A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

15 April 2021

पाहुणा गोजिरा

आज ये अंगणा,
पाहुणा गोजिरा
ये घरा आमुच्या, सोयरा साजिरा ॥

वाजवा नौबती,
ये सखा सोबती,
खेळवा संगती, हा जरा लाजरा ॥

कोवळे देहुडे,
सावळे रूपडे
पोपटी अंगडे, शोभते सुंदरा ॥

हा वसंतासवें,
सृष्टीला हासवे,
पालवे, बोलवे, सानुल्या पाखरां ॥

श्रावणीं न्हातसे,
आश्विनीं गातसे,
साउली देतसे, भूमिच्या लेकरां ॥

बासरी ऐकतो,
चांदणे झोकतो,
नाचतो, डोलतो, झोंबतो अंबरा ॥

अंगारेखांतुनी,
पर्णशाखांतुनी,
वाहतो जीवनीं, अमृताचा झरा ॥

गीत गाता मुखी,
नाचवा पालखी,
विश्व व्हाया सुखी, या नव्या जागरा ॥

सूर्य देवो, द्धुती
चंद्र देवो द्रुती,
छत्रछायाकृती, मित्र आला घरा ॥



— वसंत बापट






10 April 2021

मला व्हायचंय अंतराळवीर

मला व्हायचंय
अंतराळवीर
संचाराला
मी अधीर
सुसज्ज एक
अंतराळयान
त्यामधून करीन
वर उड्डाण
तारे वारे
वीज ढग
अद्भुतरम्य
पाहीन जग. 
पहिला मुक्काम
चंद्रावर
मग स्वारी
शुक्रावर
मारुतीसारखीच
अनावर
झेप पुढे तर
– सूर्यावर
संकटांशी
दोन हात
जिद्दीने त्यांवर
करीन मात
नवे शोध
नवे ज्ञान
या जगाची
वाढवीन शान
मला व्हायचंय
अंतराळवीर
संचाराला
मी अधीर



— वृंदा लिमये

9 April 2021

उगवला नारायण

उगवला नारायण आधी आला माज्या दारी
दहिभाताची न्याहरी मग पिरथी धुंडी सारी
उगवला नारायण केळीच्या गं कोक्यातून
धुंडितो गं अमृतबाळ बाई फिरतो मळ्यातून
उगवला नारायण अंगणात प्रकाशला
हळदी-कुंकवाचा वटा माज्या शालूचा माखला
उगवला नारायण लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा
उगवला नारायण चढे झाडा-झुडांवरी
तेज पडे चुड्यांवरी
उगवला नारायण अगनीचा ग पुडका
आत मोत्याचा सडका
उगवला नारायण सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया
उगवला नारायण पसरलं पिवळं ऊन
बाई हसलं हिरवं रान
उगवला नारायण तिरिप पिवळी छान
हसे मखमल रानोरान
उगवला नारायण "आता काय मागू त्याला ? "
सावळे ग मैनाबाई "औख माग कुंकवाला "


वाङमयरुपाने आजही अस्तित्वात असलेल्या अनेक लोकगीतांपैकी हे एक प्राचीन ओवीबद्ध लोकगीत आहे. या काव्याचा रचयिता कोण, याचे नेमके उत्तर देता येणार नाही.

11 March 2021

बाळराज


आकाशात तारे त्यांचे ओठ का हालती
संगीत गाणी गात तान्हेबाळा
काजवे फुलले फुलले लाखलाख
पहाया श्रीमुख राजसाचे
थुई थुई उडे कां ग कारंजे उसळे
तुझ्यामुळे उचंबळे तान्हेबाळा
पाखरे उडती फुलतात फुले
उठतात मुलें उजाडता
पेरा झाला रानातून मोड काढी वर मान
तसं हसे माझं तान्हं पाळण्यात
तान्हीयाचे दात जशा मोतीयांच्या ओळी
हासता पडे खळी गोड गाली
माळ्याला ताकीद येसबंदाच्या रोपाची
तान्ह्याला झाली दृष्ट सभेमधल्या लोकांची
आंथरुण केले जाई मोगऱ्याचे
सख्या गोजिऱ्याचे अंग मऊ
शाळेच्या पंतोजींना देऊ करावी खारीक
बाळ लिहाया शिकूं दे नीट अक्षर बारीक
हाती दूधभात वर पेरते साखर
तुझे जेवण प्रकार तान्हेबाळा

10 March 2021

ओळखा, कोण ?


