" चिमकुला बहु बालक हा असे !द्रुतविलंबित
बघुनियां सुख गे मज होतसे
चरण कोमल तांबुस हे किती !
वदन रम्य दिसे नयनांप्रती ll १ ll
मिटुनियां बहु घट्ट मुठी धरी,
चरण हालवितो वरच्यावरी
बघतसे टक लावुनियां किती
बघुनियां सुख होय मनाप्रती ll २ ll
किति शरीर तरी मृदु लागतें !
भय मला, जननी, बहु वाटतें
चिमकुला हसतो मज पाहुनी,
सवंगड्या, मज जाणसि कीं मनीं ? ll ३ ll
दिपतसे बघतांच उजेड हा,
मिटितसे नयनां, जननी पहा !
फिरविलें मुख कां ? जननी, अगे,
रडतसे, वरतींहि न हा बघे ! ll ४ ll
चिमकुल्या, छकुल्या, न रडें उगा,
धर करीं चिमणी अथवा फुगा
जवळ घेउनियां तुज बैसतें,
चिमकुल्या, कमती वद काय तें ll ५ ll
शिकविते तुज भूक रडावया ?
रडूं नको, तुज आणिन खावया
धर करीं बहु सुंदर बाहुली,
सजवुनी स्वकरें, बघ ! आणिली " ll ६ ll
" अजुनि हा, यमुने, बहु नेणता;
सुखद होय पुढें तुज वाढतां
अजुनि ह्या वदतां न मुळींच ये;
कळतसे न तुझें वदणें, सये ll ७ ll
अजुनि दांत न याप्रति खावया,
न समजे करिं वस्तुहि घ्यावया,
चिमकुला तुजला जरि वाटतो,
पुढतीं होय तुझ्यासम थोर तो " ll ८ ll
— मोरो गणेश लोंढे
No comments:
Post a Comment