A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

29 January 2021

भाताचा हंगाम

देवाजीच्या नांवा घेऊनी
तयार व्हा रे करू कापणी
पहांट होता जाउं चला रे
पचंग बांधुनि तयार व्हा रे
खसाखसा मग विळा चालवा
चूड कापुनि घाला आडवा
चूडावरती चूड ठेवुनी
कडपें बनवा, खपा कसूनी
कापा ! कापा ! झटुनी सारे
कडपांचे मग बांधू भारे
उचलुनि डोकीवर ते घेउं
चला खळ्यावर झप झप जाउं
एकावरती दुसरा चढवा
भार्‍यांची ह्या उडवी बनवा

सांठवणी हि आज संपली
पुढे झोडणी करणें आली
देवाजीच्या नांवा घेतां
बरकत येते बहुतची भाता
झोडा भारे खळें भरेल
भाताची मग रास पडेल
शाबास तुमची ! भले बहादर !
काम उडवुनी द्याच भराभर
भाताची ही रास पडतसे
माचुंड्यांचा ढीग होतसे
घ्या घ्या आतां हाती सुपाला
वारा वाहे वारवण्याला
पाळींज, कचरा उडुनी जाई
निवळ खालती भातच राही
मोजुनि ते कणग्यांत सांठवा
देवाचे उपकार आठवा

फुगडी खेळू फिरकीची

फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची !

फिरतिल वेण्या गर गर गर
करतिल पैंजण थर थर थर
भुईवर चित्रे ग कमळाची
फुगडी खेळू फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची

गोरा गोरा एक मनोरा
फिरता तरिही उभा भोवरा
सीमा झाली ग हौसेची
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची !


— ग. दि. माडगुळकर

28 January 2021

माहेर


तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू गं बाई.
असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू गं बाई.
असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू गं बाई.
अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू गं बाई.
असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू गं बाई.
असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू गं बाई.
असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील गं बाई.
असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन गं बाई.
असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ गं बाई.
असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू गं बाई !

- सदाशिव माळी

भयचकित नमावें तुज रमणी

भयचकित नमावें तुज रमणी,
जन कसे तुडविती तुज चरणी ? ध्रु०

महाकवी, तत्त्वज्ञ, भूपती,
समरधुरधंर वीर धीरगति,
स्थितप्रज्ञ हरि उरीं कोंडिती,
प्रसव तयांचा तूं जननी. १

भूत निघाला तव उदरांतुन
वर्तमान घे अंकीं लोळण,
भविष्य पाही मुली, रात्रदिन
तव हांकेची वाट मनीं. २

तुझ्या कांतिनें चंद्र झळझळे;
फुला फुलपण मुली, तुजमुळे;
रत्नीं राग तुझा गे उजळे;
तुझ्यास्तवच हीं प्रिय भगिनी ! ३



 भा. रा. तांबे

27 January 2021

भारतमाता

प्रियतम अमुची भारतमाता
आम्ही सारी तिची मुले,
रंग वेगळे, गंध वेगळे
तरी येथली सर्व फुले ! ।।धृ।।

प्रिय आम्हांला येथील माती
प्रिय हे पाणी झुळझुळते,
प्रियकर ही डुलणारी शेते
प्रिय हे वारे सळसळते ।।१।।

प्रियतम अमुचा धवल हिमालय
बघे भिडाया जो गगना,
प्रियतम अमुचे सह्यविंध्य हे
प्रियतम या गंगा यमुना ।।२।।

मानव सारे समान असती
शिकवण ही जगतास दिली !
या मातेची मुले सद्गुणी
सर्व जगाला प्रिय झाली ! ।।३।।

प्रियतम अमुची भारतमाता
वंदन आम्ही तिला करू
या मातेची मुले लाडकी
सदा तिचा ध्वज उंच धरू ! ।।४।।


— शांता शेळके

26 January 2021

या हो सुर्यनारायणा !

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव
या हो सुर्यनारायणा !
या हो या लौकर
सोन्याच्या पावलांनी
भूषवा हे घर

अंगण सारवीले
रेखिले स्वस्तिक
हळदी-कुंकवानी
मंगलसूचक

उघडी दालने ही
स्वागता आतुर
या हो सुर्यनारायणा !
या हो या लौकर

आकाशाच्या मध्यभागी
आलात भास्करा,
तेजाच्या वर्षावात
झगमगे धरा

येऊ देत माझ्या घरी
किरणांचे झोत
तेजस्वी पित्याचे ते
वात्सल्याचे हात

उघडी तावदाने
झरोके कौलारी
रेंगाळोत घरामाजी
किरणे रुपेरी

सोन्याच्या वेशीतून
निरोप घेताना
या हो या अंगणात
सूर्यनारायणा !

