A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

29 August 2021

नौबत

नौबत आता झडू दे ,
उंच उंच स्वर चढू दे ,
जय जय भारत विजयघोष हा या गगनाला भिडू दे.


जातपात ना आम्ही मानित,
धर्मभेद ना आम्ही जाणत,
तेज आमुच्या हृदयामधले काळोखावर पडू दे.


इथली गरिबी आम्ही हटवू,
समता सगळ्या जगास पटवू,
अन्यायाच्या विरुध्द अमुची शूर मनगटे लढू दे.


लाज न आम्हां मुळी श्रमाची,
हाक ऐकतो पराक्रमाची,
नव्या जगाची नवीन मूर्ती या हातांनी घडू दे.


विज्ञानावर अमुची भक्ती,
माणुसकी हि अमुची शक्ती,
भिऊन दडली सर्व पांखरे निर्भर होऊन उडू दे.



— मंगेश पाडगावकर

12 August 2021

ये ग तू ग गाई

ये ग तू ग गाई चरूनी भरूनी
बाळाला म्हणूनी दूध देई
ये ग तू ग गाई खा ग तुझा कोंडा
बाळाला दूध, मांडा देईन मी
ये ग तू ग गाई खा ग तू कणीस
बाळाला निरसं दूध देई
ये ग तू ग गाई दे ग दूध तुझं
ते पाजू तुज बाळराज
गाई ग गोठ्यात म्हशी ग रानांत
संजूबाळ पाळण्यात दूध मागे
अंगाई मंगाई तांबूली कंगाई
आतां तान्हीयाला घोट दूध देई

7 August 2021

पानगळ (ऋतुराजाची चाहूल)

आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलींना लागली.

देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला.

डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले.

'कुहू' गाऊन कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत.



— इंदिरा संत

ध्वजगीत

माझा भारताचा ध्वज
उभा अजिंक्य आकाशी,
नव्या मनूचा प्रवास
याच्या मंगल प्रकाशी.

संतमुनींचा, ऋषींचा
याला आशीर्वाद मिळे,
लक्ष जीवनांची ज्योत
त्याच्या पायापाशी जळे.

माझ्या भारताचा ध्वज
निळ्या आकाशात डोले,
उषेसंगती नक्षत्र
येथे उदयाला आले.

याला अरुणदेवाने
भाळी लावले केशर,
मायदेशास मिळाला
त्यात वीरतेचा वर.

पूर्णचंद्राने तयास
दिले चांदणे नितळ,
स्नेहशांततेची भव्य
उभी राहे दीपमाळ.

सस्यशामल धरेने
दिले ऐश्वर्य मातीचे,
सूर्यचक्राने अर्पिले
व्रत अखंड गतीचे.

माझ्या देशाच्या दैवता,
तुला सहस्त्र वंदन,
तुझ्या रक्षणसेवेत
होवो कृतार्थ जीवन.



— कुसुमाग्रज

2 August 2021

दुनिया दो हातांची

दुनिया दो हातांची रे बाबा I दुनिया दो हातांची I
दोन हातांमधल्या या वीतभर I भगवन् मंदिराची रे बाबा II

एक हात गगनास गवसणी I दुजा सागरा ओढुनि आणी I
त्याच्या कर्तृत्वाची गाणी I सांग कुणी गायाची रे बाबा II

दोन हात जर नसते तर मग I उभे राहिले असते का जग ? I
या उपाशी हाताची तगमग I कुठवर साहायाची रे बाबा II

सौंदर्ये तुज रिझवायाला I दगडामधुनी निर्मिला I
याच हातांनी देव घडविला I काढू साक्ष कुणाची रे बाबा II

देवें केले काय न ठावें I स्तुतीस्तोत्र का त्याचे गावे ? I
विश्वनाथ भरला दो हाती I पूजा करू या त्याची रे बाबा II

देव कुणी या जगी पाहिला I हात तुझ्या सत्वर सेवेला I
विसरलास तू याच हाताला I सीमा कृतघ्नतेची रे बाबा II



– शाहीर अमरशेख

भाऊबीज

उद्याचीच भाऊबीज
कोण मला ओवाळील ?
कोण ओवाळणीसाठी
मजसवे झगडील ?

इथे आज पडलो मी
माझ्या गावाहून दुर,
'कुणा घालू ओवाळणी ?'
लागे मला हुरहूर.

इथे साऱ्याच बहिणी,
परक्या या नगरात,
परी असे निराळीच
माझ्या बहिणीची प्रीत.

कसे बहिणीचे नाते !
कशी बहिणीची माया !
ओवाळणी मागतसे
सालभर भांडुनिया !

उद्याचीच भाऊबिज
महोत्सव घरोघरी,
आणि पाहीन हे सारे
एकटाच वेड्यापरी !



— सुरेश भट