A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

30 January 2022

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी !

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी !



— बा. सी. मर्ढेकर

अक्कू बक्कू

आमच्या घरात मांजरे येतात
त्यांना छुत छुत करायचे नसते
अक्कू त्यांना फिस फिस करते
बक्कू पुढ्यात दूध ठेवते.

आमच्या अंगणात चिमण्या कावळे
त्यांना हुश हुश करायचे नसते
अक्कू टोपलीत तांदूळ आणते
बक्कू मुठीने फेकत बसते.

आमच्या फाटकात कुत्री येतात
त्यांना हड हड करायचे नसते
अक्कू त्यांना यू यू म्हणते
बक्कू भाकर आणून देते.

आमच्या कुंपणाशी गायी येतात
त्यांना हैक हैक करायचे नसते
अक्कू त्यांना गोंजारत राहते
बक्कू आणून चारा देते.

आमच्या कपाटात झुरळे दिसतात
त्यांना मात्र हाकलायचे असते
अक्कू झाडू आणून देते
बक्कू त्यांना पळवून लावते



— इंदिरा संत

कोणाचे ग कोणाचे ?

कोणाचे ग कोणाचे ?
सुंदर डोळे कोणाचे ?
त्या पाण्यातील माशाचे,
की माझ्या बाळाचे ? ll १ ll

कोणाचे ग कोणाचे ?
लाल गाल ग कोणाचे ?
झाडावरच्या गुलाबाचे,
की माझ्या बाळाचे ? ll २ ll

कोणाचे ग कोणाचे ?
गोड बोल ग कोणाचे ?
त्या गाणाऱ्या मैनेचे,
की माझ्या बाळाचे ? ll ३ ll

कोणाचे ग कोणाचे ?
रूप गोजिरे कोणाचे ?
आकाशातील चंद्राचे,
की माझ्या बाळाचे ? ll ४ ll



— आशा गवाणकर

29 January 2022

सृष्टीची करमणुकीची घटना

होती सृष्टी कुठे उजेड अथवा अंधार होता कुठे
होता मात्र तदा जगज्जनक तो, हा काळ होता कुठे
कोणी, कांही, कुठे, कधीही नव्हते, तेंव्हा जगन्नायक
ईच्छा साधन घेऊनि बनविता झाला महापुस्तक II १ II

कोरे पुस्तक निर्मिले प्रथम ते आकाश ज्या बोलती
नाना तारकपुंज त्यात लिहिले, त्यांची न कोणा मिती
तेथे काढियली यथाक्रम तरु, पक्षी, पशु माणसे
होवो हे म्हणताच ते उमटले जागी जसेच्या तसे II २ II

झाले पुस्तक पूर्ण विश्व म्हणतो ज्याला इथे आपण
वाचाया बसला प्रभू उलटी तो पाने स्वयें वाचून
त्याने आजवरी किती उलटलि पाने तया ठाऊक
जाणे तोच पुढिल उरली पाने किती आणिक II ३ II

जन्मापासून पाहिली वरिवरि तेवीस पाने पुरी
कोणा माहित आणखी कितीतरी पाहीन ह्या भूवरी
दृष्टीदेखत आज पान सरले, आले नवे बाहिर
जाणू काय अम्ही शुभाशुभ किती पाहिलं तो यावर II ४ II



