A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

29 December 2021

भीष्मप्रतिज्ञा

[श्र्लोक : स्वागता]

श्रोत्रयुग्म परिपूत कराया
सावधान जनमेजय राया
जो परेशरत धन्य अहो तो
गोष्पदोपम तया भय होतो II १ II

[ शिखरिणी ]

"प्रतिज्ञा जे केली यदुकुळवरें 'युद्ध न करीं
धरीं ना शस्त्रातें कदनसमयीं मी निजकरीं'
घडेना हें मिथ्थ्या जरि तरी न मी भागवत रे"
प्रतिज्ञेतें भीष्मे मनिं अवथिलें या दृढतरें II २ II

[ भुजंगप्रयात ]

पिता शंतनू माय ज्याची नदी जे
स्वयें शुद्ध ऐशास सन्मान दीजे
तसा गर्व तोही हरावा मनाचा
मनाचा असा भाव त्या वामनाचा II ३ II

[ वसंततिलका ]

भीष्माकडे रव भयानक दूंदुभीचा
होतां वदे तनय आनकदूंदुभीचा
'दुश्चिन्ह आजि गमते मज सव्यसाची
जाती शिवा आशिव हे अपसव्य साची' II ४ II

गर्वोक्ति फाल्गुन वदे 'जगदेकराया
आहे असा कवण तो झगडा कराया ?
म्यां काळखंज वधिले अतुलप्रतापी
पौलोमही असुर गोसुरविप्रतापी' II ५ II

[ पृथ्वी ]

पितामह वदे तया 'प्रबळ तूं पृथानंदना !
रमेश रथिं सारथी चतुर वागवी स्यंदना
स्वयें गतवयस्क मी, सरस वीर तूं रे नवा
भिडें रणधुरंधरा ! जया घडो सुखें वा न वा' II ६ II

[ वसंततिलका ]

पारीक्षिता ! मग शरासन पांडवानें
ओढूनियां हुतवहार्पित खांडवानें
तों भीष्मदेह रचिला शरतांडवानें
ज्याच्या क्रिये सकळ पद्मभवांड वाने II ७ II

[ इंद्रवजा ]

गांगेय कोपा चढला कसा रें ?
ज्या मानिती हाचि कृतान्त सारे
गर्जोनियां सिंहरवें जयातें
पाहें जणों मारिल आज यातें II ८ II

[ वसंततिलका ]

'त्वां काय कर्म करिजे लघुलेंकरानें ?
बोलोनियां मग धनू धरिलें करांनें
तें व्यापिलें सकल सैन्य महाशरांनीं
भीष्मे, जसा पतित होय हुताश रानीं II ९ II

[ इंद्रवजा ]

तो स्तोम येतां बहु सायकांचा
झालाचि पार्थव्यवसाय काचा
काचावला वीर पुढें धजेना
झाली नृपा ! सर्व भयांध सेना II १० II

[ स्वागता ]

पुष्पवर्ण नटला पळसाचा
पार्थ सावध नसे पळ साचा
पहिलें जंव निदान तयाचें
तों दिसे वदन आनत याचें II ११ II

[ पृथ्वी ]

प्रतोद मग ठेविला उतरला रथाध:स्थळीं
म्हणे, 'प्रबळ भीष्म हा जय घडे न या दुर्बळीं
करीं कमळनेत्र तो प्रथित चक्र तें स्वीकरी
प्रमोद यमनंदना बहु तया यशस्वी करी II १२ II

[ शिखरिणी ]

असा येतां देखे रथ निकट तो श्यामल हरी
नृपा ! गांगेयाच्या हृदयिं भरल्या प्रेमलहरी
शरातें चापातें त्यजुनि वदला गद्गद रवें
'जगन्नाथें केलें मज सकळ लोकांत बरवें II १३ II

[ स्वागता ]

ये रथावरि झणीं यदुराया
खड्ग देईन विकोश कराया
तोडिं मस्तक पडो चरणीं या
धन्य होईन तदाच रणीं या II १४ II

नृपा ऐकिजे युद्ध देवव्रताचे
गमे हेचि साफल्य तूझ्या व्रताचे
रथी देखिले कृष्ण कौंतेय दोघे
म्हणे भीष्म माझ्या शराते यदो घे II १५ II

[ शार्दूलविक्रीडित ]

मारावें मजला असेंचि असलें चित्ती तुझ्या केशवा
तैं माते मग कोण रक्षिल पहा विश्वेश नाकेश वा !
हा मुख्यार्थ जनार्दना ! मज गमे भक्तप्रतिज्ञा खरी
कीजे, सर्व जनांत होईल मृषा हे आपुली वैखरी' II १६ II

[ वसंततिलका ]

हे भीष्मवाक्य परिसोनि जगन्निवासें
केलें विलोकन मृदुस्मित पीतवासें
वेगें फिरोनि चढला मग तो रथातें
पार्थाचिया पुरविणार मनोरथातें II १७ II



— वामन पंडित

संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai

24 December 2021

महाराष्ट्र भूपाळी

प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा IIधुII

सह्याद्रिच्या सहस्र शिखरीं उन्नत झालेला
गोदा कृष्णा भीमा ह्यांनी पुनीत केलेला
पश्चिम सिंधु बंधु पाठिशी पूर्वोदधि जामात
विंध्याद्रीची ऊंची लक्षी सातपुडा प्रांत
अलंकार जयाचे पैठण पंढरपूर
आळंदी, चाफळ, देहू, तुळजापूर
किं पुणे, रायगड शिवनेरी सुंदर
रजःकणाला लावुनि भाळीं महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II १ II

वरी नाचणी भात पिकवितो कोंकणचा प्रांत
गहूं बाजरी कापुस शाळू देशावर होत
कांबळ खांदी वहाण पायीं डोईस मुंडासें
श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे
ते विळे कोयते शस्त्रें हीं हातिचीं
तीं बटी ठेंगणी भीमेच्या काठींचीं
मिळविती धुळीला कीर्ती बादशाहीची
वीरांना त्या वंदन अमुचें महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II २ II

वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा
धर्म रक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा
भगवा झेंडा धन्य करी हें आनंद-वन-भुवन
स्वातंत्र्याच्या जरिपटक्याला लक्षवेळ नमन
पुण्याई पुरली शिवभुपाची पुढें
पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे
साम्राज्य मराठी पसरे चोहोंकडे
स्मरणें स्फुरतें हृदय वाकतें महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ३ II

भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत
तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयात
ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची
श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची
एकनाथ, चोखा, गोरा, ज्ञानेश्वर
रामदास, तुकया, नामा, मुक्तेश्वर
नच जात पाहतो भक्तांची ईश्वर
संतमंडळा लववू माथा महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ४ II

मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा
सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा
गतवीरांचीं पुण्य चरित्रें गाऊनि अंगाई
बाळा करितें महाराष्ट्राची भगिनी वा आई
शोभवी अहिल्या होळकरांचे पुरी
ती सती रमा भट-वंशाला उद्धरी
स्वातंत्र्य-लक्ष्मी प्रचंड संगर करी
प्रणिपात असो ह्या देवींना महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ५ II



— दत्तो आप्पाजी ऊर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर

संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai

8 December 2021

भय्याजी

रजनीचें अवगुंठन पडलें साऱ्या विश्वावरी
दाटले मेघहि गगनोदरीं.   ध्रुo

सोडून गांव ही उंच इमारत जुनी
किति किर्र रान हें माजे चौ बाजुंनीं !
खळखळा वाहते मधेंच जलवाहिनी;
पिसाट वारा तरुपर्णांतुन फिरुनी भय दाखवी,
माजली भेसुर कोल्हेकुई !    १

या स्थळींच करती भय्याजी पाहरा.
पिळदार मिशांनीं उग्र दिसे चेहरा.
ध्वज शुभ्र फडकवी वदनावरतीं जरा.
आवाजामधिं मेघगर्जना, नयनीं विद्धुल्लता,
देह हा पोलादी तत्वतां.     २

अंगात कोपरी, कसलेलें धोतर,
मल्मली चिमुकली टोपी डोक्यावर,
पायांत वाजती चढाव ते करकर,
कंदिल घेउन दंडा फिरवित भय्याजी चालती,
हादरे भूमि तयांभोंवतीं !    ३

कधिं तुलसीजींची चौपाई गाउनी,
कधिं गोड बांसरी मौजेनें छेडुनी
ते दिवस कंठिती जीवाला रिझवुनी.
कोस शेकडों दूर राहिलीं दयिता अन् बालकें
त्यामुळें सुख झालें पारखें.    ४

अन् सुहृदांची त्या स्मृति होतां कधिंतरी
ते उदासवाणे बसती कोठेंतरी;
नि:श्वास सोडती टक लावुनि अंबरीं.
दोन आंसवें भय्याजींच्या पडती नेत्रांतुनी
येति मग भानावरतीं झणीं.     ५



— गोपीनाथ

संकल्पना: श्रीमती प्रिती म. म्हात्रे, नाशिक

5 December 2021

झप-झप चाललेत नाजुक पाय

मे महिन्याची दुपार ... रणरणते उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय ?
झप-झप चाललेत नाजुक पाय.

घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळे भरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.

माथ्यावर उन्ह ... पायाखाली उन्ह
परिस्थितीचे मनात उन्ह
निखार्‍यात तापलेल्या धरणीमाये
पोरीचे पाऊल कमळाचे आहे
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे, तिच्या डोळ्यातली भिती पाहा
ड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय !



— दत्ता हलसगीकर

संकल्पना : श्रीयुत दिनेश कासवेद, पुणे.

26 November 2021

भीती मेंदूत आरपार

आता फारशी जत्रा भरत नाही,
भरलीच तरी
मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,
घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी
खेळतात 'युद्ध युद्ध'

बैठकीतल्या उश्यांचा बांध रचून
पोरांनी एकदा
माझ्यावरच रोखली स्टेनगन,
गोळीला घाबरलो नाही
पण चिमुकल्या डोळ्यांत
हिंस्रतेचा आविर्भाव पाहून,
हातातली खोटी बंदूक
कधीही खरी होण्याची भीती
मेंदूत आरपार घुसत गेली.



— दासू वैद्य

चाललो

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो
मिसळुन मेळ्यात कधी, एक हात धरुनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो
आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो
चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो
खांद्यावर बाळगिलेओझे सुखदुःखांचे
फेकुन देऊन आता परत चाललो !



— अनिल

मोठ्यांचं वागणं

अस्स कसं असतं हो, मोठ्यांचं वागणं ?
एकदा एक बोलणं, अन् एकदा एक सांगणं ?

अभ्यास केला तर म्हणतात, 'पुस्तकातला किडा'
खेळायला गेलो की म्हणतात, 'परीक्षेत रडा' |
लौकर उठलं तर म्हणतील 'नीज अजून थोडा'
उशिरा उठलं तर लागलीच 'पसरलाय घोडा' || १ ||

एकदा सांगतील, 'बाबानो, खरं खरं बोला'
खरं सांगताच म्हणतील, 'निर्लज्ज मेला' |
काम केलं तर लागलीच 'चंदू हुशार झाला'
चुकले जरा कुठे तर मग 'चंदू वाया गेला' || २||

एकदा म्हणायचं, 'जरा दया करायला शीक'
केली की म्हणायचं, 'बाबा, लावशील मला भीक' |
मी कुणाला ठोकून काढल, की मीच ठरतो चिडकट
मला कोणी मारलं की, मीच पुन्हा शेळपट || ३ ||

सांगतो तसे दाखले मी मित्रांच्या घरचे
वस्स्कन म्हणतात 'नको सांगु कौतुक दुसर्‍यांचे' |
शेजारच्या बाळूचा मात्र, सारखा सारखा पुळका
मला आपलं म्हणत राहायचं, 'त्याचं जरा शिका!' || ४||

धीटपणे बोलताच म्हणतील चुरूचुरू करतय तोंड
गप्प बसावे तर लागलीच 'लाजरच आहे सोंग' |
कधी आजारी पडलो तर तेंव्हा मात्र म्हणतात
'चंदू आमचा गुणाचा' हो तेवढच खर बोलतात || ५||



— विजया जहागीरदार

25 November 2021

नव्या जगाची आण

तुझ्या कामामधुन, तुझ्या घामामधुन, उद्या पिकंल सोन्याचं रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार,
तुला नव्या जगाची आण

तुझ्या घणाच्या घावामधुन
उठे उद्याच्या जगाची आस
तुझ्या घामाच्या थेंबामधुन
पिके भुकेल्या भावाचा घास
तुझ्या ध्यासामधुन, तुझ्या श्वासामधुन,
जुळे नव्या जगाचं गान

तुझ्या पोलादी टाचेखालुन
जित्या पाण्याचे निघतिल झरे
तुझ्या लोखंडी दंडामधुन
वाहे विजेची ताकद कि रे
चल मारून धडक, उभा फोडू खडक,
आता कशाची भूकतहान

