रम्य ते बालपण!


'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

November 1, 2014

भेटेन नऊ महिन्यांनीं

मनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll

या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते
किति दुर्दैवी, प्राणी असतिल असले l जे अपराधाविण मेले
लाडका बाळ एकुलता
फांशीची शिक्षा होतां
कवटाळुनि त्याला माता
अति आक्रोशें, रडते केविलवाणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १ ll

"किती वेळ असा, शोक करिसि गे असला l दे निरोप मज जायाला
होईल पहा, विफल तुझा आकांत l बाहेर उभे यमदूत
ते चाकर सरकाराचे
नच उलटें काळिज त्यांचें
परि शरमिंदे अन्नाचे
तुजपासुनियां, नेतिल मज ओढोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll २ ll

तुज सोडुनि मी, जाइन कां गे इथुन l परि देह परस्वाधीन
बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे l मम दोरखंड दंडाचे
अन्न्पाणि सेवुनि जिथलें
हें शरीर म्यां पोशियलें
परदास्यिं देश तो लोळे
स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ३ ll

कां परक्याला, बोल उगिच लावावा l दैवानें धरिला दावा
लाभेल कधीं, सांग कुणाला जगतीं l या जळत्या घरिं विश्रांती
घेऊनि उशाला साप
येईल कुणाला झोंप
हा सर्व ईश्वरी कोप
हा परवशता, करते भयकर करणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ४ ll

मज फांशीची, शिक्षा दिधली जाण l न्यायाचा करुनी खून
या मरणाची, मौज कशी बघ असते l सांगेन तुला मी माते
मी राजपुत्र दिलदार
घेऊनि करीं समशेर
भोंवतीं शिपाई चार
करितील अतां, स्वागत जन मैदानीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ५ ll

मजसाठिं तिनें, सिंहासन निर्मियलें l त्या एका खांबावरलें
मी वीर गडी, चढेन गे त्यावरतीं l इतरांची नाहीं छाती
इच्छिली वस्तु ध्यायाला
अधिकारी तैनातीला
प्राणापरि जपती मजला
या दुनियेची, दौलत लोळे चरणीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ६ ll

या सर्वांचे मजवर भारी प्रेम l देतील खडी ताजीम
हें वैभव मी, विकत घेतलें साचें l देउनी मोल जिवाचें
या गळ्यांतला गळफांस
देईल घडीभर त्रास
लाभेल मुक्ति जीवास
वर जाइन मी, लाथ जगा हाणोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ७ ll

या देहाची, करुं कशाला चिंता l होईल तें होवो आतां
कुणि करुणेचे, सागर हळहळतील l कुणि हंसणारे हंसतील
अश्रूंनीं न्हाऊ घाला
प्रेमाचें वेष्टण त्याला
मातीचा मोहक पुतळा
जाईल पहा, क्षणांत मातिंत मिळुनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ८ ll

सांगतों तुला, शपथ घेउनी आई l मरणाला भ्यालों नाहीं
आठवीं मनीं, श्रीगीतेचें सार l कीं नश्वर तनु जाणार
हृदयाचे मोजुन ठोके
बघ शांत कसे आहें तें
वाईट वाटतें इतुकें—
तव सेवेला, अंतरलों मी जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ९ ll

माउली तुझा, नव्हें नव्हें मी कुमार l पूर्वीचा दावेदार
तव सौख्याच्या, वाटेवर निर्मियले l दु:खाचे डोंगर असले
नउ मास भार वाहून
बाळपणी बहुपरि जपुन
संसार दिला थाटून
परि बनलों मी, खचित अभागी प्राणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १० ll

'मम बाळ गुणी, वृद्धपणी बहुसाल l आम्हांला सांभाळील'
तव ममतेचे, बोल ऐकले असले l परि सारें उलटें झालें
माउली विनंती तुजला
सांभाळ तिला, बाळाला
नच बघवे तिकडे मजला
हा कठिण गमे, प्रसंग मरणाहहूनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ११ ll

लाभतें जया, वीर-मरण भाग्याचें l वैकुंठपदीं तो नाचे
दे जन्म मला, मातृभूमिचे पोटीं l पुन:पुन्हां मरण्यासाठीं
मागेन हेंच श्रीहरिला
मातृभूमि उद्धरण्याला
स्वातंत्र्यरणीं लढण्याला
तव शुभ उदरीं, जन्म पुन्हां घेवोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १२ ll

मग यमदुतें, ओढुनि त्याला नेलें l व्हायाचें होउनि गेलें
परि त्या ठायीं, शब्द उमटती अजुनी l 'भेटेन नऊ महिन्यांनी'
खांबाला फुटतील फांटे
मृदुसुमसम होतिल कांटे
हिमगिरिला सागर भेटे
परि परवशता, सुखकर झाली नाहीं l दे कुंजविहारी ग्वाही ll १३ ll
— कुंजविहारी (हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी)पाठ्यपुस्तकात फक्त पांचच कडवी होती. देशाकरिता आनंदाने फाशी जाणार्‍या एका वीरयुवकाचे हे उद्गगार कवीने अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने चित्रित केले आहेत. आपल्यासारख्या व्यक्तीच्या मरणातूनच राष्ट्राचा पुनर्जन्म होत असतो अशी त्याची श्रद्धा आहे. पुन्हा याच भूमीत आणि याच आईच्या पोटी जन्म मिळावा हीच त्याची शेवटची इच्छा.

12 comments:

Praveen Khapre said...

atishay surekh chitran kelay salgarkaranni swatantryayodhhyanchya mantale........ its great

Gururaj Teli said...

Nice poem

Unknown said...

Heart touching and inspiring poem

pravin borade said...

Very nice

Unknown said...

Khupach sunder asa sangrah pahije

Unknown said...

अतिशय ह्रदयस्पर्शी कविता ...आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सूपूत्रा चा मातेचा निरोप घेताना चा हा संवाद मनाला भावनिक केल्या शिवाय राहत नाही ...अशी सुंदर रचना देणाऱ्या आदरणीय सलगरकर सरांना शतशः धन्यवाद !!!

Unknown said...

अति सुंदर

Unknown said...

खूपच सुंदर

Unknown said...

खूप छान...

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

धन्यवाद...सगळी कविता वाचायला मिळाली...
भारतमातेचे लाडके पुत्र...त्यांना नमन

Unknown said...

काळजाला हाथ घालणारी कविता😑😑