A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

23 December 2025

भरत-भाव

करुनि वंदन जानकिनायका भरत भाव निरोपिन आयका
जननि टाकुनि रामपदीं निघे सुकृत तो मति हे समजोनि घे ॥१॥

[मालिनी]
भरत जबळि नाहीं, मातुलग्रामवासी;
भरतजननि धाडी, कानना राघवासी
दशरथ मृत झाला, राम जातां, वियोगें;
तृण बहुत दिसांचें, अग्निच्या जेविं योगें ॥२॥

मग भरत वसिष्टें आणिला जों अयोध्ये,
नगरि गतधवा ते, आणि निर्वीर्य योद्धे,
जन मृतसम देखे, हेतु कांहीं कळेना,
जननिकृतकुचेष्टा बुद्धितें आकळेना ॥३॥

[उपजाति]
वृत्तांत सांगे भरतासि माय, स्वानंद जीचा त्रिजगीं न माय
भेदूनि वक्ष:स्थळ शब्द तीचा, करी महाक्षोभ महा-मतीचा ॥४॥

जाळील तीतें निजदृष्टिपातें, पाहे असा, हालविताच पातें
म्हणे, "अहो पापिणि! पापरुपे! जळो तुझें तोंड जडस्वरुपें ! ॥५॥

जाळीन हें तोंडचि जाण आधीं, मुखें जया देसि अनंत आधी
न माय तूं वैरिण होसि साची, माझे मनीं भाव खरा असाची ! ॥६॥

केला तुवां देखत भर्तृघात; क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत;
शत्रुघ्न मी, लक्ष्मण राम जोडे, राजा तिजा, तीस अनर्थ जोडे ! ॥७॥

गिखिना प्रति राम रमापती दवडिल्यावरि मृत्यु – मुखीं पती
निजविला मज हे विधवा धरा म्हणसि भोग अयोग्य वसुंधरा ॥८॥

[भुजंगप्रयात]
वना धाडिलें जेधवां रामराया, तुवां हेतु केला स्वभर्ता मराया.
अहा ! रामसीता अशा दंपतीतें, वना धाडिलें, मारिलें कां पतीतें ? ॥९॥

[मालिनी]
नकळत पतिताचें खादलें अन्न ओकीं
तरि पतित नव्हे तो, पापरुपे ! अहो की;
म्हणुनि उदरिं तूझ्या देह हा जन्मला गे
त्यजिन तरि मला हें पाप तूझें न लागे !॥१०॥

हे अग्नितापित घृतांत तनू तळेना
प्रत्यक्ष तो कधिंहि पावक आतळेना
रामापराधिनि सुतास शिवेल कां जी
घे ब्राम्हणोत्तम न अंत्यज पात्र – कोजी ॥११॥

राजर्षि योगें निजर्मपूतें जीं कां स्वधर्मे बधिती रिपूतें
शरघें न तीं आतळतील मातें त्वद्रुर्भ – संभूत – नराध मातें ॥१२॥

मारील सद्य मज खायिन त्या विखातें
कीं पापियास निज पातक जेविं खातें
तूं पापिणी त्वरित जासिल सैरवासी
होसी सदा निरथ – दारुण लोकवासी ॥१३॥

[घनाक्षरी]
अहो कैकयी ! हें काय केले तुवां ? हाय ! हाय !
न म्हणवे तुज माय, जन्मोजन्मीं वैरिणी !
सर्व–जगदभिराम, वना धाडिला तो राम,
केले विख्यात कुनाम, कीं हे पतिमारिणी !
तुझ्या वधें न अधर्म, तुज मारावें हा धर्म;
परि निंदील हें कर्म, राम पापकारिणी. " ॥१४॥

नाहींतरी प्राण आज्य तुझें घालूनियां प्राज्य
जाळूनियां सामराज्य दाखवितों करणी ॥१५॥

[शालिनी]
धिक्कारुनी गोष्टि मातेसि सांगे, कौसल्येच्या ये गृहा सानुरागें;
त्यातें देखे जेधवां राममाय, श्रीरामाचा शोक लोकीं न माय. ॥१६॥

[रथोद्धता ]
मोकळा करुनि कंठ तेधवां, आठवूनि मनिं जानकीधवा
ते रडे, भरतही तसा रडे, जोंवरी नयन होति कोरडे ! ॥१७॥

[भुजंगप्रयात]
म्हणे, "वांसरा ! घात झाला असा रे ! तुझ्या माउलीचेच हे खेळ सारे !
वृथा धाडिला राम माझा वनासी; न देखों शके त्या जगज्जीवनासी.॥१८॥

अरे ! राघवें व्यापिले लोक सारे, तरी नावरे शोक माझा कसा रे ?
तृषाक्रांत डोळे घनश्याम रामा, पहायास रे ! सर्वलोकाभिरामा. ॥१९॥

[स्वागता]
जानकी जनकराजकुमारी, पाय कोमल जिचे, सुकुमारी
चालली जशि वना अनवाणी बोलली कटकटा जनवाणी. "॥२०॥

सुनु सूनहि वनाप्रति जाती आणि जे जित असेल कुजा ती
मानवी तनु पशूंत गणावी, ते शिळा परि सजीव म्हणावी ॥२१॥

[द्रुतविलंबित]
भरत शोक अनेक तिचे असे, परिसतां मग बोलत तो असे,
"जननि, गोष्टि समस्तहि हे खरी, परिस येविषयीं मम वैखरी. ॥२२॥

[उपजाति]
मी ब्रम्हहत्या – शतपाप लाहें, ठावें असे लेश जरीं मला हें
खङ्गें वसिष्ठासि अरुंधतीतें वधीं, जरी ठाउक हें मतीतें !" ॥२३॥

[भुजंगप्रयात]
म्हणे राममाता, "अरे वासरा ! मी, तुझा जाणतें प्रेम-उल्हास रामीं;
तुला रामसेवेविणें काम नाहीं, न राज्यादिकांची जया काम नाहीं. " ॥२४॥

[स्वागता]
तो वसिष्ठ वदला भरतातें, रामपाद – निजलाभ – रतातें
"पाळिं यावरि समस्त धरा हे, राजनीति करिं सावध राहें. " ॥२५॥

रायें तुतेंचि दिधलें स्व – नृपासना रे
संपूर्ण तूं जननिची करिं वासना रे
शब्दार्थ हे नकळती गुरु – लाधवाचे
साचे म्हणूनि पद आठवि राघवाचे ॥२६॥