भाग्य लिहिलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्‍न लपलेलं माझं तुझं
इथे बरड माळावरी
घेउन कुदळखोरं, चला जाऊ म्होरं,



— वसंत बापट

24 November 2021

प्यारा हिंदुस्तान

प्यारा हिंदुस्तान माझा प्यारा हिंदुस्तान
नव्या जगाच्या नव्या घडीचे एकच आशास्थान

इथे हिमालय, किर्ति हिमासम
इथे नद्यांसह प्रीतिरसागम
भव्य सागर नि जन पुरुषोत्तम
दिव्य प्रेममय त्यागी जनता येथिल सृष्टिसमान

रक्तपिपासू न ही संस्कृती
वृकव्याघ्रांसम नसे प्रकृती
मानव्याची मूर्त आकृती
सकल जगाला मानवतेचे देई पाठ महान
येथे अकबर, येथ शिवाजी
कबीर, तुलसी, एकनाथजी
बुद्ध, प्रबुद्ध नि शुद्ध गांधिजी
एकी, शांती, त्याग नि प्रीती यांची माणिकखाण

आज भारतीं जे जे लढती
जे जे पिचती, झिजती, रडती
पिळले जाती, छळले जाती
बलशाली परि करिल भारता हे त्यांचे बलिदान

परकीयांच्या पाशामधुनी
विमुक्त झाली अपुली जननी
मुक्त करिल ही अवघी अवनी
दलित नि शोषित सारे गातिल स्वातंत्र्याचे गान



— वसंत बापट

29 October 2021

कष्टेंवीण फळ नाहीं

यत्नाचा लोक भाग्याचा यत्नेंवीण दरिद्रता ।
उमजला लोक तो धाला उमजेना तो हपापिला ।।

केल्यानें होत आहे रे

आधी केलेंचि पाहिजे
यत्न तो देव जाणावा अंतरीं धरितां बरें ।।

कष्टेंवीण फळ नाहीं

कष्टेंवीण राज्य नाहीं
केल्यावीण होत नाहीं साध्य जनीं ।।

आधीं कष्टांचे दुःख सोसिती

टेन पुढें सुखाचें फळ भोगिती
आधीं आळसें सुखावती त्यांसि पुढें दुःख ।।

जेहीं उदंड कष्ट केले

ते भाग्य भोगून ठेले
येर ते बोलतचि राहिले करंटे जन ।।

कोणी येक काम करितां होते

न करितां तें मागें पडतें
याकारणें ढिलेपण तें असोंचि नये ।।

जो दुसऱ्यावरी विश्वासला

त्याचा कार्यभाग बुडाला
जो आपणचि कष्टत गेला तोचि भला ।।

सुख-दु:ख भोग जगतांना सारे

इथेच मांडायचे पसारें ।
श्वास थांबता कांहीच न उरे पार्थिव होई रक्षारूप ।।

कष्टकऱ्यांसि निद्रोत्तरी जाग

पुनर्जन्माचाचि सद्यकालीन भाग ।
चिंतांची चितागर्भांतली आग शेजसरणावर त्यास जाळितसे ।।

अथांग, अगम्य अनेकविध कृती

आव्हाना स्वीकारिते संशोधक वृत्ती ।
उलगडून कार्यकारणउत्तरे मांडिती जनकल्याणार्थ ।।



– समर्थ रामदास

29 August 2021

नौबत

नौबत आता झडू दे ,
उंच उंच स्वर चढू दे ,
जय जय भारत विजयघोष हा या गगनाला भिडू दे.


जातपात ना आम्ही मानित,
धर्मभेद ना आम्ही जाणत,
तेज आमुच्या हृदयामधले काळोखावर पडू दे.


इथली गरिबी आम्ही हटवू,
समता सगळ्या जगास पटवू,
अन्यायाच्या विरुध्द अमुची शूर मनगटे लढू दे.


लाज न आम्हां मुळी श्रमाची,
हाक ऐकतो पराक्रमाची,
नव्या जगाची नवीन मूर्ती या हातांनी घडू दे.


विज्ञानावर अमुची भक्ती,
माणुसकी हि अमुची शक्ती,
भिऊन दडली सर्व पांखरे निर्भर होऊन उडू दे.



— मंगेश पाडगावकर

12 August 2021

ये ग तू ग गाई

ये ग तू ग गाई चरूनी भरूनी
बाळाला म्हणूनी दूध देई
ये ग तू ग गाई खा ग तुझा कोंडा
बाळाला दूध, मांडा देईन मी
ये ग तू ग गाई खा ग तू कणीस
बाळाला निरसं दूध देई
ये ग तू ग गाई दे ग दूध तुझं
ते पाजू तुज बाळराज
गाई ग गोठ्यात म्हशी ग रानांत
संजूबाळ पाळण्यात दूध मागे
अंगाई मंगाई तांबूली कंगाई
आतां तान्हीयाला घोट दूध देई

7 August 2021

पानगळ (ऋतुराजाची चाहूल)

आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलींना लागली.

देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला.

डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले.

'कुहू' गाऊन कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत.



— इंदिरा संत

ध्वजगीत

माझा भारताचा ध्वज
उभा अजिंक्य आकाशी,
नव्या मनूचा प्रवास
याच्या मंगल प्रकाशी.

संतमुनींचा, ऋषींचा
याला आशीर्वाद मिळे,
लक्ष जीवनांची ज्योत
त्याच्या पायापाशी जळे.

माझ्या भारताचा ध्वज
निळ्या आकाशात डोले,
उषेसंगती नक्षत्र
येथे उदयाला आले.

याला अरुणदेवाने
भाळी लावले केशर,
मायदेशास मिळाला
त्यात वीरतेचा वर.

पूर्णचंद्राने तयास
दिले चांदणे नितळ,
स्नेहशांततेची भव्य
उभी राहे दीपमाळ.

सस्यशामल धरेने
दिले ऐश्वर्य मातीचे,
सूर्यचक्राने अर्पिले
व्रत अखंड गतीचे.

माझ्या देशाच्या दैवता,
तुला सहस्त्र वंदन,
तुझ्या रक्षणसेवेत
होवो कृतार्थ जीवन.