— अज्ञात

संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai

28 January 2022

तारकांचे गाणें

कुणि नाहीं ग, कुणि नाहीं आम्हांला पाहत बाई
शांति दाटली चोहिंकडे, या ग आतां पुढें पुढें
लाजत लाजत
हळूंच हांसत
खेळ गडे, खेळूं कांहीं, कोणीही पाहत नाहीं !
सुंदरतेला नटवून, कोमलतेला खुलवून,
प्रेमाच्या वसतीकरितां जगदंतर फुलवूं आतां.
दिव्य सुरांनीं
गीतें गाउनि
विश्वाला निजवायाला वाऱ्याचा बनवूं झोला
फेकुनि द्या इकडे तिकडे थोडेसे दंवबिंदु गडे,
या निर्मल अवकाशांत प्रेमाचें पेरूं शेत
मंद यामिनी
सवें गुंगुनी
झोप लागली जगताला या ग आतां खेळुं चला
सरितांच्या लहरींवरतीं नाचूं या निर्भय चित्तीं,
अर्धोन्मीलित फुलवोनी लपूं चला कलिकांत कुणी
कविहृदयांत
गरके घेत
जाऊनियां खेळूं आतां हीं गाणीं गातां गातां
एखादी तरुणी रमण रमणाला आलिंगोनी,
लज्जामूढा भिरुच ती शंकित जर झाली चित्तीं
तिच्याच नयनीं
कुणी बिंबुनी
धीट तिला बनवा बाई; भलवा ग, रमणालाही
सुस्वप्नांनी गुंगवुनी पुण्यात्मे हसवा कोणी,
आशा ज्या त्यांच्या चित्तीं, त्याच रचा स्वप्नांवरतीं
दयितचिंतनीं,
विरहभावनीं
दिवसां ही झुरली बाला, भेटू द्या स्वपती हिजला
अनेक असले खेळ करूं प्रेमाशा विश्वांत भरूं
सोडुनियां अपुले श्वास जगीं नाचवूं उल्हास
प्रभातकाळीं
नामनिराळीं
होऊनियां आपण राहूं लोकांच्या मौजा पाहूं !




— बालकवी

22 January 2022

निर्झरास

गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !
कड्यांवरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयीं फुगड्या
घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभंवतीं;
जा हळुहळु वळसे घेत लपत-छपत हिरवाळींत;
पाचूंची हिरवीं रानें झुलव गडे, झुळझुळ गानें !
वसंतमंडप—वनराई आंब्याची पुढतीं येई.
श्रमलासी खेळुनि खेळ नीज सुखें क्षणभर बाळ !
हिं पुढचीं पिवळीं शेतें सळसळती–गाती गीते;
झोप कोठुनी तुला तरी ? हांस लाडक्या ! नाच करी.
बालझरा तूं बालगुणी, बांल्यचि रे ! भरिसी भुवनी !

बालतरू हे चोहिंकडे ताल तुला देतात गडे !
प्रेमभरें त्यांवर तूंही मुक्त-मणि उधळुनि देई !
बुदबुद–लहरी फुलवेली फुलव सारख्या भंवतालीं
सौंदर्ये हृदयांमधलीं दे विश्वी उधळून खुलीं !
गर्द सावल्या सुखदायी वेलींची फुगडी होई !
इवलालीं गवतावरतीं रानफुलें फुलती, हंसती.
झुलवित अपुले तुरे-तुरे निळीं लव्हाळीं दाट भरे.
जादूनेच तुझ्या बा रे ! वन नंदन बनलें सारें ?
सौंदर्याचा दिव्य झरा बालवसंतचि तूं चतुरा;
त्या लहरीलहरींमधुनी स्फूर्ति दिव्य भरिसी विपिनीं.

आकाशामधुनी जाती मेघांच्या सुंदर पंक्ती;
इंद्रधनूची कमान ती ती संध्या खुलते वरतीं,
रम्य तारका लुकलुकती नीलारुण फलकावरतीं;
शुभ्र चंद्रिका नाच करी स्वर्गधरेवर एकपरी;
हिं दिव्यें येती तुजला रात्रंदिन भेटायाला !
वेधुनि त्यांच्या तेजानें विसरुनियां अवघी भानें,
धुंद हृदय तव परोपरी मग उसळी लहरीलहरी
त्या लहरींमधुनी झरती दिव्य तुझ्या संगीततती !
नवल न, त्या प्राशायाला स्वर्गहि जर भूवर आला !
गंधर्वा ! तव गायन रे वेड लाविना कुणा बरें ?