घना० म्हणे भरत हा राम त्राहें त्राहें मेघश्याम
वसिष्ट हा गुरुनाम तोही मज कोपला ॥२७॥

अंतरले तुझे पाय तया राज्याचे उपाय
सांगे मज हाय हाय नव्हे गुरु आपला ॥२८॥

अग्नितुल्य वाटे राज्य मज जाळिल सामराज्य
वरी ऋषी घाली आज्य त्याणें जीव तापला ॥२९॥

दावीं सत्वर चरण किंवा स्वामी दे मरण
तुझ्या नामाचें स्मरण त्याचा भाव संपला ॥३०॥

स्मरोनि ऐसें रघुनंदनातें त्या राघवाच्या पदवंदनातें
जावें असा भाव धरुनि साच बोले वसिष्ठा प्रतिही तसाच ॥३१॥

राजाधिराज रघुराजचि एक जाणा
पाहों चला सकळ जाउनि त्या सुजाणा
आम्हीं समस्त जन किंकर राघवाचे
जें रामनाम जपतों अजि नित्य वाचे ॥३२॥

विना राक्षसी कैकयी काननातें चला सर्व पाहूं मृगांकाननातें
प्रयत्नेंचि घेऊनि येऊं गृहातें नयेतां समर्पू शरीरें स्वहातें ॥३३॥

येणार ते या अथवा न काही राहेन मी हे नघडेचि कांहीं
बोलोनियां स्पष्टचि चालिला हो शोकांतही घे प्रभुनाम – लाहो ॥३४॥

हा राम हा राम असेंचि वाचे चित्तांत पाय प्रभु – राघवाचे
त्यजी कुलाचार्यहि राम – वाटे कीं तो गुरु त्यास गुरु न वाटे ॥३५॥

येणार ते या अथवा न काहीं शब्दांत या अर्थ सखोल कांहीं
कीं जो गुरु अंतर राम – पायीं पाडी त्यजावा गुरु तो उपायी ॥३६॥

श्रीरामही टाकुनि राज्य मातें जो घे म्हणे त्या ऋषिसत्तमातें
गुरुत्व कैचें तरि मी उपेक्षा करीन त्याची न मला अपेक्षा ॥३७॥

या कारणें या अथवा न कांहीं राहेन मी हें न घडेचि कांहीं
ऐसी उपेक्षा वदनीं वदे तो श्लोकांत या व्यासचि भाव देतो ॥३८॥

नाहींतरी या अथवा न काहीं गुरुस बोलेल घडेल कांहीं
रामानिमित्तें गुरुही त्यजावा वाक्यांत भावार्थ असा भजावा ॥३९॥

रामानिमित्तें जननीस टांकी पाणी नपी राज्य नदी – तटाकीं
लंघूनियांही – गुरु – संगतीतें पावे अहो दे गुरु ज्या गतीतें ॥४०॥

गुरुविणें न घडे परमा गती गति शुकादि गुरुसचि मागति
परि गुरु करि अंतर राघवीं न गुरु तो ठक दांभिक लाघवी ॥४१॥

तो बाप जो राघवभक्ति दावी तसीच जी मायहि ते वदावी
जो राम दावी गुरु तोचि साच श्रुत्यर्थ इत्यर्थ असे असाच ॥४२॥

वसिष्ठ घे राज्य म्हणे नसाच परंतु भावार्थ नव्हे तसाच
त्याच्या परिक्षार्थचि बोलिला हो त्याहूनि आधीं मुनि चालिला हो ॥४३॥

आज्ञा गुरुची अवघे करीती सच्छिष्य ते लोक अलोकरीती
परंतु त्याच्या वचनें तयातें नटाकिती सत्पद – दातयातें ॥४४॥

राम तोचि गुरु भेद असेना भिन्न भाव तरि राम दिसेना
राम टांकि म्हणणेचि गुरुचा त्याग आत्म–सुख – कल्पतरुचा ॥४५॥

तूं टाकि माझ्या वचनेंचि मातें शब्दें अशा जो गुरुसत्तमातें
टाकील शिष्याधम तो गणावा टाकी न जो उत्तम जो म्हणावा ॥४६॥

राम नत्यजि तंईच गुरुतें न त्यजी स्व–सुखकल्पतरुतें
जो असें वचनही नमनीं तो श्रीगुरु न मनिंही नमनीं तो ॥४७॥

लंघूनि शब्दहि असा गुरु तो उपेक्षी
शिष्यासि त्या मग कसा गुरु तो अपेक्षी
जो रामनिष्ठ गुरु निष्ठचि निर्विकारें
सोडी वसिष्ठ भरतासि तयाप्रकारें ॥४८॥

म्हणे परिक्षार्थचि टाकि मातें तसा म्हणे टाकि रघूत्तमातें
उल्लंघितां शब्दचि इष्ट वाटे म्हणोनि लागे ऋषिवर्य वाटे ॥४९॥

प्रकरणीं पुढिल्या गुरुराज तो भरत संगतिनेंच विराजतो
जरि पथीं गुरु होय समागमीं तरिच राम मिळे निगमागमीं ॥५०॥

वसिष्ठ तो आणि समस्त माया रामार्थ टाकूनि समग्र माया
सेना प्रजा सर्वहि त्याचवेळे जाती जसे लंघिति सिंधु – वेळे ॥५१॥

पायीं निघे भरत सानुज रामवाटे
रामाविणें इतर इष्ट न काम वाटे
माथां जटा मुकुट वल्कल नेसला हो
श्रीराम वेष वदनीं प्रभुनाम – लाहो ॥५२॥

राम – वल्कल – जटादिक रीती वेष तो उभय बंधु करीती
राम सानुज तसें भरतातें देखती सकळ रामरतातें ॥५३॥

तों भेटला गुहकनाम किरात पाटे
श्रीराम भक्त परमाप्त तयास वाटे
गंगातटीं रघुपती शयनास दावी
ते भक्ति काय म्हणुनी मुखिं हो वदावी ॥५४॥

दर्भ निर्मित तया शयनातें देखतां उदक ये नयनातें
भूतळीं भरत घालुनि घे हो त्या स्थळींहुनि न चित्त निघे हो ॥५५॥

राम – वृत्त रघुवंश – वरातें सर्व वर्णुनि गुहाख्य – किरातें
लंघुनी सुरनदी भरतातें ते ससैन्य रघुराज – रतातें ॥५६॥

ब्रम्हा रमा वंदिति नित्य ज्यातें त्या राघवाच्या चरणांबुजातें
पाहूं बरें हे भरता असोसी वियोग तो प्राणवियोग सोसी ॥५७॥

