A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label बा. भ. बोरकर (१९१० – १९८४). Show all posts
Showing posts with label बा. भ. बोरकर (१९१० – १९८४). Show all posts

6 February 2022

थवे

बोला कुणाकुणा हवे फुलपाखरांचे थवे
जादूगार श्रावणाच्या कर्णकुंडलींचे दिवे

निळे, जांभळे, तांबडे जर्द पिवळे, हिरवे,
काळे, पांढरे, राखेरी, भुरे, पोपटी, पारवे
कोणी उन्हेरी, चंदेरी, कोणी अंजिरी, शेंदरी,
मोरपिसांपरी कोणी वर्ख ल्यालेले भर्जरी,
कुणी मख्मली, मल्मली, कुणी वर्गंदी, वायली,
किनखापी मुलायम, कुणी शीतल सायली,
कुणा अंगी वेलबुट्टी, चित्रचातुरी गोमटी,
इंद्रधनूचेही वर्ण होती पाहून हिंपुटी.

वर्णलाघवाचे थवे जाती घेत हेलकावे,
कधी थांबून पुसती फुलापानांची आसवे,
कधी पिकलेल्या साळी, कधी साळकांची तळी,
कधी लालगुंज रस्ता जाती लंघून मंडळी,
त्यांच्या लावण्याने दुणा येथे श्रावणाचा हर्ष,
अशा मोसमी गोव्यात खरेच या एक वर्ष,
पण धरायचा त्यांना फक्त करावा बहाणा,
सुखे बघत रहावा सप्तरंगांचा तराणा.



— बा. भ. बोरकर

26 April 2017

दास डोंगरी राहतो

दास डोंगरी राहतो
साता समुद्रा वाहतो
घोंगावून लक्ष वारे
दुर्ग दुर्ग हादरतो

दास विस्तवी राहतो
मेघ होऊनी वाहतो
खडपात, तळपात
बीजांकुरी पालवतो

दास अंधारी राहतो
ब्रह्मप्रकाश पाहतो
विजेसारखा पेटून
भूतासमंधा भोवतो

दास एकांती राहतो
चिंता विश्वाची वाहतो
त्याच्यापरी जो जो जागा
त्याच्या हाकेला धावतो


 –  बा. भ. बोरकर

(Compiled by : Ms. Mrudula Tambe)

26 May 2012

हिरवळ आणिक पाणी

हिरवळ आणिक पाणी
तेथें स्फुरती मजला गाणीं
निळींतुनी पांखरें पांढरीं किलबिलतात थव्यांनीं

सुखांत चरतीं गुरेंवासरें
लवेतुनी लहरतें कापरें
हवेतुनी आरोग्य खेळतें गार नि आरसपानी

उरीं जिथें भूमीची माया
उन्हांत घाली हिरवी छाया
सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानीं

जिथें अशी समृद्ध धरित्री
घुमति घरें अन पुत्रकलत्री
रमे श्रमश्री माहेरींच्या स्वाभाविक लावण्यी

सख्यापरतें जिथे न बंधन
स्मितांत शरदाचें आमंत्रण
सहजोद्गारीं गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी

ऋतूऋतूंतुन जिथे सोहळे
तसेच उघड्यावरी मोकळे
आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी

माणूस जेथें हवाहवासा
अभंग-ओवीमधें दिलासा
विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी

देव जिथें हृदयात सदाचा
भार मनाला नसे उद्यांचा
सुखें दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखें डोळा पाणी



— बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

18 April 2012

घास भरवताना (वाढदिवस)


'दीपका' ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
घडविला, जडविला,
चंदनाचा पाट

घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी

घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात

गा रे राघू, गा गे मैने, बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी

कुतु-काऊ, चिऊ-माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये ! कुलदेवी !


— बा. भ. बोरकर

जिरेसाळ - भाताचा प्रकार

15 January 2010

जलद भरुनि आले

गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले
दिन लंघुनि जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरि
पद्मरागवृष्टि  होय माड भव्य न्हाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनांत बघुनि मन निवालें
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
उतट बघुनि हरिकरुणा, हरित धरा हो गहना
मंदाकिनि वरुनि धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल, पल सलील
हिरव्या तटिं नावांचा कृष्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
मीन चमकुनी उसळे, जलवलयीं रव मिसळे
नवथर रसरंग गहन करिति नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
धूसर हो क्षितिज त्वरित, ढोर पथी अचल चकित
तृण विसरूनि जवळिल ते खिळवि गगनिं डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
टप टप टप पडति थेंब मनि वनिंचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमि आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले



—  बा. भ. बोरकर

अमुचे निशाण

चढवू गगनि निशाण, अमुचे चढवू गगनि निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान !

