'दीपका' ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
घडविला, जडविला,
चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची करू सोपी पायवाट
घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात
गा रे राघू, गा गे मैने, बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतु-काऊ, चिऊ-माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये ! कुलदेवी !
— बा. भ. बोरकर
जिरेसाळ - भाताचा प्रकार
No comments:
Post a Comment