हिरवं अंग, लाल चोच
गळ्यात माझ्या काळा गोफ
खातो डाळ, पेरूची फोड
बोलतो विठ्ठ् विठ्ठ् गोड.
ओळखा, कोण ?
सांगा पट् पट् !
—तू तर आमचा
लाडका पोपट !
निळे पंख, लाल डोळे
छाती काढून ऐटीत चाले
गुटर्रगूंS गुटर्रगूंS
कोण करतं ? सांगा बघू !
—ते तर कबूतर
घुमतंय उंच छपरावर !

उंचाडी मान फत्ताडे पाय
वाकडी पाठ डुगूडुगू जाय
तुडवीत जातो वाळवंट.
कोण ते ? सांगा बघू !
—उंट, उंट !

अंगावर पट्टे
कान छोटे छोटे
काटकुळे पाय
लांबुटकी मान
मी तर खातो
शेंड्याचं पान.
ओळखा, कोण ?
हरलात साफ ?
अहो, मी तर
—जिराफ, जिराफ !


— सरिता पदकी

6 March 2021

अखंड

अखंड - १


दृढ मनी धरी सद्विवेकास l
तेच संतानास ll सुख देई ll १ ll

जगहितासाठी सत्याने वर्तती l
हित ते करीती ll स्वतःचेही ll २ ll

आपहितासाठी मूढा नाडू जाता l
त्याने तसे होता ll मग कसे ? ll ३ ll

सद्विवेकाने तुम्ही करा न्याय l
नसे पुढे भय ll जोती म्हणे ll ४ ll



— महात्मा जोतिबा फुले

कणभर तीळाची मणभर करामत

वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !

तीळ चालला भरभर,
थांबत नाही कुठे पळभर !
"तिळा, तिळा, कसली रे गडबड ? "
"थांबायला वेळ नाही,
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड ! "
"ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा ! "

"बघा तरी थाट ! सोडा माझी वाट ! "
"बघू या गंमत, करू या जंमत !
चला रे जाऊ यांच्याबरोबर."
तीळ चालला भरभर, वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात रिकामी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
ताईने टाकला तीळ परातीत,
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरुन !

पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही, हुय नाही, हासे फसफसा !
पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय !
अरे, पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी, पांढरा हलवा कुठून आला ?
"वाटण्या फुटाण्या, शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला !"



— लीलावती भागवत

अखंड

अखंड - २

सत्याविण नाहीं धर्म तो रोकडा  l
जनांशीं वांकडा  l  मतभेद  ll १ ll

सत्य सोडूं जातां वादामध्यें पडे  l
बुद्वीस वांकडे   l  जन्मभर  ll २ ll

सत्य तोच धर्म करावा कायम  l
मानवा आराम  l  सर्व ठायीं  ll ३ ll

मानवाचा धर्म सत्य हीच नीती  l
बाकीची कुनीती   l  जोती म्हणे  ll ४ ll




— महात्मा जोतीराव फुले (जोतीराव गोविंदराव फुले)

5 March 2021

अखंड

अखंड - ३

ईशें केलें नाहीं तुजसाठीं सर्व l
करूं नको गर्व ll प्राण्यांमध्यें ll १ ll

देह देऊनीयां बुद्धिमान केला l
धनीपणा दिला ll सर्वांमध्यें ll  ll

जगाच्या कल्याणा देह कष्टवावा l
कारणीं लावावा ll सत्यासाठीं ll  ll

अशा वर्तनानें जन्माचें सार्थक l
संतोषी निर्मीक ll जोती म्हणे ll  ll


— जोतिराव गोविंद फुले

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)