निशाण अमुचे मनःक्रान्तीचे, समतेचे अन् विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुख-तेज महान

मुठ न सोडू जरि तुटला कर, गाऊ फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरि शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण

विराटशक्ती आम्ही वामन, वाण आमुचे दलितोद्धारण
नमवू बळीचा किरीट उद्धृत ठेवुनि पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरनि निशाण



— बा. भ. बोरकर

तेथें कर माझे जुळती

तेथें कर माझे जुळती
दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥धृ.॥

हृन्मंदिरी संसृतिशरस्वागत
हंसतचि करिती कुटुंबहितरत
गृहस्थ जे हरि उरात रिझवित,
सदनीं फुलबागा रचिती ॥१॥

ज्या प्रबला निज भावबलानें
करिती सदनें हरिहरभुवनें,
देव-पतींना वाहुनि सु-मने
पाजुनि केशव वाढविती ॥२॥

गाळुनियां भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगविती,
जलदांपरि येउनियां जाती,
जग ज्यांची न करी गणती ॥३॥

शिरीं कुणाच्या कुवचनवॄष्टी,
वरिती कुणि अव्याहत लाठी,
धरिती कुणि घाणीची पाटी,
जे नरवर इतरांसाठीं ॥४॥

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिलें मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहिं चिरा, नाही पणती ॥५॥

स्मितें जयांची चैतन्यफुले,
शब्द जयांचे नव दीपकळे,
कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे,
प्रेमविवेकी जे खुलती ॥६॥

जिथें विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥७॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरीं तम चवर्‍या ढाळी;
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळीं;
एकांती डोळे भरती ॥८॥


–  बा. भ. बोरकर


अधिक टिप : आशाबाईंनी हि कविता पूर्ण गायलेली नाही.

माझ्या गोव्याच्या भूमींत

माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपारीमधोनी
घट फ़ुटती दुधाचे ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
आंब्या-फ़णसांची रास,
फ़ुली फळांचे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसांत दारापुढें
सोन्या-चांदीच्या रे धारा ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनीं
भेटे आकाश सागरा ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
चाफा पानावीण फ़ुले,
भोळाभाबडा शालीन
भाव शब्दांवीण बोले ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
गड्या साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोनकेवड्याचा हात ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
जिव्या सुपारीचा विडा
अग्निदिव्यांतुन हसे
पाचपोवळ्यांचा चुडा ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
काळे काजळाचे डोळे,
त्यांत सावित्रीची माया
जन्मजन्मांतरी जळे ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
लाल माती, निळें पाणी
खोल आरक्त धावांत
शुद्ध वेदनांचीं गाणीं ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
खड्गा जडावाची मूठ,
वीर-शृंगाराच्या भाळीं
साजे वैराग्याची तीट ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
उंच धूड देवळांचे
ताजमहाल भक्तीच्या
अश्रूंतल्या चांदण्यांचे ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
तृणीं सुमनांचे गेंद,
सिद्ध कुणब्यांच्या तोंडीं
शुद्ध सौंदर्याचे वेद ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
सुखाहुनी गोड व्यथा
रामायणाहुनी थोर
मूक उर्मिलेची कथा ||
माझ्या गोव्याच्या भूमींत
सारा माझा जीव जडे,
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथें उलगडे ||


— बा. भ. बोरकर

माझा गाव

निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !

पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.

पहा तेथून खालती
साळ वाकते सोन्यात
बघालच जेवताना
कुंकू प्रत्येक दाण्यात

माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या-फणसाचे झाड.

असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.

थोडया पायवाटा हिंडा
लाल तांबडया वाकडया
होड्या उपड्या झालेल्या
तशा बघाल टेकड्या

जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले

श्रमी प्रेमळ जिवांची
पाच हजारांची वस्ती
खडा मारिताच परी
दिसे मोहळाची मस्ती !

इथे जे जे काही भले
ते ते सगळ्या गावाचे !
भाग्यभूषण वाटते
एका दुर्गेच्या नावाचे !

उभ्या गावाच्या जाईने
तिचे मढते मंदिर
नाही काही चांदण्यात
दुजे त्याहून सुंदर !

जाल जेव्हा चुकू नका
तिच्या पूजा-नैवेद्याला
नका राहू आल्यावीण
माझाकडे निवाऱ्याला

गोव्यातला माझा गाव
असा ओव्यांतच गावा
तेथे जाऊन राहून
डोळे भरून पाहावा !


— बा. भ. बोरकर

झिणिझिणि वाजे बीन

झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

कधी अर्थाविन सुखद तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा
शरणागत अतिलीन
सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन

कधि खटका, कधि रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक झटका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीण
सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन

रोमांचातुन कधि दीपोत्सव
कधी नेत्रांतून पुष्पांचे स्रव
कधी प्राणांतून सागरतांडव
अमृतसिंचित जीण
सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन

सौभाग्ये या सुरांत तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणात प्रवीण
सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन


–  बा. भ. बोरकर

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला सटीन कान्ती गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरसपानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा अजून करते दिडदा दिडदा



— बा. भ. बोरकर