— कुसुमाग्रज

2 August 2021

दुनिया दो हातांची

दुनिया दो हातांची रे बाबा I दुनिया दो हातांची I
दोन हातांमधल्या या वीतभर I भगवन् मंदिराची रे बाबा II

एक हात गगनास गवसणी I दुजा सागरा ओढुनि आणी I
त्याच्या कर्तृत्वाची गाणी I सांग कुणी गायाची रे बाबा II

दोन हात जर नसते तर मग I उभे राहिले असते का जग ? I
या उपाशी हाताची तगमग I कुठवर साहायाची रे बाबा II

सौंदर्ये तुज रिझवायाला I दगडामधुनी निर्मिला I
याच हातांनी देव घडविला I काढू साक्ष कुणाची रे बाबा II

देवें केले काय न ठावें I स्तुतीस्तोत्र का त्याचे गावे ? I
विश्वनाथ भरला दो हाती I पूजा करू या त्याची रे बाबा II

देव कुणी या जगी पाहिला I हात तुझ्या सत्वर सेवेला I
विसरलास तू याच हाताला I सीमा कृतघ्नतेची रे बाबा II



– शाहीर अमरशेख

भाऊबीज

उद्याचीच भाऊबीज
कोण मला ओवाळील ?
कोण ओवाळणीसाठी
मजसवे झगडील ?

इथे आज पडलो मी
माझ्या गावाहून दुर,
'कुणा घालू ओवाळणी ?'
लागे मला हुरहूर.

इथे साऱ्याच बहिणी,
परक्या या नगरात,
परी असे निराळीच
माझ्या बहिणीची प्रीत.

कसे बहिणीचे नाते !
कशी बहिणीची माया !
ओवाळणी मागतसे
सालभर भांडुनिया !

उद्याचीच भाऊबिज
महोत्सव घरोघरी,
आणि पाहीन हे सारे
एकटाच वेड्यापरी !



— सुरेश भट

7 June 2021

सुगी


देवाचं देणं हे देवाचं देणं
सोन्याचा ताटाला मोत्याचं दाणं
पिकला शाळू परोपरी
चढली कणसं माथ्यावरी
पाखरं आली भिरीभिरी
गोफण फिरवू माच्यावरी
चला मर्दांनो, चला बायांनो, म्हणा गाणं तुम्ही म्हणा गाणं

सपसप फिरवू विळे विळे
आडवे पाडू उभे मळे
घामाचा पाझर खाली गळे
सुकतिल पेंढ्या उन्हामुळे
काम खुषीचं, एकामेकांचं, नगं नाणं आम्हां नगं नाणं


— ग. ल. ठोकळ

30 May 2021

अरे ,अरे कळसा

—अरे,अरे कळसा,
हसून नको पाहू !
पायरीचा मी दगड
तुझाच कि भाऊ !

—मी तर बडा कळस !
माझा किरीट झळझळीत;
पायरीचा तू दगड
पडलास धूळ गिळीत

—अरे,अरे कळसा,
जरा बघ – जरा तरी,
पायरीचा मी दगड
तुझा भाऊ – गरीब जरी

—मी उंच कळस !
चढणार आकाशी !
पायरीचा तू दगड
पडणार तळाशी


—अरे,अरे कळसा,
नको गाल फुगवून बसू;
पायरीचा मी दगड
तरी भाऊ भाऊ असू

—डौलदार मी कळस !
माझा मुकुट कसा छान !
पायरीचा तू दगड,
तुझा पैजारांचा मान

—अरे,अरे कळसा,
नको झिडकारू मला;
भाऊ ना मी तुझा,
माझा दादा तू भला

—कुठे मी कळस !
मला ठेंगणे आभाळ !
पायरीचा तू दगड,
आपली पायरी सांभाळ !

कळसाचा दगड
गर्वाने चढला;
पायरीचा दगड
मान घालून बसला

इतक्यात आला सज्जन
देवदर्शन करीत
पायरीवर बसला
'राम राम' करीत

तितक्यात आला कावळा
पंख फडकावीत
जाऊन बसला कळसावर
'काव काव ' करीत !



— रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले

15 May 2021

जो बाळा जो

आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ घातला
सृष्टी माऊली लागे गायाला... जो बाळा जो जो रे जो ||

बाई गं माझं बाळ गुणाच
रांगत होतं तरी केव्हाच
लाल दिसती डोळे झोपेचे
निज रे बाळा निज सुखाने... जो बाळा जो जो रे जो ||

निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळ नीज भास्करा... जो बाळा जो जो रे जो ||

आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा... जो बाळा जो जो रे जो ||



– अज्ञात

हे अंगाईगीत श्रीमान जागृत यांच्या मदतीने पूर्ण झाले. संकलक श्री जागृत यांचा आभारी आहे.

14 May 2021

जय भारता


जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते
जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते
जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा
प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृक्ष हो, हे अंबरा
परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले
यज्ञात जे धन अर्पिले
शतकांत जे हृदयी फुले
उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडळ हो उभा
गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा
दलितांस हा नित्‌ तारता जय भारता, जय भारता

— कुसुमाग्रज

चालता चालता काय होते

समोर समोर चालता चालता
शेवटी संपून जाईल रस्ता,
आकाश राहील उभे पुढ्यात,
चांदोबाला लागेल हात.
असे काही मनात धरून
चालत सुटतो रस्त्यावरून.

गळ्यात गलोल, हातात छडी,
खिशात शेंगदाण्याची पुडी.
चालता चालता काय होते,
रेल्वे फाटक आडवे येते.
गाडीला मग 'टाटा' करतो
समोर समोर चालत राहतो.

चालता चालता काय होते,
एक छोटे तळे लागते.
पाय बुडवून, भाकऱ्या खेळून
दाणे खात चालतो फिरून.

पुढे एकदम आले समोर
चिंचेचे वन हिरवेगार !
गलोल मारून चिंचा पाडतो,
चोखत चोखत दुडका पळतो.

मग पुढे काय झाले,
ओसाड माळ, डोंगर आले.
सगळीकडे सामसूम
कडक ऊन घामाघूम.
बसून राहिलो दगडावर
एकटा एकटा... दूर घर...

'आई आई' ओरडू वाटले.
दाटून दाटून रडायला आले.
खाड्र खाड्र बूट वाजले
उंचच उंच कोण आले ?
आरपार घाबरून गेलो,
अंथरुणात मी उठून बसलो.


— इंदिरा संत

13 May 2021

पतंग

हा पतंग, की पाखरू,
म्हणे मज 'आभाळी चल फिरू'.
उंचावर किति वाकड्या
मारितो सारख्या उड्या
कुरणात जसे वासरू
शिवारी अवखळ की शिंगरू.

थरथरे दीपिकेपरी,
गिरगिरे नर्तिकेपरी,
की वारुवरुन वायुच्या
बघे हा स्वार शिलंगण करू .

