[वृत्त: वियद्गंगा]
किती उंचावरूने तूं । उडी ही टाकिसी खालींजणों व्योमांतुनी येसी । प्रपाता ! जासि पातालीं ll १ ll
कड्यांना लंघुनी मागें । चिपांना लोटिसी रागे;
शिरीं कोलांटुनी वेगे । शिळेचा फोडिसी मौली ! ll २ ll
नगाचा ऊर फोडोनी । पुढे येसी उफाळोनी;
उडे पाणी फवारोनी । दरीच्या सर्द भोंताली ll ३ ll
तुषारांचे हिरेमोत्यें । जणों तू फेंकिसी हाते;
खुशीचे दान कोणाते । मिळे ऐसे कधी काळी ? ll ४ ll
कुणी तांदूळ् वा कांडे । रुप्याचे भंगती हांडे
मण्यांचा की भुगा सांडे । कुणाच्या लूट ही भाली ? ll ५ ll
घळीमाझारिं घोटाले । वरी येऊनिं फेंसाळे,
कुठे खाचांत् रेंगाळे । करी पाणी अशी केली ll ६ ll
उभी ताठ्यांत् जी झाडे । तयांची मोडिसी हाडें;
कुशीं गेसी लव्हाळ्यांना । तयांचा तूं जणो वाली ! ll ७ ll
विजेचा जन्मदाता तूं । प्रकाशाचा निशीं हेतू;
तुला हा मानवी जंतू । म्हणोनी फार सांभाळी ! ll ८ ll
— भवानीशंकर श्रीधर पंडित
No comments:
Post a Comment