रम्य ते बालपण!


श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर

balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

December 7, 2009

गवतफुला

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्रांना;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे

पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.

वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.

गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.

तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.

मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे.— इंदिरा संत
Mr. Unmesh Inamdar, Ms. Amita Karanth and श्रीयुत किरण राजे (बोरीवली) यांच्या मदतीने दुरुस्त केलेली सुधारीत आवृत्ती.

4 comments:

Unmesh Inamdar said...
This comment has been removed by the author.
Unmesh Inamdar said...

आपला हा ब्लॉग अतिशय सुंदर आहे. बालपणीच्या कितीतरी विसरलेल्या, अर्धवट आठवणार्‍या आणि आता आठवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कविता इथे मला सापडल्या; अणि खूप आनंद झाला. त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार.

वरील कवितेत माझ्या आठवणीप्रमाणे मधे व शेवटी आणखी दोन कडवी आहेत ती आपण दिलेल्या शेवटच्या कडव्यातील काही सुधारणांसह नम्रपणे सुचवू इच्छितो. आपण राग मानणार नाही अशी आशा आहे.

पराग पिवळे झगमगती या ऒळीनंतर

तळी पुन्हा अन गोजिरवाणी
लाल पाकळी फुलते रे,
उन्हामधे हे रंग पाहता
भान हरपुनी गेले रे.

पहाटवेळी आभाळ येते
लहान होउनि तुझ्याहुनी
तुला भरविते निळ्य़ा करांनी
दवमोत्यांची कणी कणी.

मलाहि वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे,
तुझ्या संगती सदा रहावे
विसरुनि शाळा घर सारे.

तुझी गोजिरी शिकून भाषा
गोष्टी तुजला सांगाव्या,
तुझे शिकावे खेळ आणखी
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे,
तुझे घालुनी रंगित कपडे
फूलपाखरा फसवावे.

Unmesh Inamdar said...

मृग या कवितेमध्ये शेवटचे एक कडवे आपण घातलेले नाही. मला आठवते ते असे.

गावानेच उंच केला
हात दैवी प्रसादास
भिजूनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस.

मला खात्री नाही पण मला असे वाटते की ही कविता गदिमांची नसून व्यंकटेश माडगूळकर यांची असावी.कृपया तपासून पहावे.

Suresh Shirodkar said...

@ Unmesh Inamdar,

"गवतफुला" या कवितेत चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या सारख्या दर्दी आणि जागरुक वाचकांची केवळ याच ब्लोगला नव्हे तर अखंड "मराठी कवितेला" नितांत गरज आहे; त्यामुळे राग मानून घ्यायचा प्रश्नच येत नाही.