कैकेयीच्या दुष्ट भावें जळाला इच्छी रामाच्या पदाच्या जळाला
तों स्वामीच्या देखिलें आश्रमातें कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥५८॥

पाद – चिन्हित – तये वसुधेतें देखतां तृषित जेविं सुधेतें
रामचंद्र – पद – सारस – मुद्रा याढवी भरत – सौख्य – समुद्रा ॥५९॥

घालूनि घे भरत देखुनि त्या रजातें
शत्रुघ्नही अनुसरोनि निजायजातें
चित्त स्मरे प्रभुचिया पद – नीरजातें
प्रेम – प्रवाह नयनीं सुखनीर जातें ॥६०॥

तनुवरी गुटियाच उभारती कवि मुखें किति वर्णिल भारती
भरत येरितिने अजि लोळला प्रभु – पदाब्ज – रजीं बहु घोळला ॥६१॥

हा राम राम रघुनंदन हेंचि वाचे
चित्तांत ते चरण दीसति राघवाचे
ते रेणु हे मुकुट मंडण जे शिवाचे
ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ॥६२॥

भरत पदरजीं त्या घोळला दीर्घकाळ
त्रिभुवनिंहि सुखाचा होय तेव्हां सुकाळ
नमिळति पदरेणू जे विरंच्यादिकांहीं
सुलभ मज म्हणे हें भाग्य माझेंचि कांहीं ॥६३॥

देखोनि राघव – पदाब्ज – रजास वाटे
लोटांगणीं गडबडी सुख फार वाटे
आनंद – नीरत्दृदयीं नयनां बुजाचें
चित्तांत राम–पद घे रज अंबुज्याचें ॥६४॥

बाम – अंकगत भूमि – कुमारी बाम बाहु सुरता सुकुमारी
वल्कलांवर जटा अभिरामा देखतो भरत त्या रघुरामा ॥६५॥

दूर्वा–दल:श्यामल दीप्ती देहीं सेवीं पदें लक्ष्मण तो विदेही
गंगातटीं सेवित मंदवातें देखे अशा श्री रघुपुंगवातें ॥६६॥

देखोनि ऐसें रघुनंदनातें धावे त्वरेनें पदवंदनातें
अलभ्य जो हर्ष सुरादिकांहीं तो होय त्यामाजिच शोक कांहीं ॥६७॥

रडे स्फुंदस्फुंदे शिरी पादपद्मा धरी सद्म मानीतसे नित्य पद्मा
बळें क्षेम दे त्यास वोढोनि राम स्व-भक्त प्रिय स्वामी विश्वाभिराम ॥६८॥

मांडिये उपरि बैसविला हो अश्रुनीर पुसि दे सुख लाहो
वासरा न रड सांग सुवार्ता शब्द हा निववि दुःख दवार्ता ॥६९॥

तों देखिला गुरु वशिष्ठ तयासी वंदी
ब्रह्मण्यदेव जडला चरणारविंदी
तो माऊल्या तिघिहि सत्वर पावल्या हो
भेटोनियां तिघिही सत्वर सेविल्या हो ॥७०॥

पिता सुखी कीं म्हणतांचि रामा रडोनि त्या सांगति सूपरामा
रडे अहो रामहि लोकरीती स्त्रिया पुन्हा शोक महा करीती ॥७१॥

सपिंडीक्रिया राम गंगे–तटाकीं करी आणि तो पिंड गंगेंत टाकी
रडे लोक दृष्टीस शोक श्रमातें प्रभू दाउनी ये पुन्हा आश्रमातें ॥७२॥

तों वदे भरत गोष्टि मनाची प्रार्थना बहुत आगमनाची
मांडिली परि न राघव मानी देखतां सुखरांस विमानीं ॥७३॥

झणि फिरे स्वपुरी प्रति राम हा म्हणुनि आधि मनीं अमरा महा
भरतशब्द तदर्थ नये मना पुरवणें प्रभुला सुरकामना ॥७४॥

आज्ञा पित्याची मज मोडवेना वत्सा तुझी गोष्टही तोडवेना
घालूं नको बा मज संकटांत, नको पडों बा सहसा हटांत ॥७५॥

अशीआयके जेधवां रामवाणी मुखश्री करी बंधु तो दीनवाणी
म्हणे तात आज्ञा मृगांकानना रे मला सांग जाईन मी कानना रे ॥७६॥

बापा ऐसें वर्ततां तो विशेषें आज्ञा – भंग प्राप्त दोघां अशेषें
एवं राज्यातें तुवां रे भजावें ताताज्ञेनें कानना म्याच जावें ॥७७॥

असी आयके जेधवां रामवाचा करी कर्म जें बंध तोडी भवाचा
पुढें पांचवा भाव त्यामाजि वाचा स्मरा आयका बंप तोडा भवाचा ॥७८॥

येना असें भरत देखुनि रामराया
गंगातटीं रचुनि दर्भ बसे मराया
पाहे वसिष्ठ–मुनि – वकत्र – सरोरु हातें
श्रीराम आणि खुण दाखवि हो स्वहातें ॥७९॥

कीं सांग गुह्य अवतार – चरित्र याला
जें तारितें चहुयुगांत जगतत्रयाला
बोले वसिष्ट मग सन्निध जाउनीयां
कां प्राण टाकिसी म्हणे समजावुनीयां ॥८०॥

हा राम मारील दशाननासी
यालागिं जातो प्रभू काननासी
नको निवारुं भरता तयाला
ब्रम्हादिकांच्या पद – दातयाला ॥८१॥

येणार मागुति चतुर्दश – वत्सरांतीं
राहो वनांत तितुके दिन आणि राती
आत्माच तो तुज वियोग तयासि नाहीं
येऊनियां करिल जे तय कामना ही ॥८२॥

हें आयकोनि जरि शोकहि दूर केला
प्रत्यक्ष दर्शन सुखास बहू भुकेला
तेंव्हा उठोनि भरते पद वंदनातें
केलें दुरुनि म्हणतो रघु नंदनातें ॥८३॥

देखोनियां गमन – निग्रह राघवाचा
बोले उभा भरत निश्वय रुप वाचा
वर्षे चतुर्दश वरीच धरीन देहा
त्यानंतरें त्यजिन यास निरोप दे हा ॥८४॥

वर्षे द्विसप्त भरि काल समाप्त झाला
त्यानंतरें अजि तुझ्या चरणांबुज्याला
स्पर्शे शिरे न जरी देह तयाच वारीं
यातें त्यजीनचि विरिंचि जरी निवारी ॥८५॥