आईच्या मायेहून
कोमल करांनी
गोंजारा बालकांना
खेळती अंगणी

रंगवा तावदान
शिणले अंतर
गुलाबी आनंदात
न्हाऊ दे संसार


— इंदिरा संत

14 January 2021

लेखन कसे असावे !

वाटोळें सरळें मोकळें l वोतलें मसीचें काळें ll
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे l मुक्तमाळा जैशा ll
अक्षरमात्र तितुकें नीट l नेमस्त पैस काने नीट ll
आडव्या मात्रा त्याहि नीट l आर्कुली वेलांट्या ll
पहिले अक्षर जे काढिलें l ग्रंथ संपेतो पाहात गेलें ll
येका टांकेंचि लिहिले l ऐसे वाटे ll
अक्षरांचे काळेपण l टांकांचें ठोसरपण ll
तैसेंचि वळण वांकण l सारिखेंची ll
वोळीस वोळ लागेना l आर्कुली मात्रा भेदीना ll
खालिले वोळीस स्पर्शेना l अथवा लंबाक्षर ll
पान शिषानें रेखाटावें l त्यावरी नेमकेचि ल्याहावें
दुरी जवळी न व्हावे l अंतर वोळीचें ll
कोठे शोधासी अडेना l चुकीं पाहता सापडेना ll
गरज केली हे घडेना l लेखकापासुनी ll
ज्याचे वय आहे नूतन l त्यानें ल्याहावें जपोन ll
जनासी पडे मोहन l ऐसें करावें ll
भोंवतें स्थळ सोडून द्यावे l मध्येंचि चमचमित ल्याहावें ll
कागद झडतांहि झडावें l नलगेचि अक्षर ll



— संत रामदास


मसी = शाई;   वोळी = ओळी;   ढाळ = आकार;   मुक्तमाळा = मोत्यांच्या माळा;   पैस= जागा

6 January 2021

गुंजारव

फुलाफुलांतून दलादलांतून
प्रत्येक क्षण वेचित मधुकण
आम्ही वन वन करितो वणवण
सहकाराने श्रमविभाजने
करितो साऱ्यासमान कार्या.
आम्ही संगी वसतो संधी
राज्य आमुचे मोहळ साचे
मधुचा संचय करितो अक्षय.
मेणाचे थर रचितो सुंदर
सेवातत्पर आम्ही नागर.
करी कुणी जर चाल अम्हांवर
तर मग आम्ही लाहीलाही—
होऊन उठतो धावत सुटतो
त्यासी डसतो आणि शासतो.
'जाय अकारण एकहि न क्षण,
अविश्रांत श्रम अविरत उद्यम,
यांविण जीवन म्हणजे जीव न—'
करिता गुणगुण आम्ही अनुदिन
करिता गुणगुण करितो नर्तन,
करिता नर्तन करितो गुणगुण.



— भवानीशंकर श्री. पंडित

1 January 2021

चांदूमामा डोकावतो

चांदूमामा डोकावतो लिंबोणीच्या झाडातून
सय बाळपणाची ग येते याजला देखून
मायमाउलीने मला हाच चांदोबा दावीत
कडेवर घेउनीया भरविला दूधभात
माझ्या मामाचा आठवे मला चिरेबंदी वाडा
अंगणात सये बाई ! खेळले मी दुडदुडा
काय सांगू बाळपणी किती भोगियले सुख
काय सांगू आजोळचे सये, तुला मी कौतुक ?
आजाआजींची लाडकी नात नव्या नवसाची
होते तशीच लाडकी भाची माझिया मामाची
लेत होते मोतियांची बाई, बिंदी या भांगात
नेसले मी चंद्रकळा चोळी खडीची अंगात
पायी लेवूनीया तशा वाळे साखळ्या तोरड्या
अंगणात खेळले मी झिम्मा आणिक फुगड्या
तेव्हाही ग डोकावून लिंबोणीच्या झाडातून
चांदूमामाने पाहिले खेळ आमुचे हासून
किती निश्चिन्त होते मी ममतेच्या त्या छायेत
देव्हाऱ्यात तेवणारी जणू समयीची ज्योत !



— शांता शेळके