A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

30 October 2025

भ्रांत तुम्हां कां पडे?

हिंदपुत्रांनो, स्वतांला लेखिता कां बापडे ? भ्रांत तुम्हां कां पडे ?
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फांकडे. भ्रांत तुम्हां कां पडे ? ।। धृ।।

हिंदभू वीरप्रसू जी वैभवाला पावली, कां अतां खालावली?
धन्यता द्याया कुशीला अंग झाडा, व्हा खडे ! ।।१।।

पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हां बोलून कां ? झिंगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहींकडे, द्या कालवैशिष्टयाकडे ! ।।२।।

जीर्ण त्या कैवल्यकुंडी घाण देखा माजली, डुंबतां कां त्या जली ?
ओज पूर्वीचें न तेथें, तीर्थ तें आतां सडे. ।।३।।

ज्ञानगंगा वाहते पूर्वेकडे, घाला उड्या, अंतरी मारा बुड्या;
संपली पूर्वाग्रहांची रात्र, झालें तांबडे. ।।४।।

मोकळी ही खा हवा, चैतन्य अंगी खेळवा, आत्मशुद्धी मेळवा,
मुंडिती जे फक्त डोके तेच गोटे कोरडें ! ।।५।।

श्रेष्ठता जन्मेंच का ये ? जातिदर्पाला त्यजा, हिंदुतेला या भजा,
नेमका कां भेद भासे ? साम्य सारें कां दडे ? ।।६।।

ब्राम्हणत्वाची बढाई लाज ही वेदास हो ! षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. ।।७।।

कर्मयोगी एक व्हा रे, नायकी वा पायकी, दावुनी घ्या लायकी;
खानदानीतील नादाना, करीं घे फावडे. ।।८।।

जो करी कर्तव्य, घामेजूनि खाई भाकरी, धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी ! न गीतावाक्य हें खोटें पडे. ।।९।।

लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर, हिंदवी व्हा चाकर;
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडें. ।।१०।।

एकनाथाची कशी आम्हांस होई विस्मृती, जो दया मानी स्मृती,
जो कडे घे अंत्यजाचें पोर तान्हे शेंबडें ! ।।११।।

संकराची बंडखोरीची उभारा या ध्वजा ! उन्नती स्वातंत्र्यजा !
राजकी वा गावकी – सारिं झुगारा जोखडें ! ।।१२।।

भारताच्या राउळीं बत्तीस कोटी देवता जागत्या, या पावतां
मुक्तिसंगें स्वर्ग लाभे– कोण पाही वांकडें ? ।।१३।।

पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी, ईश्वराला लाजवी,
चूड घ्या अन्‌ चेतवा हें रुढ धर्माचे मढें ! ।।१४।।

काय भिक्षेची प्रतिष्ठा ? चैन चाले आयती, मुख्य दीक्षा काय ती ?
कष्टती ते खस्त होती, पोळ साई-जोगडे. ।।१५।।

'बुत्‌ शिकन्‌’ व्हा ! 'बुत्फरोशी’ कासया बालाग्रही ? भक्त व्हा सत्याग्रही !
मानिती वेड्यास साधु स्वार्थसाधू भाबडे. ।।१६।।

आचरा शांतिक्षमा, निंदोत ते जे निंदिती, संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममंत्राने झडे. ।।१७।।

ही अहिंसा प्रेमनीती वाटतां नामर्दुमी, क्षात्रता दावा तुम्ही,
सोडवा क्षेत्रीं लढूनी राज्यसत्तेचे लढे. ।।१८।।

दृष्टि राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी, उन्नतीची घे हमी;
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे. ।।१९।।

बंधुला हाणावयाला पत्करुनी दास्यही, शत्रु आणावा गृही
दोष हा राष्ट्रघ्न अद्यापिही देशाला नडे. ।।२०।।

तो असो जैचंद वा राघो भरारी वा कुणी, तो स्वराज्याचा खुनी !
हांकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे ! ।।२१।।

बंधुलाही गांजुनी जो शत्रुगेहीं मोकली, मूळ साक्षात् तो कली !
ना गणा त्याची प्रतिष्ठा, तें विषारी रोपडें ! ।।२२।।

इच्छितां स्वातंत्र्य, द्या स्वातंत्र्य हें अन्यांसही, का न कोणा आस ही ?
कां गुलामांचे तुम्हां सुल्तान होणे आवडे ? ।।२३।।

'जो बचेंगे तो लढेंगे’ ! शूर दत्ताजी वदे, स्वामिकार्यी जीव दे,
शौर्य हें दावाल का कल्ले मिशांचे आकडे ? ।।२४।।

काळ राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा, अंध ऐशाराम कां ?
स्वर्ग जिंका वा मही ! ऐका रणींचे चौघडे. ।।२५।।

कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला !
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सांपडे. ।।२६।।

जा गिरीच्या पैल जा ! समृद्धि नांदे वैभवें, तेथ सौंदर्यासवें;
मोकळीकीच्या मुदें उत्कर्ष तेथें बागडे ! ।।२७।।

०००

हिंदपुत्रांनों, हिताचें तें तुम्ही हातीं धरा, एरव्ही माफी करा.
शब्द माझे बोबडे अन्‌ ज्ञान माझें तोकडें, चित्त माझे भाबडें. ।।२८।।


– माधव ज्यूलियन ऊर्फ डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन


टीप: मुळात एकोणतीस कडव्यांच्या या कवितेतील छोटे-मोठे वेचे पाठ्यपुस्तकांत सापडतात. 'उषा' या संग्रहातील संहिता 'गज्जलांजली'तल्या संहितेपेक्षा अनेक ओळींत वेगळी आहे.

No comments: