A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

21 January 2013

जिऊ

नमुनेदार धनाजी धनीण त्याची बघोनि राजाऊ
ज्याला त्याला वाटे, क्षणभरि त्यांच्याकडे चला जाऊं.

तीं एकजीव दोघें असुनि असे त्यांस दूसरा जीव,
कन्या 'जिऊ' म्हणोनी; तत्प्रेमालय-रसाल राजीव !

गोधूमवर्ण तीचा हरणाच्या पाडसापरी डोळे,
स्नेहाळ वदन नामी, प्रसन्न विधुबिंब जेविं वाटोळे.

तो केशपाश काळा, भाळावरि लांब आडवें कुंकू,
जणुं म्हणति शब्द तीचे आम्ही कोकिलरवासही जिंकू.

घेती पाटिल साड्या हौसेच्या रेशमी किनारीच्या,
ऐनेदार खडीच्या झळकति चोळ्या तया कुमारीच्या.

साधींच कंकणें तीं, कदा तदाकार नागमोडीचे,
शोभति शुद्ध रुप्याचे तयांवरिल गोल गोठ जोडीचे.


येतां सुदिन सणाचा पुतळ्यांची माळ ती गळां घाली;
तेव्हां शृंगाराच्या माहित नव्हत्या नव्या तऱ्हां, चाली.

जाई आईसंगें मळ्यांत किंवा खळ्यांत ही कन्या
साधी निसर्गसुंदर दिसे तदा देवता जणों वन्या !

अपवादास्पद जितकी रूपवती गुणवतीहि ती तितकी,
बहुधा गुणरूपांचें व्यस्तचि दिसतें प्रमाण मूर्तिंत कीं !

कांतीव सूत ऐशा येत तिला शेवया वळायाला—
ह्या फेण्या ! म्हणुनि तिच्या लोकभ्रम कुराड्यांवरी झाला.

लावोनि गुळवणी वा पुरण करी सार ती मजेदार;
ऐसें कीं तें सेवुनि हुशार व्हावा मनुष्य बेजार.

गुलगुलित मलमलीपरि करी झराझर कशा पुरणपोळ्या,
काढुनि सुंदर कशिदा तिनें शिवाव्याहि रेखिल्या चोळ्या

ती निंदणी, खुरपणी, जाणे बारीक काम शेतीचें,
केवळ राजाऊचें वळण जसें उतरलें तसें तीचें.


— चंद्रशेखर (चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे)


टीप : पाठ्यपुस्तकात पहिली दोन कडवी समाविष्ट नाहीत.

20 December 2012

पाखरबोली

चिमणीला बोलले कावळोबा काळे
चिऊताई, आपली हुशारयत बाळे

खूप खूप त्यांना कळतंय जग
आपणच अडाणी राहिलोत बघ

नुसती कावकाव, चिवचिव करून
डोळ्यातलं पाणी ठेवलंय धरून

शेणाचं, मेणाचं घरपण जपत
सगळं आयुष्य काढलं खपत

माणसासारखा तुझ्याही मुलाने
कालच मोबाईल घेतलाय म्हणे

माझंही काळं उजळू लागलंय
संगणकावरती जाऊन आलंय

पंखात वारं भरलंय गडे
पिढीच्या पिढी गेलीय पुढे

कशाला आपण ओढायचे पाय?
घेतील भरारी खातील साय

तरण्याताठ्या चोचीला चिऊ
चांगले दिवस लागलेत येऊ

तरीही उगाच वाटतंय बाई
राहतील ना शब्द 'बाबा अन आई'


— कल्याण इनामदार

19 December 2012

माझें घड्याळ













ड्याळ माझें नवें असे;
सुंदर दिसतें पहा कसें !
दादाचें तर जुनें मुळीं;
झुरळांची वाटे खोली !
ड्याळ माझें लखलखतें;
सांगा कोणाचें आवडतें ?

'उगाच वटवट बोलुं नये;
कटकट कोणा करू नये'
– तूंच नाहिं कां म्हणत असें ?
किटकिट त्याची सदा असे.
दिवसां किटकिट,
रात्रीं किटकिट,
ड्याळ माझें गुणी मुळीं
कटकट कधिं ना करी खुळी !

गडबड करितां मार मिळे,
हेंहि न त्याला कसें कळे ?
रात्रीं निजण्याच्या वेळीं
दादा त्याचा कान पिळी;
कुरकुरतें, परि ना खळते,
रागानें चिडूनी जातें;
झोंप लागते दादाला,
तें नच खपतें पण त्याला;
पहाट होतां गुरगुरतें,
दादाला जागें करतें.
दादा उठतो;
चिमटा घेतो;
तेव्हां मग तें गप्पा बसें;
ड्याळ माझें कधि न असें !

रात्रीं नशिबीं कोनाडें;
दिवसा करितें पुढेंपुढें.
उगाच बसतें ऎटित
हालवीत अपुले हात;
लहानमोठे हात तसे
पाहुन येई मला हसें.
लाज तयाला ना त्याची;
खोड कोठची जायाची ?
हात असे फिरवुन आधीं
मोडुन घेतें कधींकधीं !
वैद्य आणुनी,
हात जोडुनी,
दादा देतो पुन्हां जरी,
फिरवित बसतें हात तरी !
ड्याळ माझें परी पहा;
चाळा त्याला मुळी न हा.

ड्याळ दादाचें, आई,
सर्वांना करितें घाई.
खेळ रंगला असे जरी
मधेंच दादा पुरा करी.
गोष्ट न राजाची सरली;
बाबा म्हणती, 'छे, झाली.'
ड्याळ असलें
कुणास सुचलें ?
ड्याळ माझें गुणी परी,
किती वाजले पहा तरी !
सकाळचे अवघे सात;
म्हणती खेळा बागेंत.



— विंदा करंदीकर

14 December 2012

शेवटचा लाडू

सुटी संपली नी चाललों गांवाहुन दूर;
आणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.
ताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं
मी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;
आणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,
नकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll

तेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,
आज उरे मागें तयांतिल आवडता सरता.
वाटतसे घाई कशाला मी इतकी केली ?
नाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.
खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,
आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.
तूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;
तूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll

छे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.
छे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.
उजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;
उजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.
उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं
मिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ll३ll


– विंदा करंदीकर

13 December 2012

पाऊस

थबथबली, ^^^^^^^^^ ओथंबुनी खाली आली,
जलदाली ^^^^^^^^^^ मज दिसली सायंकाळी.
रंगहि ते ^^^^^^^^^^^ नच येती वर्णायातें !
सुंदरता ^^^^^^^^^^^ मम त्यांची भुलवी चित्ता ll १ ll

व्योमपटीं ^^^^^^^^^ जलदांची झाली दाटी;
कृष्ण कुणी ^^^^^^^^ काजळिच्या शिखरावाणी.
नील कुणी ^^^^^^^^^ इंद्रमण्यांच्या कांतिहुनी,
गोकर्णी ^^^^^^^^^^^ मिश्र जांभळे तसे कुणी; ll २ ll

तेजांत ^^^^^^^^^^^^ धुमाचे उठती झोत,
चकमकती ^^^^^^^^^ पांडुरही त्यापरिस किती !
जणुं ठेवी ^^^^^^^^^^ माल भरुनि वर्षादेवी
आणुनिया ^^^^^^^^^ दिगंतराहुनि या ठाया ! ll ३ ll

कोठारी ^^^^^^^^^^^^ यावरला दिसतो न परी.
पाहुनि तें ^^^^^^^^^^^ मग मारुत शिरतो तेथें;
न्याहळुनी ^^^^^^^^^^ नाहिं बघत दुसरें कोणी
मग हातें ^^^^^^^^^^^ अस्ताव्यस्त करी त्यातें.
मधु मोतीं ^^^^^^^^^^ भूवरतीं भरभर ओती ! ll ४ ll


— बालकवी

पाऊस खुळा

पाऊस खुळा, किति पाऊस खुळा !
शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ll धृ.ll

नाचे किती वेड्यापरी,
बडबडे कांहींतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ll १ll

दीनवाणी वेलीबाई,
पांघराया नाहीं कांहीं
काय करू, उघडा हा राहे छकुला ! ll २ll

उचलून आणूं काय,
पुसूं डोकें, अंग, पाय ?
काकडून गेला किती माझा माकुला ! ll ३ll

निजवूं या गादिवर,
पांघरुण घालूं वर,
देऊं काय, सांग आई, आणुन तुला ? ll ४ll

काय– "नको तोडूं फूल,
वेल– पावसाचें मूल ?
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला ?" ll ५ll

आणि, येऊं मी घरांत ?
भिजूं नको अंगणांत ?"
नको आई– ! चमकेल मीही आपुला ! ll ६ll

मज वेडा म्हणतील ?
फूल शहाणें होईल ?
मग वेडी म्हणतील सगळे तुला ! ll ७ll


गिरीश

1 December 2012

माझी शाळा

वृत्त: शिखरिणी

तुझें जेव्हां जेव्हां सहज मजला दर्शन घडे
स्मृतींचे पूर्वींच्या फलक पुढतीं राहति खडे
हृदयी भारावोनी गुणगुणत मी त्यांत रमतों,
तरंगूनी भावें विनत हृदयें तूज नमतों ll १ll

किती होता झा उगम अगदीं सान, नगरीं
जणू रानातील स्फटिकधवला निर्मळ झरी
अतां विस्तारें या मन कुतुकुनी येथ खिळतें
नदीच्या सौंदर्ये अतुल सुख नेत्रांस मिळतें ll२ll

तुझीं बाळें, तूझे गुरुवर, तुझे सेवक मला
सदा पूज्य; प्रेमें तूजवर असे जीव जडला
तुझ्या उत्कर्षातें श्रवुनि हृदया येई भरतें
तुझ्या त्यांच्या गावें सतत पुरुषार्थास गमतें ll ३ll

गुरुचें तूं माझ्या असशी मधुर स्वप्न, सुभगे !
मन:सौंदर्याचा सुखमधुर कीं ताजच बघे
कणांतूनी तूझ्या अतुल दिसते वृत्ती विमला
गमे ठायीं ठायीं गुरुहृदयिंचा भाव रमला ll ४ll

तुला होवो वा न स्मरण मम, माते परि मनीं
स्मृती माझ्यासंगें मधुर तव मी नेइन जनीं
तुझी थोर सर्वां पटवुन सदा देइन मुखें
तवशिर्वादानें मिळतिल मला आंतरसुखें ll ५ll



गिरीश (शंकर केशव कानेटकर)

29 November 2012

सकाळ

ये अवखळ पोरीसमान आज सकाळ,
तोडीत गळ्यातिल सोन्याची फुलमाळ;
नादात वाजवित रुमझुम अपुले चाळ,
घरट्यांतुनि उडवी खगांस हीच खट्याll १ll
करि आनंदाचे मोरपीस घेवोनी,
गुदगुल्या करी मज गालावरि फिरवोनी;
गुणगुणत स्वतःशी वारा अधिरे गाणे,
अन फुगडी घाली घालित मजसि उखाणे ll २ll

हे ऊन केशरी लोळण घेई अंकी,
लुसलुशित कोवळी निर्मळ बाळतनू कि;
तृणपर्णी हसते दंव मिचकावित डोळे,
भिजविते वसन मम लावुनिया कर ओले ll ३ll
तरुवेलींवरती फुलला सुमसंभार,
लडिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार;
मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी,
मखमलिचा परकर आज ल्यावया काढी ll ४ll

घेऊन ओढणी जरतारी सुकुमार,
मज खुणाविते, 'ये बनुनी अवखळ पोर';
अन मलाहि वाटे मुक्त सोडुनी केश,
लेऊन परीसम हलका निळसर वेष ll ५ll
होऊन तरल या वाऱ्यासम धावावे,
सोनेरी असल्या उन्हात मिसळुनि जावे;
गुदगुल्या कराव्या मूर्त बनुनि आनंद,
गुणगुणत बसावे स्व:शीच स्वच्छंद ll ६ll

सुमनापरि निर्मळ हसुनि जगा हसवावे,
अन विहंग बनुनी आकाशी विहरावे;
या लीन तृणाला दंव बनुनी नटवावे,
अन माझ्यातुनि मी निसटुनि सकाळ व्हावे ll ७ ll


— पद्मावती विष्णू गोळे

28 November 2012

हा देश माझा

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे ll धृ ll

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ll १ ll

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे ll २ ll

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ll ३ ll
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!"


— सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)