A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

4 January 2010

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे
झुबे लालसर ल्यावे कानी ;
जरा शीरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी.

शीळ खोल ये तळरानातून
भणभण वारा चढ़णीवरचा;
गालापाशी झील्मील लाडीक
स्वाद जीभेवर आंबट कच्चा.

नव्हती जाणीव आणि कुणाची
नव्हते स्वप्नही कुणी असावे;
डोंगर चढ़णीवर एकटे
किती फीरावे... उभे रहावे.

पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण;
झुरते तन मन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण ...

निवडुंगाच्या लाल झुब्याची,
टपोर हिरव्या करवंदाची ...


- इंदिरा संत

घाटातील वाट

घाटातली वाट,
काय तिचा थाट !
मुरकते, गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी-निळी परडी,
कोणी केली पालथी ?
पानं फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग, जणू
उभा काढून फडा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

घाटातली वाट,
काय तिचा थाट !
गाणी म्हणू, टाळ्या पिटू,
जाऊ रुबाबात ।।



— सरिता पदकी

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली....


- इंदिरा संत

लाडकी बाहुली

लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना, शोधुनी दुसर्‍या लाख

किति गोरी गोरी, गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती, उघडती निळे हासरे डोळे
अन् ओठ जसे की, अताच खुदकन हसले

अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितितरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली !

मी तीजसह गेले माळावर खेळाया
मी लपून म्हणते, 'साई सुट्ट्य हो ! या या !'
किति शोधशोधली कुठे न परी ती दिसली
परतले घरी मी होउन हिरमुसलेली !

वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी
शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण ? संतत पाउस-धार !
खळ मुळी न तिजला, वारा झोंबे फार

तिजसाठी रडले रात्रंदिन मी बाई
किति खेळ भोवती, हात लावला नाही !
स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळु माळावरती न्यावे

पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती !
कुणि गेली होती गाय तुडवुनी तिजला
पाहूनी दशा ती—रडूच आले मजला

मैत्रिणी म्हणाल्या, 'काय अहा, हे ध्यान !
केसांच्या झिपर्‍या—रंगहि गेला उडुन !'
परी आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली होती—माझी म्हणुनी !


— इंदिरा संत

पाऊस

पावसाच्या धारा, येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्यालें ओहळ, जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्यें तुडुंबलें जळ

ढगांवर वीज, झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसलीं पांखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

पावसाच्या धारा, डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरें शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धांवे जणूं नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानीं खुलतसें रंगदार छवी

थांबला पाऊस, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे, भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुलें

पावसात न्हाली, धरणी हांसली,
देवाजीच्या करणीने, मनी संतोषली !



कवयित्री — शांता ज. शेळके

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी.
माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची... अनोळखीची...
जाणीव गूढ आहे त्यास.
धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले
तन.. एक मन..
खसहिन्यात माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची
आरास पदराआडून हसली.
वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले.
कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात;
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो
आजीला माझे कुशल सांगा.

 शांता शेळके

माझा घोडा

टपटप टपटप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटीत वळवी अपुली कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत, चाले थोडा थोडा !

घोडा माझा घाली रिंगण,
उखडून टाकी सारे अंगण
कोणी त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा ?

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडील हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !


 शांता शेळके

अनंत

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरतीं खाली सर्व सांठलें वातावरण अनंत,
माप कशाचें, कुणा मोजितां, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेंही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी !
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा ?
विशाल वरतीं गगन नव्हे, हें विश्वाचें कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी ?
फार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी ?
अनंत सारें विश्व, जाहलें अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान ?
तव वैभव हें; तुझीं धनें हीं, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनी ? अनंत का होतील ?
तुझ्या कीर्तिचें माप गड्या का काळाला मोजील !
ज्ञान तुझें तूं म्हणशी 'जाईल', कोठवरी जाईल ?
'मी', 'माझे' या वृथा कल्पना, तूं कोणाचा कोण ?
कितेक गेले मी मी म्हणतां या चक्रीं चिरडून.


— बालकवी

चिमणीचा घरटा

चिंव चिंव चिंव रे !
तिकडे तूं कोण रे ?

'कावळे दादा, कावळे दादा,
माझा घरटा नेलास, बाबा ?'
'नाहीं ग बाई, चिमूताई,
तुझा घरटा कोण नेई ?'

'कपिला मावशी, कपिला मावशी,
घरटें मोडून तूं कां जाशी ?'
'नाहीं गं बाई, मोडीन कशी ?
मऊ गवत दिलें तुशीं'

'कोंबडी ताई, कोंबडी ताई
माझा घरटा पाहिलास बाई ?'
'नाहीं गं बाई मुळीं नाहीं
तुझा माझा संबंध कांहीं ?'

'आता बाई पाहूं कुठें ?
जाऊ कुठें ? राहूं कुठें ?'
गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला.

चिमणीला मग पोपट बोले,
'कां गं तुझे डोळे ओले ?'
'काय सांगू बाबा, तुला ?
माझा घरटा कोणी नेला ?'

'चिमुताई, चिमुताई,
माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई ?
पिंजरा किती छान माझा !
सगळा शीण जाईल तुझा'

'जळो तुझा पिंजरा मेला !
त्याचे नाव नको मला !
राहीन मी घरट्याविना !'
चिमणी उडून गेली राना.



— बालकवी