निळ्या खाडीच्या काठाला
पूल ओलांडिता पुढे
पहा तेथून खालती
माणसांच्या जागीसाठी
असो झाडी किंवा वाडी
थोडया पायवाटा हिंडा
जेथे होईल माध्यान्ह
श्रमी प्रेमळ जिवांची
इथे जे जे काही भले
उभ्या गावाच्या जाईने
जाल जेव्हा चुकू नका
गोव्यातला माझा गाव
— बा. भ. बोरकर
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !
पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.
पहा तेथून खालती
साळ वाकते सोन्यात
बघालच जेवताना
कुंकू प्रत्येक दाण्यात
माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या-फणसाचे झाड.
असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.
थोडया पायवाटा हिंडा
लाल तांबडया वाकडया
होड्या उपड्या झालेल्या
तशा बघाल टेकड्या
जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले
श्रमी प्रेमळ जिवांची
पाच हजारांची वस्ती
खडा मारिताच परी
दिसे मोहळाची मस्ती !
इथे जे जे काही भले
ते ते सगळ्या गावाचे !
भाग्यभूषण वाटते
एका दुर्गेच्या नावाचे !
उभ्या गावाच्या जाईने
तिचे मढते मंदिर
नाही काही चांदण्यात
दुजे त्याहून सुंदर !
जाल जेव्हा चुकू नका
तिच्या पूजा-नैवेद्याला
नका राहू आल्यावीण
माझाकडे निवाऱ्याला
गोव्यातला माझा गाव
असा ओव्यांतच गावा
तेथे जाऊन राहून
डोळे भरून पाहावा !
— बा. भ. बोरकर