कितितरी चलाखी दिसे
तैशीच चढाई असे,
जणु दाखवितो की 'पहा
किती मी पराक्रमी, वाघरू ! '

सरसरा चढे वरिवरि
एकेक काय पायरी.
सूर्यास पाहते धरू,
काय हे अंजनिचे लेकरू.


— यशवंत

12 May 2021

चंदन

माझ्या चंदनी खोडाचा
मंत्र: 'झिजणे झिजणे !'
ऊणें लिंपायाला माझें
घाली सुगंधाचे लेणें

झिज केशरी तयाची
तप्त जीवा लावी उटी
आंत उमले भावना
शांत, शीतल, गोरटी !

माझें सुख, माझी तृप्ति
हीच देवपूजा त्याची—
निष्काम ते; अपवाद :
इच्छा एक झिजायाची !

झिजतें तें—जीव माझा
होतो आंत आंत गोळा
अडखळे हात आणि
पाणी तरारतें डोळां—

वृद्ध चंदन तें माझें
नित्य जपलें—जपेन
त्याच्यासाठीं—आण त्याची—
जीव ठेवीन गहाण !



— कृष्ण बलवंत निकुंब

पाऊस

थेंबा थेंबा थांब थांब
दोरी तुझी लांब लांब
आकाशात पोहोचली
तिथे कशी खोचली ?
सर सर सर सर धावतोस
सरीवर सरी गुंफतोस
सरी तुझ्या मोत्यांच्या
रुप्याच्या की सोन्याच्या ?
सरी तुझ्या ओल्या
गंगेत जाऊन न्हाल्या


– ताराबाई मोडक

10 May 2021

अखंड

अखंड - ४

उद्योग जो करी दीनबंधूंसाठी l
ममता ती पोटी ll मानवाच्या ll १ ll

विद्या सर्वां देई सद्गुणांची हाव l
करी नित्य कीव ll अज्ञानाची ll २ ll

थकल्या भागल्या दीना साह्य करी l
उद्योगास सारी ll जपूनीया ll ३ ll

त्याच्या उद्योगास नित्य यश देई l
जगा सुख देई ll जोती म्हणे ll ४ ll


— महात्मा जोतिबा फुले

पाऊस

पाऊस पडतो । पडतो मुसळधार
गंगेला आला पूर । दोन्ही थडी ।। १ ।।

पाऊस पडतो । गरजे पाणी पडे
आकाश जणु रडे । रात्रंदिवस ।। २ ।।

पाऊस पडतो । पडतो सारखा
सूर्य जालासे पारखा । चार दिवस ।। ३ ।।

पाऊस पडतो । विजांचा चमचमाट
धरणीमाता हिरवा थाट । मांडीतसे ।। ४ ।।

मेघ गडगडे । कडाडते वीज
कुशीमध्ये नीज । तान्ह्या बाळा ।। ५ ।।

झाडे झडाडती । विजा कडाडती
धरणीमाये तुझा पती । येत आहे ।। ६ ।।

मेघ गरजतो । पाऊस वर्षतो
कुशीत निजतो । तान्ह्या बाळ ।। ७ ।।

पाऊस थांबेना । राऊळी कशी जाऊ
त्रिदळ कसे वाहू । शंकराला ।। ८ ।।

पाऊसं थांबेना । देउळी कशी जाऊं
बाळाला कशी नेऊ । कडेवरी ।। ९ ।।

पाऊस थांबेना । पाखरे गारठली
आईच्या पदराखाली । तान्ह्या बाळ ।। १० ।।

पाणी पाणी झाले । साऱ्या अंगणात
नको जाऊ तू पाण्यात । तान्ह्या बाळा ।। ११ ।।



— अज्ञात

वाङमयरुपाने आजही अस्तित्वात असलेल्या अनेक लोकगीतांपैकी हे एक प्राचीन ओवीबद्ध लोकगीत आहे. या काव्याचा रचयिता कोण, याचे नेमके उत्तर देता येणार नाही.

6 May 2021

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा चमकावी वीज
उतरावी खाली भिनावी रक्तात
पेटावे स्नायू करीत पुकार
पुन्हा एकवार पुन्हा एकदा
घालीत पिंगा पावसाच्या सरी
व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली
मातीत माती व्हावी एक...
पुसून टाकीत भेदाभेद...
पुन्हा एकवेळ... पुन्हा एकदा
घुमावा वारा युवक इथला
भारला जावा भुलावी तहान
विसरावी भूक नवनिर्माणाची
लागावी चाहूल उजळावी भूमी...
दिगंतात...पुन्हा एकदा...


– प्रतिमा इंगोले

5 May 2021

मी न माझा राहिलो

या नदीला घाट छोटा
बांधुनी मी चाललो !

जन्मली वेदांसवे जी
सिंधु ही सारस्वताची
दे स्मुती आता श्रुतींची
व्यास आणि वाल्मिकींची,
मी इच्या पाण्यात रसिका
थेंब म्हणुनी खेळलो !

मी नव्हे शिल्पज्ञ मोठा,
तंत्र नव्हते माहिती,
चार धोंडे जोडणारी
ही किनाऱ्याचीच माती,
फक्त तिचा चिखल व्हाया
अंतरी मी ओळलो !

या प्रवाहाच्या गतीला
पृथ्वी गातेआरती
जी त्रिकालज्ञास ठेवी
आपुल्या विस्तीर्ण पोटी
ताज बांधो बांधणारा,
मी वडारी जाहलो !

गर्व कुठला, गर्जनाही
या निवांतातून जाई,
ईश्वरी कंठातली का
जाइ कोमेजून जाई ?
लोटताना देह डोई
मी न माझा राहिलो ... !



