A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

15 January 2010

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे


 ग. दि. माडगुळकर

14 January 2010

डरांव डरांव!

डरांव डरांव! डरांव डरांव!
का ओरडता उगाच राव?
पत्ता तुमचा नव्ह्ता काल
चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई
कोठुनी आला? सांगा नाव

धो धो पाउस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डरांव डरांव!

बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव.

जा गाठा जा, अपुला गाव
आणि थांबवा डरांव डरांव!


— ग. ह. पाटिल

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातून बोलविले
भरात येउनि नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते !


– ना. धों. महानोर

आभाळाची अम्ही लेकरे

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ–रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही


— वसंत बापट

झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया


— ग. दि. माडगूळकर

सांग मला रे सांग मला

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


 ग.दि. माडगूळकर

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
टाळ चिपळ्यांची साथ,
वाजताहे रानवारा
चिवारीच्या झुडुपांत !

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाला आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत !

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी !

गावानेच उंच केला—
हात दैवी प्रसादास,
भिजुनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस.

निसर्गाने दिले धन—
—द्यावे दुसऱ्यां, जाणुनी,
झाली छप्परे उदार
आल्या पागोळ्या अंगणी !

स्नान झाले धरणीचे
पडे सोन्याचा प्रकाश !
आता बसेल माउली
अन्नब्रम्हाच्या पूजेस !



— ग. दि. माडगुळकर

केवढे हे क्रौर्य!

(पृथ्वी)

क्षणोक्षणि पडे, उठे, परि बळें, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झांपडी;
किती घळघळां गळे रुधिर कोमलांगांतुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
म्हणे निजशिशूंप्रती, 'अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतिचा कवळ एक मी आणिला;
करा मधुर हा ! चला ! भरवितें तुम्हां एकदां,
करो जतन यापुढें प्रभु पिता अनाथां सदा !
अहा ! मधुर गाउनी रमविलें सकाळी जनां,
कृतघ्न मज मारितील नच ही मनीं कल्पना !
तुम्हांस्तव मुखीं सुखें धरुनि घांस झाडावरी
क्षणैक बसलें न तों, शिरत बाण माझ्या उरीं !
निघून नरजातिला रमविण्यांत गेलें वय,
म्हणून वधिलें मला ! किति दया ! कसा हा नय !
उदार बहु शूर हा नर खरोखरीं जाहला
वधून मज पांखरा निरपराध कीं दुर्बला !
म्हणाल, 'भुलली जगा, विसरली प्रियां लेंकरां'
म्हणून अतिसंकटें उडत पातलें मी घरा;
नसे लवहि उष्णता, नच कुशींत माझ्या शिरा,
स्मरा मज-बरोबरी परि दयाघना ईश्वरा. '
असो; रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणूनि तरुच्या तळीं निजलि ती द्विजा भूवरी;
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य तें उत्पल,
नरें धरुनि नाशिलें, खचित थोर बुध्दि, बल.

(वसंततिलका)
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केलें वरी उदर पांडुर निष्कलंक !
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले !



— नारायण वामन टिळक


नय = नीति; उत्पल = कमल

8 January 2010

रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडूमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकासि दे, करटि भूपाप्रति,
झाड खटखट तुझें खड्ग क्षुद्रां !

जल तडांगी सडे, बुडबुडे, तडतडे—
"शांति ही!" बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वि नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले—
दे जयांचें तयां वीरभद्रा!



— भा. रा. तांबे