A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

14 January 2021

लेखन कसे असावे !

वाटोळें सरळें मोकळें l वोतलें मसीचें काळें ll
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे l मुक्तमाळा जैशा ll
अक्षरमात्र तितुकें नीट l नेमस्त पैस काने नीट ll
आडव्या मात्रा त्याहि नीट l आर्कुली वेलांट्या ll
पहिले अक्षर जे काढिलें l ग्रंथ संपेतो पाहात गेलें ll
येका टांकेंचि लिहिले l ऐसे वाटे ll
अक्षरांचे काळेपण l टांकांचें ठोसरपण ll
तैसेंचि वळण वांकण l सारिखेंची ll
वोळीस वोळ लागेना l आर्कुली मात्रा भेदीना ll
खालिले वोळीस स्पर्शेना l अथवा लंबाक्षर ll
पान शिषानें रेखाटावें l त्यावरी नेमकेचि ल्याहावें
दुरी जवळी न व्हावे l अंतर वोळीचें ll
कोठे शोधासी अडेना l चुकीं पाहता सापडेना ll
गरज केली हे घडेना l लेखकापासुनी ll
ज्याचे वय आहे नूतन l त्यानें ल्याहावें जपोन ll
जनासी पडे मोहन l ऐसें करावें ll
भोंवतें स्थळ सोडून द्यावे l मध्येंचि चमचमित ल्याहावें ll
कागद झडतांहि झडावें l नलगेचि अक्षर ll



— संत रामदास


मसी = शाई;   वोळी = ओळी;   ढाळ = आकार;   मुक्तमाळा = मोत्यांच्या माळा;   पैस= जागा

6 January 2021

गुंजारव

फुलाफुलांतून दलादलांतून
प्रत्येक क्षण वेचित मधुकण
आम्ही वन वन करितो वणवण
सहकाराने श्रमविभाजने
करितो साऱ्यासमान कार्या.
आम्ही संगी वसतो संधी
राज्य आमुचे मोहळ साचे
मधुचा संचय करितो अक्षय.
मेणाचे थर रचितो सुंदर
सेवातत्पर आम्ही नागर.
करी कुणी जर चाल अम्हांवर
तर मग आम्ही लाहीलाही—
होऊन उठतो धावत सुटतो
त्यासी डसतो आणि शासतो.
'जाय अकारण एकहि न क्षण,
अविश्रांत श्रम अविरत उद्यम,
यांविण जीवन म्हणजे जीव न—'
करिता गुणगुण आम्ही अनुदिन
करिता गुणगुण करितो नर्तन,
करिता नर्तन करितो गुणगुण.



— भवानीशंकर श्री. पंडित

1 January 2021

चांदूमामा डोकावतो

चांदूमामा डोकावतो लिंबोणीच्या झाडातून
सय बाळपणाची ग येते याजला देखून
मायमाउलीने मला हाच चांदोबा दावीत
कडेवर घेउनीया भरविला दूधभात
माझ्या मामाचा आठवे मला चिरेबंदी वाडा
अंगणात सये बाई ! खेळले मी दुडदुडा
काय सांगू बाळपणी किती भोगियले सुख
काय सांगू आजोळचे सये, तुला मी कौतुक ?
आजाआजींची लाडकी नात नव्या नवसाची
होते तशीच लाडकी भाची माझिया मामाची
लेत होते मोतियांची बाई, बिंदी या भांगात
नेसले मी चंद्रकळा चोळी खडीची अंगात
पायी लेवूनीया तशा वाळे साखळ्या तोरड्या
अंगणात खेळले मी झिम्मा आणिक फुगड्या
तेव्हाही ग डोकावून लिंबोणीच्या झाडातून
चांदूमामाने पाहिले खेळ आमुचे हासून
किती निश्चिन्त होते मी ममतेच्या त्या छायेत
देव्हाऱ्यात तेवणारी जणू समयीची ज्योत !



— शांता शेळके

1 December 2020

जाईंची फुलें

स्वागत केलें माझें, सन्मित्रा, त्वां फुलांस देऊन
झाला मोद मनाला प्रेमें त्यांचा सुगंध सेवून. ll १ ll

जीं 'दाराचीं 'फुलें त्वां अपुल्यां मज आणुनी दिलीं सुमनें
होता पुंज गुणांचा नव्हतीं तीं सत्य जाईचीं सुमनें. ll २ ll

कारण त्या पुष्पांनीं कथिलें भाषा स्वकीय बोलून
"वरिवरि हुंगुनि" आम्हां वेड्या देऊं नकोस फेकून. ll ३ ll

जे गुण असती साधे हितकर अंगात आमुच्या चार
घे शिकुनी त्यां योगें स्वर्गाचेंही खुलें तुला द्वार. ll ४ ll

जैसा परिमल अमुचा टाकी सज्जन मनास मोहून
तव कीर्तीचा परिमल जग मोहूं दशदिशीं दणाणून. ll ५ ll