वर्षे चतुर्दशहि रक्षीन शासनातें
अंगिकारीन न बसेन नृपासनातें
सिंहासनावरि तुझ्या पद पादुका मी
पूजीन जो तव – पदांबुज – लाभ – कामीं ॥८६॥

पादुका जडित आणुनि हातें रामचंद्र चरणांबुरुहातें
लावुनी निजशिरीं भरतानें वंदिल्या रघुवरांघ्रि – रतानें ॥८७॥

भरत – जननि जागी होय राम प्रतापें
विकळ रघुपतीच्या द्रोह पापानुतापें
रडत म्हणतसे मी पापिणी रामराया
न धरिन तनु आज्ञा येस्थळीं दे मराया ॥८८॥

रघुपति तिस बोले टाकि हा शोक माते
इतुकिहि मम माया जीत ही सृष्टि माते
सकळहि सुरकार्या म्याचि हा हेतु केला
अमर दशमुखाच्या मृत्युतें हो भुकेला ॥८९॥

झणी हो कैकेई बुडविशि तुं शोकांत त्दृदया
तुझी माझे ठायीं सुमति भरताहुनि सुदया
तुतें मी कौसल्येहुनि अधिक माते समजतों
तुयां ऐसें केलें म्हणउनि न वाटेच मज तों ॥९०॥

म्हणे मंथरा राम राज्यार्थ सिद्धी करी ती तुझा हो पती हे प्रसिद्धी
तुवां इष्ट मानूनि त्या भारतीतें दिला टाकुनी कंठिंचा हार तीतें ॥९१॥

शरीरीं तुझ्या यापरी देवराया निघोनी करी येरितीतें भ्रमाया
तुझा यांत अन्याय कांहींच नाहीं करी मोह माया विरिंच्यादिकांहीं ॥९२॥

करुनि मागुति बुद्धि सकोमला क्षणभरी विसरुंचि नको मला
तरि असा न पडे भ्रम मागुती जितचि पावशि हो परमा गती ॥९३॥

भरत भाव असा बरवा मनें सुरस सेवुनि सादर वामनें
अजि समर्पियला पदवंदनीं रचुनि पद्यपदें रघुनंदनीं ॥९४॥

हरिगुणीं ग्रथिल्या यमकां पहा धरिल थोरभयें यम कांव हा
हरिगुणाविण हो यमकां करी करि न दंड धरी यम कांकरी ॥९५॥

राम तुष्ट असिया यमकां हो आणिखी नियम संयम कां हो
वामनें हरिगुणीं रसनेला अर्पितां अनुभवीं रस नेला ॥९६॥



– वामन पंडित

बाळाजी आणि कंपनीने १८९१ साली प्रकाशित केलेल्या 'वामनी ग्रंथ भाग तिसरा' या संग्रहानुसार 'भरत-भाव' चे ९७ श्र्लोक आहेत. पण 'मराठी सातवे पुस्तक' मध्ये फक्त १८ श्र्लोकांची संहिता आहे.

8 December 2025

धबधबा

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालिली बळें |
धबाबां लोटल्या धारा | धबाबां तोये आदळे || १||

गर्जतो मेघ तो सिंधू | ध्वनीकल्होळ उठीला |
कड्यासी आदळे धारा | वात आवर्त होतसे ||२||

तुषार उठती रेणु | दुसरें रज मातलें |
वातमिश्रित ते रेणु | सीतमिश्रित धुकटें ||३||

दराच तुटला मोठा | झाडखंडे परोपरीं |
निबीड दाटली छाया | त्यामधें वोघ वाहती ||४||

गर्जती श्वापदें पक्षी | नाना स्वरें भयंकरें |
गडद होतसे रात्रीं | ध्वनिकल्लोळ उठती ||५||

कर्दमु निवडेना तो | मनसी सांकडें पडे |
विशाळ लोटली धारा | तीखाले रम्य विवरें ||६||

विश्रांती वाटते येथे | जावया पुण्य पाहिजे |
कथा निरुपणे चर्चा | सार्थके काळ जातसे ||७||


— रामदास

17 November 2025

थांब पावसा ऊन पडूं दे

उघड पावसा ऊन पडूं दे
उडूं बागडूं हंसूं खेळूं दे !

कळी उमलुं दे फुला फुलूं दे,
पानें वार्‍यामध्यें डुलूं दे
टपटप खालीं थेंब पडूं दे
तालावर त्या मला नाचुं दे ।। १ ।।

पाय उठवुं दे वाळूवरती
समुद्र झाला ! आली भरती,
आभाळ पडे खोल खालती
डोकावुनि ढग आंत पाहुं दे ! ।। २ ।।

उंच चालल्या घारी वरतीं
बगळे रांगा धरुनी उडती;
ढगांत भरभर रंग बदलती
पाठशिवणिचा खेळ बघू दे ! ।। ३ ।।

चिमणी ओले पंख सुकविते
घरट्यामधुनी पिलू पहातें
मुंगी रांगेमधें धांवते
साखर-खाऊ तिला घालुं दे ! ।। ४ ।।

जाळीं कोळ्यांचीं बघ भिजती
हिर्‍यासारखे थेंब चमकती;
रंग त्यांवरी सुंदर खुलती
थांब पावसा हार करुं दे ! ।। ५ ।।

बसे फुलावर फूलपांखरुं
मला सांगतें मौज चल करुं
थांब पावसा ऊन पडूं दे
गातां गातां मला खेळूं दे ! ।। ६ ।।


— श्रीधर बाळकृष्ण रानडे

सांग ना आई

दिवसभर पावसात असून सांग ना आई,
झाडाला खोकला कसा होत नाही?

दिवसभर पावसात खेळून सांग ना आई,
वारा कसा जराही दमत नाही?

रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई,
बेडकाचा आवाज कसा बसत नाही?

रात्रभर जागून सुद्धा सांग ना आई,
चांदोबा झोपी कसा जात नाही?

दिवसभर काम करून सांग ना आई,
तुला मुळी थकवा कसा येत नाही?



– मंगेश पाडगांवकर

माज्या आज्यानं पंज्यानं

माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज इनल्या येसणी,
तुझ्या मातले गोरपे
तवा करीती पेरणी.

माझ्या आज्यानं पंज्यानं
किती इनल्या गोफणी,
तवा नेमानं चालते
तुझ्या रानाची राखणी.

माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज वळली चर्‍हाटं,
पाट भरून वाह्याची
तुझ्या रानातली मोटं.

माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज इनल्या रं बाजा,
येतो दमून रेघाळ्या
पाट टेकवितो राज्या.

माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज वळल्यात काण्या,
तुझ्या दुभत्या म्हशीला
रोज बांधया दावण्या.

माझ्या आज्यानं पंज्यानं
पोरं घातली साळंला,
कष्टकऱ्याच्या जिण्याला
दिस सोनियाचा आला.


– शंकर अभिमान कसबे

10 November 2025

गवताचे फूल

साजिरे गोजिरे, गवताचे फूल
इवल्याशा झुळकीचे, नाचरे मुल

लपत छपत,
हसत खेळत
वाटसरुंना
पाडिते भूल
साजिरे गोजिरे, गवताचे फूल

ऊन झलोनी,
दव पिवोनी
उजाड रानात
घालिते शीळ
साजिरे गोजिरे, गवताचे फूल

कोणा ते रुचले,
कोणा ते बोचले
सर्वां हाकारुन
मांडिते खेळ
साजिरे गोजिरे, गवताचे फूल

साजिरे गोजिरे, गवताचे फूल
इवल्याशा झुळकीचे नाचरे मुल


अनुवाद – लक्ष्मीनारायण बोल्ली
(मूळ तेलुगु कवी – कोंडल वेंकटरावुगारु)


लक्ष्मीनारायण बोल्ली (१५ एप्रिल, १९४४ – २३ फेब्रुवारी, २०१८)
लक्ष्मीनारायण बोल्ली हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. बोल्ली यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून स्वतंत्र कविता व ललित लेखन केले असून ‘तेलुगु’ भाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणले आहे.

30 October 2025

भ्रांत तुम्हां कां पडे?

हिंदपुत्रांनो, स्वतांला लेखिता कां बापडे ? भ्रांत तुम्हां कां पडे ?
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फांकडे. भ्रांत तुम्हां कां पडे ? ।। धृ।।

हिंदभू वीरप्रसू जी वैभवाला पावली, कां अतां खालावली?
धन्यता द्याया कुशीला अंग झाडा, व्हा खडे ! ।।१।।

पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हां बोलून कां ? झिंगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहींकडे, द्या कालवैशिष्टयाकडे ! ।।२।।

जीर्ण त्या कैवल्यकुंडी घाण देखा माजली, डुंबतां कां त्या जली ?
ओज पूर्वीचें न तेथें, तीर्थ तें आतां सडे. ।।३।।

ज्ञानगंगा वाहते पूर्वेकडे, घाला उड्या, अंतरी मारा बुड्या;
संपली पूर्वाग्रहांची रात्र, झालें तांबडे. ।।४।।

मोकळी ही खा हवा, चैतन्य अंगी खेळवा, आत्मशुद्धी मेळवा,
मुंडिती जे फक्त डोके तेच गोटे कोरडें ! ।।५।।

श्रेष्ठता जन्मेंच का ये ? जातिदर्पाला त्यजा, हिंदुतेला या भजा,
नेमका कां भेद भासे ? साम्य सारें कां दडे ? ।।६।।

ब्राम्हणत्वाची बढाई लाज ही वेदास हो ! षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. ।।७।।

कर्मयोगी एक व्हा रे, नायकी वा पायकी, दावुनी घ्या लायकी;
खानदानीतील नादाना, करीं घे फावडे. ।।८।।

जो करी कर्तव्य, घामेजूनि खाई भाकरी, धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी ! न गीतावाक्य हें खोटें पडे. ।।९।।

लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर, हिंदवी व्हा चाकर;
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडें. ।।१०।।

एकनाथाची कशी आम्हांस होई विस्मृती, जो दया मानी स्मृती,
जो कडे घे अंत्यजाचें पोर तान्हे शेंबडें ! ।।११।।

संकराची बंडखोरीची उभारा या ध्वजा ! उन्नती स्वातंत्र्यजा !
राजकी वा गावकी – सारिं झुगारा जोखडें ! ।।१२।।

भारताच्या राउळीं बत्तीस कोटी देवता जागत्या, या पावतां
मुक्तिसंगें स्वर्ग लाभे– कोण पाही वांकडें ? ।।१३।।

पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी, ईश्वराला लाजवी,
चूड घ्या अन्‌ चेतवा हें रुढ धर्माचे मढें ! ।।१४।।

काय भिक्षेची प्रतिष्ठा ? चैन चाले आयती, मुख्य दीक्षा काय ती ?
कष्टती ते खस्त होती, पोळ साई-जोगडे. ।।१५।।

'बुत्‌ शिकन्‌’ व्हा ! 'बुत्फरोशी’ कासया बालाग्रही ? भक्त व्हा सत्याग्रही !
मानिती वेड्यास साधु स्वार्थसाधू भाबडे. ।।१६।।

आचरा शांतिक्षमा, निंदोत ते जे निंदिती, संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममंत्राने झडे. ।।१७।।

ही अहिंसा प्रेमनीती वाटतां नामर्दुमी, क्षात्रता दावा तुम्ही,
सोडवा क्षेत्रीं लढूनी राज्यसत्तेचे लढे. ।।१८।।

दृष्टि राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी, उन्नतीची घे हमी;
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे. ।।१९।।

बंधुला हाणावयाला पत्करुनी दास्यही, शत्रु आणावा गृही
दोष हा राष्ट्रघ्न अद्यापिही देशाला नडे. ।।२०।।

तो असो जैचंद वा राघो भरारी वा कुणी, तो स्वराज्याचा खुनी !
हांकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे ! ।।२१।।

बंधुलाही गांजुनी जो शत्रुगेहीं मोकली, मूळ साक्षात् तो कली !
ना गणा त्याची प्रतिष्ठा, तें विषारी रोपडें ! ।।२२।।

इच्छितां स्वातंत्र्य, द्या स्वातंत्र्य हें अन्यांसही, का न कोणा आस ही ?
कां गुलामांचे तुम्हां सुल्तान होणे आवडे ? ।।२३।।

'जो बचेंगे तो लढेंगे’ ! शूर दत्ताजी वदे, स्वामिकार्यी जीव दे,
शौर्य हें दावाल का कल्ले मिशांचे आकडे ? ।।२४।।

काळ राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा, अंध ऐशाराम कां ?
स्वर्ग जिंका वा मही ! ऐका रणींचे चौघडे. ।।२५।।

कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला !
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सांपडे. ।।२६।।

जा गिरीच्या पैल जा ! समृद्धि नांदे वैभवें, तेथ सौंदर्यासवें;
मोकळीकीच्या मुदें उत्कर्ष तेथें बागडे ! ।।२७।।

०००

हिंदपुत्रांनों, हिताचें तें तुम्ही हातीं धरा, एरव्ही माफी करा.
शब्द माझे बोबडे अन्‌ ज्ञान माझें तोकडें, चित्त माझे भाबडें. ।।२८।।


– माधव ज्यूलियन ऊर्फ डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन


टीप: मुळात एकोणतीस कडव्यांच्या या कवितेतील छोटे-मोठे वेचे पाठ्यपुस्तकांत सापडतात. 'उषा' या संग्रहातील संहिता 'गज्जलांजली'तल्या संहितेपेक्षा अनेक ओळींत वेगळी आहे.