पर्वत हा, ही दरीदरी तव गीतें भरलीं सारीं.
गाण्यानें भरलीं रानें वर-खाली गाणें ! गाणें !
गीतमय स्थिरचर झालें ! गीतमय ब्रम्हांड डुलें !
व्यक्त तसें अव्यक्तहि तें तव गीतें डुलतें-झुलतें !
मुरलीच्या काढित ताना वृंदावनिं खेळे कान्हा;
धुंद करूनि तो नादगुणें जडताही हंसवी गानें;
दिव्य तयाच्या वेणुपरी तूंहि निर्झरा ! नवलपरी
गाउनि हें झुळझुळ गान विश्वाचे हरिसी भान !
गोपि तुझ्या हिरव्या वेली रास खेळती भंवतालीं !
तुझ्या वेणुचा सूर तरी चराचरावर राज्य करी !

काव्यदेविचा प्राण खरा तूंच निर्झरा ! कवीश्वरा !
या दिव्याच्या धुंदिगुणें दिव्याला गासी गाणें.
मी कवितेचा दास, मला कवी बोलती जगांतला,
परि न झरे माझ्या गानीं दिव्यांची असली श्रेणी !
जडतेला खिळुनी राही हृदयबंध उकलत नाही !
दिव्यरसीं विरणें जीव जीवित हें याचे नांव;
तें जीवित न मिळे मातें मग कुठुनी असलीं गीतें ?
दिव्यांची सुंदरमाला ओंवाळी अक्षय तुजला !
तूंच खरा कविराज गुणी सरस्वतीचा कंठमणि
अक्षय तव गायन वाहे अक्षयांत नांदत राहे !

शिकवी रे, शिकवी मातें दिव्य तुझी असलीं गीतें !
फुलवेली—लहरी असल्या मम हृदयीं उसळोत खुल्या !
वृत्तिलता ठायींठायीं विकसूं दे सौंदर्याहीं !
प्रेमझरी—काव्यस्फूर्ति ती आत्मज्योती चित्तीं
प्रगटवुनी चौदा भुवनीं दिव्य तिचें पसरी पाणी !
अद्वैताचें राज्य गडे ! अविच्छिन्न मग चोहिंकडे !
प्रेमशांतिसौंदर्याहीं वेडावुनि वसुधामाई
मम हृदयीं गाईल गाणीं रम्य तुझ्या झुळझुळ वाणी !
आणि जसें सगळें रान गातें तव मंजुळ गान,
तेंवि सृष्टिची सतार ही गाईल मम गाणीं कांहीं !



— बालकवी

11 January 2022

कुणास्तव कुणीतरी

सरोष घन वर्षती, तरुलतांशिं वारा झुजे,
विराम नच ठाउका क्षणहि नाचतांना विजे;
भयानकचि संचरे, सकल सृष्टि हो घाबरी
कुणास्तव कुणीतरी सभय वाट पाहे घरीं !

रवप्रतिरवामुळें बधिर जीव सारे जरी;
निनाद करिते अहा ! श्रवण चाहुलीचा तरी;
उठे दचकुनी तडित् दुसरि नर्तनाला करी,
कुणास्तव कुणीतरी कितिक येरझारा करीं !

खुशाल कर वृष्टीला, तुज न तो भिणारा घना !
पिशाचसम तूं खुशाल कर गे विजे ! नर्तना.
महिधर समिरणा ! धरुनि लोळवीं भूवरी,
कुणास्तव कुणीतरी निघत जावयाला घरीं !

घनप्रसर माजला, नभिं न एक तारा दिसे,
परंतु हसरा सदा सुखद चंद्र गेहीं वसे;
अहा द्रवविता कुणा सहज चंद्रकांताप्रत ी
कुणास बघुनी कुणीतरि हंसेल हर्षे किती ?

अहा चरणधावना कलशपूर्ण उष्णोदकें,
रुचिप्रद वरान्न जें करिल हो सुधेला फिकें !
फुलांहुनि मऊ असें शयन रम्य मंचावरी,
कुणास्तव कुणीतरी घरिं अशी तयारी करीं !

रसाळ वचनावली, विविध तोंडि लावावया,
मिळेल, उपमा उरे मग न भोजनाला तया;
पडेल मग विस्मृती सकलही श्रमांची क्षणीं,
कुणाप्रति कुणीतरी निरखितां प्रसन्नेक्षणीं !