आहे जगांत अमुचे निर्मल अतिशुभ्र सर्वदा रूप
तैसें तुझें असावें वर्तन त्या नच शिवो कधी पाप. ll ६ ll

आम्ही कोमल तैसें हृदय असावें तुझें सदा साच
कोमेजावें त्यानें दीनांचा पाहुनी जगीं जाच. ll ७ ll

रूप मनोहर अमुचें दिसतें परि तें नसे रहायाचें
जग हें असार सारें जें दिसतें तें अखेर जायाचें. ll ८ ll

इतुकें बोलुनि थकलीं, सुकलीं, मुकलीं स्वकीय तेजातें
जाईची दिव्य फुलें असलीं फेंकील कोण हो हातें. ll ९ ll

तीं धन्य रम्य कुसुमें, मित्रा तूं धन्य सत्य त्यांहून
मी धन्य धन्य कां कीं माझ्या तीं पावलीं करीं निधन. ll १० ll



— माधवानुज

30 November 2020

तेरड्याचे फुल

भाऊ, नवीन बघ हें फुल तेरड्याचे
सौंदर्य यावर किती विलसे मजेचे
हें स्पर्श कोमल किती सुखवी करांस
हा लाल रंग रमवीं मम लोचनांll १ ll

मिथ्या न तूं सकल जें वदतेस, ताई,
हें तेज सुंदर परी टिकणार नाहीं
त्वां पाहिलेंस तिसऱ्या दिवशीं फुलास
होशील तूं बघुनि त्यास तरी उदास ll २ ll

सौंदर्य वैभव दिसें रमणीय साचें
आहे परी सकल हें धन दों दिसांचें,
आणूनि हाच सुविचार मनीं विवेकीं
जें जाय वैभव लया पडती न शोकीं ll ३ ll

आतां मनांत धर एकचि गोष्ट ताई,
दैवें जरी तुजसी वैभव थोर येई,
मोहांत तूं पडुं नको क्षणही तयाचे
जाऊं नको विसरुनी फुल तेरड्याचें ll ४ ll


— माधवानुज

29 September 2020

अन्योक्ति - ज्याचे पल्लव

आंब्याविषयी

(शार्दूलविक्रीडित)
ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी
गंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी,
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला
आम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग कीं जाहला



बकान्योक्ती

[शिखरिणी]
उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनीयां
तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनीयां,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.

[पृथ्वी]
वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे
तयांत मज चंदनासम न एकही सांपडे,
जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी,
शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी



— कृष्णशास्त्री चिपळूणकर

सूर्यान्योक्ति

[शार्दूलविक्रीडित]

देखूनी उदया तुझ्या द्विजकुळें गाती अती हर्षुनी,
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी,
देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा,
अत्त्युच्चीं पदिं थोरही बिधडतो हा बोल आहे खरा.


— कृष्णशास्त्री चिपळूणकर

31 August 2020

सागर

आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपीत, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केंव्हा भांडत येते, सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा, जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवर

दर्यावरची रंगित मखमल उचलुन घेते कुणी
कृष्णसावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती, निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता, घरी जायला हवे



– कुसुमाग्रज


संकल्पना: श्री अनंत नायक, मडगांव

30 May 2020

ऋण

फिटेल कैसें ऋण ?
ना कळे, फिटेल कधिं हें ऋण ? ll ध्रु ll
वाळवंटिंचें रखरखतें उन्ह
मजस्तव हांसत माथां झेलुन
पोटीं ज्यांनीं मज कवटाळुन
वाढविलें निशिदिन;
तयांचे, फिटेल कैसें ऋण ? ll १ ll

गुंफुनियां कर नित माझ्या करिं
संगे येती कुणि छायेपरि
घरी, संगरीं, राजमंदिरीं—
करित पाठराखण;
तयांचें, फिटेल कैसें ऋण ? ll २ ll

विसरुनि अवगुणआपुलकीनें
थोरपणाचें चढवुनि लेणें
शिलाच मी, परि मज प्रेमानें
दिलें कुणीं प्रभुपण;
तयांचे, फिटेल कैसें ऋण ? ll ३ ll

मंथुनियां रससागर कोणी
मज पाजियली अमृतवाणी,
नवज्ञानांच्या उघडुनि खाणी—
उभे सखे, सज्जन;
तयांचें, फिटेल कैसें ऋण ? ll ४ ll

— आणि, उदात्तासाठीं ज्यांनीं
जीवन ज्योतीपरी जाळुनी
अंधारीं कधिं जातां बुडुनी
दिलें तेज पसरुन;
ततयांचें, फिटेल कैसें ऋण ? ll ५ ll

सातवार व शतदां जन्मुन
फिटायचें का ऋण हें हातुन ?
आनंदानें माथां वाहिन
तेंच मला भूषण;
ना कळे, फिटेल कैसें ऋण ? ll ६ ll



— वि. म. कुलकर्णी