— मनमोहन नातू

15 April 2021

पाहुणा गोजिरा

आज ये अंगणा,
पाहुणा गोजिरा
ये घरा आमुच्या, सोयरा साजिरा ॥

वाजवा नौबती,
ये सखा सोबती,
खेळवा संगती, हा जरा लाजरा ॥

कोवळे देहुडे,
सावळे रूपडे
पोपटी अंगडे, शोभते सुंदरा ॥

हा वसंतासवें,
सृष्टीला हासवे,
पालवे, बोलवे, सानुल्या पाखरां ॥

श्रावणीं न्हातसे,
आश्विनीं गातसे,
साउली देतसे, भूमिच्या लेकरां ॥

बासरी ऐकतो,
चांदणे झोकतो,
नाचतो, डोलतो, झोंबतो अंबरा ॥

अंगारेखांतुनी,
पर्णशाखांतुनी,
वाहतो जीवनीं, अमृताचा झरा ॥

गीत गाता मुखी,
नाचवा पालखी,
विश्व व्हाया सुखी, या नव्या जागरा ॥

सूर्य देवो, द्धुती
चंद्र देवो द्रुती,
छत्रछायाकृती, मित्र आला घरा ॥



— वसंत बापट






10 April 2021

मला व्हायचंय अंतराळवीर

मला व्हायचंय
अंतराळवीर
संचाराला
मी अधीर
सुसज्ज एक
अंतराळयान
त्यामधून करीन
वर उड्डाण
तारे वारे
वीज ढग
अद्भुतरम्य
पाहीन जग. 
पहिला मुक्काम
चंद्रावर
मग स्वारी
शुक्रावर
मारुतीसारखीच
अनावर
झेप पुढे तर
– सूर्यावर
संकटांशी
दोन हात
जिद्दीने त्यांवर
करीन मात
नवे शोध
नवे ज्ञान
या जगाची
वाढवीन शान
मला व्हायचंय
अंतराळवीर
संचाराला
मी अधीर



— वृंदा लिमये

9 April 2021

उगवला नारायण

उगवला नारायण आधी आला माज्या दारी
दहिभाताची न्याहरी मग पिरथी धुंडी सारी
उगवला नारायण केळीच्या गं कोक्यातून
धुंडितो गं अमृतबाळ बाई फिरतो मळ्यातून
उगवला नारायण अंगणात प्रकाशला
हळदी-कुंकवाचा वटा माज्या शालूचा माखला
उगवला नारायण लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा
उगवला नारायण चढे झाडा-झुडांवरी
तेज पडे चुड्यांवरी
उगवला नारायण अगनीचा ग पुडका
आत मोत्याचा सडका
उगवला नारायण सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया
उगवला नारायण पसरलं पिवळं ऊन
बाई हसलं हिरवं रान
उगवला नारायण तिरिप पिवळी छान
हसे मखमल रानोरान
उगवला नारायण "आता काय मागू त्याला ? "
सावळे ग मैनाबाई "औख माग कुंकवाला "


वाङमयरुपाने आजही अस्तित्वात असलेल्या अनेक लोकगीतांपैकी हे एक प्राचीन ओवीबद्ध लोकगीत आहे. या काव्याचा रचयिता कोण, याचे नेमके उत्तर देता येणार नाही.

11 March 2021

बाळराज


आकाशात तारे त्यांचे ओठ का हालती
संगीत गाणी गात तान्हेबाळा
काजवे फुलले फुलले लाखलाख
पहाया श्रीमुख राजसाचे
थुई थुई उडे कां ग कारंजे उसळे
तुझ्यामुळे उचंबळे तान्हेबाळा
पाखरे उडती फुलतात फुले
उठतात मुलें उजाडता
पेरा झाला रानातून मोड काढी वर मान
तसं हसे माझं तान्हं पाळण्यात
तान्हीयाचे दात जशा मोतीयांच्या ओळी
हासता पडे खळी गोड गाली
माळ्याला ताकीद येसबंदाच्या रोपाची
तान्ह्याला झाली दृष्ट सभेमधल्या लोकांची
आंथरुण केले जाई मोगऱ्याचे
सख्या गोजिऱ्याचे अंग मऊ
शाळेच्या पंतोजींना देऊ करावी खारीक
बाळ लिहाया शिकूं दे नीट अक्षर बारीक
हाती दूधभात वर पेरते साखर
तुझे जेवण प्रकार तान्हेबाळा

10 March 2021

ओळखा, कोण ?


हिरवं अंग, लाल चोच
गळ्यात माझ्या काळा गोफ
खातो डाळ, पेरूची फोड
बोलतो विठ्ठ् विठ्ठ् गोड.
ओळखा, कोण ?
सांगा पट् पट् !
—तू तर आमचा
लाडका पोपट !
निळे पंख, लाल डोळे
छाती काढून ऐटीत चाले
गुटर्रगूंS गुटर्रगूंS
कोण करतं ? सांगा बघू !
—ते तर कबूतर
घुमतंय उंच छपरावर !

उंचाडी मान फत्ताडे पाय
वाकडी पाठ डुगूडुगू जाय
तुडवीत जातो वाळवंट.
कोण ते ? सांगा बघू !
—उंट, उंट !

अंगावर पट्टे
कान छोटे छोटे
काटकुळे पाय
लांबुटकी मान
मी तर खातो
शेंड्याचं पान.
ओळखा, कोण ?
हरलात साफ ?
अहो, मी तर
—जिराफ, जिराफ !


— सरिता पदकी

6 March 2021

अखंड

अखंड - १


दृढ मनी धरी सद्विवेकास l
तेच संतानास ll सुख देई ll १ ll

जगहितासाठी सत्याने वर्तती l
हित ते करीती ll स्वतःचेही ll २ ll

आपहितासाठी मूढा नाडू जाता l
त्याने तसे होता ll मग कसे ? ll ३ ll

सद्विवेकाने तुम्ही करा न्याय l
नसे पुढे भय ll जोती म्हणे ll ४ ll



— महात्मा जोतिबा फुले

कणभर तीळाची मणभर करामत

वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !

तीळ चालला भरभर,
थांबत नाही कुठे पळभर !
"तिळा, तिळा, कसली रे गडबड ? "
"थांबायला वेळ नाही,
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड ! "
"ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा ! "

"बघा तरी थाट ! सोडा माझी वाट ! "
"बघू या गंमत, करू या जंमत !
चला रे जाऊ यांच्याबरोबर."
तीळ चालला भरभर, वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात रिकामी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
ताईने टाकला तीळ परातीत,
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरुन !

पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही, हुय नाही, हासे फसफसा !
पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय !
अरे, पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी, पांढरा हलवा कुठून आला ?
"वाटण्या फुटाण्या, शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला !"