28 October 2025

आला माझ्या घरी

शेजीबाईचा कोंबडा
आला माझ्या दारी.
घालीन कोंडा
पाजीन पाणी.

शेजीबाईची बकरी
आली माझ्या दारी.
घालीन पाला
पाजीन पाणी.

शेजीबाईचा बैल
आला माझ्या दारी.
घालीन चारा
पाजीन पाणी.

शेजीबाईचा बाळ
आला माझ्या घरी.
देईन खाऊ
पाजीन पाणी.

– अज्ञात

27 October 2025

आमची कपिला

किती दिसते ही कपिला गोजिरवाणी
मी देतो चारापाणी
किति मऊ मऊ हें अंग लागतें हाता
मारी ना कोणा लाथा
हीं शिंगे सुंदर दोन
हे मोठे मोठे कान
शेपटी किती ही छान
जरि काळी ही, दूध पांढरे देई
लागतें गोड तें ताई!


– ग. म. वैद्य

झुले बाई झुला

झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला.

हिरव्या हिरव्या फांदीला ग,
झुला माझा बांधिला ग,
आता होता भुईवर, भेटे आभाळाला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

उंच उंच जाते मी ग,
झुल्यासंगे गाते मी ग,
गाता गाता वाऱ्याने या झोका मला दिला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

जिथे जिथे झुला झुले
तिथे तिथे सारी फुले.
झुल्यासंगे झुला, बाई, फुलासंगे फुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

झुला झाला अनावर,
जीव माझा खालीवर.
माया याची माझ्यावर, सांभाळतो मला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.

झुला माझा पाखरू ग,
वाऱ्याचे हे लेकरू ग.
एक झोका मला आणि एक झोका तुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.


— मंगेश पाडगांवकर

25 October 2025

बहुमोल जीवन

मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
फुले निखळुनी पडती, तरिही झाड सारखे झडते का?

भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला
गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला
काटे देते म्हणुनी लतिका मातीवरती चिडते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?

वसंत येतो, निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला
पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला
देह जळाला म्हणुनी धरणी एकसारखी रडते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?

रोज नभाचे रंग बदलती, घन दाटुनि येतात तरी
निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी
अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?

सुखदुःखाची ऊनसावली येते, जाते, राग नको
संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको
बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?


— रमण रणदिवे

17 October 2025

दिवाळीचा सण

आली दिपवाळी, गड्यांनो, आली दिपवाळी || ध्रु o ||

रोज रोज शाळा, पुरे तो आला कंटाळा
चार दिवस आतां, मनाला कसली ना चिंता
उडूं बागडूं जशीं पाखरें स्वैर अंतराळी || १ ||

मौजेनें न्हाऊं, कपाळीं लाल गंध लावूं,
अलंकार लेवूं, करोनी थाटमाट जेवूं,
लाडू, करंज्या, शंकरपाळी खाऊं कडबोळीं || २ ||

खेळगडी नाना, जमवुनि खेळू खेळांना
बांधुनिया किल्ले, करुं या त्यांवरती हल्ले
भावी पुरुषार्थाचे कित्ते गिरवूं या काळीं || ३ ||

नळे, चंद्रज्योती, फटाके, फुलबाज्या, वाती
दारुकाम सोडूं, धडाधड बार नवे काढूं
उडवूं बंदुक लटोपटीची घालुनियां गोळी || ४ ||

खेळाचा धंदा, येतसे भरती आनंदा
फारच गमतीचे, खरोखर दिवस दिवाळीचे
तुच्छ त्यांपुढें कडी, आंगठ्या, कंठी, भिकबाळी || ५ ||


— माधवानुज

प्रमाण

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १ ll

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll २ ll

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ३ ll

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ४ ll

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ५ ll

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ६ ll

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ७ ll

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ८ ll

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्रय तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ९ ll

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १० ll

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती 'होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll ११ ll

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १२ ll

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १३ ll

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १४ ll

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १५ ll

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्टचित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १६ ll

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १७ ll

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १८ ll

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll १९ ll

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ll २० ll


— कृष्णाजी नारायण आठल्ये

ती शाळा

चावडीच्या पाठीमागे । जुना सरकारी वाडा ।
अर्ध्या पडक्या भिंतींचा । थर पांढरा केवढा

पटांगणाचा सोबती । उभा जुनाट पिंपळ ।
अजूनही येते कानी । त्याची मंद सळसळ

खिळखिळे झाले गज । अशा खिडक्या लांबट ।
छपराच्या कौलातून । ऊन हळू डोकावत

खाली धुळीची जमीन । राठ टेबल समोर ।
किलबिल थांबे क्षण । छडी नाचता ज्यावर

चिंचा पेन्सिलींचा सौदा । अंकगणिताचे ताळे ।
नवा शर्ट दहा बुक्के । सारे गुपचूप चाले

तुळशीशी जाता उन्हे । घणघण वाजणारी ।
उंच आढ्याशी टांगली । घंटा घोडीच्या शेजारी

शाळा सुटे पाटी फुटे । घरा वळती पाउले ।
वना निघाली मेंढरे । वाट त्यातून न मिळे

अशी माझी उंच शाळा । होती पिंपळा जवळी ।
मन भिरभिरे तीत । कधी बनून पाकोळी


– वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

15 October 2025

सुभद्रेचा शोक

सुभद्रेते न धरवे धीर । शरीर टाकिले पृथ्वीवर ।
माझा अभिमन्य सुकुमार । दावा एकदा पाहीन मी ॥ १ ॥

हे अभिमन्या कमळ-लोचना । हे सौभद्रा चंद्रवदना ।
हे कोमलांगा मधुरभाषणा । ये धावूनि मज भेटे ॥ २॥

