

छान छान काकडी
हिरवी हिरवी अंबाडी.

मी आणली भाजी
ताजी ताजी भाजी.

आजी ग आजी
कर ना ग भाजी.

— अज्ञात कवी 

August 28, 2015

या भारतात बंधुभाव

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे ।
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे । मतभेद नसू दे ॥ धृ o॥

नांदतो सुखे गरिब-अमिर एकमतानी । मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी ।
स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे । दे वरचि असा दे ॥१॥

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना ।
उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे । दे वरचि असा दे ॥२॥

हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी ।
खळनिंदका–मनीही सत्य न्याय वसू दे । दे वरचि असा दे ॥३॥

सौंदर्य रमो घरा-घरांत स्वर्गियापरी । ही नष्ट होऊ दे विपत्ति भीती बोहरी ।
तुक​ड्यास सदा या सेवेमाजी कसू दे । दे वरचि असा दे ॥४॥— राष्ट्रसंत तुकडोजी महाराज