आंब्याविषयी
(शार्दूलविक्रीडित)
ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी
गंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी,
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला
आम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग कीं जाहला
बकान्योक्ती
[शिखरिणी]
उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनीयां
तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनीयां,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.
[पृथ्वी]
वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे
तयांत मज चंदनासम न एकही सांपडे,
जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी,
शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी
— कृष्णशास्त्री चिपळूणकर
No comments:
Post a Comment