— लीलावती भागवत

अखंड

अखंड - २

सत्याविण नाहीं धर्म तो रोकडा  l
जनांशीं वांकडा  l  मतभेद  ll १ ll

सत्य सोडूं जातां वादामध्यें पडे  l
बुद्वीस वांकडे   l  जन्मभर  ll २ ll

सत्य तोच धर्म करावा कायम  l
मानवा आराम  l  सर्व ठायीं  ll ३ ll

मानवाचा धर्म सत्य हीच नीती  l
बाकीची कुनीती   l  जोती म्हणे  ll ४ ll




— महात्मा जोतीराव फुले (जोतीराव गोविंदराव फुले)

5 March 2021

अखंड

अखंड - ३

ईशें केलें नाहीं तुजसाठीं सर्व l
करूं नको गर्व ll प्राण्यांमध्यें ll १ ll

देह देऊनीयां बुद्धिमान केला l
धनीपणा दिला ll सर्वांमध्यें ll  ll

जगाच्या कल्याणा देह कष्टवावा l
कारणीं लावावा ll सत्यासाठीं ll  ll

अशा वर्तनानें जन्माचें सार्थक l
संतोषी निर्मीक ll जोती म्हणे ll  ll


— जोतिराव गोविंद फुले

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

24 February 2021

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश ।। ध्रु .।।

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास ।। १ ।।

दंव पिऊन नवेली, झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे, जग उदास उदास ।। २।।

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा, सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही, नवा सुवास सुवास ।। ३ ।।



— सुधीर मोघे

18 February 2021

तारकांचे गाणे

कुणी नाही गं कुणी नाही
आम्हाला पाहत बाई
शांती दाटली चोहिकडे या गं आता पुढेपुढे लाजत लाजत
हळूच हासत खेळ गडे
कोणीही पाहत नाही!सुंदरतेला नटवून,

कोमलतेला खुणवून,
प्रेमाच्या वसतीकरिता
जगदंतर फुलवु आता.
दिव्य सुरांनी गीते गाउनि
विश्वाला निजवायाला वाऱ्याचा बनवू झोला
एखादी तरुणी रमणी
रमणाला आलिंगोनी
लज्जा मूढा भिरुच ती
शंकित जर झाली चित्ती
तिच्याच नयनी कुणी बिंबुनी
धीट तिला बनवा बाई भुलवा गं रमणालाही...

अनेक असले खेळ करूं
प्रेमाशा विश्वात भरूं
सोडुनिया अपुले श्वास
खेळवु नाचवु उल्हास प्रभातकाळी
नामनिराळी होऊनिया आपण राहू
लोकांच्या मौजा पाहू!

9 February 2021

पाणी पडते


पाणी वरून पडते जमिनी गेल्या धागा
पोवळे पेरू लागा

पाणी वरून पडते जमिन शिणारते
मोती-हिरे उणारते !

पाणी वरून पडते पडते उभ्या धारा
तिफणी आल्या घरा

पाणी वरून पडते टपकते थेंब थेंब
करे झाडं–झुडं चिंब

पाणी वरून पडते लहरा मारे मुंग
झोंबे पानोपानी शेंग !

पाणी वरून पडते बाजरा निसवला
दाणा चिकावर आला !

पाणी वरून पडते तूर बारावर आली
वाकल्या फांद्या खाली

पाणी वरून पडते डोले धांडा उसावणी
काढे जसा नाग फणी !

पाणी वरून पडते धरे मिरची फुलोरा
भरारला मोतीचुरा !

पाणी वरून पडते नार चालली वावरा
हाती तिच्या विळा दोरा !

पाणी वरून पडते कसा मोत्यांचा शिरवा
बाग हिरवा हिरवा !

पाणी वरून पडतेकाय पाहता वावरा
धरा धडाल डवरा !

पाणी वरून पडतेबसे दडून हरणी
झाली मुकी मैनाराणी

पाणी वरून पडतेपाहा म्हशी डोबोडोबी
गवळी उभा लोभी !

पाणी वरून पडते नदी दोथडी भरून
धार चालली फुटून

पाणी वरून पडतेमोत्यांचा झाराझुरा
जाते पाणी देवघरा !



धागा = भेगा; लहरा = डोलू लागणे; मुंग = मूग; धांडा = ज्वारीचे ताट; बार = बहर; डोबोडोबी = डबक्याडबक्यात; मोतीचुरा = ज्वारीचा एक प्रकार; धडाल = खुशाल; डवरा = शेतीचे अवजार

5 February 2021

भारतमाता

प्रियतम अमुची भारतमाता
आम्ही सारी तिची मुले
तरी येथली सर्व फुले !
प्रिय आम्हांला येथिल माती
प्रिय हे पाणी झुळझुळते
प्रियकर ही डुलणारी शेते
प्रिय हे वारे सळसळते
प्रियतम अमुचा धवल हिमाचल
बघे भिडाया जो गगना
प्रियतम अमुचे सह्य-विंध्य हे
प्रियतम या गंगा-यमुना
मानव सारे समान असती
शिकवण ही जगतास दिली !
या मातेची मुले सद्गुणी
सर्व जगाला प्रिय झाली !
प्रियतम अमुची भारतमाता
वंदन आम्ही तिला करू
या मातेची मुले लाडकी
सदा तिचा ध्वज उंच धरू !
— शांता शेळके

4 February 2021

कशाले काय म्हनू नही

बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरीनामाइना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हाललं त्याले पान म्हनू नही
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाटा येहेरीवाचून त्याले मया म्हनू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामधी नही पानी त्याले हाय म्हनू नही
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

येहेरीतून ये रिती तिले मोट म्हनू नही
केली सोताची भरती त्याले पोट म्हनू नही

नही वळखला कान्हा तिले गाय म्हनू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरी वाटच्या दोरीले साप म्हनू नही
इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही
जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही
ज्याच्यामधी नही चेव त्याले शक्ती म्हनू नही


— बहिणाबाई नथुजी चौधरी

गोगलगाय


बैसूनिया कशावरी
शंखोबाची निघे स्वारी ?
गोगलगाय गोगलगाय
दोन शिंगे बिनापाय !

ऐटीमध्ये पाठीवरी
शंखोबाची बसे स्वारी !
चाल हिची मंद अशी
तीन वाव दार ताशी !

असा काही हिचा थाट
मागे चमचम करी वाट
अंग हिचे लोळागोळा
काय तरी अंगी कळा !

शंखोबाचे छत्र वर
तेचअस्त्र, तेच घर,
नाही पाय, नाही पंख
अकलेचा वरी शंख

नका म्हणू रे टोचूनी
गोगलगाय माझी गुणी,
भयभीत जेव्हा होते
शंखामाजी ही दडते

चतुर हि आसे भारी
जीवालागी जपणारी
पीळ देऊनी पोटाला
निघे आपुल्या कामाला

हळू मार्ग आक्रमीत
गेली गेली, झाली गुप्त !
शोधा बघू, जा जा थेट
चमचमणारी वाट !

सापडेल तुम्हांलागी
चाललीसे निजमार्गी.
गोगलगाय पोटात पाय
म्हण खोटी नव्हे काय ?



