[वृत्त : वियद्गंगा]
तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला ।
हिऱ्यांचे तेज ही जैसे मिळावे गारगोटीला ॥
दिसावी पावलांखाली खड्यांना तारकाकांती ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ धृo ॥
घणाचे घाव घालावे गळावा घाम अंगीचा ।
यशोदेवी तयांसाठी करी घे हार पुष्पांचा ॥
विषारी तीक्ष्ण काट्याची तुझ्या स्पर्शे फुले व्हावी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ १ ॥
स्वसामर्थ्ये, स्वचारित्र्ये, तुवा हे दाविता राया ।
तरी ये निंदकांच्याही मुखी वाणी अहो या या ॥
मनीषा ही जरी ठेवी मनी या खूणगाठीशी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा यशश्री पायची दासी ॥ २ ॥
ग्रहांनी कुंडलीच्या त्या, फिरावे कोष्टकांमाजी ।
परी यत्नांसी जो राजी, ठरे तो सर्वदा गाजी ॥
स्मरोनी आत्मकर्तव्या, प्रयत्नांची करे राशी ।
ग्रहांचे साह्य त्या शूरा, यशश्री पायची दासी ॥ ३ ॥
— यशवंत
संकल्पना : श्री अजित गोखले
No comments:
Post a Comment