तया प्रणयनिर्झरा प्रणयनिर्झरीला तिला,
सदा सुखद भोंवरा विहरण्यास ऐशा मुला
बळेंच उठवी कुणी ! उभयतांस आलिंगुनी
कुणीतरि धरील तैं विषय अन्य कैंचा मनीं ?

तमास अपसारुनी उन पडेल त्या मंदिरीं,
तशात पडतील हो मधुनि पावसाच्या सरी,
कुणीतरि धरोनियां कर करीं कुणाचा तरी,
स्तवील परमेश्वरा जलद, सूर्य ज्याचा करीं !



— ना. वा. टिळक

29 December 2021

भीष्मप्रतिज्ञा

[श्र्लोक : स्वागता]

श्रोत्रयुग्म परिपूत कराया
सावधान जनमेजय राया
जो परेशरत धन्य अहो तो
गोष्पदोपम तया भय होतो II १ II

[ शिखरिणी ]

"प्रतिज्ञा जे केली यदुकुळवरें 'युद्ध न करीं
धरीं ना शस्त्रातें कदनसमयीं मी निजकरीं'
घडेना हें मिथ्थ्या जरि तरी न मी भागवत रे"
प्रतिज्ञेतें भीष्मे मनिं अवथिलें या दृढतरें II २ II

[ भुजंगप्रयात ]

पिता शंतनू माय ज्याची नदी जे
स्वयें शुद्ध ऐशास सन्मान दीजे
तसा गर्व तोही हरावा मनाचा
मनाचा असा भाव त्या वामनाचा II ३ II

नृपा ऐकिजे युद्ध देवव्रताचे
गमे हेचि साफल्य तूझ्या व्रताचे
रथी देखिले कृष्ण कौंतेय दोघे
म्हणे भीष्म माझ्या शराते यदो घे II ४ II

[ वसंततिलका ]

भीष्माकडे रव भयानक दूंदुभीचा
होतां वदे तनय आनकदूंदुभीचा
'दुश्चिन्ह आजि गमते मज सव्यसाची
जाती शिवा आशिव हे अपसव्य साची' II ५ II

गर्वोक्ति फाल्गुन वदे 'जगदेकराया
आहे असा कवण तो झगडा कराया ?
म्यां काळखंज वधिले अतुलप्रतापी
पौलोमही असुर गोसुरविप्रतापी' II ६ II

[ पृथ्वी ]

पितामह वदे तया 'प्रबळ तूं पृथानंदना !
रमेश रथिं सारथी चतुर वागवी स्यंदना
स्वयें गतवयस्क मी, सरस वीर तूं रे नवा
भिडें रणधुरंधरा ! जया घडो सुखें वा न वा' II ७ II

[ वसंततिलका ]

पारीक्षिता ! मग शरासन पांडवानें
ओढूनियां हुतवहार्पित खांडवानें
तों भीष्मदेह रचिला शरतांडवानें
ज्याच्या क्रिये सकळ पद्मभवांड वाने II ८ II

[ इंद्रवजा ]

गांगेय कोपा चढला कसा रें ?
ज्या मानिती हाचि कृतान्त सारे
गर्जोनियां सिंहरवें जयातें
पाहें जणों मारिल आज यातें II ९ II

[ वसंततिलका ]

'त्वां काय कर्म करिजे लघुलेंकरानें ?
बोलोनियां मग धनू धरिलें करांनें
तें व्यापिलें सकल सैन्य महाशरांनीं
भीष्मे, जसा पतित होय हुताश रानीं II १० II

[ इंद्रवजा ]

तो स्तोम येतां बहु सायकांचा
झालाचि पार्थव्यवसाय काचा
काचावला वीर पुढें धजेना
झाली नृपा ! सर्व भयांध सेना II ११ II

[ स्वागता ]

पुष्पवर्ण नटला पळसाचा
पार्थ सावध नसे पळ साचा
पहिलें जंव निदान तयाचें
तों दिसे वदन आनत याचें II १२ II