— सोपानदेव चौधरी

2 February 2021

कोकिळ

बहुत मधुर ऐशा काढिशी तू रवाला l
परिसुनि बहू लागे नाद माझ्या मनाला ll
टकमक बघतो मी कोठ काही दिसेना l
मधुर कुठून येई शब्द हेही कळेना ll

तरुवर दिससी ना पर्वतीही न पाही l
अवनितल रिकामा, कल्पना होत नाही ll
झुडुप हलत नाही थोर आश्चर्य आहे l
खग न मजसि वाटे शब्द हा धावताहे ll

जवळ रव निघावा तोच तो लांब जावा l
परिसुनि मग का हा जीव ना गोंधळावा ll
अवनितलि निघे हा, की दरीतून येई l
समजत मज नाही की नभी जन्म घेई ll

फिरून फिरून येई शब्द ऐकावयाला l
बहुत रिझवितो तो माझिया बा मनाला ll
जलद जलद चाले रूप पाहावयासी l
त्वरित पळुन तुही फार तो दूर जासी ll

बघुनि परि तुला मी पावलो फार तोष l
लवकर पळसी तू कोकिळा हा न दोष ll
बसुनि परि कुठेही गोड वाणीस काढी l
परिसुनि रव माझे चित्त घेईल गोडी ll

हरित बहुत ऐसे शोभती पंख ज्याला l
सुबक अमल चंचू लाजवी पोवळ्याला ll
मधुर वदुन शब्दां तोषवी मानवाला l
धरुनि जन अशाही कोंडिती की शुकाला ll

म्हणवुनि तुजलागी धाक वाटे जनांचा l
पळुन करिसि वाटे आसरा काननाचा ll
परि न समचि मानी कोकिळा सर्व लोक l
धरुनि तुजसि द्याया इच्छितो मी न षोकं ll

तरुवर सुफलांनी युक्त झाले कितीक l
कुसुमित दिसताती हे किती येथ देख ll
झुळ झुळ झुळ आहे मंद वाहात वात l
निज किलबिल शब्दे पाखरे बोलतात ll

सुरूचिर वनशोभा सोडुनी पिंजर्‍यात l
रुचि न तव मनाला राहणे दे निवांत ll
मम मन न कधी बा इच्छिते जे अनिष्ट l
तुज बहु गमते ते हो स्वचित्तास तुष्ट ll

परि न सकळ माझ्यासारखे लोक पाहे l
म्हणवुनि पिकराया दूर तू दूर राहे ll
बसुनि वरि तरुच्या गोड वाणी वदे तू l
पुरविन मनिचा मी येथ येवून हेतू ll



— मो. ग. लोंढे

शिशिर ऋतूचं गान



हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान
बाई, तरुचे पान न् पान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
हिवात राने पिवळी पडली
उषा धुक्यामधि ही काकडली
ओठच उलले संध्यालाली
नक्षत्रांची रात शहारे गारव्यात हैराण
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
थंडगार किति पवन झोंबतो
ऊन्हाच्याहि उरि काटा उठतो
पानफुलांचा बहर झडपतो
गळेल वाटे चांदण्यात हे निळे नभाचे पान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
फुले जळाली, पाने गळली
फळांत जरि रसधार गोठली
सर्व सृष्टि जरि हिमे करपली
पिवळ्या पानांच्या मनि फुलते वसंतस्वप्न महान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !


— वा. रा. कांत

31 January 2021

एक अश्रू

स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी
श्रुंगारली आळी, झगमगे ll १ ll

तोरणे, पताका, सांगती डोलुन
स्वांत्र्याचा दिन, उगवला ll २ ll

स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले ?
पुर्वज श्रमले, तयासाठी ll ३ ll

वृक्ष लावणारे, निघोनिया जाती
तळी विसावती, सानथोर ll ४ ll

विचारी गुंतत, हिंडलो बाजारी
पेठेत केवढी, गजबज ll ५ ll

केवढी धांदल, केवढा उल्हास
केवढी आरास, भोवताली ll ६ ll

मात्र एका दारी, दिसे कोणी मात
दीप ओवाळीता, छायाचित्रा ll ७ ll

ओल्या नेत्रकडा हळुच टिपुन
खाली निरांजन, ठेवीत ती ll ८ ll

हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कान
चित्त थरारोनी, ऐकतसे ll ९ ll

होते लखाखत, पेठेतले दीप
आकाशी अमूप, तारा होत्या ll १० ll

चित्तापुढे माझ्या, एक दीप होता
एक अश्रु होता, माऊलीचा ll ११ ll


— वि. म. कुलकर्णी

मनास बोध (मनाचे श्लोक)

(भुजंगप्रयात)

मना सज्जना, भक्ति-पंथेची जावें ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्व-भावे करावें ॥ १ ॥

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ २ ॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना, सर्वथा पाप-बुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो ।
मना, अंतरी सार-वीचार राहो ॥ ३ ॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ४ ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ५ ॥

मना, श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें ।
मना, बोलणें नीच सोशीत जावें ॥
स्वयें सर्वदा नम्र-वाचे वदावें ।
मना, सर्व लोकांसि रे नीववावें ॥ ६ ॥

तनू त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें ।
परी अंतरी सज्जना नीववावें ॥ ७ ॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ८ ॥

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावें ॥ ९ ॥

जगीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारी मना तूंचि शोधोनि पाहे ॥
मना, त्वांचि रे पूर्व-संचीत केले ।
तयासारिखें भोगणे प्राप्त झाले ॥ १० ॥

मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ ११ ॥

मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १२ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १३ ॥

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १४ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥ १५ ॥

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १६ ॥

मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १७ ॥

मना, सर्वथा सत्य सोडूं नको रे ।
मना, सर्वथा मिथ्य मानूं नको रे ॥
मना, सत्य तें सत्य वाचे वदावें ।
मना, मिथ्य तें मिथ्य सोडोनि द्यावें ॥ १८॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्य-वादी, विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ १९॥

फुकाचें मुखी बोलतां काय वेंचे ।
दिसंदीस अभ्यंतरीं सर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारें तुझा तूंचि शोधून पाहें ॥ २०॥



— समर्थ रामदास

टीप: पाठ्यपुस्तकात फक्त पांचच श्लोक समाविष्ठ आहेत. 'मनोबोधाचे श्लोक' मधील २०५ श्लोकांपैकी अनेक पिढ्या सर्वशृत असलेल्या निवडक २० श्लोकांचा वेचा इथे घेतला आहे.