हे घनःश्यामत्णा । हे अभिमन्या प्रति-अर्जुना ।
हे महावीरा सुहांस्य-वदना । ये धावूनि मज भेटे ॥ ३॥

द्रौपदी म्हणे, अभिमन्या । हे वत्सा सद्गुण-निधाना ।
हे तरुणा तुझी अंगना । उत्तरा आता करील काय ॥ ४॥

हे किशोर-वया परम उदारा । समर-धीरा प्रताप-शूरा ।
पांडव-कुल-दीपका सुंदरा । केली त्वरा सर्वां आधी ॥ ५॥

उत्तरेच्या गळा मिठी घालिती । सुभद्रा द्रौपदी शोक करिती ।
ते देखोनि पार्थ श्रीपती । शोकार्णवीं बुडाले ॥ ६ ॥

बोले सुभद्रा वेल्हाळ । इतुके वीर असता सबळ ।
सापडला व्यूहामाजी बाळ । पाठी कोणी न राखेची ॥ ७॥

विकळ पडता माझे किंशोर । जयद्रथे दिधला लत्ता-प्रहार ।
धिक्‌ गांडीव धिक्‌ तूणीर । धिक्‌ यदू-वीर पार्थ पै ॥ ८ ॥


– श्रीधरस्वामी

14 October 2025

पवित्र मजला

पवित्र मजला जळजळीत ती
भूक श्रमांतुन पोसवणारी
पवित्र मजला दगडी निद्रा
दगडाची दुलई करणारी

पवित्र मज यंत्राची धडधड
समाजहृदयातिल हे ठोके
पवित्र मजला सत्यासाठी
धडपडणारे स्वतंत्र डोकें

पवित्र सुखदु:खाची गाणी
वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी
श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन

पवित्र मज पोलादी ठोसा
अन्यायाच्या छातीवरचा
पवित्र मजला आणिक गहिवर
माणुसकीचा माणुसकीचा


– विंदा करंदीकर

सोनूताई

कन्या झाली म्हणून,
नको करु हेळसांड
गोपूबाळाच्या शेजारी,
सोनूताईचा पाट मांड.

लेकाच्या परिस,
लेक ती काय उणी ?
हिरा नव्हे हिरकणी
माझी सोनूताई.

लाडकी सोनुताई
लाड करू मी कशाचा ?
चंद्रमा आकाशीचा
मागतसे.

आंबा मोहरला
मोहरला पानोपानी
बाबांच्या कडे तान्ही
सोनुताई.

माझ्या ग अंगणात
शेजीचे खेळे बाळ
त्याच्यासंगे शोभे
सोनुताई लडिवाळ.

बापाची लाडकी,
बाप म्हणे कुठे गेली ?
हासत दारी आली
सोनूताई.

कानांतले डूल
हालती लुटुलुटू
बोलते चुटुचुटू
सोनूताई.

साखळ्या वाळ्यांचा
नाद येतो माझ्या कानी
आली खेळूनिया तान्ही
सोनूताई.


– साने गुरूजी

13 October 2025

आभाळमाया

पावसा रे, पावसा रे,
मला पावसाचे ढग बनू दे.
डोंगर, दरी आणि शेतात,
मला खूप कोसळू दे.

शेतकरीबाबा, शेतकरीबाबा,
मला बी म्हणून पेरून दे.
शेत खूप पिकून पिकून,
तुम्हांला बरकत होऊ दे.

पणती गं, पणती गं,
मला दिवा होऊन जळू दे.
गरिबांच्या झोपडीत,
उजेड मला नेऊ दे.

पक्ष्या रे, पक्ष्या रे,
मला चोच आणि पंख फुटू दे.
तोंडात फळे घेऊन जाऊन,
भुकेकंगालांना वाटू दे.

परी गं, परी गं,
मला बागेत येऊ दे.
आनंदाने नाचगाण्यासाठी,
साऱ्यांना आभाळमाया मिळू दे.


– विलास सिंदगीकर

सहा ऋतू

झुळझुळ वारे वाहु लागले,
लाल पालवी तरूंवरी.
फळाफुलांनी लवल्या वेली,
आंबेराई मोहरली.
आभाळाचे निळेनिळेपण,
कुहू कुहू कोकीळा करी.
आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी !

ग्रीष्म पातला, सूर्य तापला,
ऊन कडक जिकडे तिकडे.
खूप तापते जमीन, तिजवर
जागोजागी पडती तडे.
गपचीप झाली सर्व पाखरे
छाये खाली लपती गुरे
गरम झळ्यांच्या ऐन दुपारी ऊन्हात खेळू नका बरे !

वारे सुटले, मेघ उसळले,
गडगडती ते आभाळी !
वीज कडकडे लखलख करूनी,
सर सर सर वर्षा आली.
सुटे मातीचा वास चहुंकडे,
हिरवेहिरवे गार दिसे
कागद-होड्या सोडायची पावसात किती मौज असे !

शरद येई, अन् मेघ पळाले
गुबगुबीत जणु पळति ससे !
कुरणे हिरवीगार चहुंकडे,
हिरवे हिरवे मळे तसे.
हिरवी झाडे, हिरवी शेते,
तुडुंब भरले तळे निळे.
चांदण्यात अन बागडण्याची हौस सारखी मनी उसळे

हेमंताचे दिवस पातले,
भरे हुडहुडी अंगात.
शेतकऱ्याची गोफण फिरते
गरगर भरल्या शेतात.
हवेहवेसे ऊन वाटते,
अंगणात आजी बसते
शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते !

उदासवाणा शिशिर ऋतू ये,
पाने पिवळी पडतात.
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे
झर झर झर झर गळतात
झडून पाने झाडे सारी
केविलवाणी दिसतात.
दिसें तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास !

सहा ऋतूंचे चाक फिरतसे,
शिशिर ऋतूही जाईल हां
वसंत सांगे ‘मीही येतो'
हळूच मागोमाग पाहा !


– अज्ञात

देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना ।
सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना ॥

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना ॥

जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना ॥

जाळुनी वैषम्य सारे वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची मूर्त होवो कल्पना
मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना ॥


– वसंत बापट

9 October 2025

लवकुशाचा पाळणा




मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा ।
मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई ।
लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले ।
वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥

किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे
मग जाऊ या आपण सारी मिळुनी । बघण्यास अयोध्या भुवनी ।
अळी मळी गुपचिळी बरं का । सांगाल कुणाल जर का ।
कुस्करीन गाल हे बरं का । अन् इवलाले ओठ असे झाकुनी ।
ठेवीन मुके घेवोनी । मुके घेवोनी ॥२॥

मृत्यूत कोणी हासे

मृत्युत कोणि हासे, मृत्युस कोणि हसतो
कोणि हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो.

