पाणी वरून पडते जमिनी गेल्या धागा
पोवळे पेरू लागा
पाणी वरून पडते जमिन शिणारते
मोती-हिरे उणारते !
पाणी वरून पडते पडते उभ्या धारा
तिफणी आल्या घरा
पाणी वरून पडते टपकते थेंब थेंब
करे झाडं–झुडं चिंब
पाणी वरून पडते लहरा मारे मुंग
झोंबे पानोपानी शेंग !
पाणी वरून पडते बाजरा निसवला
दाणा चिकावर आला !
पाणी वरून पडते तूर बारावर आली
वाकल्या फांद्या खाली
पाणी वरून पडते डोले धांडा उसावणी
काढे जसा नाग फणी !
पाणी वरून पडते धरे मिरची फुलोरा
भरारला मोतीचुरा !
पाणी वरून पडते नार चालली वावरा
हाती तिच्या विळा दोरा !
पाणी वरून पडते कसा मोत्यांचा शिरवा
बाग हिरवा हिरवा !
पाणी वरून पडतेकाय पाहता वावरा
धरा धडाल डवरा !
पाणी वरून पडतेबसे दडून हरणी
झाली मुकी मैनाराणी
पाणी वरून पडतेपाहा म्हशी डोबोडोबी
गवळी उभा लोभी !
पाणी वरून पडते नदी दोथडी भरून
धार चालली फुटून
पाणी वरून पडतेमोत्यांचा झाराझुरा
जाते पाणी देवघरा !
धागा = भेगा; लहरा = डोलू लागणे; मुंग = मूग; धांडा = ज्वारीचे ताट; बार = बहर; डोबोडोबी = डबक्याडबक्यात; मोतीचुरा = ज्वारीचा एक प्रकार; धडाल = खुशाल; डवरा = शेतीचे अवजार
No comments:
Post a Comment