[ पृथ्वी ]

प्रतोद मग ठेविला उतरला रथाध:स्थळीं
म्हणे, 'प्रबळ भीष्म हा जय घडे न या दुर्बळीं
करीं कमळनेत्र तो प्रथित चक्र तें स्वीकरी
प्रमोद यमनंदना बहु तया यशस्वी करी II १३ II

[ शिखरिणी ]

असा येतां देखे रथ निकट तो श्यामल हरी
नृपा ! गांगेयाच्या हृदयिं भरल्या प्रेमलहरी
शरातें चापातें त्यजुनि वदला गद्गद रवें
'जगन्नाथें केलें मज सकळ लोकांत बरवें II १४ II

[ स्वागता ]

ये रथावरि झणीं यदुराया
खड्ग देईन विकोश कराया
तोडिं मस्तक पडो चरणीं या
धन्य होईन तदाच रणीं या II १५ II


[ शार्दूलविक्रीडित ]

मारावें मजला असेंचि असलें चित्ती तुझ्या केशवा
तैं माते मग कोण रक्षिल पहा विश्वेश नाकेश वा !
हा मुख्यार्थ जनार्दना ! मज गमे भक्तप्रतिज्ञा खरी
कीजे, सर्व जनांत होईल मृषा हे आपुली वैखरी' II १६ II

[ वसंततिलका ]

हे भीष्मवाक्य परिसोनि जगन्निवासें
केलें विलोकन मृदुस्मित पीतवासें
वेगें फिरोनि चढला मग तो रथातें
पार्थाचिया पुरविणार मनोरथातें II १७ II



— वामन पंडित


संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai

24 December 2021

महाराष्ट्र भूपाळी

प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा IIधुII

सह्याद्रिच्या सहस्र शिखरीं उन्नत झालेला
गोदा कृष्णा भीमा ह्यांनी पुनीत केलेला
पश्चिम सिंधु बंधु पाठिशी पूर्वोदधि जामात
विंध्याद्रीची ऊंची लक्षी सातपुडा प्रांत
अलंकार जयाचे पैठण पंढरपूर
आळंदी, चाफळ, देहू, तुळजापूर
किं पुणे, रायगड शिवनेरी सुंदर
रजःकणाला लावुनि भाळीं महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II १ II

वरी नाचणी भात पिकवितो कोंकणचा प्रांत
गहूं बाजरी कापुस शाळू देशावर होत
कांबळ खांदी वहाण पायीं डोईस मुंडासें
श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे
ते विळे कोयते शस्त्रें हीं हातिचीं
तीं बटी ठेंगणी भीमेच्या काठींचीं
मिळविती धुळीला कीर्ती बादशाहीची
वीरांना त्या वंदन अमुचें महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II २ II

वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा
धर्म रक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा
भगवा झेंडा धन्य करी हें आनंद-वन-भुवन
स्वातंत्र्याच्या जरिपटक्याला लक्षवेळ नमन
पुण्याई पुरली शिवभुपाची पुढें
पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे
साम्राज्य मराठी पसरे चोहोंकडे
स्मरणें स्फुरतें हृदय वाकतें महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ३ II

भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत
तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयात
ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची
श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची
एकनाथ, चोखा, गोरा, ज्ञानेश्वर
रामदास, तुकया, नामा, मुक्तेश्वर
नच जात पाहतो भक्तांची ईश्वर
संतमंडळा लववू माथा महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ४ II

मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा
सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा
गतवीरांचीं पुण्य चरित्रें गाऊनि अंगाई
बाळा करितें महाराष्ट्राची भगिनी वा आई
शोभवी अहिल्या होळकरांचे पुरी
ती सती रमा भट-वंशाला उद्धरी
स्वातंत्र्य-लक्ष्मी प्रचंड संगर करी
प्रणिपात असो ह्या देवींना महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ५ II



— दत्तो आप्पाजी ऊर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर

संकलन व संकल्पना: Shri Vilas Daoo, Mumbai