अश्रूत कोणि बुडतो, लपवीत कोणि अश्रू.
सोयीनुसार अपुल्या कोणि सुरात रडतो.

जनता धरी न पोटी साक्षात जनार्दनाला
जनतेस कोणि पोटी पचवून हार घेतो.

विजनी कुणी सुखी अन भरल्या घरात कोणि;
वनवास भोगणारा, दुःखात शांत गातो.

कोणी जुने-पुराणे विसरे न पीळ धागे,
कोणी तुटून पडला, सगळ्याच पार जातो.

कोणास मेघपंक्‍ती दाटून गच्च येतां
लागे तहान, कोणी नाचून तृप्त होतो.

कोणी दिव्याशिवाय होतो स्वतःच दीप
कोणी दिव्यावरी अन टाकून झेप देतो.


— आरती प्रभू

8 October 2025

आटपाट नगरात नांदे राजाची गं राणी

"आटपाट नगरात नांदे राजाची गं राणी नाव तिचे मैना राणी" ही खूप जुनी कविता आहे. बालभारतीच्या एका वाचकाने त्याच्या आईच्या आवाजात ती रेकॉर्ड केली आहे (जेवढी आठवली तेवढी).

 कविता ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

'Kiyu's world' यांचे आभार.

2 October 2025

सोहळा

नभ झाकळलेले वरती
मन धूसर आणि ढगाळ
गिरिशिखरांवरती धुंद
ओथंबुन वर्षाकाळ

सळसळत्या हिरव्या लाटा
बेहोष पिउनिया वारा
सर झिमझिमणारी मंद
मोत्यांचा उघळित चारा

लावण्य पोपटी गर्द
रसरसले रानोमाळ
अन्‌ कडेकपारींमधुनी
इवलाले शुभ्र खळाळ

मेघांचे काजळ काळे
घालुनिया डोळे निवले
हा मुग्ध सोहळा हिरवा
मौनाला अंकुर फुटले


— वृंदा लिमये

30 September 2025

निळा पारवा

वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा. 

डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.

–अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.

जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकविली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.

पुन्हा दचकला निळा पारवा
मनात भरले वारे–
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…

तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक, झगमगणारे.

पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
–आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.



— इंदिरा संत

21 August 2025

माझ्या या ओटीवर

माझ्या या ओटीवर
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
टपटप दाणे टिपून जातो — टिपून जातो.
होला येतो नि पारवा येतो,
हू हू घू घू करून जातो — करून जातो
मैना येते नि पोपट येतो,
मंजूळ मंजूळ बोलून जातो — बोलून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थय थय थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.

माझ्या या हौदावर
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
बुडबुड गंगे न्हाऊन जातो — न्हाऊन जातो.
होला येतो नि पारवा येतो,
थेंबथेंब पाणी पिऊन जातो — पिऊन जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पाणी उडवून खेळून जातो — खेळून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थुई थुई थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.

माझ्या या बागेत
कोण कोण येते — कोण कोण येते ?
चिमणी येते नि कावळा येतो,
इकडे तिकडे उडून जातो — उडून जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पेरु, डाळिंब खाऊन जातो — खाऊन जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
आंब्याच्या डहाळीवर झुलून जाते — झुलून जाते.
कोकीळ येतो नि बुलबुल येतो,
गोड गोड गाणी गाऊन जातो — गाऊन जातो.



— ताराबाई मोडक

काय झालं सोनुलीला (अंगाई)

काय झालं सोनुलीला?
रडूं कशाचं डोळ्यांत?
पोरक्या वासरावाणी
कशापायीं हा आकांत?

डोळ्यांतल्या आंसवांच्या
पाणीदारशा मोत्यांनीं
डंवरलें काहून ग !
लाल गुलाब हे दोन्ही

रडूं नको ग अं हं ! मीं
देतें बाईला भुल्जाई
हांसतील कशा मग
ओठांवर जाईजुई

जांभया कां देशी अशा
नीज आली कां मैनेला ?
झोप झोप छबुकडे !
मीच थोपटतें तुला

जाय उडून रे ! हाड्या
नको करुं कावकाव
नीजते ही पांघरुनी
लुगड्याचा माझ्या शेव

गुंगी जाईल निघून
हड हड दूर आकू
डोळा लागला बाईचा
वायकारणी नको भुंकूं

ये ग ये ग हम्‍मा ये ग
दुदू दे ग तान्‍हुलीला
राघो ! पळत ये तूंहि
घाल वारा साळुंकीला

पाय वजे वजे टाका
गोड गोड ओव्या म्हणा
चारा घेऊन तुम्ही या
टांगा मैनाइ ! पाळणा

चिड्या रंगीत तावाच्या
द्या ग ! त्यावर लावून
गुलाबाच्या पाकळ्यांचं
करा छान अंथरुण

मीच निजवितें त्यांत
माझ्या जिवाची ही राणी
हिंदवतें अन् बाईला
गात गात गोड गाणीं


– वि. भि. कोलते

5 July 2025

या काळाच्या भाळावरती

या काळाच्या भाळावरती,
तेजाचा तू लाव टिळा
आणि फुलू दे तुझ्या श्रमातुन
मानवतेचा इथे मळा ॥धृ॥

नित्य नवी तू पाही स्वप्ने
साकाराया यत्न करी
सूर्यफुलांच्या फुलवी बागा
उजेड यावा घरोघरी
वाहत येवोत समृद्धीच्या,
नद्याच सगळ्या खळाखळा ॥१॥

काट्यांमधल्या वाटांमधुनि
चालत जा तू पुढे पुढे
या वाटा मग अलगद नेतील
पाऊस भरल्या नभाकडे
झळा उन्हाच्या सरुन जातील,
नाचत येईल पाणकळा ॥२॥

अंधाराला तुडवित जाऊन
घेऊन ये तू नवी पहाट
कणाकणाला उजेड देऊन
उजळ धरेचे दिव्य ललाट
डोंगर सागर फत्तर यांना,
सुवर्णसुंदर देई कळा ॥३॥

उंच आभाळी घेऊन झेपा
काढ शोधुनि नव्या दिशा
नवीन वारे घेऊन ये तू
घेऊन ये तू नव्या उषा.
करणीमधुनी तुझ्या गाऊ दे,
धरणीवरल्या शिळा शिळा ॥४॥


— उत्तम कोळगावकर