A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

14 October 2025

पवित्र मजला

पवित्र मजला जळजळीत ती
भूक श्रमांतुन पोसवणारी
पवित्र मजला दगडी निद्रा
दगडाची दुलई करणारी

पवित्र मज यंत्राची धडधड
समाजहृदयातिल हे ठोके
पवित्र मजला सत्यासाठी
धडपडणारे स्वतंत्र डोकें

पवित्र सुखदु:खाची गाणी
वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी
श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन

पवित्र मज पोलादी ठोसा
अन्यायाच्या छातीवरचा
पवित्र मजला आणिक गहिवर
माणुसकीचा माणुसकीचा


– विंदा करंदीकर

सोनूताई

कन्या झाली म्हणून,
नको करु हेळसांड
गोपूबाळाच्या शेजारी,
सोनूताईचा पाट मांड.

लेकाच्या परिस,
लेक ती काय उणी ?
हिरा नव्हे हिरकणी
माझी सोनूताई.

लाडकी सोनुताई
लाड करू मी कशाचा ?
चंद्रमा आकाशीचा
मागतसे.

आंबा मोहरला
मोहरला पानोपानी
बाबांच्या कडे तान्ही
सोनुताई.

माझ्या ग अंगणात
शेजीचे खेळे बाळ
त्याच्यासंगे शोभे
सोनुताई लडिवाळ.

बापाची लाडकी,
बाप म्हणे कुठे गेली ?
हासत दारी आली
सोनूताई.

कानांतले डूल
हालती लुटुलुटू
बोलते चुटुचुटू
सोनूताई.

साखळ्या वाळ्यांचा
नाद येतो माझ्या कानी
आली खेळूनिया तान्ही
सोनूताई.


– साने गुरूजी

13 October 2025

आभाळमाया

पावसा रे, पावसा रे,
मला पावसाचे ढग बनू दे.
डोंगर, दरी आणि शेतात,
मला खूप कोसळू दे.

शेतकरीबाबा, शेतकरीबाबा,
मला बी म्हणून पेरून दे.
शेत खूप पिकून पिकून,
तुम्हांला बरकत होऊ दे.

पणती गं, पणती गं,
मला दिवा होऊन जळू दे.
गरिबांच्या झोपडीत,
उजेड मला नेऊ दे.

पक्ष्या रे, पक्ष्या रे,
मला चोच आणि पंख फुटू दे.
तोंडात फळे घेऊन जाऊन,
भुकेकंगालांना वाटू दे.

परी गं, परी गं,
मला बागेत येऊ दे.
आनंदाने नाचगाण्यासाठी,
साऱ्यांना आभाळमाया मिळू दे.


– विलास सिंदगीकर

सहा ऋतू

झुळझुळ वारे वाहु लागले,
लाल पालवी तरूंवरी.
फळाफुलांनी लवल्या वेली,
आंबेराई मोहरली.
आभाळाचे निळेनिळेपण,
कुहू कुहू कोकीळा करी.
आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी !

ग्रीष्म पातला, सूर्य तापला,
ऊन कडक जिकडे तिकडे.
खूप तापते जमीन, तिजवर
जागोजागी पडती तडे.
गपचीप झाली सर्व पाखरे
छाये खाली लपती गुरे
गरम झळ्यांच्या ऐन दुपारी ऊन्हात खेळू नका बरे !

वारे सुटले, मेघ उसळले,
गडगडती ते आभाळी !
वीज कडकडे लखलख करूनी,
सर सर सर वर्षा आली.
सुटे मातीचा वास चहुंकडे,
हिरवेहिरवे गार दिसे
कागद-होड्या सोडायची पावसात किती मौज असे !

शरद येई, अन् मेघ पळाले
गुबगुबीत जणु पळति ससे !
कुरणे हिरवीगार चहुंकडे,
हिरवे हिरवे मळे तसे.
हिरवी झाडे, हिरवी शेते,
तुडुंब भरले तळे निळे.
चांदण्यात अन बागडण्याची हौस सारखी मनी उसळे

हेमंताचे दिवस पातले,
भरे हुडहुडी अंगात.
शेतकऱ्याची गोफण फिरते
गरगर भरल्या शेतात.
हवेहवेसे ऊन वाटते,
अंगणात आजी बसते
शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते !

उदासवाणा शिशिर ऋतू ये,
पाने पिवळी पडतात.
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे
झर झर झर झर गळतात
झडून पाने झाडे सारी
केविलवाणी दिसतात.
दिसें तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास !

सहा ऋतूंचे चाक फिरतसे,
शिशिर ऋतूही जाईल हां
वसंत सांगे ‘मीही येतो'
हळूच मागोमाग पाहा !


– अज्ञात

देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना ।
सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना ॥

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना ॥

जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना ॥

जाळुनी वैषम्य सारे वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची मूर्त होवो कल्पना
मुक्‍त आम्ही फक्‍त मानू बंधुतेच्या बंधना ॥


– वसंत बापट

9 October 2025

लवकुशाचा पाळणा




मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा ।
मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई ।
लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले ।
वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥

किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे
मग जाऊ या आपण सारी मिळुनी । बघण्यास अयोध्या भुवनी ।
अळी मळी गुपचिळी बरं का । सांगाल कुणाल जर का ।
कुस्करीन गाल हे बरं का । अन् इवलाले ओठ असे झाकुनी ।
ठेवीन मुके घेवोनी । मुके घेवोनी ॥२॥

मृत्यूत कोणी हासे

मृत्युत कोणि हासे, मृत्युस कोणि हसतो
कोणि हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो.

अश्रूत कोणि बुडतो, लपवीत कोणि अश्रू.
सोयीनुसार अपुल्या कोणि सुरात रडतो.

जनता धरी न पोटी साक्षात जनार्दनाला
जनतेस कोणि पोटी पचवून हार घेतो.

विजनी कुणी सुखी अन भरल्या घरात कोणि;
वनवास भोगणारा, दुःखात शांत गातो.

कोणी जुने-पुराणे विसरे न पीळ धागे,
कोणी तुटून पडला, सगळ्याच पार जातो.

कोणास मेघपंक्‍ती दाटून गच्च येतां
लागे तहान, कोणी नाचून तृप्त होतो.

कोणी दिव्याशिवाय होतो स्वतःच दीप
कोणी दिव्यावरी अन टाकून झेप देतो.


— आरती प्रभू

8 October 2025

आटपाट नगरात नांदे राजाची गं राणी

"आटपाट नगरात नांदे राजाची गं राणी नाव तिचे मैना राणी" ही खूप जुनी कविता आहे. बालभारतीच्या एका वाचकाने त्याच्या आईच्या आवाजात ती रेकॉर्ड केली आहे (जेवढी आठवली तेवढी).

 कविता ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

'Kiyu's world' यांचे आभार.

2 October 2025

सोहळा

नभ झाकळलेले वरती
मन धूसर आणि ढगाळ
गिरिशिखरांवरती धुंद
ओथंबुन वर्षाकाळ

सळसळत्या हिरव्या लाटा
बेहोष पिउनिया वारा
सर झिमझिमणारी मंद
मोत्यांचा उघळित चारा

लावण्य पोपटी गर्द
रसरसले रानोमाळ
अन्‌ कडेकपारींमधुनी
इवलाले शुभ्र खळाळ

मेघांचे काजळ काळे
घालुनिया डोळे निवले
हा मुग्ध सोहळा हिरवा
मौनाला अंकुर फुटले


— वृंदा लिमये